मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय २३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । दशरथ वसिष्ठास विनवीत । वैशाख कृष्ण चतुर्थीचें व्रत । आता सांगावें मजप्रत । मुनिशार्दूला अतृप्त मी ॥१॥
वसिष्ठ तेव्हां महिमा सांगत । अगस्त्य मुनींचा वृत्तान्त । समुद्रशोषणीं होता रत । परी तें त्यासी जमेना ॥२॥
तेव्हां महातेजस्वी तो जात । ब्रह्मदेवासी शरण विनीत । ब्रह्मा तयासी सांगत । वैशाखी संकष्टीचें व्रत ॥३॥
तेव्हां तो हें व्रत करित । विधिपूर्वक श्रद्धायुक्त । सर्व मुनिसत्तमांसमवेत । नित्य मंत्र परायण ॥४॥
दशरथ विचारी वसिष्ठाप्रत । अगस्त्यासी कैसी विस्मृति होत । कैसा तो जाहला व्रतहीन कुंठित । महाद्युती तें सांगा ॥५॥
वसिष्ठ म्हणे नृपा प्रश्न । विचारलास तूं विचक्षण । आतां वृत्त सांगतों भावपूर्ण । संक्षेपानें तें तुज ॥६॥
अगस्त्य एकदा तप करित । अति दारुण निश्चययुक्त । त्याच्या सम कोणी न जगांत । राजेंद्रा ब्राह्मण तपस्व्यांत ॥७॥
परी अज्ञानानें हें व्रत । त्यानें न केले पुनीत । त्याचें कारण तुजप्रत । सांगतो संशय दूर कराया ॥८॥
वेदशास्त्र पुराणांत । कर्मे नानाविध असत । तीं सर्व करण्या असत । शक्ति कोणा मानवाची ॥९॥
स्वेच्छेनें कर्मांचा कर्ता होत । मानव या जगतांत । त्यांत एक सुगम मार्ग तुजप्रत । सांगतो दे अवधान ॥१०॥
नित्य तैसे नैमित्तिक । द्विविध कर्म असे शास्त्रसंमत । अगस्त्य त्यांतले आचरित । नित्य कर्म महीपते ॥११॥
अन्य व्रतादिक समस्त । त्यागून तो विधि समन्वित । तपास देई महत्त्व अत्यंत । त्याहून श्रेष्ठ अन्य न मानी ॥१२॥
तपोधन तो त्या गर्वांत । हें संकष्टीचें व्रत न करित । सांगतों रहस्य तुजप्रत । ऐक सारें मनोभावें ॥१३॥
गणेशभजन मुख्य असत । यांत संशय कांहीं नसत । सर्वधिसिद्धिकर तें ख्यात । वेदादींतही वर्णिलें असे ॥१४॥
राजशार्दूला तथापि जन । संस्कारहीन होऊन । न भजती ब्रह्मनायका महान । गणेशासी अज्ञानानें ॥१५॥
तपानें पापें जळतीं । पुण्याची होय उत्पत्ती । त्या पुण्यप्रभावें गणेशभक्ति । उपजते चित्तीं उपासकाच्या ॥१६॥
म्हणून तपःप्रभावें युक्त । अगस्त्य हा श्रेष्ठ तेजस्व्यांत । जाहला पात्र ज्ञानाप्रंत । गणेशाच्या तपोयोगें ॥१७॥
होऊन क्रोधसंतप्त । वातापिरक्षका सागरांतून त्वरित । शोषविण्या तो यत्न करित । परी असफल तें जाहला ॥१८॥
तेव्हां होऊन मनीं विस्मित । ब्रह्मदेवाजवळीं जात । तयाला म्हणे सांगा मजप्रत । आश्चर्य हें काय घडलें ॥१९॥
तपें जलधि शोषण्या शक्त । परी आज माझी शक्ति कुंठित । का जाहलीं ते न समजत । आपण सांगावें कारण ॥२०॥
ब्रह्मदेव तेव्हां बोले वचन । ऐक महाभागा कारण । नित्य कर्मपर होऊन । सदा तप तूं आचरलास ॥२१॥
गणेशाचें भजन तैसें पूजन । नित्य करिशी तूं महान । परी नैमित्तिक व्रत पावन । चतुर्थीचें विसरलास ॥२२॥
तूं तें संकष्टीचें व्रत । त्यागिलेस म्हणोनि असफल होत । सर्व तुझें मनोवांछित । आतां करी तें व्रत मुख्य ॥२३॥
चार पुरुषार्थांचे दायक । शास्त्रसंमत पावक । तें ना करितां कुंठित साशंक । मति होय मानवाची ॥२४॥
तरी हें वैशाख संकष्टीचें व्रत । करशील तूं श्रद्धायुक्त । तरी संकट टळून जगतांत । पूर्णयोगी होशील ॥२५॥
गाणपत्यपद पावशील । ऐसें  ऐकून वचन अमर । अगस्त्य करी व्रत निर्मळ । गाणेश्वराचें हें सदा ॥२६॥
त्यायोगें पुरुषार्थयुक्त । होऊन समुद्रा शोषवित । व्रतपुण्याचा प्रभाव अद्‌भुत । ऐसा प्रथम तें अनुभविल ॥२७॥
तेव्हांपासून अचल भक्ति । गणनाथाची करी स्वचित्तीं । मुनींद्रासही व्रतमहती । सांगितली तयानें ॥२८॥
नित्य वृत्तान्त मुख्य हें व्रत । सर्वार्थसिद्धिप्रद असत । अन्यही एक वृत्तान्त । सांगतों तुज पुण्यप्रद ॥२९॥
अवंती नगरींत वैश्य राहत । पापी दुराचारी अत्यंत । बाल्यापासून तो आचरत । महा अद्‌भुत पापें सदा ॥३०॥
तो मातेचा वध करित । द्रव्यलोभें पित्यास मारित । गुरुचाही द्रोह करित । ब्रह्म हत्या त्यास घडली ॥३१॥
तेव्हां लोक नृपाप्रती । सांगती सर्व त्याची कृती । तेव्हां तत्क्षणीं त्यास करिती । हद्दपार राज्याधिकारी ॥३२॥
तेव्हां तो गेला वनांत । राहू लागला गुहेंत । मार्गस्थ लोकांसि मारित । नानाविध जीवां ठार करी ॥३३॥
नंतर बहु संपन्न होत । दुसरे चोर त्याचा आश्रय घेत । त्यांच्या साहाय्यें बांधित । दुर्गम एक दुर्ग तो ॥३४॥
पर्वताच्या गुहेंत । महाखळ तो घर बांधित । चोर तेथ झोपण्यास येत । अन्यथा फिरती जे जगीं ॥३५॥
त्यांचा राजा तो होत । भार्येस आपुल्या अगणित । पुत्रपुत्री समन्वित । यथेच्छ भोग भोगितसे ॥३६॥
चौर्यपरायण चोरांसमवेत । तो दुर्मति कदापि न करित । लेश मात्रही पुण्य जगांत । मतिभ्रष्ट तो जाहला ॥३७॥
पाहतां परस्त्री मार्गांत । तो तिजला भ्रष्ट करित । कांहीं स्त्रिया मरण पावत । शीलभंताच्या भीतीनें ॥३८॥
अवंतीपालका लोक निवेदित । त्या चोरांची हकीगत । तेव्हां मार्ग रोधून उद्यत । चोरमुख्यासी मारावया ॥३९॥
दाही दिशांत राजा पाठवित । आपुले सैनिक त्वरित । त्या दुष्टासी ते रोखित । अंतीं पकडला तयांसी ॥४०॥
अन्य चोरांसमवेत । सर्वांसी ते पकडून नेत । राजास सारा वृत्तान्त । कथन करिती त्या दुष्टाचा ॥४१॥
राजानें अन्य चोरांस मारिले । परी त्या वैश्या बंधनीं टाकिलें । राजपुरुष नित्य ताडित झाले । दुष्टासी त्या अतिभयंकर ॥४२॥
पुढे वैशाखी संकष्टी येत । कृष्ण पक्षांतली पुनीत । त्य दिवशी तुरुंगांत । वैश्या त्या खावया न मिळाले ॥४३॥
नित्य मार खाऊनी जर्जर । झाला अत्यंत क्षुधातुर । तो पापी दिवस समग्र । उपवास घडून विहवळला ॥४४॥
परी थंद्रोदय होता येत । दया त्याची राजदूतांप्रत । ते त्यांस खावया देत । तें भक्षिलें तेणें सत्वर ॥४५॥
पंचमी उजाडता झाला मृत । बंधनीं मार भीषण असत । परे न कळत घडून व्रत । गणेशसायुज्य पावला ॥४६॥
अन्तीं स्वानंदपुरांत जाऊन । राहिला आनंदात । ऐसा हा असे वृत्तान्त । दुष्ट पापी दुरात्म्याचा ॥४७॥
तो ही उद्धरला जगांत । तरी जाणून जे जन व्रत करित । त्यांचें पुण्य अगणित । अनेक जन मुक्त जाहलें ॥४८॥
त्या समस्तांचें वर्णन । करण्या अशक्य मान । ऐसें हें वैशाखी कृष्ण चतुर्थीचें महिमान । ऐकतां वाचितां परमपदप्राप्ती ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते वैशाखकृष्णचतुर्थीचरितं नाम त्रयोविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP