मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ४|

खंड ४ - अध्याय ३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल सांगती दक्षाप्रती । गणपती तदनंतर जाती । अन्य सर्व तिथींपुढती । म्हणती मागा इच्छित वर ॥१॥
गणपतीचें वाक्य ऐकून । तिथी गणनायका वंदून । नंतर पूजा करुन । स्तुति करिती तयाची ॥२॥
गजाननासी त्या प्रार्थिती । जरी वर देशी आम्हांप्रती । तरी आमुचें कार्य या जगतीं । काय तें सांगा दयासिंधू ॥३॥
आपापल्या त्या उचित कार्यांत । देवा सामर्थ्य देई अद्‌भुत । भक्ती तुझ्या पायीं अविरत । दृढतर सर्व मान्य देई ॥४॥
त्यांचें तें वचन ऐकून । सर्वांसी हितकारक बोले वचन । प्रजानाथा दक्षा तें गजानन । तेव्हा सांगता जाहला ॥५॥
माझी भक्ति अत्यंत । राहील तुमच्या चित्तांत । तुम्ही महाभागा पुण्यभाग ख्यात । तिथींनो या जगांत ॥६॥
माझ्या कलांशांतून जन्म पावले । त्यांसी तुम्हीं पाहिजे तोषविलें । तुमच्यासहित देव भले । जनांस प्रीतिपद होवोत ॥७॥
जे नर प्रतिपदा दिनीं पूजतील । हुतद्रव्यें अग्नीस अमल । दुग्धाहार राहतील । व्रतामध्ये रत सर्वदा ॥८॥
उपोषण करुन देवांसी आराधती । त्यासी देव ईप्सित देती । ते मरणानंतर उपभोगिती । विविध भोग अग्निलोकांत ॥९॥
अग्नितुल्य प्रकाशयुक्त । ऐशा विमानांतून गगनीं संचरत । यांत संदेह अल्प नसत । प्रतिपदेचें हें व्रत करणारे ॥१०॥
ब्रह्मार्पण स्वभावें माझ्यांत । अंतीं ते एकरुप होत । द्वितीयेस आश्विनांत पूजित । पत्राहार समायुक्त ॥११॥
ते रुपसंपन्न होती । येथ अखिल भोग भोगिती । अंतीं सलोकता लाभती । देवमान्य होऊनिया ॥१२॥
ब्रह्मार्पण स्वभावें द्वितीयेचें व्रत । जे करती माझे भक्त । ते माझ्या स्वानंदांत । लीन होतील निश्चयें ॥१३॥
तृतीयेस महाशक्ति पूजिती । लवण आहार वर्जिती । सर्व सौभाग्यद्रव्यें उपासिती । भक्तिपूर्वक जे जन ॥१४॥
ते शक्तिलोकांत जाऊन । अनंत भोगभोगून । ब्रह्मार्पण तेणें अंती लीन । माझ्या लोकांत होतील ॥१५॥
पंचमीस नागमुख्यासी पूजित । दुधाचें स्नान त्यास घालित । आम्ल पदार्थ भोजन वर्जित । नागलोकांत तो जाई ॥१६॥
तेथ नाना भोग भोगून । अंतीं निष्काम होऊन । माझ्या लोकीं आगमन । करील तो निश्चयें ॥१७॥
षष्ठी तिथीस स्कंदासी पूजित । फलाहार जो त्या दिनीं करित । तो महाभोग भोगित । कार्तिकेयाच्या लोकांत ॥१८॥
निष्काम भाव होऊन । अंतीं स्वानंदांत गमन । सर्व भावांचे नियमन करुन । शुक्लगतीनें क्रमें जातो ॥१९॥
सप्तमीस उपोषण करुन । सूर्याचें करी पूजन । तो सूर्यलोकीं जाऊन । प्रचुर भोग भोगी ॥२०॥
अंतीं निष्काम व्रतानें प्रवेशत । महालय समयीं स्वानंदांत । होऊन सदेह ब्रह्मभूत । अद्वैत माझें लाभेल ॥२१॥
अष्टमीस मातृकांचें पूजन । बिल्व आहारमय अन्न सेवून । करी जो भक्तिपूर्ण मन । मातृलोकांत जाईल तो ॥२२॥
मदर्पण स्वभावें व्रत परायण असत । तोही माझ्या लोकीं येत । नवमीस दुर्गेचें पूजन करित । पीठ खाऊन जो नर ॥२३॥
तो दुर्गा लोकांत भोगत । दिव्य भोग समस्त । ब्रह्मार्पण स्वभावें प्रवेशत । माझ्या लोकीं शुक्ल गतीनें ॥२४॥
दशमीस दिशा प्रमुखांशी पूजित । व्रतसंस्थ जो दधि भक्षण करित । तो इहलोकीं भोगून भोग समस्त । अंतीं दिगीश लोक लाभेल ॥२५॥
तो ही निष्कामभावें ब्रह्मभूत । पावतो माझे अद्वैत । एकादशीस कुबेरा पूजित । वह्रीनें पक्व अन्न वर्जून ॥२६॥
तोही आपुल्या भक्तियोएं लाभत । नाना भोग कुबेर लोकांत । ब्रह्मार्पण स्वभावें करितां हें व्रत । सुखी सदैव होईल ॥२७॥
द्वादशीस विष्णूस पूजित । घृत भोजन सेवन करीत । तो वैकुंठ लोकीं जात । नाना भोग परायण ॥२८॥
परी ब्रह्मार्पण स्वभावें जो हें व्रत । माझ्या महालयसमयीं करित । तो माझ्या लोकीं प्रवेशत । अंतीं ब्रह्ममय होतसे ॥२९॥
त्रयोदशीस धर्मासी पूजित । क्षीर भोजन सेवन करित । तो जाऊन धर्मलोकांत । विविध सुखें भोगत ॥३०॥
ब्रह्मार्पण स्वभावें त्रयोदशी साधित । तो स्वानंदीं प्रवेशत । अंतीं ब्रह्मभूत होत । ऐसें माहात्म्य या व्रताचें ॥३१॥
चतुर्दंशीस करी शिवपूजन । भक्तियुक्त ठेवोनियां मन । उपोषण त्या दिनीं करुन । गोधूम अन्नानें पारणा करी ॥३२॥
ऐसें जो व्रत करित । तो कैलासलोकीं जात । निष्कामचित्त जरी असत । तरी अंतीं मन्मय होई ॥३३॥
पौर्णिमेस चंद्रादि देवांसी पूजित । देवगणांसी जो आराधित । तो चंद्रलोकी प्रवेशत । अखिल भोग येथ भोगून ॥३४॥
जरी तो निष्काम चित्त असत । तरी अंतीं ब्रह्ममय होत । उपोषण समायुक्त । अर्घ्यदान चंद्रासी करी ॥३५॥
रात्रीं एकदा भोजन करी । सर्व देवांची पूजा करी । पौर्णिमा ही चेतोहारी । सर्व देवमयी चांद्री ॥३६॥
ऐसी ही पुण्यप्रद तिथि ख्यात । आतां ऐका अमावास्येचें व्रत । पितृपरायण तर्पण करित । त्या दिनीं जो भक्तिभावें ॥३७॥
तो संतोषवी पितरांस । करुनिया उपोषणास । लाभतो सर्वार्थ त्यास । अंतीं प्रवेशत पितृलोकीं ॥३८॥
परी होता निष्कामचित्त । अंतीं लय पावे स्वानंदांत । ऐशा शुक्ल कृष्णा तिथी असत । सदा पूजनीय व्रतकर्त्यासी ॥३९॥
ऐशी भावबळ पूजा करित । तो सर्व अर्थकाम लाभत । माझ्या प्रियतिथी हया समस्त । प्रभाव त्यावरी देवांचा ॥४०॥
जे देव माझ्या कलांशांनी संयुक्त । म्हणोनि असती बलवंत । जे चतुर्थी व्रत न करित । त्यांचे निरर्थक सर्व कार्य ॥४१॥
म्हणून चतुर्थी संयुक्त । तुम्ही मानार्ह समस्त । कालमानें पूजनीय जगांत । ऐसे सांगे गणवल्लभ ॥४२॥
नंतर गणेश अंतर्धान पावत । तेव्हांपासून तिथियुक्त व्रत । दक्षा जाहलें प्रख्यात । गणेश महिमा प्रवर्तक ॥४३॥
चतुर्थीचे महिमान । तैसेचि हे अन्य तिथींचे पावन । ऐकेल अथवा वाचील प्रसन्न । तो नर सर्वार्थ मिळवील ॥४४॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते प्रतिपदाव्रतवर्णनं नाम तृतीयोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP