मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
शहरांतील मजुरांचीं कामावरील गीतें

शहरांतील मजुरांचीं कामावरील गीतें

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.एक नार होती बाजिंदी डोईवर पाटी उभी दर्या काठीं ।
अग अग बाई तिकडून आला सोजीर कीं पडली मिठी ।
नको नको म्हणताना आला बळकटी हिची सुटली गाठी ।
नार तशीच पळाली उघडीन माय पोटीं ।
जातीचा होता रामोशी हमाल कामाठी  याची पान ग देठी ।
अग अग बाई यांनी नेसाया दिलं धोतर रेशमीकाठीं ।
नार हिंडती पाडापाडा कुलाबा सारा कामाठपुरा ।
अग अग बाई हिचा कुठं लागना थारा ।
नार गेली होती बंगल्याला करमली रात ।
येवढ्या रातीच रुपये कमावल साठ ।

२.
बाळ बुटाची चोळी हौसाची कोणच्या बाजारची ग ।
नवलाखाचा पैसाद घेऊन माई गेली र हाटाला ।
माई गेली र हाटाला चोळीचा खण पाहूं लागली ।
घरीं जाऊन मतलब झालं शिंप्याला बोलविला ।
वरी बेत घेतला चोळी काय शिवून तयार केली ।
शिवून तयार केली पोरीनं अंगामधी घातली ।
अंगामधी घातली पोरीची सुरत लागून गेली ।
बाळपणाचा मित्र बोल चोळी कुणी शिवली ।
जाईजुईच्या झाडाखालीं दोहीची लटपट झाली ।
दोहीची लटपट झाली पोरीची उरीं चोळी चिरली ।
घागर घेऊन चुंबळ केली नार गेली पाण्याला ।
मुशाफर उभा वावडीला ।
गिरगिर गिरकी येऊन पडला धरणीला ।
पडला धरणीला सुताचा झपाटा झाला ।
मानखालीं हात घालुनी उठवती  त्याला ।
उठूनशानी साजिवत झाला हातामधीं रुपया दिला ।
घागर घेऊन चुंबळ केली नार आली आपल्य़ा घरला ।

३.
हातीं सोन्याच गोठ ल्येलें सोंकटाचा पाट ।
आज खेळू चला हो खेळू चला ।
खातो माजुमची वडी वर सुका गांजा ओढी ।
सदा निशामधीं आली गांजाची तार ।
मला करी  हाणमार याचा सोसूं किती कहार ।
याला सांगा तुमी ।
आला सणामधीं सण तशामधीं आलें न्हाण ।
तुम्हां खाया देतें पान आज घरला चला ।

४.
सखा ग बाई गुलाबाची छडी ।
सखा ठाण्याच्या तुरुंगांत याच्या लिवलय दैवांत ।
आला ग बाई दसर्‍याचा सण हातामधीं थाळा घेऊन ग ।
सख्याला ओवाळील कोण ? सख्या ग बाई
आला ग बाई शिमग्याचा सण हातामधीं पिचकारी घेऊन ।
सख्या संग र खेळल कोण ?॥ सखा ग बाई
आला ग बाई सकरातीचा सण हातमधीं तिळगूळ घेऊन ।
सख्या संग गोड बोलल कोण ? सखा ग बाई

५.
जीजाबाई बोलती साहेबाला । पैसा दे गंगेच्या लग्नाला ।
सून होईल हाताखालीं राबवायला । मूल होईल मांडीवर खेळवायला ।
म्हातारी मेली सडकेला । मुरुमाची माती तिच्या हाडकाला ।

६.
चुटुक चांदण्यांत पलंग काय टाकलाय अंगणांत ।
तिथं नाहीं करमत चला जाऊं लाल बागेंत ।
लाल बागेची हवा काय वो न्यारी ।
फुलांचा वास सुंदर मांडीवर बस ।
तुमच्या मांडीवर बसतें मी स्वामी ।
जीव माझा लहान घालीते गळ्याची आण ।
चित्र शाळेला लिवाया जाती अक्षर बरोबरी ।
साळुचा हात खांद्यावरी ।

७.
मुरली बजाव र बजाव मुरलीवाला ।
सईबाई कान्हान डाव मांडिला ।
डाव यांनी मांडिला मांडिला गोपीनाथ ।
चेंडू गेला पाताळीं त्रिभुवनांत ।
लिंब द्राक्ष लोंबती ।
त्याला बाई पाखरं झोंबती ।
येक येक ग लिंबू मी झेलीत गेली ।
ब्रह्मादेवाला सांगीत गेली ।
ब्रम्ह्या देवाची हो निळी घोडी ।
त्याजवर बसुनी कमळ तोडी ।
सीताफळीच्या झाडाला टाप मारीला ।
तिथं विंचूनीं नारीला डंका दिला ।
बोलव हरी बसव पलंगावरी ।
मथुरे तांदुळ टाकीतो अंगावरी ।
जाईजुईच्या कळ्या झोकीतो अंगावरी ।
अबीरबुका झुपीतो गळ्यावरी ।
नारीचा इचु उतरतो नानापरी ।

८.
कुण्या सावकाराची सुन । दुकानावर विक्री कर बसून ।
हिचा भ्रातार गेला वंजवकारण ग ।
आला आला जानीचा भर । नेसली पिवळं पीतांबर ।
धुणं धुवाया निघून चालली सुंदर ग ।
काढला गळ्यांतील हार । ठिवला जणुं बेटावर ।
खालीं वाकून धुणं धुती सुंदर ग ।
कुण्या राजाचा पुत्र । गेला शिकारीकारण ।
शिकार काय खेळून चाललाय आपल्याच मार्गानं ग ।
आवो आवो राजेश्री एवढा हार द्या काढून ।
दिला हातावरी हात इमान बघ झालंय जंगलांत ।
सुंदर निघून गेली आपल्या महालांत ग ।

९.
वाटवरी गांव कोंकणी राहू वाण्याच्या घरीं कशी जाउं ग ।
वाण्याच्या घरीं पिकल्या बोरीवर पडल्या राघूच्या झाकी ।
त्याला हाणाव गोफ्याणी धोंडा वो ।
इकुडला राघू तिकड गेला जिंतीला गुंगभर तारुग ।
तार बाई तारु गळ्यांतला हार रानवेल सोडील चार ।
सख्या तांबडया पगडीवाला ग त्यांनीं भुलविल्या नगरच्या ।
नगरच्या नारी मायबहिणी भोगिल्या सख्या सुंदरी ग ।

१०.
अग सांग कुणाची सुंदरी उभी कां वाटेवरी ।
तुझे केस मोकळे पदर खांद्यावरी ।
तूं सांग कुणाची सुंदरी उभी कां वाटेवरी ।
काय मेल्या बोली बोलला बाण लागला उरीं ।
जर कळालें पतीला जीव टाकील मारुनी ॥
गोरीच नार काय गोराच मुखडा ।
रंगाबाई वाण्याची ।
तिच्यावरुनी मिठी पडली वाण्या बामणाची
शेटी सावकार गळ्यामधीं कंठी ।

११.
अग कोळी बोल कोळणीला । चल ग माझ्या चंद्रा ।
माझ्या गळ्याची शपथ चल ग माझ्या चंद्रा ।
काढला पायांतला तोडा । ठिवला वाण्यापाशीं गहाण ।
काढिलीं तिकिटं झाला मुंबईला पास ।
अर्ध्या दर्यामधीं होडी बुडायासी आली ।

१२.
माळ्याची पोर मळ्यामधीं उभी ।
रताळ्याचं बेण लाविती ग हाणी कुदळ पाणी वळविती ग ।
माळ्याची पोर मळ्यामधीं उभी ।
कार्ल्याचं बेण लाविती ग हाणी कुदळ पाणी वळविती ग ।

१३.
माळ्याच्या मळ्यांत कोण उभी ।
लसूण लावितें मी भावजी ।
भावजी पाया पडतें दाजी वहिनी म्हणूं नका ।
माळ्याच्या मळ्यांत कोण ग उभी ।
कांदा लावितें मी भावजी ।.....

१४.
एकुलता एक लेक होता आईबापाला सख्या ग सजणाला ।
यांनी लष्करी जाण्याचा छद घेतला थाया घेतला ।
शंभर रुपये मंजुरी त्याला पांचशे रुपये घेतले संगतीला ।
घातला घोडयावरी जिन निघून चालला ।
वाटवरी बहिणीचं गांव वसतीला गेला ।
बहिणीनं भाव देखिल बंधु ग माझा आला दादा ग माझा आला ।
वीस रुपयाचं चोळीपातळं केलं बहिणीला ।
पन्नास रुपयाचा धडूतकपडा केला मुला लेकराला ।
पंचवीस रुपयाच्या येळा दिला बहिणीला ।
शालजोडी केली मेव्हण्याला ।
बहिणीनं मनामधीं विचार केला ।
वीष घालुनी मारावा भाऊ विष्टेक होईल आपल्याला ।
बहीण बोलती वाण्याला विषाच्या पुडया बांधा मला ।
वाणी बोलतो बहिणीला वीष नेतो कशाला ।
घरामधीं उंदीर झाले गुलावा देते मी त्याला ।
विषाच्या पुड्या घेऊन आली बहिणीनं पोळ्याचा विचार केला ।
गोड पोळ्या केल्या मुलाला नवर्‍याला विषाच्या पोळ्या केल्या सख्या भावाला । सख्या बंधुला ।
स्वैपाकांतून शांत झाली दादा बस जेवायला ।
बाई येऊं दे दाजीला मुलालेकराला मग बसूं जेवायला ।
बहीण बोलती ते बोलती ते गेले जेवूनशानी त्यांना उशीर लागल यायला । तुम्ही बसा जेवायला ।
भावाला बहिणीनें जेऊं घातला विषाच्या पोळ्या वाढिल्या त्याला ।
एक घास मुखामधीं घातला दुसरा घास हातीं घेतला ।
आग लागली व्हाया पोटाला भाऊ म्हणतो बहिणीला ।
पाणी देग बाई मला प्राण चालला ।
पाणी नाहीं रे दादा आणलं जेवण शांत हो मग पाणी देतें तुला ।
जेवायचा तहकूब झाला याच्या पोटामधीं कालवा झाला ।
बहीण उठली गडबडीनं पाट उचलून घालती डोक्याला । भाउ थंडगार केला ।
लावली शिडी माळियाला काढलं कुदळी पावडं ।
गेली पांची उतरंडी हिनं खडाजी खणीला त्याही खडयांत गाडीला
रात्रीच्या समयाला आईबापाच्या स्वप्नीं गेला ।
उठ उठ माझी आई मी गेलोय पावणा बहिणीला ।
बहिणीच्या गांवांमधीं घात मला झाला ।
पांची उतरंडी बहिणीनं मला निजवीला ।
तुम्ही दोघ मायबाप म्हणून मी सांगाया आलों तुला ।
सकाळ उठून माय अन्‍ बाप गेले लेकीच्या गांवाला ।
आईनें शोक केला सांग बाई दादा कुठं गेला ।
लेक बोलतो आईला दादा मजकडे नाहीं आला ।
तशा शोकामधीं आई गेली पांची उतरंडीं ।
आईनं खडा पाहिला सुरत केल सरकारला ।
पहारा सरकारचा बसवला मूर्त लेकाचा काढिला ।
आईबाप बोलती लेकीला बाई काय कमी केलं होतं तुला ।
एकुलता एक लेक होता आम्हांला कसा नाहीं राहूं दिला ।
पाठीची बहिण झाली वैरीण धिक्कार असो तुझ्या जन्माला ।

१५.
असे रामलक्ष्मण हे दोघे बंधु राम तळ्याला गेला ।
कुस तळ्याला उतरीला त्यानं हात घातला कमळयाला ।
कमळाच्या देठीं लवासी खांबासि बांधला ।
त्याला खासा मार दिला ।

१६.
हार तुरा वाहिला । रुक्मिणीच्या महालामधीं विठ्ठलदेव पाहिला ।
ध्यान मला रामाचं । मारुतीला पत्र आलं लंकेवरी जायाचं ।
राम मला भेटला । आनंदाचा दिवस मला आज सखे वाटला ।

१७.
शंभु शिकारी पार्वती माता ।
डाव यानं मांडील सोंगटयाचा ।
डाव मांडून फासा टाकून ।
जितीला टाळा गोसाव्याचा ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP