मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
रुक्मिणी स्वयंवर

रुक्मिणी स्वयंवर

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


पद - ( बायांनो द्या सोडोनी या चालीवर)

आयके द्रुपदनृपतनये ॥ मजवरिलें श्रीयदुराये ॥ आयके ॥धृ०॥
मत्पिता विदर्भाधिपती ॥ भीष्मक या नामें नृपती ॥
शर्मप्रद कर्मठ सुमती ॥ धर्मशील निर्मलकीर्ती ॥
तत्सविधविप्रकृतसुकृती ॥ प्रस्तव प्रसंगें सुदती ॥ चाल ॥
यदुराज दीनजनबंधू ॥ सज्जनकुल कुमुदवदनेंदू ॥
स्मरसुंदर करुणासिंधू ॥ वर योग्य श्रवणपथा ये ॥ आयके ॥१॥
तैं पासनि साजणि माझ्या ॥ मनिं रुचला यादवराजा ॥
कधिं होइन त्याची भाजा ॥ मनिं उपजलि असि निर्व्याजा ॥
वडिल हेंचि म्हणती योजा ॥ कीं संमत साधुसमाजा ॥ चाल ॥
हेकाड येक परिदादा ॥ रुक्मया  करुनि अतिवादा ॥
निंदुनिया बहुत मुकुंदा ॥ शिशुपाल योजि अन्यायें ॥ आयके ॥२॥
नेमुनिया विवाहकाला ॥ धाडिलें मूळ शिशुपाला ॥
सवर्‍हाड संभ्रमें आला ॥ तो कुंडिननामपुराला ॥
उद्वेग जाहला मजला ॥ रोचला उरीं जणु भाला ॥ चाल ॥
पत्रिका लिहिली निजकाजीं ॥ द्विज सुदेव करुनी राजी ॥
धाडितां द्वारकेमाजीं ॥ पवनसा जवन तो जाये ॥ आय० ॥३॥
दुबळिची विनंती विनयें ॥ कळविली सुदेवें सदयें ॥
अवधारुनि निश्चल त्द्ददयें ॥ अंकूर दयेचा उदये ॥
कळवितां न कोणासहि ये ॥ प्राणेश निघाला सदये ॥ चाल ॥
दारुकें आणिला नामी ॥ रथराजसमीरणगामी ॥
आरोढुनि त्रिजगत्स्वामी ॥ मजसाठिं आला लवलायें ॥ आय० ॥४॥
होता ही गाजी वाजी ॥ बलदेवराव भावोजी ॥
धेउनिया सेना ताजी ॥ गर्जत पथिं रथगजवाजी ॥
पातले कुंडिनामाजी ॥ भीष्मक त्या सादर पूजी ॥ चाल ॥
वाटला जिवाला थारा ॥ आटला संशय सारा ॥
दाटला कंठ जलधारा ॥ नयनि ये मनिं न सुख माये ॥ आय० ॥५॥
लागली हळद शुभकाळीं ॥ वाद्यांची विविध धुमाळी ॥
न्हाणुनियां साडी पिंवळी ॥ चोळीवर मुक्त जाळी ॥
जगशत नथ बुगडी बाळी ॥ मंडवळी मळवट भाळीं ॥ चाल ॥
लेवउनी मज अनुरागें ॥ वैवाहिक वैदिकमार्गें ॥
स्वस्तिवाचनादिक अंगें ॥ सारिलीं नृपाळें न्यायें ॥ आय० ॥६॥
अंबिका पूजनासाठीं ॥ निघतांना झाली दाटी ॥
रक्षणार्थ मम भटकोटी ॥ चहूंकडे चोळिती द्दष्टी ॥
मागधादि धेंडें मोठीं ॥ चेदिपहित ज्यांचे पोटीं ॥ चाल ॥
वाद्यसंघ गाजत वाजे ॥ खेटले पहाया राजे ॥ मध्यें स्त्रीवृंद विराजे ॥
त्यांत मी चालिलें पायें ॥ आय० ॥७॥
अंबिक वंदिली द्वारीं ॥ पूजिली विविध उपचारीं ॥
मी दीन देवि अवधारी ॥ करि मजला हरिची नबरी ॥
शिशुपाल दृष्ट धिक्कारी ॥ हा प्रसाद मज विस्तारी ॥ चाल ॥
प्रार्थुनिया ऐसें निघतां ॥ क्षितिपतितति पहातां पहातां ॥
मोहिली मजकडे पहातां ॥ यदुराज दयेचे छाये ॥ आय० ॥८॥
प्रभुनें जन कोणि न गणिला ॥ मजसमीप निजरथ आणिला ॥
देखतांचि तत्पद कमला ॥ वाटलें नमावें विमला ॥
तव सदयें निजकर दिधला ॥ घेतलें रथावरि मजला ॥ चाल ॥
निजसैन्यसहित रथ हाकला ॥ सिंहनाद कटकीं पिकला ॥
आनंद जाहला सकळां ॥ चालले संभ्रमोत्साहें ॥ आय० ॥९॥
नेतांचि हरुनि नृपबाळा ॥ कोलाहल बहुतचि झाला ॥
परतूनि न्यावया मजला ॥ मागधादि भट झट उठला ॥
झटला बहु केला खटला ॥ परिं समरीं मागें हटला ॥ चाल ॥
मंडवळी बांधुनि बसला ॥ शिशुपाल सर्वथा फसला ॥
मनिं विषादविषधर डसला ॥ परि जाय घरा निरुपायें ॥ आय० ॥१०॥
चवताळनि रुक्मी दादा ॥ धांवला भिउनि अपवादा ॥
गांठुनि त्वरित गोविंदा ॥ मांडिली मुखावरि निंदा ॥
झुंजला करुनि निर्बंधा ॥ शेवटीं पावला बंधा ॥ चाला ॥
क्रोधाकुल यादवमल्लें ॥ क्षुरधार - तीक्ष्णतर - भल्लें भादरुनी दोनी कल्ले ॥
दाविलें कुतुक निज जाये ॥ आय० ॥११॥
इतक्यांत भावोजी आले ॥ पाहुनि ते अनुजा वदले ॥
अनुचित हें अजि त्वां केलें ॥ यदुकुळास लांछन आलें ॥
ऐसे बहु रागें भरलें ॥ रुक्मियास सोडूनि दिधलें ॥ चाल ॥
रिपुकटकसकट माघारें ॥ घटिकेंत हटविलें सारें ॥
स्वभटोत्कट जयजयकारें ॥ द्वारके आलों उत्साहें ॥ आय० ॥१२॥
भीष्मकादि मंडळी सारी ॥ द्वारकापुरा माझारीं ॥
पातले विविध संभारीं ॥ कर पीडन विधिसंस्कारीं ॥
वर्तले सोहळे भारी ॥ प्रभु भक्तकाज - कैवारी ॥ चाल ॥
मी त्याचीं श्रीपदपद्में ॥ सेवाविं निरंतर नेमें ॥
कवि पंतविठ्ठल प्रेम ॥ हरिचरित दुरितहर गाये ॥ आय० ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP