मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीविठोबाअण्णाकृत पदे|
प्रल्हादचरित्र

प्रल्हादचरित्र

अण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.


प्रल्हाद, दैत्यबालकांस उपदेश करितो :---

घ्या हरिच्या नामा, लिहितां कशास ओनामा ॥ गडयानो घ्या० ॥धृ०॥
सांगतों ऐका एक वर्म ॥ दुर्लभ हें मानुषजन्म ॥
यास्तव आचरुनि सत्कर्म ॥ पहावा भागवती धर्म ॥ दु:खसें प्राप्त होय शर्म ॥
यत्न त्या कशासरे परम ॥ न पावे हरिवांचुनि क्षेमा ॥ लिहि० ॥१॥
शरण सद्नुरुला जावें ॥ हरिभजनीं नच लाजावें ॥
हरिचें सगुण रूप पहावें ॥ निर्मल भावें पूजावें ॥ हृदयीं पदपद्म घ्यावें ॥
सर्व हरि असेंच समजावें ॥ साडनि हृदयांतुनि कामा ॥ लिहि० ॥२॥
आपुल्या हृदयीं जो वसता ॥ नलगे प्रयास त्या भजतां ॥
धनसुतजायेची ममता॥ हरिचें चरणांबुज नमितां ॥
विठ्ठल नेइल निज धामा ॥ लिहि० ॥३॥

श्रीमद्भागवताच्या स्कंध ७ यांत प्रभु, स्वभक्तरक्षणार्थ नृसिंहरूपानें स्तंभांत प्रकट झाले, त्या वेळचीं हीं पदें.

पद - २ रें. दत्त दिंगबर मूर्तिया चालीवर.

स्तंभीं नरहरि अवतरला ॥ स्तंभीं नरहरि अवतरला ॥धृ०॥
सत्य कराया निज जन भाषित चराचरांतरिं संचरला ॥
केवळ न मनुज न केवळ मृग ॥विग्रह अत्यद्भुत धरिला ॥ स्तं० ॥१॥
कडकडकड स्तंभ उकळला ॥ गडगडगड रव नभिं भरला ॥
थरथरथरथर केश थरारती ॥ करकर करि रद गुरगुरला ॥ स्तं० ॥२॥
क्रुद्धतमें चिरयुद्ध करुनिया ॥ उद्धत अरि निज करिं धरिला ॥
करुनि अंकगत खरतर नखरें ॥ उदरीं चरचरचर चिरिला ॥ स्तं० ॥३॥
गगनिं अमरजनिं सुमनिं वर्षिला ॥ जो वनिं मुनिजनिं मनिं धरिला ॥
नारदादिसुरगायकनिकरें परतर परपरम स्तविला ॥ स्तं० ॥४॥

हिरण्यकश्यपूच्या, प्रभुद्वेष, साधुनिंदा, गोब्राम्हाणपीडाइत्यादि दुष्कर्मानें त्यास दुर्गति प्राप्त होईल, ती न व्हावी म्हणून साधु प्रल्हाद देवाची प्रार्थना करितो.

पद - ३ रें. राग जोगी (माझा कृष्ण) या चालीवर.

देवा दर्गति मात्र न हो मत्पितया ॥धृ०॥
पिडिले गाई विप्रविशेष ॥ धर्म बडवीले नि:शेष ॥
सत्कर्माचा मोठा त्वेष ॥ त्यांतुनि द्वेष या चरणीं ॥ देव० ॥१॥
संत्रासले दिव्यमुनी ॥ देववृंदाला जाचणी ॥
केवळपातकि चूडामणी ॥ किति अवगुणीं वर्णावा ॥ देव० ॥२॥
याच्या दुश्चरितज्वलनांत ॥ होरपळले प्राणीजात ॥
देवा ऐसा हा मम तात ॥ यास्तव हात जोडितसें ॥ देव० ॥३॥
याच स्मरतां दोष अनंत ॥ कैसा काय होइल पंथ ॥
चित्तीं वाटतसे बहु खंत ॥ विठ्ठलपंतमतिदात्या ॥ देवा० ॥४॥

प्रल्हादाची प्रार्थना ऐकून देव उत्तर करितात :---

पद - ४ थें. राग जोगी, चाल सदर.

वत्सा दुर्गति काय तुझ्या ॥ या पितया ॥धृ०॥
ऐकुनि प्रल्हादाची वाणी ॥ जैसी पीयूषाची खाणी ॥
नरहरिलोचनाला पाणी ॥ ये तत्क्षणीं गहिंवरला ॥ वत्सा० ॥१॥
तुजसारिखा सन्मणि ॥ आला ज्याचे उदरांतुनी ॥
त्याच्या दुर्गतिला चिंतुनी ॥ व्यर्थ मनिं कां झुरसी ॥ वत्सा० ॥२॥
ज्याचे वंशीं माझा दास ॥ त्याला वैकुंठीं बा वास ॥
व्यर्थ होऊं नको उदास ॥ धरिं विश्वास मद्वचनीं ॥ वत्सा० ॥३॥
ठेउनि पद्महस्त तो शिरीं ॥ प्रेमें घेउनि अंकावरी ॥
विठ्ठलपंत - प्रभु - नरहरी ॥ कृतार्थ करी निजदासा ॥ वत्सा० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP