मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय ४१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक विनवी सुतास । गणेशनाम महिमा आम्हांस । सांग करुणानिधे सुरस । एक नामें दहा उद्धरती ॥१॥
सूत तेव्हां त्यांस म्हणत । कोण असे समर्थ या जगांत । जो गणेशनाम माहात्म्य वर्णू शकत । अपार असे तें न संशय ॥२॥
वेदवादांत ऐसें ख्यात । याविषयीं इतिहास तुम्हांप्रत । सांगतों सर्वसिद्धिप्रद पुनीत । वाचनें श्रवणें नरांसी ॥३॥
जरत्कारू नाम ब्राह्मण ख्यात । ब्रह्मवेत्ता तपस्वी तेजयुक्त । शाप अनुग्रह देण्य शक्त । त्याचा पुत्र आस्तिक होता ॥४॥
एकदा तो महाभाग पुण्यवंत । येऊन भेटे जनकाप्रत । प्रणाम करून सेवारत । राहित हर्षयुक्त तेथें ॥५॥
योगींद्र पित्यास एकदा म्हणत । तो आसिक विनययुक्त । जनमेजयाच्या जज्ञांतून सुरक्षित । ठेविले मी सर्पोत्तमा ॥६॥
तेथूनच येथ आगमन । महाभागा करण्या तुज वंदन । सर्प सत्रांत तेथ पाहून । अग्नीत होरपळून मरताना ॥७॥
माझें चित्त दयायुक्त । जाहलें त्यांची पीडा बघाता दुःखित । परमपावना संसार दुःख असत । ऐसें असह्य हें सर्वदा ॥८॥
तें सर्व पाहून नसत । त्याची इच्छा माझ्या मनांत । म्हणोनि सुशांतिप्रद मार्ग मजप्रत । सांगा ताता दयाघना ॥९॥
ऐसें पुत्राचें वचन । ऐकून । महामुनी जरत्कारु प्रसन्न । म्हणे तयास वचन । योगलाभ जेणें व्हावा ॥१०॥
ब्रह्मज्ञानावाचून न लाभत । शांतिलाभ या विश्वांत । जें ब्रह्म नाना ब्रह्मांत । अन्नप्राणादींत स्थित असे ॥११॥
शांतीस जें शांतिप्रद । पूर्ण ब्रह्म वेदप्रकाशक विशद । ब्रह्मणस्पति नामें सुखद । त्यास भत तूं विधिपूर्वक ॥१२॥
ऐकून हें विचारित आस्तिक विप्र तपोयुक्त । गणेश्वरास श्रेष्ठ म्हणत । वेद कां तें सांगावें ॥१३॥
नानारूपधारी असून । ब्रह्मणस्पति नाम लाभून । हा देवेश कैसा झाला हें ज्ञान । तैसें सांगा स्वरूप त्याचें ॥१४॥
जरत्कारू म्हणे गणधातु ज्ञात । समूहवाचक व्याकरणांत । समूह ब्रह्मरूप असत । बाह्मांतरभावें ज्ञात तें ॥१५॥
त्यांचा स्वामी गणेश्वर । संप्रज्ञातमय त्याचा देह थोर । असंप्रज्ञातमय शिर । संयोगें गजरुप गजानन ॥१६॥
अज्ञानसंयुत भूतें असत । जगताच्या प्रारंभीं समस्त । त्यांना ज्ञान देण्या होत । देहधारी हा देव ॥१७॥
स्वसंवेद्ययोगें त्याचें सांप्रत । दर्शन त्याचें योग्यां प्रत । त्यायोगे विघ्नेश ख्यात । निजलोकनिवासी गणेश ॥१८॥
सिद्धि ऐश्वर्य रूप भ्रांतिदा ज्ञात । बुद्धि भ्रांतिधरा असत । पंचचित्त स्वरूपिणी ख्यात । त्यांचा स्वामी गणाधीश ॥१९॥
चित्तसिद्धिग तो खेळत । ह्या दोन्ही मायांच्या प्रभावें विश्वांत । योगरूप हा असत । तदाकार परात्पर ॥२०॥
याविषयीं इतिहास महा अद्‍भुत । गणेशनाम माहात्म्ययुक्त । आस्तिका तूं मातेच्या उदरांत । तेव्हां वृत्त जें घडलें ॥२१॥
तुज त्यागून गर्भावस्थेंत । मी घर सोडून जात । योगसिद्धयर्थ कौंडिण्याप्रत । योगनिपुण जो प्रसिद्ध होता ॥२२॥
स्थावर नगरांत तो वसत । गाणपत्यश्रेष्ठ गणेशभक्त । चिंतामणि गजाननास भजत । दूर्वा वाहून सर्वदा ॥२३॥
मज पाहून हर्षयुक्त । माझें स्वागत तो करित । तापसश्रेष्ठा जरत्कारू अवचित । आज कां केलें आगमन ॥२४॥
येथ स्वीकारी आसन । करावा आतिथ्याचा सन्मान । यथाविधि सर्व सेवून । मग सांगावें आगमन कारण ॥२५॥
कौडिण्याचें ऐकून वचन । माझें झालें मुदित मन । त्यास म्हणालों ताता भ्रमण । पृथ्वीतलावरी करीतसे ॥२६॥
नाना तपोयुक्त मी असत । परी शांति मजला न प्राप्त । ती शांति मजला कैसी लाभत । तें मजला सांगावें ॥२७॥
म्हणोनि तुमच्या आश्रमांत । राहण्या आलों सांप्रत । कौंडिण्य म्हणे जरत्कारूप्रत । गणेशासी भज भक्तिभावें ॥२८॥
अन्य कांहीं उपाय नसत । ह्याविण होशील वृथा श्रमयुक्त । ऐसें त्याचें वचन ऐकत । त्यासि प्रश्न विचारिला तैं ॥२९॥
नामरूपधर जो देव वर्तत । तो शांतिदाता कैसा होत । तेव्हां तो कौंडिण्य दयायुक्त । मज रहस्य सांगतसे ॥३०॥
ऐक इतिहास पुरातन । मी योगप्राप्त्यर्थ उत्सुकमन । तप केलें तरी तो न लाभून । ब्रह्मदेवास भेटलों ॥३१॥
त्यास प्रणाम करून । योगशांति प्रदायका स्तवून । म्हटलें योगशांतिलाभ व्हावा म्हणून । तपश्चर्येनें जर्जर झालों ॥३२॥
परी ती न मिळाली मजप्रत । म्हणोनि तुम्हांसी विचारित । तेव्हां ब्रह्मा सांगे उपाय मजप्रत । गणेशासी भज भावबळें ॥३३॥
तरीच शांति तुज मिळेल । स्थावर ग्रामीं जा निर्मल । तेथ चिंतामणि देव प्रबळ । तयासी भज तूं भक्तिभावें ॥३४॥
चित्त चंचल असे ख्यात । तें जेथें स्थिर होत । म्हणून स्थावर नाम क्षेत्राप्रत । मीच दिधलें भूतकाळीं ॥३५॥
पंचचित्त प्रकाशकर । तेथ स्थापिला प्रभु उदार । साक्षात्‍ शांतिप्रदायक थोर । सृष्टिपूर्वीं तेथ तप केलें ॥३६॥
तपश्चर्या करून । मी आराधिला चिंतामणि महान । त्याच्या वरप्रभावें सुमन । योगिवंद्य मी झालों ॥३७॥
ऐसें त्याचें ऐकून वचन । मी केला पुनरपि प्रश्न । नामरूपधर असून । चिंतामणि शांतिप्रद कैसा ॥३८॥
तेव्हां ब्रह्मदेव मज सांगत । हर्षयुक्त त्याचें चित्त । गणांच्या पतिभावें स्थित । असे ह नामधारक ॥३९॥
देह जगरूप तयाचा गज ख्यात । ब्रह्म त्याचें मस्तक वर्तत । त्यांच्यायोगे स्वरूपयुक्त । भक्तकारणास्तव झाला ॥४०॥
स्वानंद नगर ज्याचें प्रख्यात । सिद्धिबुद्धिप्रिय अत्यंत । लक्षलाभ त्याचे सुत । मूषकवाहन जयाचें ॥४१॥
ऐसे नानाविध असत । ब्रह्म आकार त्याचे जगांत । सुह्रद या अर्थी असे ज्ञात । वेदांत हा ब्रह्मणस्पति ॥४२॥
मायामोह युक्त होतीं । विश्वेंसारीं प्रारंभीं मूढमती । मुनिसत्तमा त्यांना योगदानार्थ घेती । देहाकार गजानन ॥४३॥
स्वेच्छेनें देहधारी होत । स्वेच्छेनें जाहला मायायुक्त । स्वेच्छेनेंच योगरूप ज्ञात । विनायक हा गणेश ॥४४॥
अस्थिचर्मादिसंयुक्त । महात्म्याचा देह शाश्वत । त्यावर्जित तो असत । योगदेहधारी विप्रेशा ॥४५॥
याविषयीं इतिहास पुरातन । भ्रुशुंडि देवर्षि संवादरूप महान । पुढिलें अध्यायीं निरूपण । त्याचें तुजला सांगेन ॥४६॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंड धूम्रवर्णंचरिते कौंडिण्यब्रह्मसमागमो नामैकचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP