मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय ४०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । सूत म्हणे शौनकाप्रत । जाजलि नंतर मंत्र देत । गणेश पंचाक्षर विभांडाप्रत । विधियुक्त विधानज्ञ ॥१॥
मंत्र प्राप्त होतां महाभाग राहत । जाजलीच्या आश्रमांत । बल्लाळेशा पूजित । व्रत करी भावभक्तीनें ॥२॥
गाणेशपंचकाचें ध्यान करित । कार्तिक पूर्णिमादिनीं प्रकटत । बल्लाळनायक त्याच्या पुढयांत । विभांड विस्मित जाहला ॥३॥
सत्वर उठून करी वंदन । पूजा करून करी स्तवन । नानाविध स्तोत्रें गाऊन । विघ्नेशाची अति हर्षानें ॥४॥
तेव्हां बल्लाळेश प्रसन्न होत । योगशांतियुक्त विभांत करित । तदनंतर अन्तर्धान पावत । विभांड गाणपत्य ख्यात झाला ॥५॥
बल्लाळेश भक्तीनें मग्न । मनाच्या स्वच्छंदें करी भ्रमण । विभांडक म्हणे वचन । ऐशापरी झालों योग शांतिस्थ ॥६॥
सर्वांसी मी वंद्य ख्यात । बृहदश्वा तूंही करी गाणेश्वर व्रत । ऐसें सांगून तयास देत । दशाक्षर मंत्र गणपतीचा ॥७॥
विधियुक्त मंत्र घेऊन । बृहदश्व परतला तयास नमून । स्वस्थानांत परतून । चातुर्मास्य व्रत करिता झाळा ॥८॥
गणेशपंचकीं तो निरत । बृहदश्वास योग देत । विघ्नेश शांतिप्रद ह्रदष्ट । तोही गणेश्वरा नित्य भजे ॥९॥
अन्यही एक कथा ख्यात । चातुर्मास्य व्रतासंबंधी असत । तीच सांगतों तुजप्रत । ऐक चित्त देऊनियां ॥१०॥
विभांडाचें वीर्थ जेथ पडलें । भूमिमंडळीं अवचित भलें । तें खाई हरिणी दैवबळें । हरिततृणाच्या सहित तैं ॥११॥
त्या अमोघ वीर्यें होत । ती हरिणी गर्भवती त्वरित । त्या मुगीस योग्य काळांत । एक पुत्र जाहला ॥१२॥
साक्षात्‍ ब्रह्मतेजयुक्त । ललाटावरी त्यास शिंग असत । म्हणोनि ऋष्यशृंग नाम ख्यात । जगांत जाहलें त्या मुनीचें ॥१३॥
नारद विभांडाला सांगत । तेव्हां तो ऋष्यशृंगास नेत । आनंदानें आपुल्या आश्रमांत । ब्राह्मणांकरवी संस्कार करी ॥१४॥
एकदां त्या ऋष्यशृंगास नेत । लोमपाद नृप भुलवून अवचित । अप्सरा पाठवून स्वपुरांत । आपुली कन्या देत तयासी ॥१५॥
दुष्काळ पडला होता राज्यांत । प्रजा होती अति दुःखित । तें पाहून नृप देत । त्या ऋषीस राजकन्या ॥१६॥
शांता नाम गुणवती कन्या । विवाहांत दिली ऋष्यश्रृंगांना । त्या ऋषीच्या कृपेनें सर्वमान्या । वृष्टि जाहली तत्काळ ॥१७॥
जनांचें दुःख हरित । शांतेसह ऋष्यशृंग रमत । हरषनिर्भर तो चित्तांत । नंतर गेला पित्याकडे ॥१८॥
आपुल्या भार्येंस घेऊन । विभांडासन्निध जाऊन । विनम्रपणें करी नमन । नंतर तेथेंच राहिला ॥१९॥
सेवा करी पित्याची । विनय दृष्टि पाहून त्याची । तपश्चर्येची आवड साची । पाहून बोले तयाला ॥२०॥
महायोगी प्रेमयुक्त । विभांड म्हणे सुताप्रत । ब्रह्मांत जो ब्रह्मभूत । त्यास ब्राह्मण म्हणताती ॥२१॥
म्हणोनि तूं पुत्रभावें जगांत । उत्तम ब्राह्मण होई ख्यात । ऐसें बोलून तयास देत । गणपतीचा शुभ मंत्र ॥२२॥
विधिपूर्वक त्या नमून । मंत्र तो आदरें स्वीकारून । पुत्रत्वाचें करी पालन । शांता भार्येसहित तो ॥२३॥
चातुर्मास्थ व्रत आचरित । गाणेश पंचकानें सेवित । ध्याननिष्ठ तो होत । नित्य योगसाधना करी ॥२४॥
प्रार्थितसे गणनायका प्रत । योगींद्रवंद्य करी मज भार्येंसहित । त्याच्या व्रतानें तपें तुष्ट । गणाधीश त्यास योग देई ॥२५॥
ऋष्यशृंग तैं भार्येंसहित । गाणपत्य होय प्रख्यात । शांतियुक्त स्वभावें भजत । विघ्नेश्वरासी मोदानें ॥२६॥
तदनंतर लोमपाद नृप येत । विभांडासी प्रेमें प्रार्थित । ऋष्यशृंगास सुतेसहित । स्वपुरासी नेता झाला ॥२७॥
आपुल्या नगरांत त्यास स्थापून । त्याची आज्ञा करित पालन । नित्य तो नृपही करी पूजन । भक्तीनेम गणाधीशाचें ॥२८॥
आपुल्या जावयाने जें कथित । तें चातुर्मास्य व्रत आचरित । अंती तो नृप विघ्नेशाप्रत । जाता झाला धर्मनिष्ठ ॥२९॥
ऐसें नाना जन या व्रतें पावत । सिद्धि सर्वोत्तम जगांत । तेथ क्रिती वर्णूं तुजप्रत । अशक्य सर्वदा वर्णन ॥३०॥
चातुर्मांस्यासम व्रत । दुसरें नसे निश्चित । एक कैवर्तक एकदा द्विजांस पाहत । नादकर नांवाचा ॥३१॥
त्यास नमून विचारित । कोणतें करता हें व्रत । तेव्हां ते त्यास सांग्त । चातुर्मास्य व्रत हें असे ॥३२॥
गाणेश्वर हें व्रत । ऐकून तो पुनरपि निनवित । विपेंद्र मुख्यहो मजप्रत । सांगा समग्र विधि याचा ॥३३॥
तेव्हां त्यास पाहून विनययुक्त । ते तयास आदरें सांगत । तें ऐकून तो प्रणाम करित । नंतर गेला स्वगृहासी ॥३४॥
चातुर्मास्य व्रत आचरित । स्नान करून गणेशा वंदित । घटिका मात्र भजन करित । नंतर करी स्वकार्य ॥३५॥
आपुल्या देहासी देहासी निंदित । म्हणे व्यर्थ हा देह भूतलांत । गणेशभक्तित विवर्जित । घालविला मीं मूर्खानें ॥३६॥
तदनंतर एकदा वनांत । मार्गक्रमण तो करित । तेथ त्यास भक्षण्या धावत । दहा राक्षस वेगानें ॥३७॥
तेव्हां भयगीत होऊन । तो स्मरे गणेशासी उद्विग्न । राक्षस त्याच्या सन्निध येऊन । भिवविती तैं तयासी ॥३८॥
तैं जल घेऊन करांत । गणेशाय नमो म्हणत । त्या मंत्रोच्चारासहित । प्रोक्षिलें तें जळ त्या दृष्टांवर ॥३९॥
गणेश नाममंत्रानें युक्त । ते जळ राक्षस शरीरीं पडत । तेव्हांत त्यांस आठवत । पूर्व जन्म कर्म आपुलें ॥४०॥
त्या स्मृतीनें व्याकुळित । ते रडूं लागले समस्त । त्या गणेशभक्तास नमित । कर जोडून त्या वेळीं ॥४१॥
तया नादकरासी वंदून । राक्षस दुःखे म्हणती वचन । अम्हीं पूर्व जन्मीं ब्राह्मण । होतो अरे शूद्रजा ॥४२॥
तेथ आचारविहीन । होतों निरंतर पापमग्न । यथेच्छ विषयसुख सेवन । केलें आम्हीं सर्वांनीं ॥४३॥
तदनंतर यमगृहीं जात । विविध नरकांत पडत । पापसंभव दुःख भोगित । नंतर झालों राक्षस ॥४४॥
आतां नित्य भुकेनें त्रस्त । हिंडतों या वनांतरांत । येथ तेथ अत्यंत संत्रस्त । दैवयोगें तव दर्शन घडलें ॥४५॥
आपुल्या भाग्यगौरवें सिंचिलें । मंत्र जपून जळ शरीरीं भलें । त्यानें सर्व साठवलें । पूर्व जन्माचें वृत्त आम्हां ॥४६॥
आतां तारावें आम्हांसी । शरण तुज आलों या वेळेसी । गणेशकीर्तनें जें मिळविलेसी । तें पुण्य दे महाभागा ॥४७॥
ऐसें त्यांचें रुदनपूर्ण वचन । ऐकून त्यांची दया येऊन । माहात्म्य व्रताचें जाणून । नामसंभव पुण्यही ॥४८॥
नादक म्हणे त्य राक्षसांप्रत । गणेश कीर्तनाचें पुण्य अर्पित । वर्णनातीत तें असंख्यात । ऐसें गुरूंनी सांगितलें ॥४९॥
तैसेंचि तत्त्वकोविद ब्राह्मण । सांगती माहात्म्य याचें प्रसन्न । अहो राक्षस जातिस्थांनों पावन । ऐका वचन हितकारक ॥५०॥
चातुर्मास्यांत सतत । मीं गणेशाचें कीर्तन करित । त्यांतील एक नामाचें पुण्य तुम्हांप्रत । देईन मीं दयाभावें ॥५१॥
चातुर्मास्यांत जें केलें । त्यांतल्या एक दिनाचें दिलें । पुण्य तुम्हांसी तेणें झालें । हित तुमचें जाणावें ॥५२॥
त्यायोगें व्हाल बंधहीन । विचक्षण तैसे पावान । ऐसें बोलून पुण्यदान । करी एक नामकीर्तनाचें ॥५३॥
तो राक्षसास पुण्य देत । तोंच गणेशदूत तेथ अवतरत । त्या राक्षसांस निज लोकांत । घेऊन गेले त्वरित ते ॥५४॥
गणेश्वरासी तेथ पाहत । तेव्हां ते झाले ब्रह्मभूत । ऐसा व्रताचा महिमा अद्‍भुत । अशक्य वर्णन करण्यासी ॥५५॥
चातुर्मास्य चरित तुम्हांप्रत । सांगितलें संक्षेपें पुनीत । भुक्तिमुक्तिप्रद जें असत । वाचका श्रोत्या सर्वांसी ॥५६॥
जो हें वाचील अथवा ऐकेल । त्यास व्रताचें फळ मिळेल । मनेप्सित लाभून जाईल । अंतीं जाई स्वानंदलोकीं ॥५७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते चातुर्मास्यव्रतमाहात्म्यनिरूपणं नाम चत्वारिंशोऽध्याः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP