खंड ८ - अध्याय २

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ गणेशाय नमः ॥ श्रीशिव कथा पुढती सांग्त । अहं मनोभावें तप आचरित । ऐशीं एक सहस्त्र समाप्त । तेव्हां प्रसन्न गजानन ॥१॥
त्याच्या भक्तिभावें संतुष्ट । प्रकटला वर देण्यास इष्ट । मूषकवाहन त्रिनेत्र वरिष्ठ । गजवक्त्र तैं महोदर ॥२॥
चतुर्भुज पाशांदींनी सुशोभित । सिद्धिबुद्धियुक्त एकदंत । शूर्पकर्ण देवमुनींसहित । गणसे वित । सर्वप्रद ॥३॥
त्यास पाहून अहं उठत । आदरें करांजली जोडित । सिद्धिबुद्धिसहितास पूजित । विघ्नेशास परमादरें ॥४॥
तदनंतर क्रमानें नमन । करी देवांस मुनींस भावपूर्ण । दोन्ही कर भक्तीनें जोडून । स्तवन करी गणेशाचें ॥५॥
गणनाथासी हेरंबासी । परात्म्यासी बरदात्यासी । वरदासी ब्रह्मनाथासी । निजास स्वरूपप्रदा नमन ॥६॥
परत उत्थानासी सांख्यासी । ज्ञानांत बोधरूपासी । सोऽहंदेहीं त्य बिंदुरूपासी । विघ्नेशासी नमन असो ॥७॥
स्त्रष्टयांत ब्रह्मदेवासी । पालकांत विष्णुदेवरूपासी । संहर्त्यांत शिवशंकरासी । एकदेंतासी नमन असो ॥८॥
प्रकाशकांत सूर्यासी । मोहकांत शक्तिरूपासी । देवांत देवराजासी । विनायकासी नमन असो ॥९॥
दाहकांत अग्नीसी । नीतिधारकांत यमासी । रक्षकांत नैऋतासी । शूर्पकर्णासी नमन माझें ॥१०॥
बलयुक्तांत वायूसी । निधिपतींत धनपासी । रुद्रांत कालरूपासी । लंबोदरासी नमन असो ॥११॥
प्रजापतींत दक्षासी । नागेशांत शेषरूपासी । अनंत विश्वासी धूम्रवर्णासी । नमन माझें पुनःपुन्हां ॥१२॥
ज्याच्या स्तवनीं वेद असमर्थ । योगीही मौन धरित । त्यास मीं अल्प मतियुक्त । किती स्तवूं तुज विघ्नेशा ॥१३॥
धन्य मी कृतकृत्य जगांत । सफल माझा जन्म निश्चित । धन्य मातापिता कुल समस्त । दर्शनें तुज्या चरणांच्या ॥१४॥
ऐसें स्तवून गणेशास नमित । गजानन अत्यंत हर्षित । अहं असुरा त्या म्हणत । महासुरा मीं प्रसन्न ॥१५॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र पावन । मजला अत्यंत प्रिय जाण । त्याच्या पाठका श्रोत्यांस धान्याधन । सर्व इच्छित लाभेल ॥१६॥
पुत्रपौत्रादिक सुख लाभेल । भुक्तिमुक्ति सारें प्राप्त होईल । याचें पठणें बाणेल । चित्तांत भक्तिभ्रमनाशिनी ॥१७॥
वर माग महाभागा मनेप्सित । देईन मीं तुझ्या स्तोत्रें तुष्ट । तपानें तुझ्या मी जित । सांग झडकरी ह्रद‍गत तुझें ॥१८॥
तेव्हां अहं गणेशासी प्रार्थित । प्रसन्न जरी माझ्यावरी सांप्रत । तुझी भक्ति माझ्या हृदयांत । सदैव दृढपणें विलसावी ॥१९॥
जें जें मी इच्छित । तें तें होवो सफळ जगांत । सर्वदा मायाविकारें जे युक्त । त्यांच्या हस्तें मरण नसो ॥२०॥
ब्रह्मांड गोलाचें राज्य द्यावें । सर्वभोगसंपन्न मज करावें । आरोग्य विजयादी मज लाभावें । अमोघ अस्त्र मज देई ॥२१॥
ज्या अस्त्रानें संग्रामांत । अतुल्य मीं अजिंक्य विश्वांत । तुझ्या प्रसादें बळवंत । त्रिकाळांतही सर्व व्हावें ॥२२॥
गणनायक तथाऽस्तु म्हणून । त्वरित पावला अंतर्धान । निजलोकीं करी गमन । अहं गेला शुक्राकडे ॥२३॥
त्यांस प्रणास करून । सांगे सकल वर्तमान । मुनिवर तें ऐकून । अहं असुराची प्रशंसा करी ॥२४॥
महामति शुक्र आमंत्रित । सर्व महा असुरांसी त्वरित । ते सर्वही जगांत । जमले शुक्र चरणांपासीं ॥२५॥
त्यांना हितप्रद वचन सांगत । अहं असुराचा वृत्तान्त । तेही ऐकून अति हर्षित । गरजले प्रणास करोनियां ॥२६॥
महायोग्या आज्ञा द्यावी । मनाची खूण सांगावी । जी करणे असेल ती निवेदावी । कामगिरी तव पददासांसी ॥२७॥
त्यांचें तें वचन ऐकून । सर्वार्थकोविद काव्य बोले आनंदून । अहं असुराम राजा करावें हें मन । माझें सांगे सांप्रत ॥२८॥
असुर तत्क्षणीं संमति । आपुली शुक्रास देती । तेव्हां वेदनिष्ठ ब्राह्मण बोलाविती । पूजिती त्यांनी आदरें ॥२९॥
त्यांच्या हस्तें राज्यपदावर । अहं असुरासी बैसविती थोर । अभिषेक यथाशास्त्र सुंदर । दैत्याधीश तैं झाला ॥३०॥
त्याचे पाच सुदृढ प्रधान । शंख देवघ्नक काल पैशुन । पाचवा अधर्मकारक महान । सर्वही अत्यंत तेजस्वी ॥३१॥
त्यांच्या साहाय्यें राज्य करित । अहं असुर बलवंत । त्याच्या राज्यीं निवासा येत । लोक नाना वर्णाश्रमांचे ॥३२॥
विविध अधिकारपदांवरी । आसुर सुखलोलुप भारी । भोग भोगून ह्रदयांतरी । सुखावले ते सारे ॥३३॥
तदनंतर प्रमादासुर अर्पित । ममता नाम कन्या अहं नृपाप्रत । रूपशालिनी ती युक्त विवाहांत । दैत्येंद्र रमे तिच्या संगे ॥३४॥
मायेनें होऊन मोहिन । जाहला तो ममतावश आसक्त । दोन पुत्रांसी जन्म देत । योग्य वेळीं ममता राणी ॥३५॥
ते महावीर तिचे सुत । गर्व श्रेष्ठ नामें ख्यात । ऐसा बहु काळ जात । तेव्हां प्रमादासुर म्हणे ॥३६॥
अहं दैत्येंद्रा महावीरा सांप्रत । स्वस्थ कां तूं बैसलास शांत । जिंकावें देवादिकां समस्तां त्वरित । राजा होई ब्रह्मांडाचा ॥३७॥
वरदानप्रभावें तूं भयमुक्त । अजिंक्य या समग्र विश्वांत । वरांचें साफल्य त्वरित । करावें भोग भोगूनियां ॥३८॥
सासर्‍याचें ऐकून वचन । अहं असुर प्रतापवान । शुक्राचार्यांस बोलावून । पूजा करी मनोभावें ॥३९॥
त्यांची आज्ञा घेऊन । अन्य दैत्यवीरा जमवून । त्यांच्या समवेत शोभला महान । शुक्र प्रधानांच्या संगें ॥४०॥
तदनंतर तो दैत्यप्रभु आज्ञा देत । दिग्विजय करा वीर समस्त । त्याची आज्ञा मिळतां जात । युद्धसज्ज ते महादैत्य ॥४१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खण्डे धूम्रवर्णचरिते अहमासुरराज्यप्राप्तिवर्णनं नाम द्वितीयोगऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP