मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ८| अध्याय २६ खंड ८ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० खंड ८ - अध्याय २६ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय २६ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत कथा पुढती सांगती । मौद्गल ब्राह्मण पूजी गणपती । विश्वसह नामें त्याची ख्याती । सदा सत्यंग लालस तो ॥१॥एकदां माघ मासांत । त्यानें घेतलें होतें माघव्रत । गाणेशपंचक नित्य सेवित । भक्तिभावें ब्राह्मण तो ॥२॥प्रातःकाळीं उठून । स्नानार्थ जाई तो श्रद्धायुक्त मन । एकदां स्नानस्थळीं उद्विग्न । राक्षसी एक धावली ॥३॥ती त्या द्विजा भक्षण्या वांछित । तिज पाहून भयव्याकुळित । विकरालमुखीस त्या वारण्या जपत । गणेशमंत्र विश्वसह ॥४॥गणेशमंत्र जपत । दूर्वेनें पाणी उडवित । तें जल दूर्वायुक्त पडत । त्या राक्षसीच्या देहावर ॥५॥त्या तीथजलाचा स्पर्श होत । तैं ती शुद्ध क्षणांत । होऊन विश्वसहास म्हणत । शरण तुजला मीं आलें ॥६॥मज तारी या भवार्णवांतून । तुझ्या दर्शनमात्रें पवित्र मन । तिचें तें दीन वचन । ऐकून दया आली द्विजासी ॥७॥ति राक्षसी रुदन करित । दुःखी होऊन अत्यंत । दयायुक्त प्रतापवंत । म्हणे विश्वसह तिजलागी ॥८॥कोण तूं पापिष्ठे अससी । ऐसें महाघोर कर्म करिसी । दुःखित होऊन आतां रडसी । सांग याचें कारण ॥९॥राक्षसी सांगे तयाप्रत । विप्रेशा मीं पूर्व जन्मांत । ब्राह्मणी होते रूपसुंदरी विख्यात । परी भ्रष्ट तैं जाहलें ॥१०॥पातिव्रत्य मी त्यागिलें । देहभोगांत मग्न जाहलें । विषय यथेष्ट भोगिले । पापपरायण होऊन ॥११॥मृत्यूनंतर यमदूर नेती । नरकांत मज टाकिती । तेथ यातना असंख्य असती । भोगिलें दुःख अपार ॥१२॥नंतर राक्षसी होऊन । पुनर्जन्म घोर हा लाभून । सदैव क्षुधापीडित भ्रमण । करू लागलें पापिणी मीं ॥१३॥नीच उच्च मांसाचें भक्षण । नित्य करीत होतें उन्मन । परी जठराग्नी भडकून । सदैव भुकेली राहिलें मीं ॥१४॥अपार अन्न भक्षण करित । परी सदा क्षुधाक्रान्त । विप्रजन्म संपल्यापासून आजपर्यंत । अतुप्तची राहिलें मीं ॥१५॥आज तुज पाहून । धावले भक्षावया तुज लागून । परी तुझ्या अंगाच्या जलस्पर्शे मन । पूर्वजन्मज्ञानें भरलें ॥१६॥आतां महाभागा मज तारावें । तूं समर्थ अससी स्वभावें । अन्यथा देहपरित्यागें मरावें । तुझ्या पुढयांत ऐसें वाटे ॥१७॥त्या राक्षसीचें तें वचन । ऐकून विश्वसह बोले उद्विग्न । त्याचें अन्तःकरण । दयापूर्ण । होऊन बोले तो हर्षानें ॥१८॥गणेशानामाचें महिमान । अशक्य असे त्याचें वर्णन । मीं पुराणांत ऐकलें होतें वचन । तें सत्य आज अनुभविलें ॥१९॥दूर्वायुक्त जलानें तुजप्रत । पूर्वजन्मीचें आठवलें वृत्त । आतां तुझ्या उद्धारार्थ अर्पित । आज पुण्य तुजलागी ॥२०॥माघस्नान एक दिन । करितां लाभतें जें पावन । तें पुण्य तुजसी देऊन । उपकृत केलें असे ॥२१॥आतां महाभागें जाई परत । आपुल्या तूं स्वनगरांत । ऐसें बोलून तो सोडित । हातावरी पाणी तिच्या ॥२२॥त्या मौद्गलें ऐसें केलें । तैं गणेश्वरदूत । त्वरित आले । त्या राक्षसीस विमानीं बैसविलें । नंतर गेले स्वानंदपुरासी ॥२३॥तें परम आश्चर्य पाहून । विश्वसह मुनि विस्मितमन । स्नान करून नंतर पूजन । करूं लागला गणेशाचें ॥२४॥तें त्याचें व्रत । संपूर्ण होतां विनायक प्रकटत । वर देण्या मौद्गलाप्रत । पुण्यप्रभावानें तेव्हां ॥२५॥गणाध्यक्षाचें होतां आगमन । उठून करी त्यास नमन । संभ्रम होऊन आनंदमग्न । प्रेमविव्हाल नाचतसे ॥२६॥त्याचा प्रेमभाव पाहत । द्विरदानन तैं त्यास म्हणत । म्हणे वर माग सांप्रत । मनोवांछित ते पुरवीन मी ॥२७॥गणेशवचन ऐकून । महामुनि जागृत होऊन । हर्षयुक्त करी पूजन । आवरून शौनका भावावेग ॥२८॥विश्वसह म्हणे धन्य जन्म । माझे मातापिता कर्म पावन । माघव्रत हें धन्य मोहन । ज्यायोगें गजानन पाहिला ॥२९॥गणेश्वरा तुझें संपूर्ण ज्ञान । वेदउपनिषदांनाही नाहीं म्हणून । नेति नेति ऐसें बोलून । असमर्थता दाखविली ॥३०॥योगीजन तैसे शंकरादि । तुझें रूप जाणिती अनादि । ऐसा जो तूं स्वयमेव अद्यावधि । प्रत्यक्ष मजला दिसलास ॥३१॥कृतकृत्य मी अत्यंत । त्वंदध्रियुगाचें दर्शन होत । काय सांगू गणेशा सांप्रत । दृढ भक्ति देई तुझी ॥३२॥विघ्नेशासी परात्परासी । हेरंबासी गणेशासी । गणपतीसी मायाकारशरीरासी । मायिकशिरयुक्ता तुज नमन ॥३३॥त्यांच्या योगें सुदेहासी । गजानना नमस्कार तुजसी । राजसासी सृष्टिकर्त्यासी । कृपालवा तुज नमन असो ॥३४॥सात्त्विकासी सर्वपालकासी । तामसजनांच्या संहर्त्यासी । कर्मरूपें त्रिरूपासी । अहंकृतिधारका तुज नमन ॥३५॥चालकासी महामोहदायीसी । शक्तिरूपासी गुणेशासी । गुणांच्या सत्ताधारासी । बिंदुमात्रशरीरा तुज नमन ॥३६॥सोऽहंकारासी देहीसी । बोधासी प्रकृतिस्थासी । खेलकासी विदेहासी । परेशासी नमन असो ॥३७॥स्वानंदासी अयोगासी । सुशांतासी योगेशासी । किती स्तवूं मी तुजसी । गणाध्यक्षा योगशांतिरूपा ॥३८॥तुझ्या दर्शनेंजो बोध झाला । त्यायोगें मीं तुज स्तविला । ऐसें बोलून विनम्र झाला । विश्वसह तो गजाननपदीं ॥३९॥त्यास वरती उठवून । गणाधीश बोले आनंदून । तूं रचिलेलें हें स्तोत्र पावन । सर्वप्रद होईल सर्वदा ॥४०॥वाचका श्रोत्यास भक्तिवर्धक । जें जें इच्छितें तें प्रदायक । भुक्तिमुक्तिप्रद ब्रह्मदायक । स्तोत्र हें अति प्रिय मजला ॥४१॥माझ्यावरी तुझी भक्ति । दृढ होईल जगीं निश्चिती । जें जें इच्छिसी चित्तीं । तें तें सर्वदा सफल होवो ॥४२॥ऐसें बोलून अंतर्धान । पावले तेव्हां गजानन । विश्वसह करी गणेशभजन । तत्पर होऊन त्या जागीं ॥४३॥गाणपत्याग्रणी झाला । मुद्गलासम तो कीर्तीला । लाभूत नित्य तयाला । निष्ठ वाढली माघव्रतीं ॥४४॥गाणेश पंचकांत रत । तो विश्वसह नित्य होत । अन्यही एक महाचरित । माघ माससंभूत ऐक आतां ॥४५॥सर्व पापांचें हारक सुखद । व्रिप्रा जें ऐकतां सुखप्रद । नीलक नामक चांडाळ दुःखद । एकदां ऐके गणेशकथा ॥४६॥माघस्नानाचें महिमान । त्यानें ऐकिलें पुण्य पावन । त्याचा परिणाम होऊन । नित्य करी माघस्नान ॥४७॥स्नान करून व्यवसाय करित । रात्री गणेशगीत ऐकत । ऐश्या परी माघ मासांत । गणेश मंदिरीं नित्य जाई ॥४८॥तेथ जाऊन करी गायन । करी स्वकुटुंबाचें पोषण । एकदा माघमास असता मग्न । व्रतकार्यांत तो होता ॥४९॥एक याम रजनी उलटली । गणेश्वरभजनीं मति रंगली । प्रणाम करून पाइली । गीतें त्यानें विघ्नहर्त्याचीं ॥५०॥तदनंतर स्वमंदिराप्रत । निघाला गणेश मंदिरांतून विनत । तैं मार्गमध्यांत । पांच पिशाचें त्यास बघतो ॥५१॥त्या अति विक्राळास पाहून । गणनायकास मनीं स्मरून । म्हणे देवा तूं भक्तजन । सदैव तारिसी संकटांत ॥५२॥गणेशस्मरण मात्रें होत । पिशाचें तीं स्तंभित । होऊन मनांत अतिविस्मित । पाहती त्या गणेशभक्ता ॥५३॥त्याच्या दर्शनानें पुनीत । होऊन तयांचें चित्त । त्या नीलकास म्हणत । महाभागा आम्हां तारावें ॥५४॥अत्यंत दुःखयुक्त चित्त । म्हणती या संसारसागरांत । बुडालों होतों भूतयोनींत । तुझ्या दर्शनें शुद्ध झालों ॥५५॥तुझ्या गणेशगायनाचें फळ । आम्हांस देई तूं निर्मळ । त्यायोगें मुक्त होऊ सकल । विश्वास ऐसा वाटतसे ॥५६॥गणेशगीतांमुळे जें मिळालें । तें पुण्यफळ तुम्हां दिलें । एका गीताच्याही प्रभावें उद्धरलें । पाहिजे हें चराचर ॥५८॥तेव्हां एका चरणाचें फळ । देईन शाश्वत तुम्हां अमल । त्यायोगें मुक्त होऊन सबळ । मुक्ति तुम्हांस लाभेल ॥५९॥ऐसें बोलून पुण्य देत । एका गीताच्या चरणाचें त्वरित । त्या फळप्रभावें होत । पिशाचें तीं दिव्यदेही ॥६०॥विमान आले त्या स्थळीं । त्यांत चढलीं पिशाचें सगळीं । स्वानंदपुरासी तीं गेलीं । नीलका आश्चर्य वाटलें ॥६१॥होऊनियां विस्मित । परतला तो स्वगृहाप्रत । अधिकचि होत व्यापृत । गणेशभक्तींत तदनंतर ॥६२॥अंतीं कोटिकुलजां सहित । तो गणेश्वरसामीप्य लाभत । गणेशसायुज्य प्राप्त । होतां धन्य तो झाला ॥६३॥ऐसा एकभावें करितां नियम । माघव्रताचा पुण्यपावन । अनंत जंतू मुक्त होऊन । गणेश अद्वैत लाधले ॥६४॥माघमास व्रताचें चरित । कथिलें तुजला अद्भुत । हें ऐकेल वा वाचील समस्त । त्यास भुक्तिमुक्ति लाभे ॥६५॥धनधान्य पुत्रपौत्रादि समस्त । सौभाग्य तयास प्राप्त । नाना रोगांतून हो मुक्त । आतां आणखी काय सांगू ? ॥६६॥सूतानें शोनकास कथिलें । गणेश्वराचें तदनंतर भलें । तें आख्यान आहे वर्णिलें । पुढिले अध्यायीं भक्तिभावें ॥६७॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते माघमासमाहात्म्ये नानाजनोद्धरणं नाम षड्विंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP