खंड ८ - अध्याय १

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शौनक म्हणे सुतासी । विघ्नराजचरित्र तूं आम्हांसी । सांगितलें ममनाशकर जें सर्वांसी । सर्वप्रद महामते ॥१॥
तूं धन्य ज्ञानयुक्त । व्यासतुल्य अससी निश्चित । अथवा व्यासाहूनही अधिक श्रेष्ठ । शिष्य तूं त्या महात्म्याचा ॥२॥
हें कथामृत जों जों ऐकत । तों तों अधिक तृष्णा मनांत । पूर्ण तृप्ति न आमुची होत । म्हणून पुनरपि कथा सांगा ॥३॥
धूम्रवर्णाचें सुखप्रद चरित । सांग आम्हांसी सांप्रत । सूत म्हणे शौनकाप्रत । सांगेन जैसें मी ऐकलें तें ॥४॥
व्यास मुखांतून पावन । धूम्रवर्णाचें चरित महान । दक्षही विघ्नेशचरित्र ऐकून । मुद्‍गलासी विनवी विनयान्वित ॥५॥
प्रणाम करून तयास म्हणत । ऐकिलें विघ्नेशमाहात्म्य अद्‍भुत । सर्वसिद्धिप्रद तरीही तृप्त । न जाहलें माझें मानस ॥६॥
अमृताहूनही कथा मधुर । आतां धूम्रवर्ण चरित्र । माहात्म्यासह वर्णन कर । विस्तारानें मजप्रती ॥७॥
त्यानें कोणास शमविलें । ह्याचें ब्रह्म कैसें वर्णिलें । कोणत्या योगें भावबलें । लाभतो तो भक्तांसी ॥८॥
त्याचे किती अवतार । जाहले कोणतीं कृत्यें थोर । कैसें त्याचें तेज अपार । कोणी आराधिलें तयासी ॥९॥
कोणास्तव देहधारी झाला । कोणत्या दैत्या वश करून घेतला । धर्मस्थापनेच्या कार्याला । प्रारंभ धूम्रवर्णानें ॥१०॥
इत्यादि सर्व महिमान । योगींद्रा सांग जें पावन । ब्रह्मांडांत । तुझ्यासमान । नसे अन्य ब्रह्मदायक सुपात्र ॥११॥
सूत म्हणे शौनकाप्रत । ऐसें दक्ष प्रार्थी मुद्‍गलाप्रत । तेव्हां तो महायोगी भक्तियुक्त । म्हणे आनंद वाटूनिया ॥१२॥
दक्षा तूं योगिवंद्य निश्चित । सर्व भावें मज वाटत । अन्यथा गणनाथाच्या कथेंत । रस तुजला न वाटता ॥१३॥
धूम्रवर्णाचें चरित सांप्रत । सांगेन संक्षेपानें तुजप्रत । जें सर्वसिद्धिप्रद जगांत । मोक्षप्रद परलोकीं ॥१४॥
विस्तारानें सांगण्यास । शिवादि देवही करिती प्रयास । परी सामर्थ्य नसे तयांस । मीं तर स्वल्पज्ञानवान ॥१५॥
येथ इतिहास पुरातन । शेष-शंकर संवादपर सांगेन । एकदां शेषनाग करी वंदन । शंकरासी आदरानें ॥१६॥
तदनंतर तयासी म्हणत । तूं सिद्धिदाता पूर्ण सर्वज्ञ असत । करुणानिधे तुझ्याहून जगांत । अधिक श्रेष्ठ कोणी नसे ॥१७॥
ऐसें वेदश्रुति प्रमाण । परी तूं स्वामी करिसी ध्यान । कोणाचें करिसी भजन । कोण हा शिवाहून परम श्रेष्ठ ॥१८॥
हा संशय माझ्या चित्तांत । विचारीतसे सर्वभावें तुजप्रत । मज वाटे मोह होण्या आम्हांप्रत । ऐसें नवीन कर्म करिसी ॥१९॥
मुद्‍गल सांगती दक्षाप्रत । ऐसा प्रश्न ऐकून शिव सांगत । होऊनी मनीं हर्षित । योगप्रिय भक्तांसी पाहूनियां ॥२०॥
शेषनागाचा भावुक प्रश्न । कार्य त्याचें हें शोभन । याचा विचार करून । शिव सांगे तयासी ॥२१॥
ऐसाचि एकदा एकांतांत । सनकादि भक्तोत्तम विचारित । प्रश्न मजला पडून भ्रांत । तुझ्यासम त्या समयीं ॥२२॥
सनकादि तैं विचारिलें । महेश्वरा आम्हां ज्ञान झालें । तुझ्या रूपें परमतत्त्व भलें । तूं साक्षात ईश सर्वंश्रेष्ठ ॥२३॥
तुझा ईश न कोणी जगांत । मग कोणसी नियमें ध्यात । महादेवा मिथ्या मोहांत आम्हांस । पाडण्या कां ऐसें करिसी ? ॥२४॥
त्यांचें तें वचन ऐकून । कश्यपा मी आनंदून । त्यांना गणेशयोग कथन । केला पूर्ण शांतिदायक जो ॥२५॥
ईशत्व अथवा अनीशत्व । हें मायायुक्त निःसंशय तत्त्व । ब्रह्मांत ब्रह्मभूत होता भेदभावत्व । कैसें राहील द्विजोत्तमा ॥२६॥
ज्यानें मज ईशत्व दिलें । तैसेंचि अनीशत्व लोकांसी वाहिलें । त्या गणाधीशा मीं जाणिलें । भक्तिसंयुत द्विजांनो ॥२७॥
अहंकारयुक्त जे वर्तती । ते गजाननासी न जाणती । त्या अहंकारा जिंकून निश्चिती । सेवितों त्याचे पदद्वय ॥२८॥
शिवावें ऐकून वचन । सनकादि मुनि विस्मितमन । भावसंयुक्त तैं होऊन । गणेशज्ञानीं लालस झाले ॥२९॥
ते म्हणती महादेवासी । अभिमान जिंकण्या अशक्य सर्वांसी । वेदादींस तैसें योगियांसी । अजिंक्य असे अभिमान ॥३०॥
मीं नर मीं देव मीं आत्मा असत । मीं ब्रह्मा मीं महेश जगांत । ऐसा अहंकार प्रतिष्ठित । सर्व प्राणिमात्रांत ॥३१॥
तरी कोणत्या योगानें जिंकिला । अहं जो बलवंत अजिंक्य जगाला । तें सर्व चरित्र आम्हांला । विस्तारपूर्वक सांगावें ॥३२॥
श्रीशिव तेव्हां सांगत । अहं ब्रह्मासी मीं जाणत । मीं ब्रह्म या मंत्रासह जात । ब्रह्मांत मीं चित्तासह ॥३३॥
महावाक्यमय योगसाधन । करितां ब्रह्म दिसे अंतर्धान । सारा अहं निरसून । ब्रह्ममय मन होय ॥३४॥
बोधार्थ हें साधन । महावाक्य ख्यात जाण । त्याचा होतां बोध पावन । अहं आणि ब्रह्म भिन्न नुरेल ॥३५॥
तेव्हां सनकादिक मुनिजन । विचारिती विनीत होऊन । नाथ दुर्गम तुमचें वचन । संशय आमुच्या मनीं असे ॥३६॥
म्हणून सुलभ करून । सांगा महेश्वरा हा योग पावन । दया करून शिष्यांचें तारण । करावया सुशांतिप्रद ॥३७॥
शिव तेव्हां इतिहास पुरातन । म्हणे मीं तुम्हांस सांगेन । अहंभावाचें विनाशन । जें वृत्त ऐकतां सौख्यद होय ॥३८॥
एकदा नक्षत्र ग्रहांचा नाथ । शरीरी जनांचा आत्मा पुनीत । ब्रह्मनाथ जो जगांत । त्यास राज्याभिषेक केला ॥३९॥
तो ज्योतिष्पति जेव्हां होत । कर्माचा राजा तैं वाटत । अहंकार त्याच्या मनांत । देवदेवपाच्या अत्यंत ॥४०॥
ब्रह्मा कर्मांचा सृष्टिकर्ता । लोकपितामह तो ज्ञाता । विष्णू झाला पालनकर्ता । संहारक हर प्रख्यात ॥४१॥
कर्मांच्या अन्य प्रभावें वर्तत । पोषणकर्ती शक्ति जगांत । कर्माधीन जग समस्त । ईश्वराधीत निःसंशय ॥४२॥
परी भानुदेव अहंकारयुत । कर्म चाळक स्वतःस मानित । म्हणे माझ्या अधीन जन समस्त । गर्व अत्यंत मानसीं ॥४३॥
त्या घोर अहंकार वृतींत । असता त्यास शिंक येत । त्या शिंकेंतून उत्पन्न होत । एक पुरुष सुंदराकृती ॥४४॥
तो भूपृष्ठावरी पडला । परी भानूस न समजला । महाकाय विशालाक्ष विराजला । बळयुक्त तो पुरुष ॥४५॥
तेथ शुक्राचार्य अकस्मात । सर्वार्थकोविद येत । तो हर्षभरें त्यांस पाहत । विचारी प्रेमानें त्यासी ॥४६॥
कोण तूं कुठे तुझा निवास । काय करण्या इच्छिसी या समयास । मातापित्यांचें नाम आम्हांस । सांग काय इच्छा तुझी ॥४७॥
तेव्हां तो पुरुष सांगत । मी सूर्याच्या शिंकेतून जन्मलों त्वरित । द्विजश्रेष्ठा मी सूर्याचा सुत । परी अनाथ या समयीं ॥४८॥
मी या धरणीवरती परित्यक्त । तूं दिससी दयायुक्त । मज कुशल विचारिसी प्रेमयुत । तुझ्याच स्वाधीन मी होतों ॥४९॥
मुनिसत्तमा माझें रक्षण । करावें तूं लालन पालन । श्रीशिव म्हणे तें वचन ऐकून । शुक्र योगिश्रेष्ठ म्हणे ॥५०॥
त्याचें कर्म ध्यानानें पाहून । शुभ लक्षण त्याचें जाणून । शुक्र म्हणे तूं अहंभावसमुत्पन्न । सुर्यापासून निःसंशय ॥५१॥
म्हणोनी अहं नांवानें ज्ञात । होशील तूं जगांत । तप करी आतां एकचित्त । षोडशाक्षर गणेशमंत्राचा ॥५२॥
ऐसें सांगून विधियुक्त । गणेश मंत्र तो त्यास देत । नंतर शुक्र अंतर्हित । जाहला हर्षित होऊनियां ॥५३॥
अहं सूर्यसुत तप करित । ध्याई गणपतीस ह्रदयांत । निराहार राहून जपत । मंत्र एकनिष्ठ अविरत तो ॥५४॥
थंडी वारा पाऊस सहत । दृढनिश्च्यें तप आचरित । इंद्रियें प्रयत्नें जिंकित । विघ्नापासी तोषविलें अंतीं ॥५५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते अहमुत्पत्तिवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP