मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय ३२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत कथा पुढती सांगती । मुनिजन प्रेमभावें ऐकती । अवंतीनगरीमध्यें वसती । करी एक ब्राह्मणोत्तम ॥१॥
तो गालव सर्वधर्मज्ञ असत । सर्वशात्रांत पारंगत । शापानुग्रहार्थ समर्थ । तेजयुक्त तो महामुनि ॥२॥
यात्रापर एकदां तो हिंडत । पृथ्वीवरी समस्त । स्वगुरूस विश्वामित्रास भेटत । सुशील गुणवंत तो ब्राह्मण ॥३॥
यात्रा संपवून तेथच राहत । गणेशभजनांत । आसक्त । विश्वामित्र तपोनिधीस म्हणत । हात जोडून एकनिष्ठपणें ॥४॥
पंचभूतांचा हा देह नश्वर । सर्वसंमत हे सत्य जर । देहांत स्थित तो गणेश थोर । त्यास कैसें भजता तुम्ही ॥५॥
योगींद्रांचें गुरु साक्षात । आपण ब्रह्मपदधारक पुनीत । ब्रह्मरूप स्वभाव अपूर्व असत । तो सोडून यास कां भजतां ॥६॥
हा ब्रह्मपति साक्षात । वेदश्रुति ऐसें वर्णित । तर हा देहधार कैसा होत । गजानन हें मज सांगा ॥७॥
आवडीस्तव ब्रह्मप्राप्तर्थ । सेवन याचें मुख्य सतत । वेद ऐसें सांगतात । योग्यांचें मत काय असे ॥८॥
गणेशपूजनानें नर होत । शुद्धचित्त स्वल्प काळांत । योगज्ञ तो योगनिष्ठ ख्यात । यात संशय कांहीं नसे ॥९॥
सर्वत्र आत्मस्वभावें एकाग्र वृत्ति । तो होय जड उन्मत्तमय चित्तीं । गजानन त्यागून जगतीं । हिंडतसे ऐसा साधक ॥१०॥
आपण शांतियोग युक्त । असतां गजाननास कां भजत । लोकसंग्रहार्थ का तें मजप्रत । सांगा सर्व स्पष्टपणें ॥११॥
सूत म्हणती बालवचन । ऐसे ऐकून करी निर्भर्त्सन । विश्वामित्र स्वशिश्यास उद्विग्नमन । ज्ञानदायक गोष्ट सांगे ॥१२॥
मूर्खा तूं न जाणसी । गणेशासी ब्रह्मनायकासी । सर्ववत्‍ त्यास चित्तीं । न गणावें तूं गालवा ॥१३॥
पंचचित्तमयी बुद्धि वर्तत । स्वेच्छया ती देह धरित । नाना भ्रांतिकरी होत । सिद्धि सर्वदा जनांसी ॥१४॥
बुद्धिसिद्धींचा स्वामी गणेशान । देहधारी होऊन । क्रीडा करण्या उत्सुक मन । मायिकासम दाखवी माया ॥१५॥
देह जगन्मय ज्याचा । गजाकार मस्तकाचा । ब्रह्ममथ होत संयोग त्यांचा । देहधारी गजानन ॥१६॥
ढुंढि योग्यांच्या ह्रदयांत । वसतसे हें कथिलें असत । अज्ञान्यांच्याही चित्तांत । निराकार पंचभूतात्मक ॥१७॥
सगुण निर्गुण ऐसा भिन्न । कदापि नसे गजानन । त्यास न उत्पत्ति विनाशन । सर्वांसम हे मूर्खश्रेष्ठा ॥१८॥
हा देहयुक्त स्वेच्छया होत । तैसाची देहवर्जित । आत्मरूप अंतर्धान करित । योगनायक लीलेनें ॥१९॥
विश्व जेव्हां ब्रह्मयुत । हें लय पावत समस्त । तेव्हां ते ब्रह्मणस्पतिसंज्ञ योगांत । तन्मय होतें ऐसें जाण ॥२०॥
नरकुजररूप त्याच्या अभेदें स्थित । त्याच्या प्राप्तिस्तव विभिन्न होत । भक्तिभावलालस असत । योगी आपुल्या योगबळें ॥२१॥
ब्रह्मरूप जरी होत । तरी ब्रह्मसामर्थ्य न त्याच्या हेहांत । ब्रह्मणस्पति शब्दें व्यक्त । सत्ता गणेशदेहांत ॥२२॥
म्हणून त्यास योगी भजती । एवढें सांगून मौन धरिती । विश्वामित्र प्रतापी अतिप्रीती । मौनें भजती गणेशासी ॥२३॥
तेव्हां गालव शिष्य प्रणिपात । करून त्यासी म्हणत । निंदून स्वतःसी विनवित । संशय दूर करण्यासी ॥२४॥
गालव म्हणे गणेश योगशांतिस्थ । तरी देव ऐसा कां ख्यात । समस्त वेदवादांत । तें सांगा योगींद्रसत्तमा ॥२५॥
देव ते सत्त्वगुणयुक्त । नर राजस गुण घेत । असुरा तामस ख्यात । त्रैलोक्यांत ते वास करिती ॥२६॥
ऐसा माझा संशय असत । तो सर्वज्ञा दूर करावा त्वरित । जयानें संशयहीन अविरत । भजेन त्या गजाननासी ॥२७॥
विश्वामित्र तैं सांगत । देव सत्त्वगुणयुक्त । स्वर्गांत ते राहत । इंद्रादिक यांत न संशय ॥२८॥
ब्रह्मदेवाचा दिवस लय पावत । तैं नित्य ते लय होत । अन्य कर्मकर देव होत । मानव लाभे ब्रह्माचे पद ॥२९॥
कर्में सृष्टिकर्त्याचें स्थान । लाभे कर्मरूप मानव जाण । परी तो देवरूपता न लाभत । इंद्र ही परम गती ॥३०॥
परमेष्ठी समाख्यात । परा ही इष्टि वर्तत । त्या इष्टीहून अतीत । कांहीं न लाभे मानवांसी ॥३१॥
शिव विष्णु तैसे भानु शक्ति । हे चार ईश्वर होती । सत्यसंकल्प ते असती । सगुण निर्गुण आनंदें ॥३२॥
परी गणेश ब्रह्मभूत । स्वेच्छाचारी वर्तत । ऐशा भेदप्रकारें विश्वांत । जातावा निश्चयार्थींनीं ॥३३॥
दिव हा क्रीडार्थक धातु असत । ऐसें मुनि सर्व सांगत । सर्वत्र क्रीडनें ज्ञात । सर्व देव सर्व पूजित ॥३४॥
सत्यसंकल्प ते असती । म्हणोनि ईश्वर ऐसी ख्याती । सगुणनिर्गुणांत खेळती । हे चार देव परम ॥३५॥
स्वधर्मनिष्ठज स्वकर्मांत । खेळांत ते सदैव रत । इंद्रादि देव समस्त । शास्त्रज्ञ ऐसें सांगती ॥३६॥
चराचर निर्मूंन तेथ खेळत । ब्रह्मा म्हणोनि देवशब्दें ज्ञात । अनंत कोटि ब्रह्मांडें रचित । चार देव स्वमायेनें ॥३७॥
असत्‍  सत्‍ समान पर । ऐसें चतुर्विध भावपर । विश्व रचून क्रीडा अपार । विश्वात्मयुक्त गणेश करी ॥३८॥
जगतांत तैसें ब्रह्मांत । क्रीडार्थें गणजातींत । देव हा गणेश्वर तामें ख्यात । पहा वेदांतील वर्णन ॥३९॥
म्हणोनि अन्य देव देवासमान । न होती कदापि जाण । ब्रह्मादि देव जरी करिती धारण । देव शब्द उपचारें ॥४०॥
सूत सांगती गालव होत । हें वचन ऐकून अति विस्मित । म्हणे महाभागा संशयमुक्त । विश्वामित्रा चित्त माझें ॥४१॥
देव हविर्भाग भोगित । महेशादी भागामिश्रित । जेव्हां दैत्य यज्ञ कर्म नाश करित । तेव्हां देव पीडित होती ॥४२॥
त्यासमयीं शंभु आदि देवास । उपोषण घडे सवांस । तरी देव समस्त कैसे असत । हा संशय दूर करावा ॥४३॥
विश्वामित्र उत्तर देत । अज्ञान आसुरभावें असत । ब्रह्मादी देव शब्दयुक्त । जरी उपोषण त्यांस घडे ॥४४॥
दैत्यहस्ते ते होत पीडित । हा भेद कायम राहत । आणखी तत्त्व सांप्रत । ऐक संशयहारक जें ॥४५॥
खंडैश्वर्ययुक्त इंद्रादि देव ज्ञात । नश्वर त्यांचें वैभव वर्तत । मन्वंतर संपतां ते होत । हविर्भागविवर्जित ॥४६॥
तैसाच ब्रह्मदेव साक्षात । दोन परार्ध काळ हवि भोगत । म्हणोनि ऐश्वर्ययुक्त तो वर्तत । कल्पमात्रची निश्चित ॥४७॥
इंद्रादि देवां समाभाव प्राप्त । गणेशाचा कैसा होय न कळत । म्हणोनि बुध त्यास संबोधित । परमेष्ठी या नांवानें ॥४८॥
इष्टि भक्षण करी देव हा प्रीती । अखंड ऐश्वर्यसंयुक्त जगतीं । जरी शिवादिक हविर्भाग भोगिती । परी ते नष्ट मन्वंतरान्तीं ॥४९॥
देहत्याग सारे करिती । तपानें ध्यानधारणेनें अंतीं । परी हया गणेशाचें ऐश्वर्य जगतीं । त्यांच्याहून श्रेष्ठ असे ॥५०॥
गालव विचारी विश्वामित्राप्रत । जरी देव हविर्भांगयुक्त । यज्ञभागविहीन वर्तत । तरी गजानन देव कैसा ॥५१॥
विश्वामित्र तयास सांगती । विविध यज्ञांत जगती । गणेशास आधी पूजिती । तो हविर्भोक्ता सर्वसिद्धिप्रद ॥५२॥
एक भावाश्रित भावें म्हणती । या देवासी गणपती । समूहांचा समयोग जगतीं । होता संशय काय मुने ॥५३॥
गणराजाचा यज्ञ भिन्न । वेदांत कथिलासे पावन । ब्रह्मणस्पति नामें ख्यात । असून । हविर्भोक्ता तेथें विघ्नप ॥५४॥
एकभागाश्रित वर्तत । विष्णुशंकर मुख्य देव जगांत । म्हणोनि स्वस्वपदांत । पूजनीय ते देव प्रयत्नें ॥५५॥
सर्वंकर्मांत विघ्नेश्वर । आदिपूज्य हा थोर । सर्वपूज्य श्रेष्ठ खरोखर । महाविघ्नप्रभु पालक हा ॥५६॥
गालव विचारी तयाप्रत । पांच देव समान ख्यात । सगुण निर्गुंण समस्त । गणेश सर्वपूज्य आदिपूज्य कसा ? ॥५७॥
विश्वामित्र म्हणे तयास । सगुण निर्गुण देव विशेष । ईश्वर तो शंभु मुख्य तयांस । सत्यसंकल्पभाव असे ॥५८॥
ते योगरूप नसती । एकगुणान्वित ते वर्तती । सर्वही सगुण ऐसी ख्यातीमहालयांत लय पावती ते ॥५९॥
गुणधारण करिती । ते सगुण नाशवंत निश्चिती । निर्गुंण ते नाशवर्जित । असती । योगरूप ते उभय ॥६०॥
त्यांच्या योगें शिवादि ख्यात । नरकुंजर योग होत । गणेश हा योगवाचक ज्ञात । सगुणनिर्गुण उभयविध ॥६१॥
तादृश तो तन्मय होत । योगरूप सदा हा देव असत । सगुण आणि निर्गुण असत । स्वेच्छेने निर्मी उभयविध ॥६२॥
ऐसें उभयविध निर्मित । त्यांत हा नंतर क्रीडा करित । स्वानंद नगरीं संस्थित । देहधारी गजानन हा ॥६३॥
स्वानंदाचा लय न होत । वेदा दींत ऐसें वर्णित । म्हणून हा नाशहीन वर्तत । देहधारी तथापि ॥६४॥
सगुणरूपी योगनाथ । अंतर्धान पावन निर्गुणीं रत । योगशांतिद योगरूपीं रत । स्वेच्छया हा सर्वहा ॥६५॥
म्हणून हा ज्येष्ठराज प्रख्यात । आधार असे वेदश्रुतींत  ज्येष्ठांचा ज्येष्ठ हा असत । सर्वदिपूज्य म्हणोनि ॥६६॥
पंचचित्तमय बुद्धी । भ्रांतिप्रद जी असे सिद्धि । त्यांचा स्वामी गणेश सर्वादी । माझ्या ह्रदयीं सेवितों तया ॥६७॥
ऐसें बोलून महायोगी थांबला । गालवाचा संशय निमाला । प्रणाम करून मुनीला । झाला ज्ञानलाभें कृतार्थ ॥६८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते श्रावणमासमाहात्म्ये गालवसंशयनाशनं नाम द्वात्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP