मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय १६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शिव कथा पुढती सांगती । वर्णाश्रम जेव्हां नष्ट होती । कलियुगांत तेव्हां होती । देव सारे अति दुःखित ॥१॥
ते उपोषणपर प्रार्थितील । विघ्नेशासी अति दुर्बळ । नाना तपोबळांचा प्रभाव । होऊन तोषेल गजानन ॥२॥
तदनंतर प्रकटेल त्यांच्या पुढयांत । धूम्रवर्ण अवतारधारी त्वरित । द्विभूज अश्वावरी स्थित । खड्‍गचर्मप्रधारक तैं ॥३॥
नाना फुलांची माळ धारण । गळयांत करील गंध चर्चून । त्यास पाहतां भक्तियुक्त मन । देव सारे वंदन करिती ॥४॥
पूजन करून त्यास स्तविती । धूम्रवर्णा तुज प्रणती । नाना खेळकरा अतिप्रीती । अमेयशक्तियुता तुज नमन ॥५॥
भाविकासी धर्मरक्षकासी । अनाथांच्या नाथासी । सगुणासी । सगुणनिर्गुणहीना नमन तुला ॥६॥
योगरूपासी योगकारासी । सदा सर्वत्र संस्थितासी । नरकुंजररूपा तुजसी । धूम्रवर्णधरा तुज नमन ॥७॥
पूर्णासी पूर्णरूपासी । गणेशासी । गणेशासी परात्म्यासी । धर्मरक्षकासी महाभागासी । गजानना नमन तुला ॥८॥
धर्म होता अमरासी प्राप्त । अन्य होय या जगतांत । धर्मंनष्ट होतां निश्चित । मरण आमुचें ओढवेल ॥९॥
बुद्धमाया सहाय्यें निर्जिंत । जाहलों आम्हीं सांप्रत । विष्णुशंभु मुख्य देव समस्त । महोदरा आम्हां रक्षावें ॥१०॥
अडीच हजार वर्षें लढलें । क्षुद्रदेव कलीशीं स्वबळें । परी अंतीं पराजित झालें । स्वस्थान सोडून पळाले ते ॥११॥
तदनंतर वर्षे पाच हजार । लढले तीर्थदेव अनिवार । परी शेवटीं स्वीकारून हार । तेही पळाले तीर्थांतुनी ॥१२॥
कलीनें तीर्थें समस्त । जिंकिलीं तेव्हां त्वरित । तदनंतर दहा हजार वर्षें झुंजत । विष्णूशिवादी देव तैं ॥१३॥
तेही कलिबळें पराजित । पृथ्वी त्यागून पळून जात । कर्माकर्मात्मिक शक्ति वसत । मायात्मिका बुद्धी तेथें ॥१४॥
ती विकर्मगुणसंयुक्त । तूं विष्णु तैसाची होत । फलदाता तेथ वसत । देवरूपधर कलिप्रवर्तक ॥१५॥
परी तुझें देवस्वरूप नष्ट । करण्या कलीस न शक्य इष्ट । तुझेंच चिंतन तो करित । त्यायोगें जिंकी अन्य देवां ॥१६॥
त्यानें तुझें करून चिंतन । विघ्नेशा जिंकिले देवगण । आम्ही सर्व मुख देव दारूण । पराजय पावलों गणेशा ॥१७॥
आम्हांस स्वाहा न मिळती । धर्मांची हानी झाली जगतीं । आतां लेशमात्रें स्थिति । धर्माची या अवनीवरी ॥१८॥
त्यासही वधील त्वरित । कलि तो दारुण अत्यंत । गणनायका रक्षी अविलंबित । अन्यथा समूळ नष्ट होऊं ॥१९॥
आम्हीं धर्मशील ख्यात । धर्म नष्ट होतां नाशिवंत । दयासिंधो धूम्रवर्णा राख सांप्रत । गजानना आमुची प्रतिष्ठा तूं ॥२०॥
मरणोन्मुख अनाथ । देव जाहले समस्त । त्यांसी करी तूं सनाथ । धूम्रवर्णा गजानना ॥२१॥
ऐसें प्रार्थूंन गणाधीशासी । देवगण वंदिती त्यासी । दुःखपूर्णं आपुल्या वृत्तासी । निवेदिती पुनःपुन्हा ॥२२॥
पीडा होऊन ते रडती । तेव्हां गजानन त्यांस म्हणती । चिन्ता करूं नका चित्तीं । भयही सारें सोडावें ॥२३॥
धूम्रवर्ण म्हणे मी रक्षीन । तुम्हां देवगणांस प्रसन्न । धर्मरक्षणाकारण । अजेय कलीस मारीन मी ॥२४॥
उग्र त्या कलीसी जिंकीन । त्याचा विनाशा मीं करीन । त्यास्तव अवतार घेईन । वचन हें माझें तुम्हांसी ॥२५॥
अपण रचिलेलें स्तोत्र जगांत । कलिदोषहारक पुनीत । पाठका श्रोत्यांस समस्त । सर्वसिद्धिप्रदायक ॥२६॥
धनधान्यप्रद आरोग्यप्रद । पुत्रपौत्र कलत्र प्रद । होईल हें निर्विवाद । ऐसें वरदान देतो मीं ॥२७॥
ऐसें बोलून स्वदेहांतून । धूम्रवर्ण निर्मी प्रतापवान । विविध सेना शस्त्रसंपन्न । नाना वाहनयुक्त ऐसी ॥२८॥
पूर्ण तेजानें संयुक्त । त्या सेनेनें जो मंदित । ऐसा प्रभु गजानन वधित । मलिन जनांसी त्या वेळीं ॥२९॥
म्लेंच्छप्राय जे विविध जन । तैसे जे म्लेंछ पापमग्न । धर्मपीडेत निमग्न । ऐश्या कलीस त्रस्त केलें ॥३०॥
त्या गणेशाच्या अंगावरून । जो वारा वाहे पावन । त्याचा स्पर्श होतां जन । धर्मपरायण जाहले ॥३१॥
जरी भययुक्त मन । कलि गुप्त स्वरूप घेऊन । युद्ध करी जनांत राहून । तेथही मारिती गणेशदूत ॥३२॥
अंतीं हतोत्साह होऊन । मानवांचें जोवित । सोडून । कलि हतप्रभ उन्मन । देहधारी शरण गेला ॥३३॥
तो धूम्रर्णासी वंदित । पूजन करून स्तवित । महाबळास धूम्रवर्णा ध्यात । विघ्नेश्वरासी भक्तीनें ॥३४॥
आनंदानें रोमांचित । कलीचि काया तैं होत । तो धूम्रवर्णाचें स्तोत्र गात । विनीतभावें त्या समयीं ॥३५॥
धूम्रवर्णासी नाना रूपधरासी । सर्वांसी सुखदायकासी । विघ्नेशासी अनंतहस्तासी । अनंतचरणा तुज नमन ॥३६॥
अनंतमायेनें गुप्त प्रचारकासी । हेरंबासी भक्त संरक्षकासी । अभक्ता भय दात्यासी । गणेशा तुज नमो नमः ॥३७॥
आदिमध्यान्तहीनासी । आदिमध्यांतयुक्तासी । विरुद्धधर्मयुक्तासी । मोहप्रदा तुज नमन असो ॥३८॥
कर्माचें फलदात्यासी । ज्ञान्यांसी ज्ञानदात्यासी । आनंदयुक्ता सदानंद दात्यासी । सहजा तुजा नमन असो ॥३९॥
स्वानंदासी समाधीसी । योगासी योगनाथासी । ब्रह्मेशासी गजाननासी । धूम्रवर्णा तुज नमन असो ॥४०॥
तुज स्तवण्या समर्थ कोण । वेदादीही धरिती मौन । तुज भक्तिभावें करितों नमन । संतुष्ट होई या स्तोत्रानें ॥४१॥
गणनाथा मीं तुझा दास । शरणागत आलों उदास । आतां रक्षण करी अनुचरास । अज्ञानें युद्ध मीं केलें ॥४२॥
करुणानिधे क्षमा करी । मज दीनातें उद्धरी । ऐसें बोलून चरण धरी । कली गणाध्यक्षाचें तें ॥४३॥
तेव्हां त्या स्वभक्ताप्रत । शरणार्थीसी गणेश म्हणत । धर्मघ्ना चिंता न करी मनांत । तुज मी सांप्रत क्षमा करितों ॥४४॥
तुज मी नाहीं वधणार । शरणागतावर मीं दयाकर । तूं रचिलेलें माझें स्तोत्र । कलिमलहारक होईल ॥४५॥
पाठका वाचका सर्वकामप्रद । अंतीं देई पूर्ण स्वानंद । योग्यांची भक्ति करी सुदृढ । योगदायक सर्व काळी ॥४६॥
कले तूं द्वेष सोडून । माझ्या आज्ञावश राहून । आपुल्या अधिकाराचें करी पालन । कलीनें तें मान्य केलें ॥४७॥
धूम्रवर्णासी नमून । कली गेला स्वस्थाना प्रसन्न । धूम्रवर्ण वसिष्ठादीस बोलावून । कृतयुगाचा आरंभ करी ॥४८॥
स्वयं होत अंतर्धांन । धूम्रवर्णाचें हें चरित्र महान । कथिलें सर्वसिद्धिप्रद पावन । पठणें श्रवणें पूर्णत्व लाभे ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते धूम्रवर्णकलिनिर्जयवर्णनं नाम षोडशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP