खंड ८ - अध्याय ४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शिव कथा पुढती सांगती । अहं दैत्य माजला जगतीं । परस्त्रीलालस मूढमती । पकडिल्या त्यानें नागकन्या ॥१॥
देवकन्या नरांच्या दुहिता । बलात्कारें त्या आणितां । सर्वदूषक भोगी नित्यनेमता । मद्यमांस उपभोगी ॥२॥
गणेशासी विसरून । दुष्टात्मा पापकर्मपरायण । एकदां अधर्मकारक दैत्य बोले वचन । कर जोडून सभेंत ॥३॥
दैत्येंद्रांनी तो प्रेरित । म्हणे महाभागा सर्व ब्रह्मांड जित । तूंच एक जगदीश तुजसम नसत । अन्य कोणीही या जगीं ॥४॥
विष्णुमुख्य देव वनांत । राहिले सांप्रत भयभीत । सुर असुर शस्त्रू शत्रू असत । देव ऐसें सांगती ॥५॥
हें देवेंद्र शस्त्रादींनीं न मरतील । म्हणून अमर नामें ख्यात सबल । वेदवादांत हें वचन आढळेल । यज्ञाहुती देव भक्षिती ॥६॥
त्यांसी मारण्याचा उपाय । यज्ञकर्मांचा करावा क्षय । त्यायोगें देवगण उपोषित होय । क्षुधापीडित सारे मरतील ॥७॥
म्हणून कर्मांचें खंडन । करावें दैत्येशा सत्वर जाऊन । पूर्वींही त्रैलोक्यराज्य जिंकून । असुर प्रबल झाले होते ॥८॥
परी पुढें अमर वधिती । कालप्रभावें त्यांसी फसविती । जरी कांहीं न्यून पाहती । त्याचा लाभ घेऊनिया ॥९॥
छिद्रान्वेषी देव समस्त । आपणा मारतील कदाचित । त्यांच्या विनाशार्थ त्वरित । प्रयत्न करी अहंराजेशा ॥१०॥
त्या अधर्मधारकाचें वचन । ऐकून अन्य असुर आनंदून । म्हणती हें शोभन वचन । महाराज आपण मान्य करावें ॥११॥
शंखादि असुर प्रशंसिती । तेव्हां अहंकार म्हणे हर्षितमती । अधर्मकारका तूं सांप्रती । योग्य सल्ला दिलास ॥१२॥
आतां दैत्यहो समस्त । जावें तुम्हीं जगांत । यज्ञादि कर्में करा खंडित । राजाज्ञाही मी देतों ॥१३॥
दैत्यसमूहासहित हर्षित । अधर्मधारक तेव्हां निघत । भूमीवरी कर्में खंडित । केलीं त्यानें सर्वंत्र ॥१४॥
त्यायोगें हाहाकार माजला । वर्णाश्रमांचा बंध तुटला । देवालयें फोडित झाला । गणेशमूर्ती क्षेत्रस्थानें ॥१५॥
सर्वत्र अंह असुरमय प्रतिमा । स्थापिल्या दैत्यनयनाभिरामा । ब्रह्मणांची करून मानखंडना । त्यांच्या हस्तें पूजविती ॥१६॥
कर्मांचा प्रचर । सर्वत्र करविला अनिवार । ऐसा कर्मांचा संहार । करून भेटला असुरेश्वरासी ॥१७॥
त्यासी स्वपराक्रम सांगत । असुरेद्र त्याचा सन्मान करित । त्यायोगें मानी कृपार्थ । आपणासी अधर्मासुर ॥१८॥
कर्मनाश होतां वर्णसंकर होत । जन सर्व झाले दुःखयुक्त । मुनींसहित सर्व देवांप्रत । उपोषण संकट ओढवलें ॥१९॥
दैत्यनाशार्थ विचार करिती । ब्रह्मा महेश खेदयुक्त अती । त्यांस अन्य मुनि देवगण सांगती । मायायुक्त आम्हीं सारे ॥२०॥
त्या दुरात्म्यानें आम्हांस जिंकिलें । अहं असुरें निष्प्रभाव केलें । नानाविध मायेचे झालें । प्रभुत्व सर्वत्र प्रस्थापित ॥२१॥
त्या मायेच्या अतीत असत । गणेश एकला जगांत । पंचचित्तमयी बुद्धि वर्तत । सिद्धि पंचभ्रांतिकरी ॥२२॥
त्यांचा गणनायक पति । मायिक हा सिद्धिबुद्धींचा प्रीती । त्यांनी मायेची न भीती । विघ्नेश्वर सर्व श्रेष्ठ देव ॥२३॥
तोचि ह्या दैत्याचें करील हनन । परी दैत्यास त्याचेंच वरदान । सांप्रत विसरला त्यास म्हणून । हितकारक हें आपणांसी ॥२४॥
गणेशाचा मंत्र त्यागून । भोगविलासीं झाला निमग्न । गणेशक्षेत्रांचें भंजन । केलें असे त्या दुर्मतीनें ॥२५॥
गणेशपूजन सर्व कर्मांत । करावें सर्वांनी विशेषयुक्त परी तो अहं असुर मदोन्मत्त । विसरला त्या विघ्नेश्वरा ॥२६॥
म्हणून आपण समस्त । पूजूया ढुंढि भक्तियुक्त । तो त्या महा सुरासी मारील निश्चित । उपासना सारे करुंया ॥२७॥
एकाक्षर मंत्राचा जप करूंया । गजानना ह्रदयीं ध्याऊंया । ऐश्या विधीनें तोषवूया । गणेशप्रभूला आपण सारे ॥२८॥
श्रीशिव कथा सांगत । ब्रह्मयाचें वचन ऐकत । देव सारे अभिनंदन । करित । वाहवा उत्तम हा उपाय ॥२९॥
ऐसें म्हणून ईश्वरासहित । निराहार ते व्रत आचरित । एकाक्षर विधानें भक्तियुक्त । गणेश्वरासी तोषविती ॥३०॥
ऐसी शंभर वर्षें जाती । तेव्हां गणनायक प्रसन होती । त्या देव मुनीजनांपुढती । प्रकटले वर देण्यासी ॥३१॥
मूषकावरी आरूढ असत । द्विरदानन ऐसा पाहत । तेव्हां देव मुनी त्वरित । हर्षभरें प्रणाम करिती सारे ॥३२॥
आदरें पूजन करून । पुनः पुनः करिती वंदन । देव मुनिगण आनंदून । विघ्नेश्वराची स्तुती गाती ॥३३॥
देवर्षी स्तोत्र गाती । धूम्रवर्णासी आमुची प्रणती । सर्वांसी सर्वदा सुखप्राप्ती । कृपाबळें जो देत असे ॥३४॥
गणेशासि परेशासी । परात्परासी लंबोदारसी । विघ्नपतीसी । विघ्नकर्त्यासी । विघ्नहारकासी नमन असो ॥३५॥
हेरंबासी अनादीसी । विशेषें ज्येष्ठराजासी । सर्वपूजिता मनोवाईविहीनासी । मनोवाणीमया नमन ॥३६॥
ब्रह्मरूपासी ब्रह्म प्रकाशकासी । ब्रह्मपतीसी मंत्रनाथासी । महारूपासी देवासी । देवदेवेशरूपा नमन तुला ॥३७॥
देवांसी वरदात्यासी । महोदरासी आदिपूज्यासी । सर्वांच्या मातापित्यासी । सर्वरूपासी नमन असो ॥३८॥
सर्वात्म्यासी कर्मरूपासी । शूर्पकर्णासी शूरासी । वीरासी परमात्म्यासी । चतुर्भुजासी नमन असो ॥३९॥
गुणेशासी धूम्रासी । गुणेशासी कर्त्यासी । हर्त्यासी तैसें भर्त्यासी । परज्ञानस्वरूपा नमन तुला ॥४०॥
स्वाधीनासी महामोहदात्यासी । सर्वहर्त्यासी गजाननसी । वेदादींसही वर्णन करण्यासी । शक्ति नसे दयाळ ॥४१॥
तेही जेथ धरिती मौन । तेथ आम्ही काय करूं स्तवन । जेथ वर्ण धूमराधिष्ठित । होऊन । अव्यक्तरूपा तुझ्यांत ॥४२॥
धूम्रवर्णं ऐसी ख्याती । वेदांत तुझी सर्वत्र जगतीं । धन्य आम्हीं सारे जगतीं । पाहिलीं तुझीं पदकमलें ॥४३॥
अव्यकत असुनी व्यक्त । झालास भक्तांस्तव सांप्रत । ऐसें स्तवन करून वंदित । मुनिदेव सारे धूम्रवर्णासी ॥४४॥
त्या प्रणतांसी उठवून । धूम्रवर्ण मेघगंभीर वचन । म्हणे तुमचें हें स्तोत्र महान । सर्व सिद्धिप्रदायक ॥४५॥
जो हें स्तोत्र वाचील । अथवा भक्तिभावें ऐकेल । त्यास पुत्रपौत्रादिक लाभेल । ऐहिक इष्ट सर्वस्व ॥४६॥
जें जें इच्छील तें तं समस्त । स्तोत्रप्रभावें होईल प्राप्त । वर मागा सुरर्षिजनहो सांप्रत । देईन मी तपतुष्ट ॥४७॥
गणेशाचें ऐकून वचन । देवर्षी करिती वंदन । अत्यंत हर्षित होऊन । म्हणती त्या देवदेवेशासी ॥४८॥
जरी गजानना तूं प्रसन्न । वर देण्या प्रकटलास तोषून । तरी अहं दैत्याचें करी हनन । सर्वज्ञा हें वरदान द्या ॥४९॥
तो सर्वांसी दुःख देत । कर्मखंडनी नित्य आसक्त । त्याच्या मरणें जगांत । सुख शांति नांदेल निश्चयें ॥५०॥
तूं देवा मायाविहीन । तुझ्या हस्तें त्याचें हनन । होईल यांत । संदेह न म्हणून । मारावें अहं असुरा त्वरित ॥५१॥
तूंच त्या असुरास । अभय पूर्वी दिलेंस । त्यायोगें सर्व जगास । अजिंक्य तो महा असुर झाला ॥५२॥
आम्ही सर्वही पराजित । शरण तुजला आलों विनत । आतां रक्षण करी कृपायुक्त । दृद्धभक्ति दे तव चरणीं ॥५३॥
अव्यभिचारिणी भक्ती । देई देवा आम्हांसी पवित्र मती । तरी विघ्नविहीनता निश्चिती । लाभून तव तदाचा लाभ होवो ॥५४॥
ऐसें बोलून वंदन । गणेशास करिती देव मुनिजन । तथास्तु म्हणून अंतर्धान । पावला विघ्नराज धूम्रवर्णं ॥५५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते देवमुनिवरप्रदानं नाम चतुर्थोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP