खंड ८ - अध्याय ७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ शिव सांगे पुढचा वुत्तान्त । शुक्राचा उपदेश अहंकार ऐकत । त्यास प्रणास करून म्हणत । ज्ञानसंयुक्त कृतांजली ॥१॥
गुरो आपण बोध दिला । तो मज मान्य झाला । शरण जाईन गजाननाला । सर्वशांतिप्रदायका त्या ॥२॥
सुरासुरमया त्या ब्रह्मासी । ऐसें सांगून शुक्राचार्यासी । श्रीओंकारापासून मनासी । आकर्षून योगेशा शरण गेला ॥३॥
महापाशास पुरप्रांतीं पाहत । त्यास कर जोडून नमन करित । शस्त्रराजावें स्तवन करित । गणेशाहंकराचा धारक जो ॥४॥
अहं गणेशपाशास स्तवित । शस्त्रराजासी त्या वंदित । मोक्षरूपास बंधरूपा नमित । गणेशकराच्या भूषकराच्या भूषणासी ॥५॥
मोहमायामय असे ख्यात । बंधप्रद सर्व जंतूपत । गणेशज्ञानानें जो नर युक्त । तो बंधहीन होईल ॥६॥
तेंच बंधरूपाख्य असत । शस्त्र त्या महात्म्याचें विख्यात । तूं पाशरूप जगांत । बंधमोक्षकर महान ॥७॥
जे तुज शरण येत । त्यांस नव बंधज भय नसत । शस्त्रा मीं तुज शरणागत । रक्षण करी तूं माझें ॥८॥
तेजनाथासी दुष्टनाशकरासी । परमात्म्यासी पाशासी । शस्त्रब्रह्मासी मीं तुजसी । वंदितसें मनोभावें ॥९॥
ऐसी स्तुति करून नमित । महापाशासी पुनरपि विनीत । अहंकार त्याचा निरोप घेत । विघ्नेश्वरा भेटण्या गेला ॥१०॥
हें स्तोत्र जो वाचील । त्याचा बंध नष्ट होतो समूळ । मायापाशमय जो सबळ । गणेशांत । गति लाभावी ॥११॥
पाश जेव्हां निघून जात । तेव्हां अहंकार गुरूसहित । धूम्रवर्णास भेटण्या जात । पाहून त्यास प्रणास करी ॥१२॥
पुनः वरती उठून । विघ्नेशाचें करी पूजन । सर्वेशासी पुनरपि वंदून । कर जोडूनी स्तुती करी ॥१३॥
धूम्रवर्णांसी गणेशासी । परमात्म्यासी अव्यक्तासी । आदिबीजासी परेशासी । लंबोदरासी नमन असो ॥१४॥
दैत्यनाथासी हेरंबासी । महेशासी पालकासी । कर्मासी कर्मरूपासी । नानाकर्मप्रचार्रका नमन ॥१५॥
ज्ञानासी ज्ञानदात्यासी । ज्ञानासी ज्ञानासी चराचररूपासी । जंगमस्थासी स्थावरासी । स्थावर जंगमहीना नमन ॥१६॥
योगासी योगनाथासी । योग्यासी योगदायकासी । योग्यांसी योगदात्यासी । चिंतामणीसी नमन असो ॥१७॥
शांतासी शांतचित्तासी । शांत मूर्तीसी ब्रह्मपतीसी । सिद्धिबुद्धिदात्यासी ब्रह्मासी नमन असो ॥१९॥
स्वानंदपतीसी माझें नमन । किती करूं मी तुझें स्तवन । गणाधीशा तूं धूम्रवर्ण । वेदवेदासही अवर्णनीय ॥२०॥
तुझें रूप अव्यक्त । वर्णन करितां वेद धूम्रायित । योगशांति तें धरित । कथन करण्या अक्षम ॥२१॥
म्हणून धुम्रवर्ण तुज म्हणती । वेदवादी जन जगतीं । योगिदुर्लभा तुझें मजप्रती । दर्शन झालें धन्य मी ॥२२॥
माझें सर्व कुळ धन्य । तुझ्या अंध्रियुगाचें झालें दर्शन । ऐसें बोलून वाचे रम्य । भक्तियुक्त तो महासुर ॥२३॥
भक्तिरसांत । निमग्न । तयासी पाहे गजानन । प्रेमयुक्त म्हणे वचन । वर माग महाभागा ॥२४॥
तुझ्या या स्तोत्रानें संतुष्ट । देईन तुझें सर्वही इष्ट । तूं रचिलेलें हें स्तोत्र । सर्वसिद्धिप्रद सुखद ॥२५॥
हयाचें करिता पठण । तैसेंचि प्रेमानें वाचन । त्यास अहंकारज भय नसून । भक्तिमुक्ति लाभे दैत्येशा ॥२६॥
जें जें इच्छील तें तें देईन । तो माझा प्रियभक्त जन । मोहविवर्जित सदा होऊन । तयांसी न्यून कांहीं नसे ॥२७॥
ऐसें ऐकून गणेशवचन । तें ऐकून अहं बोले प्रसन्न । धूम्रवर्णासी प्रणिपात करून । महासुर त्या वेळीं ॥२८॥
जरी मज वर देण्या आलास । धूम्रवर्णा गजानना तव भक्तीस । देई मज तूं दृढत्वास । स्नेह तुझ्या पादपद्मीं ॥२९॥
मज गाणपत्य तूं करी । गाणपत्यप्रिय मजला तारी । माझें स्थान वृत्ति योगक्षेमकरी । सांगे दास मी विनम्र तुझा ॥३०॥
अन्य कांहीं मीं न याचित । व्हावें श्रीओंकार मोहवर्जित । सिद्धिबुद्धियुक्त भक्तियुत । तुज भजेन विशेषें ॥३१॥
गुरूनें मज बोध अत्यंत । केला तो मीं स्मरत । योगशांतिमयरूपा तुज सांप्रत । महोदरा मीं पूजीन सदा ॥३२॥
धूम्रवर्ण तें ऐकून म्हणत । माझी दृढभक्ति तुझ्या हृदयांत । वसेल अहं असुरा सतत । गाणपत्यप्रिय तूं होशील ॥३३॥
दास्यपरायण एकचित्त । माझा भक्त तूं होशील ख्यात । जेथ माझें पूजन कार्यादींत । न करिती तेथ स्थान तुझें ॥३४॥
तैसें कर्मफळ खाऊन । त्या कार्याचें करी विध्वंसन । परी कार्यादींत जेथ करिती स्मरण । तेथ पीडा देऊं नको ॥३५॥
अहंकारा तुझा वारा । सात्त्विक जनांस न लागो उदारा । परी भ्रष्टस्वभावी असुरा । भ्रष्ट करी तूं निरंतर ॥३६॥
आपुल्या नगरांत स्थित । रात्री सदा माझे भक्त । त्यांस माझ्या अहंकृतियुक्त । नित्य करावें आदरानें ॥३७॥
जेथ कर्मादीत माझें स्मरण । तैसेंवि करिती पूजन । तेथ साधुस्वभावें वागून । अहंकृतिवर्ज जनांत करी ॥३८॥
गणेशभक्तिसंयुक्त । माझ्या अभिमानें तूं युक्त । होशील यांत संदेह नसत । जाई आतां माझ्या आज्ञेनें ॥३९॥
ऐसें बोलून गणाधीश थांबत । शिव सांगती पुढला वृत्तांत । अहंकार त्यांस वंदून जात । आपुल्या नगरासी मोदानें ॥४०॥
त्याचें तें ह्रदाय परिवर्तन । जाणून दैत्येश दुःखित मन । त्याचा संग सोडून । पाताळविवरीं निघून गेले ॥४१॥
भयविव्हल ते होत । परी अहं असुर सुखयुक्त । त्या गणनायकासी भजत । अनन्यमनें धूम्रवर्णा ॥४२॥
जैसें विघ्नेशें सांगितलें । तैसें आचरण ठेविलें । अंतीं शांतरूप प्राप्त झालें । अहंकार असुरासी ॥४३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते अहंकारशांतिरूपवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP