मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय १४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीशिव सांगती कथा अद्‍भुत । बाणास गणेश वरदान प्राप्त । त्याच्या कृपेनें भजनें होत । बुद्धिभेद माझा तैं ॥१॥
तदनंतर गिरिसुतेसहित । स्कंदमुख्य गणांच्या संगतींत । शंकर मीं बाणाच्या नगरी । पुनरपि गेलों रहावया ॥२॥
माझें आगमन जाणून । बाण झाला हर्षितमन । ध्याऊन देव गजानन । आला माझ्या संनिध ॥३॥
मज शिवास प्रणाम करित । मीं होतो गणांच्या समवेत । रुदन करून मज पूजित । म्हणे क्षमा करी शंभो ॥४॥
तेव्हां शंकर मी त्या भक्तास । स्तवून म्हणे मधुर वचनास । हर्षवित त्याच्या चित्तास । वृथा चिंता करूं नको ॥५॥
दानवाधिपा मी संतुष्ट । आलों येथ अतिह्रष्ट । वर माग जो असेल इष्ट । देईन मीं तो बलिनंदना ॥६॥
तेव्हां तो महाभाग बाणासुर । म्हणे भक्ति देई तुझी स्थिर । तुझा वियोग जीवनभर । कदापिही मज न व्हावा ॥७॥
ऐसें करी महादेवा सतत । शंभु तथाऽस्तु तैं म्हणत । राहित बाणाच्या नगरींत । बाणासुर मनीं आनंदला ॥८॥
तदनंतर सर्व लक्षणसंयुत । सुता जाहली थोडया काळांत । उषा ऐसें नाव ठेवित । बहु सुंदर ती ह ओती ॥९॥
ती होतां यौवनसंपन्न । स्वप्नांत अनिरुद्धास पाहून । जाहली काममोहित उन्मन । चित्रलेखेस तैं सांगे ॥१०॥
उषेची मनोव्यथा जाणून । चित्रलेखा जादू करी तत्क्षण । अनिरुद्धास अन्तःपुरीं आणून । स्वाधीन केला उषेच्या ॥११॥
यादवांस मोहिनी घालून । पडविला निद्रित अनिरुद्ध प्रसन्न । गुप्तपणें त्यास वरून । उषा नित्य हो रममाण ॥१२॥
तिची मोहिनी पडून । अनिरुद्धही रमला एकमन । कामदेवसुत हरवला म्हणून । यादय तिकडे शोध करिती ॥१३॥
त्याच्या शोध ते करिती । परी वार्ता न मिळे तयाप्रती । प्रद्युम्नें गणाधीशाला स्मरलें चित्तीं । प्रसाद तेव्हां लाभला तया ॥१४॥
त्याच्या प्रसादे नारद येत । ते कामपुत्राचें वृत्त सांगत । ऐकूनिया अति हर्षित । जाहले सारे यादव ॥१५॥
तदनंतर ईश्वरसंयुक्त बाणास । जिंकण्याचा करी मानस । कृष्ण बलराम युक्त खास । यादव साहाय्यें परम युति ॥१६॥
शंकराच्या भयानें ग्रस्त । कृष्णास उद्धव सांगत । कृष्णा तूं गणेशाराधन भावयुक्त । करी तूं तरी भय टळेल ॥१७॥
विघ्नविहीन तूं होशील । शिवास अजिंक्य तुम्ही व्हाल । यांत संशय नसे त्या वेळ । एकाक्षर मंत्र जपावा ॥१८॥
तो उपदेश ऐकत । कृष्ण एकाक्षराचें पुनश्चरण करित । गणपतीस ध्यात । यथाशास्त्र विधानानें ॥१९॥
तदनंतर यादवांसहित । गेला बाणाच्या नगराप्रत । शंख वाजवून आव्हान देत । तेव्हां बाणही बाहेर पडे ॥२०॥
शिवासहित बाण युद्धक्षेत्रांत । ठाकला गणेश कवचयुक्त । शंकरें जें दिलें तयाप्रत । सामदेवभव विशुद्ध ॥२१॥
शिवाचा शाप सत्य होण्यास । हस्तच्छेदन होण्यास । कृष्ण करी युद्धास । बाणासुरासह त्या समयीं ॥२२॥
महाबळ तो दैत्येंद्र होत्त । खिन्न तें पाहून शंकर जात । लढण्यास रणांगणांत । कृष्ण स्मरे विघ्नपासी ॥२३॥
तदनंतर शिवकृष्णाचें होत । महायुद्ध वर्णनातीत । त्रैलोक्य नाश संभवत । कृष्णे सोडिलें जृंभास्त्र ॥२४॥
त्यायोगें सदाशिवास मोहवून । कृष्ण सोडी मर्मभेदी बाण । बाणासुराचे छेदिले भुज तत्क्षण । धारदार चक्रानें ॥२५॥
सहस्त्र बाहूतले दोन । भुज ठेविलें राखून । चक्र तेव्हां कुंठित होऊन । परतलें कृष्णाच्या हातांत ॥२६॥
तेव्हां कृष्ण खेडयुक्त । स्मरे विघ्नपासी मनांत । आकाशवाणी तैं ऐकत । गणेशानें जी प्रेरिली ॥२७॥
गणेशकवचानें रक्षित । शंकरें बाणास जाण निश्चित । त्यास मारण्या रणांत । समर्थ तूं न होशील ॥२८॥
शिववरें जें झाअळे प्राप्त । ते भुज नष्ट शिवशस्त्रेंच सांप्रत । जन्मस्थ दोन भुज राहत । गणेश कवचें सुरक्षित ॥२९॥
तेव्हां हर्षभरें परतून । कृष्णें रणांगणीं तें ऐकून । जृंभास्त्र घेतले काढून । तेव्हां शंकरास जाग आली ॥३०॥
तदनंतर मज शंकरा ज्ञान । जाहलें विघ्नेशकृतीचें महान । कृष्णें मज केलें नमन । मीही आलिंगिलें तया ॥३१॥
जनार्दनास भेटून । केला समेट युद्ध थांबवून । यथाविधि विवाह लावून । स्वकन्या देईअ अनिरुद्धासी ॥३२॥
दैत्येंद्र तो बाणासुर । प्रेमयुक्त मुदित फार । विवाहोत्सव अपूर्व सुंदर । साजरा केला तयानें ॥३३॥
तदनंतर कृष्ण स्वभवनाप्रत । परतला हर्षसमन्वित । बाणासुर राज्य सोडून होत । महाकाल वरप्रसादें ॥३४॥
कैलासावरी तो निवसत । प्रातःकाळीं नित्य उठत । द्विरदाननासी पूजित । शमी मंदार दूर्वादींनी ॥३५॥
तैसेंच रक्तपुष्पें वाहून । गणापतीस प्रथम पुजून । तदनंतर शंभूचें आराधन । करीतसे तो महागण ॥३६॥
सदा ध्यानमग्न राहून । तोषवी त्या दोघांस नितनेम । शौनक विचारी गजानन । रक्तवर्ण कां प्रिय मानी ॥३७॥
सूता विघ्नेश्वराप्रत । लालरंग सदा प्रिय असत । त्यानें तो होत सुप्रीत । रक्तवर्ण स्वयं गणपती ॥३८॥
रक्तवस्त्रधर रक्त चंदनचर्चित । रक्तपुष्णधर तो असत । सिंदूर विलेपनें विलसत । रत्नसागर खेलक तो ॥३९॥
सर्ववर्णात्मक असून । लाल रंगांत विशेष प्रसन्न । हयाचें कारण सांगून । सर्वाज्ञा संशय दूर करी ॥४०॥
सूत तेव्हां शौणकास सांगत । सृष्टिप्रारंभीं पांच रंग उद्‍भूत । श्वेत शामल तैसा रक्त । पिवळा निळा सर्व वर्णमय ॥४१॥
परस्पर विभेदानें तैसें संमीलनें होत । अनंत वर्ण उद्‍भूत । द्विजसत्तमा हें रहस्य तुजप्रत । सांगतों सारें ऐकावें ॥४२॥
त्या पांच रंगांनीं आचरिलें । गणनाथाचें घोर तप जें चाललें । शंभर वर्षे तेणें तोषले । गणनायक तयांवरी ॥४३॥
प्रकटले त्या रंगासमोर । त्यांस करिती ते नमस्कार । होऊन प्रणत तुष्ट फार । शोभासमन्वित वर मापती ॥४४॥
ते गणेश्वरास प्रार्थित । ब्रह्मनायका आमुच्या रूपांत । राही स्वामी तूं सतत । त्यायोगें कृतकृत्यता आम्हां ॥४५॥
मायाबंधहीन होऊन । गणाध्याक्षा तुज भजूं एकमन । तथाऽस्तु ऐसें म्हणून । गणेश अंतर्धान पावले ॥४६॥
तदनंतर सगळे रंग मुदित । जाहले स्वस्वकार्यी रत । सर्व चराचरास सुशोभित । केलें त्या विविध रंगांनीं ॥४७॥
काश्यप गणनाथ होत । नीलवर्णा कृतिधर पुनीत । मयूरेश श्वेतवर्ण युक्त । वरेण्याचा सुत रक्तवर्ण ॥४८॥
गजानन रक्तवर्ण । धूम्रवर्ण श्यामवर्ण । हरिद्रा गणपति पीतवर्ण । नानावर्णात्मक अवतार नाना ॥४९॥
ऐसें वरदान लाभून । सर्व वर्ण करिती गणेशाराधन । स्वस्वकार्यांत परायण । तदनंतर लाल रंग काय करी ॥५०॥
रक्तवर्ण पुनरपि तप आचरित । निराहार राहून गणेशा ध्यात । सहस्त्र वर्षें गजानन पूजित । तेव्हां तोषले गजानन ॥५१॥
रक्तवर्णा वर देण्या येत । त्यास लाल रंग नमन करित । गणाधिपाची स्तुति करित । नानाविध स्तोत्रें म्हणोनियां ॥५२॥
तेव्हां विघ्नेश प्रसन्न । त्या लालरंगा म्हणे वचन । महाभागा वर माग मी देईन । जो तुज इष्ट वाटतसे ॥५३॥
लालरंग तेव्हां म्हणत । रक्तवर्ण स्वरूपांत । गणनायका तूं सतत । राहून मज धन्य करी ॥५४॥
सर्व रंगांत रक्तप्रियत्व दाखवी । मानदा तेणें महत्त्व वाढवी । मज श्रेष्ठत्व लाभवें भवीं । सतत सर्व रंगांत ॥५५॥
तुझें सान्निध्य लाभून । सतत मीं कृतकृत्यपावन । व्हावें ऐसें द्या वरदान । गणेशानें तें त्वरित दिलें ॥५६॥
वरदान देऊन अंतर्धान । मग पावले गजानन । त्या समयापासून । रक्तवस्तु प्रिय गजानन ॥५७॥
वेदशास्त्रांत हें वर्णन । अधिकृत जाहलें शोभन । हें बाणचरित्र पावन । वाचील वा ऐकेल जो ॥५८॥
त्यास गणाधीश प्रसन्न । देईल सर्व अभीष्ट वरदान । ऐहिक सारें सुख लाभून । अंतीं स्वानंदप्राप्ति होई ॥५९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणें अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते बाणासुरवर्णसंभवचरितं नाम चतुर्दशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP