मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ८|

खंड ८ - अध्याय ३६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत म्हणे प्रसंगोपात्त । सर्व मासांचें कथिन तुम्हांप्रत । चरित्र गणेशभक्तिप्रद पुनीत । मुनींनो जें आश्चर्यंकर ॥१॥
प्रातःस्नान करून पूजित । जो गणेशपंचक द्वादशमासांत । त्यास सर्व अर्थ लाभत । असाध्यही साध्य होय ॥२॥
येथ इतिहास पुरातन । सांगेन तुज पावन । तो वाचितां वा ऐकतां जन । सर्वं सिद्दि प्राप्त करिती ॥३॥
नळ नामा महाराज होता । निषध देशांत धर्मशील तत्त्वता । उदार स्वधर्मनिरतता । तयांत वसे सर्वदा ॥४॥
दमयंती त्याची कान्ता असत । तिच्या संगे एकदा निचार करित । त्रैलोक्यसंचारणीं समर्थ । कैसा होईल नर या जगीं ॥५॥
नरदेहधारी असून । स्वच्छंदचारी व्हावा जन । तेव्हां त्यांचें यश पावन । सर्वातीत धन्य तो ॥६॥
ऐसा विचार करून तो जात । विप्रेश गौतमाच्या आश्रमांत । प्रणाम करून त्यास विचारित । स्वहितकारक मनेप्सित ॥७॥
नर देहधारी असून । स्वामी त्रैलोक्यांत प्रसन्न । जेणें स्वच्छंद संचार गमन । तत्त्वज्ञा ऐसा उपाय सांगा ॥८॥
गौतम म्हणे तयासी । उपाय सांगतों एक तुजसी । प्रथम स्नान साधकासी । श्रावण महिन्यांत हितकारक ॥९॥
स्वशाखोक्त कर्म समस्त । नंतर पूजा गणेशपंचकाची करित । घ्यावें श्रावण स्नानादि व्रत । नियमानें गणेशकृपेस्तव ॥१०॥
आषाढ आमावास्या दिनीं । मंडप सुंदर बांधोनी । पूजावा गणनाथ प्रसन्नमनीं । बारा ब्राह्मण बोलवावे ॥११॥
त्या वेदपारंगत द्विजांकडून । करवावा होम पावन । जपाच्या दशांश संख्येनें हवन । करवावें महामते ॥१२॥
ब्राह्मणांसी द्यावें वायन । बळि ठेवावा काढून । नंतर पूर्णाहुति देऊन । ब्राह्मणांसी क्षीर भोजन द्यावें ॥१३॥
प्रतिपदेस पुनरपि पूजन । गणेशाचें करून । सर्व सिद्धिप्रदा तोषवून । द्विज सुवासिनींस भोजन द्यावें ॥१४॥
एकवीस अथवा अधिक त्याहून । ब्राह्मण भोजन घालून । विपुल दक्षिणा देऊन । विशेषें त्यांसी संतुष्ट करावें ॥१५॥
स्त्रियांस कंचूकादी प्रदान । नाना अलंकार देऊन । त्या सर्वांस प्रणाम करून । आशीर्वाद घेऊन निरोप द्यावा ॥१६॥
सोपस्कार गणाध्यक्षा प्रति करत । दानें द्यावी गुरूसी विनत । अन्यास शक्ति अनुसार मुदित । द्यावीत दानें त्या वेळीं ॥१७॥
ऐशापरी करी महीपाला व्रत । तेणें होशील ज्ञानयुक्त । त्रैलोक्यसंचारशक्ति तुजप्रत । लाभेल यांत संशय नसे ॥१८॥
ऐसें बोलून गौतम थांबत । नळराजा त्यास वंदित । तदनंतर स्वगृहीं परतत ॥ यथाविधी व्रत केलें ॥१९॥
एक वर्षभर व्रत करित । सर्वधर्मज्ञ नळराज गणेशभक्त । त्यायोगें योगीवंद्य होत । ज्ञानसंपन्न जाहला ॥२०॥
त्रैलोक्य संचार शक्ति प्राप्त । नरदेहधारी असून जगांत । ऐसें हें संवत्सर व्रत । केलें ते योगीवंद्य झाले ॥२१॥
मनेप्सित सिद्धि लाभून । अंतीं स्वानंदलोकीं गमन । करून झाले ब्रह्मरूप प्रसन्न । अशक्य त्यांचें चरित्रवर्णन ॥२२॥
अनंत असतीं चरित्रें सांप्रत । म्हणोनि संक्षेपें वर्णित । गाणेशपंचकसेवनी असमर्थ । त्यांनी नियम कांहीं करावा ॥२३॥
त्यां आज नियमव्रतें लाभत । ते लोक ह्रदयवांछित । अंतींगणप लोकांत । ब्रह्मप्राप्ति होत तयांसी ॥२४॥
एक बृहत्कर्मा नामा शूद्र । संततिहीनत्व दुःखें रौद्र । होऊन निराश तो भावाई । करी नाना उपाय ॥२५॥
प्रत्रप्राप्तिस्तव उपाय करित । परी संतति तयास नसत । म्हणोनि गेला घोर वनांत । तेथ ब्राह्मण कांहीं भेटले ॥२६॥
त्यांस वंदन करित । उपाय विचारी तयाप्रत । पुत्र लाभास्तव ते सांगत । संवत्सरात्मक व्रत श्रीगणेशाचें ॥२७॥
ऐकून तें विधियुत । पूर्ण गाणेश्वर व्रत । त्यांस वंदून परतत । स्वगृहीं तो हर्षानें ॥२८॥
गाणेशपंचकाचें पूर्ण सेवन । न घडलें त्याच्या हातून । म्हणोनि स्वल्प मात्र आचरून । पूजितसे गणेशासी ॥२९॥
प्रातःकाळीं करून स्नान । पार्थिव गणेश मूर्तोचें पूजन । नाममंत्रांचा जप करून । पाळी व्रत ब्रह्मचर्याचें ॥३०॥
एकभुक्त तो राहत । ऐश्या रीतीं व्रत आचरित । समाप्ति करी शास्त्रसंमत । गणेशासी प्रसन्न केलें ॥३१॥
ब्राह्मणांची पूजा करित । धर्मविहित दक्षिणा देत । कुटुंबाचें पोषण करित । त्या पवित्र प्रभावें ॥३२॥
नंतर स्वल्प काळांत । पुत्र त्यास एक होत । सुरूप तो ज्ञानवंत । त्यास पाहून हर्षला ॥३३॥
क्रमानें त्यास पांच सुत । तीन मुली झाल्या पुनीत । शूद्र तो मानी तें सामर्थ्य अद्‍भुत । श्रीगणेशप्रभूचें ॥३४॥
अंतीं स्वानंदलोकीं जात । आपुल्या भार्येच्या सहित । इहपरत्र सुख भोगित । ब्रह्मभूत अखेर झाला ॥३५॥
ऐसें नाना जन आचरित । अल्प्मात्रही हें व्रत । त्यांस नियमानें पावत । सिद्धि नानाविध सर्वदा ॥३६॥
जैसें उद्यापन सांगितलें । एक संवत्सर व्रताचें भलें । तैसेंच महिन्याच्या व्रतासही केलें ॥ पाहिजे सर्व मासांत ॥३७॥
चातुर्मास्य व्रतांत । उद्यापन हें विशेष ख्यात । करावें मलसास व्रतांत । आदरें गणेशभक्तानें ॥३८॥
हें संवत्सर व्रत तुम्हांप्रत । सांगितलें संक्षेपें समस्त । ऐकतां वाचितां साधकाप्रत । सर्वप्रद हें होईल ॥३९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणें अष्टमे खंडे धूम्रवर्णचरिते संवत्सरव्रतमाहात्म्यवर्णनं नाम षट्‍त्रिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP