मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
उत्पत्ति-स्थिति-लय-कर्ता परमेश्वर

श्रीदत्त भजन गाथा - उत्पत्ति-स्थिति-लय-कर्ता परमेश्वर

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. ६-११-१९३०

उत्पत्तिस्थितिलय जे का जगताचे । तुझेनि ते साचे घडताती ॥१॥
कारण उत्पत्तिचे कारण स्थितीचे । कारण लयाचे तूंच एक ॥२॥
दृश्याऽदृश्य जे का असे त्रिभुवनी । सकळ तुझेनी विश्वमूर्ते ॥३॥
कारणही तूंच कार्य तरी तूंच । सकल तुझेच अधिष्ठान ॥४॥
आधार तुझाच सकल विश्वाला । सेवित तुजला विश्व सारे ॥५॥
विदित असो की असो अविदीत । सकल भजत तुझी सत्ता ॥६॥
विनायक म्हणे त्रिभुवनपति । तुजला भजती विश्वेदेव ॥७॥
==
उत्पत्ति-स्थिति-लय-कर्ता परमेश्वर

जे जे कांही असे उपजले येथे । तुवांच ते नाथे निर्मीयेले ॥१॥
सकल भूतांची उत्पत्ति तुझेनी । सकलां जननी तूंच नाथा ॥२॥
तुझेच हे असे त्रैलोक्य संतान । तुझाच की स्तन पीत असे ॥३॥
पोषण विश्वाचे होतसे तुझेनी । दक्ष तूं पालनी सदा दत्ता ॥४॥
जननीजनक तूं तुज नमस्कार । बाहोनी अंतर करीतो मी ॥५॥
तूंच बुद्धिदाता तूंच सर्व दाता । अशुमांचा हर्ता तूंच एक ॥६॥
त्या तुझे चरणी घेतो लोटांगण । माझे संरक्षण द्त्ता करि ॥७॥
प्रार्थना हे माझी तुज समर्पिली । पाहिजेच केली कृपा मज ॥८॥
कायावाचामने शरण चरणी । तरी चक्रपाणी कृपा कीजे ॥९॥
विनायक म्हणे धरोनी लीनता । तुज भगवंता नमितो मी ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP