मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
देहप्रमाद

श्रीदत्त भजन गाथा - देहप्रमाद

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


किती जरी देह आम्ही आराधिला । करी प्रमादाला सहजची ॥१॥
ठायी ठायी घडे प्रमाद आम्हांसी । देहसंबंधेसी अनिवार ॥२॥
किती जपणूक ठेवावी देहाची । साधितसे साची निज लहरी ॥३॥
ऐन वेळी दंगा करित हा देह । किती तरी संदेह पाडीतसे ॥४॥
आहार विहार योग्य ठेवीयेला । देव बनविला देह जरी ॥५॥
मूळचा सैतान प्रगटी स्वभाव । प्रकाशित भाव अज्ञानाचा ॥६॥
उपाय न चले हटतट केले । जरि गोंजारिले देहालागी ॥७॥
विनायक म्हणे सर्व परस्वाधीन । येथे नियम न मुळी चाले ॥८॥
==
धांवा

म्हणोनियां देवा शरण पायांसी । मजला क्षमेसी करा नाथा ॥१॥
कितीतरी क्षमा मागूं मी तुम्हांसी । मज निर्लज्जासी लाज नाही ॥२॥
असहाय दीन हीन मी अज्ञान । करावे अवन देवा याचे ॥३॥
कायावाचामन यांही जे पातक । घडे प्रात्यहिक क्षमा करा ॥४॥
क्षमा करा मज क्षमा करा मज । राखा माझी लाज कृपावंता ॥५॥
बहु निर्बुजलो शरण पातलो । ह्रदयी खोंचलो परमची ॥६॥
कोण सोडविल क्षमेते करील । मजला देईल क्षेम थोर ॥७॥
चरणांवरी नाथा लोळतो अमूप । तरी माझे पाप दग्ध करा ॥८॥
जेथोनियां मज स्मरण होतसे । सर्व आठवतसे वृत्त मज ॥९॥
भडभडोनियां नाथ मज येत । मन हे लज्जित होत असे ॥१०॥
काय काय दोष अभ्यासाने केले । आठविती भले मजलागी ॥११॥
स्वस्थ मन होइनाच नारायणा । आठव अंत:करणा पीडा देत ॥१२॥
भेदते ह्र्दय खिन्न अंत:करण । होत दयाघन किती सांगूं ॥१३॥
तरी क्षमा करा करा या दासाला । करा या दीनाला क्षमा नाथा ॥१४॥
किती म्हणूं नाथा मजला क्षमस्व । आतां माझे सर्वस्व तूंच दत्ता ॥१५॥
विनायक म्हणे हीन दीन पंगु । मज अनुरागु तुझ्या पायी ॥१६॥
==
धांवा

क्षमस्व म्हणतो नाथ मी वाणीने । विनीत वचने आळवीतो ॥१॥
तेणे वाणीदोष माझे क्षमा व्हावे । मजला करावे कृपापात्र ॥२॥
तुम्हांसी अर्पितो माझी नम्रवाचा । अनुबंध क्षमेचा धरा नाथा ॥३॥
अर्पितो हे मन करोनी सुमन । तरी दयाघन स्वीकारीजे ॥४॥
विवेकाने मन शोधोनियां नाथा । तुम्हांसी समर्था समर्पीतो ॥५॥
करोनी विचार आठवोनी दोष । विशेष अविशेष जे का त्यांचे ॥६॥
तेणे लाजवोनी आपुल्या मनासी । विनीत करोनी अर्पितसे ॥७॥
तरी अंगिकारा मज क्षमा करा । श्रीगुरु उदारा प्रार्थिताहे ॥८॥
विनायक म्हणे काया वाचा मन । यांचे संशोधन दत्ता करा ॥९॥
==
धांवा

तळमळ दूर करी । दत्ता माझी आतां सारी ॥१॥
काया वाचा आणि मन । केली तुझीये स्वाधीन ॥२॥
सांडियेला अहंकार । लोळतसे पायांवर ॥३॥
दु:खमुक्त मज करी । कृपा उपजो अंतरी ॥४॥
कष्ट किती आजवरी । साहिले मी देवा तरी ॥५॥
सकळ जाणीतोसी नाथा । कृपा करी श्रीसमर्था ॥६॥
विनायक विनवीत । कृपा करा अवधूत ॥७॥
==
धांवा

किती साहूं कष्ट देवा । आतां तरी मज वांचवा ॥१॥
जन्म गेला यांत नाथ । दिन काढिले चिंतेत ॥२॥
स्वस्थता न कधी मज । जाणतोसी मम गुज ॥३॥
हाय हाय किती झाली । जाणसी तूं मज भली ॥४॥
म्हणुनि धरीले चरण । विश्वासाने नारायण ॥५॥
तरी आतां कृपा करी । अपराध क्षमा करी ॥६॥
मजसाठी उडी घेई । बाळकासी जैसी आई ॥७॥
वांचवी मज अतां देवा । गुरुराया वासुदेवा ॥८॥
विनायक तुझा दास । उद्धरावे नाथा खास ॥९॥
==
धांवा

काकुळती बहु येतो । तुझे पाय मी धरीतो ॥१॥
कितीतरी विनवीतो । शब्द किती उच्चारीतो ।
मनोभावे विसरतो । तुजपुढे गुज गातो ॥३॥
तरी आतां प्रगटावे । दु:खमुक्त मज करावे ॥४॥
चिंता माझी शमववी । विजयश्री मज द्यावी ॥५॥
तुझा आहे मी तो दास । देई मज विजयास ॥६॥
कृपाछत्र शिरी धरी । कृपाकवच शरीरी ॥७॥
अजिंक्य करी मजलागी । विजयी करीं मज जगी ॥८॥
तुझ्या आशीर्वादे नाथा । विजयी होईन समर्था ॥९॥
म्हणोनि मागतो प्रसाद । जेणे जाईल विषाद ॥१०॥
अनुग्रह मज करा । दत्तात्रेया गुरुवरा ॥११॥
करि आतां विनवावे । काय पामरे बोलावे ॥१२॥
किती आतां मी सांगावे । ह्रदय उघडे करावे ॥१३॥
नका पाहूं माझा अंत । प्रगट व्हावे तरी त्वरित ॥१४॥
माझे पुढे उभे रहावे । मजलागी आश्वासावे ॥१५॥
माझे दु:ख परिहरावे । मज आनंदी करावे ॥१६॥
चिंताशोक सर्व हरा । माझा आतां अत्रिकुमर ॥१७॥
विनायकाची प्रार्थना । सिद्ध करा दयाघना ॥१८॥
==
धांवा
गुरुवार ता.३०-१०-१९३०

माझी लाज राखणारा । संकटांत तारणारा ॥१॥
मजसाठी धांवणारा । ममत्वे कळवळणारा ॥२॥
कृपादृष्टी पहाणारा । पाठी उभा राहणारा ॥३॥
साउलीसम वर्तणारा । कधी न विसंबणारा ॥४॥
हेतु पूर्ण करणारा । क्षुधा तृषा हरणारा ॥५॥
शीतोष्णांते वारणारा । द्वन्द्वजांसी नासणारा ॥५॥
ह्रदयांत राहणारा । देही परिस्फ़ुरणारा ॥७॥
इंद्रियें प्रवर्तविणारा । मनालागी भारणारा ॥८॥
बुद्धि प्रकाशविणारा । चैतन्या अनुग्रहणारा ॥९॥
पाठी पुढे असणारा । वरी खाली पसरणारा ॥१०॥
सर्वत्र प्रादुर्भवणारा । जिकडे तिकडे संचरणारा ॥११॥
शिरी छत्र धरणारा । खांद्यावरी मज घेणारा ॥१२॥
कौतुक माझे करणारा । लाड माझे पुरविणारा ॥१३॥
विघ्ने माझी नासणारा । वैरी माझे निवटणारा ॥१४॥
सदा क्षेम मज देणारा । कृपादृष्टी पाहणारा ॥१५॥
माझ्या जीवा सुखविणारा । दु:ख माझे लया नेणारा ॥१६॥
दत्त एक भगवान । त्याचेवीण नसे आन ॥१७॥
नम्रवाचा त्या बोलतों । विनवणी मी करितो ॥१८॥
अपराध क्षमा करी । दत्तात्रेया नरहरी ॥१९॥
याहुनि काय करणार । कैसा तुज वळविणार ॥२०॥
म्हणोनियां कृपा करी । मज आतां तारी तारी ॥२१॥
विनायक काकुळती । आला असे तुम्हांप्रति ॥२२॥
==
धांवा

काय विटंबणा व्हावी माझी जगी । ऐसे अंतरंगी आणी देव ॥१॥
कठोर मानस कैसे तुवां केले । समजेना भले मजलागी ॥२॥
गूढ वाटे मज तुझी हे करणी । बोध अंत:करणी उमटेना ॥३॥
काय तुझा हेतु कांहीच कळेना । मज आकळेना काही केल्या ॥४५॥
विचार मी केला बहु अंतरांत । परि न उमगत मज कांही ॥५॥
किती जरी दोष घडले मजला । क्रुद्धता तुजला आली नाही ॥६॥
मज ठावे आहे कधी न कोपशील । मज न टाकीशील दयावंता ॥७॥
मजलागी ठावा आहे हा निर्धार । अनुभव साचार दत्तात्रेया ॥८॥
मग कां ऐसा आज हा चमत्कार । नवल हे थोर मजलागी ॥९॥
विनायक म्हणे देवा गोंधळलो । तुझे पायी झालो नत नाथा ॥१०॥
==
धांवा

सांग सांग आतां काय मनीं आणिले । कठोर कां केले निजमना ॥१॥
नवनीताहूनि मृदुल जे नाथा । कठोर समर्था केलेस की ॥२॥
नित्य द्रवणार तुझे हे ह्रदय । धरीत नैष्ठुर्य कैसे सांग ॥३॥
पाषाणाहुनीही कठीण बनत । ऐशी कैशी मात घडे सांग ॥४॥
रुसलासी काय देवा माझेवरी । सांग मज तरी दत्तात्रेया ॥५॥
परी बाळलीला यांत कोप नाही । कठीणता कांही नाही नाही ॥६॥
रुसणे फ़ुगणे प्रकार क्रीडेचा । अंश तो सत्याचा त्यांत नाही ॥७॥
काय म्हणूं सांग काय ओळखूं मी । खिन्न ह्रदयी मी झालो असे ॥८॥
विनायक आहे बहु पस्तावला । अंगिकार केला पाहिजेच ॥९॥
==
धांवा

अभिमान कोणा माझा तुजविण । कोण माझा शीण वाहतसे ॥१॥
माझ्या दु:खे कोण सांग दुखावत । सुखे सुखावत कोण माझ्या ॥२॥
कोण माझे ठायी संलग्न बनतो । ममत्व ठेवीतो माझेवरी ॥३॥
माझ्या जीवालागी जी जी असे आतां । कोण पुरविता सांग दत्ता ॥४॥
माझे सुखदु:ख ओढोनियां घेसी । आपुलियावरी दत्तात्रेया ॥५॥
माझा अंगिकार सर्वस्वाने केला । तुवां असे भला गुरुराया ॥६॥
ऐसे असुनियां काय हे वर्तन । समजेल मन काय माझे ॥७॥
माझिये मनाने कायसे जाणावे । कैसे ओळखावे तूझे चित्त ॥८॥
विनायक आला असे निर्वाणीसी । तरी ह्रषिकेशी कृपा करा ॥९॥
१६४)
धांवा

भयभीत झालो असे अंतरांत । शरीर कांपत माझे दत्ता ॥१॥
चिंता हे जाळीत देह पोळवीत । मनाते भाजीत गुरुनाथा ॥२॥
केव्हा येई मना करुणा सांगावी । श्रीगुरुराया व्हावी थोर कृपा ॥३॥
नका पाहूं अंत झालो मी विस्मित । दत्त अवधूत कृपा करा ॥४॥
घाबरेपणा मज बहुत जडला । शांति या जीवाला नाही नाही ॥५॥
भीतिग्रास्त सुस्त तुजसीं विश्वस्त । आशा माझी निरस्त होऊं पाहे ॥६॥
तरी आतां नाथा प्रगट माझ्यासाठी । स्वामि जगजेठी भगवंता ॥७॥
माझीये विघ्नांचा करोनि संहार । सर्व शिरावर घेई माझे ॥८॥
हेतु माझे कर पूर्ण जगन्नाथा । तुझे पदी माथा ठेविलासे ॥९॥
विनायकाचे हे करुणेचे बोल । करुं नको फ़ोल दयावंता ॥१०॥
==
धांवा

शिक्षेला ते युक्त तुझे न ऐकती । आज्ञा उल्लंघिती तूझी जे का ॥१॥
धर्मसेतुंचा जे करिती अनादर । वर्तन स्वैराचार करीती जे ॥२॥
तुज स्मरती ना तुज भजती ना । तुज मानिती ना जे का दुष्ट ॥३॥
तिरस्कार तुझा करिती पामर । उन्मत्त साचार जे का खळ ॥४॥
ऐशिया पाषीयांसी शासन करणे । उचित तुजकारणे गुरुदत्ता ॥५॥
आम्हां पददासां दंडिसी कां वृथा । आम्हांवरी अनर्था लोटिसी कां ॥६॥
काय यांत नाम तुझे बा होईल । कायसी वाढेल कीर्ति तुझी ॥७॥
समजत नाही मज अज्ञानाला । म्हणुनी चरणांला शरण मी ॥८॥
विनायक म्हणे ह्रदयाधिवासा । मज जगन्निवासा सोडवावे ॥९॥
==
धांवा

काया वाचा मने शरण तुज आलो । बहु पस्तावलो ह्र्दयांत ॥१॥
भयभीत मन वपुही कांपत । ह्रदय थरारत माझे दत्ता ॥२॥
भ्याड मी पूर्वीचा स्वभावाचा भ्याड । प्रसंगाने भ्याड मूर्त झालो ॥३॥
मज भयभीता कोण वांचवील । करुणा येईल कोणा सांग ॥४॥
कोण माझी आशा सांग पुरवील । मजसी धांवेल कोण सांग ॥५॥
कायसे बोलावे कायसे सांगावे । सर्वज्ञासी ठावे तुज असे ॥६॥
नको आतां मज भ्रमवूं उदारा । करी साक्षात्कारा अविलंबे ॥७॥
तुझीया दासांचे मरण टळावे । यश विस्तारावे तुझे नाथा ॥८॥
ऐशी चमत्कृती करुनीयां दावी । नाथ निवारावी संकटे की ॥९॥
माझी दृढ श्रद्धा तारसील मज । राखशील लाज माझि दत्ता ॥१०॥
माझा हा निर्धार मज न त्यागिसी । जरी दाखविसी कोपभावा ॥११॥
माझ्य़ा संकटांसी खास हरशील । आनंद करिसील माझा दत्ता ॥१२॥
माझा हा विश्वास कोप हा लटिका । तुझा असे निका दाविसी जो ॥१३॥
कोप नोहे दया तूझी दत्ता असे । मन हे घेतसे माझे ऐसे ॥१४॥
सकळ हे माया मज भिववाया । गंमत पहाया लेकुरसी ॥१५॥
चोज हे माझे नाथा तुवां आरंभिले । वाटतसे भले मजलागी ॥१६॥
मज भिवबीणे कौतुके पहाणे । खेळ हा खेळ्णे तुझे दत्ता ॥१७॥
मज अज्ञानाची थट्टा त्वां मांडिली । बरी हे योजिली विटंबणा ॥१८॥
परी यांत आहे प्रेमाचा आशय । जाणत ह्रदय माझे दत्ता ॥१९॥
तरी आतां नाथ प्रगट लवलाही । मजला केशवा तारी त्वरे ॥२१॥
विनायक म्हणे माझा बडिवार । वाढवा साचार त्रिभुवनी ॥२२॥
==
धांवा

करुं नका आतां देवा फ़जितीला । करित प्रार्थनेला कृपाकरा ॥१॥
माझीया वैरीयांसी माझी विटंबणा । देवा दयाघना दावूं नका ॥२॥
तुझ्या भक्तिस्तव झाले माझे वैरी । त्रिभुवनामाझारी जे का दत्ता ॥३॥
तयां नको दावूं माझे हीनपण । अंतरासी शीण थोर होतो ॥४॥
दिमाखाने आहे वदलो जगांत । माझेवरी प्रीत तूझी अति ॥५॥
द्त्तकृपेचा मी बालक वोलीलो । तैसा मी वर्तलो मानोनीयां ॥६॥
नको करुं आतां मजलागी हीन  । झालो असे दीन तुझ्यापुढे ॥७॥
माझे तुझे वत्स फ़ोडी हंबरडा । नको गांवगुंडां ओपूं मज ॥८॥
आणोनियां पाणी दोन्ही नयनांत । तुज विनवित कृपावंता ॥९॥
लाज राख माझी राख अभिमान । आतां दयाघन दत्तात्रेया ॥१०॥
तुझा मी म्हणोनि मुखे सांगितले । देवा आहे भले किती वेळां ॥११॥
जरी आतां मज कठोर होशील । अब्रु माझी जाईल हातोहात ॥१२॥
अपकीर्ति होईल वैरी हांसतिल । टाळी पिटितील महानंदे ॥१३॥
तरी येवो आतां कळवळा तुज । स्वामी योगिराज अवधऊत ॥१४॥
विनायका नक अपकीर्तिचा डाग । लावूं रमारंग वांचवा त्या ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP