मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
कनवाळू देव

श्रीदत्त भजन गाथा - कनवाळू देव

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


ह्रदय तुझे देवा जैसे नवनीत । भक्तांसी द्रवत सर्वकाळी ॥१॥
भक्तां ताप होतां विरघळे मन । जासी कळवळोन कृपामूर्ति ॥२॥
अंत:करण तूझे दयेची की मूस । मूर्त दयारस सांठला की ॥३॥
ह्रदयकमळांत दया मकरंद । करीत निष्यन्द भक्तांसाठी ॥४॥
आर्तरव कानी पडतां तूझिया । आंच तव ह्रदया लागतसे ॥५॥
ह्रदयासी धग लागतां गळत । बाहेर निघत दयारस ॥६॥
केवळ तूं दया प्रतिमा दयेची । दयाच की साची मूर्तिमंत ॥७॥
स्वभावधर्म दया दयेचि प्रतिमा । दयेचाच गाभा प्रगट की ॥८॥
तुज आठवितां दया मनी येत । दया उभारत तुझ्यारुपी ॥९॥
हांक मारितां तूज दयाच ओ देत । दया उभी रहात साक्षात्कारे ॥१०॥
तुझे गुण गांता दया प्रगटत । अभिमुखी होत दया नाथा ॥११॥
यश कीर्ति तुझी दयाच केवळ । दयाच विमल कांति तूझी ॥१२॥
अधिष्ठान तूझे शुद्ध एक दया । तुजला सदया काय वानूं ॥१३॥
विनायक म्हणे निर्दयता गुण । तुज नारायण जडे कैसा ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP