मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
उत्तरगति

श्रीदत्त भजन गाथा - उत्तरगति

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


उत्तरगति
गुरुवार ता. २६/९/१९२९
देह प्रेत होतां पुढे काय होत । जीव कोठे जात कोठे राहत ॥१॥
कोणत्या लोकांत गमन करितो । किंवा काय पाहतो भलते ॥२॥
यालाच विचार करणे असे आज । पितृपक्ष काज जाणावे की ॥३॥
महालय श्राद्ध दिन पितरांचे । काव्य काय त्यांचे वदावे की ॥४॥
पितृस्वरुपी हा असे जनार्दन । तयासीं नमन करावे की ॥५॥
पितृलोक कोठे वसतसे जाणा । विचार अंत:करणा यावा हाच ॥६॥
पितर म्हणोनियां काय सृष्टी आहे । कोणता जीव पावे पितृपद ॥७॥
पितृलोक कोणा जीवास मिळतो । स्वर्गाप्रति जातो कोण जीव ॥८॥
कोण ब्रह्मलोकी स्थितीने पावती । कोण मोक्षा जाती विचारावे ॥९॥
लोकांचा विचार देहाचा विचार । विहार-विचार करावा की ॥१०॥
कोण देवयान कोण अनुष्ठान । सकळ वर्तन विचारावे ॥११॥
पितरांचे श्राद्ध कर्तव्य कां असे । पितृपक्ष वसे कोणे ठायी ॥१२॥
श्राद्धी अन्नत्याग कोणास पावतो । कोण तृप्त होतो पिंड देतां ॥१३॥
बाप आजा आणि तैसा तो पणजा । त्यांचे नांव गाजा करायाचा ॥१४॥
काय त्यांस अन्न श्राद्धीय लाभत । कैसे काय होत विचारावे ॥१५॥
व्याघ्रादिक योनी जयां प्राप्त होती । कैसे ते पावती श्राद्धान्नाला ॥१६॥
पितृलोकीं वस्ती सकळांची काय । अन्य जग होय किंवा नाही ॥१७॥
अन्य देहप्राप्ती जरी तयां होय । मग कोठे जाय श्राद्धान्न ते ॥१८॥
सकळ विचार करणे सांगोपांग । श्रद्धेचे ते अंग जाणावे की ॥२०॥
म्हणोनि श्रद्धेनेंच श्राद्धाते करावे । ब्राह्मणांते घालावे प्रिय अन्न ॥२१॥
जे जे कांही प्रिय आपणातें जाणा । ते ते तुम्ही ब्राह्मणां घालावे की ॥२२॥
ब्राह्मणांचे मुखे पितर तृप्त होती । ग्रास जे का घेती मुखी द्विज ॥
तया ग्रासमात्रे पितरांची तृप्ति । श्राद्धाची पद्धती ऐसी असे ॥२४॥
तोंच की विचार करणे आम्हां आज । पितृश्राद्ध काज श्रद्धेलागी ॥२५॥
विनायक म्हणे श्राद्ध पितरांचे । हेतु अभ्युदयाचे जाणावे की ॥२६॥
==
उत्तरगति
गुरुवार ता. ३/१०/१९२९
देह त्यागितां जे पुढील गमन । तयाचे चिंतन करावे की ॥१॥
शास्त्र काय सांगे श्रुति काय बोले । मनामाजी भले विचारावे ॥२॥
प्रेतरुप होतां जीवाचे सांगाती । कोण ते निश्चिती शोधावे की ॥३॥
काय घेउनियां जीव हा निघतो । गमन करीतो कोण स्थानी ॥४॥
पाथेय काय त्याचे कोण त्याचा वेष । विचार विशेष करावा की ॥५॥
आपुले कर्तव्य देहांत वसतां । काय ते तत्वतां चिंतावे की ॥६॥
सुकरगमन पुढे कैसे होय । काय रुप होय प्राप्त जीवा ॥७॥
पुण्यपापासम होय जीवा गति । तेथील ते स्थिती जाणावी की ॥८॥
सुटतां मर्त्य लोक पुढे कोण लोक । याचाच आलोक करावा की ॥९॥
पुढील जाणोनि तैसेच वर्तन । रहावे करुन नियमाने ॥१०॥
याही जन्मी होय थोर तो प्रमोद । पुढेही आनंद भरलासे ॥११॥
मनुष्य गंधर्व आणि देवगंधर्व । पितरांचा ठाव जाणावा की ॥१२॥
आजान देव तैसे पुढे कर्मदेव । स्वर्गीचे ते देव पुढे जाणा ॥१३॥
तयांचा तो पति जाणा इंद्रदेव । तया श्रेष्ठ्भाव जाणावा की ॥१४॥
तेहतीस कोटी देव त्यांचा स्वर्ग लोक । इंद्र तो पालक स्वामि त्यांचा ॥१५॥
बृहस्पतीदेव प्रजापती देव । हिरण्यगर्भ भाव येथेच की ॥१६॥
ब्रह्मभव जधि तधी परमानंद । इतर आनंद क्षुद्र जाणा ॥१७॥
आनंदाची सीमा तैशी पराकाष्ठा । लाभत ब्रह्मिष्ठा ब्रह्मभावे ॥१८॥
इतरांसी होय पुनरागमन । फ़लाते भोगून परलोकी ॥१९॥
युआकाश धरा पुरुष आणि नारी । अग्निच हे तरी पांच जाणा ॥२०॥
श्रद्धा सोम वृष्टी आणि रेत । हवन घडत आहुतींचे ॥२१॥
पांच आहुती या पांच अग्निमाजी । हवनें होती गाजी पुरुषरुप ॥२२॥
ऐसा जन्म आहे मानवाचा जाणा । संसार तरणा नौकारुप ॥२३॥
म्हणोनियां कांही हित आचरावे । पुण्याते करावे सदाकाळ ॥२४॥
पुण्याईच्या योगें सुष्टु लोक प्राप्ती । पाप्यां अधोगति प्राप्त होय ॥२५॥
पापाचीया योगे संयमन-पुर। पावतसे नर पापात्मा जो ॥२६॥
बहु कष्ट भोगी नरकांत पात । पाप्यालागी होत प्राप्त जाणा ॥२७॥
तेथुनी मग त्यासी मर्त्यलोकांतरी । ढ्कलुनि तरी देती जाणा ॥२८॥
कृमिकीटकांचा जन्म तया होय । पापाने अपाय सर्वस्वासी ॥२९॥
याचसाठी जोडा पुण्य स्वल्प तरी । मग देहांतरी गति होय ॥३१॥
जोवरी अज्ञान तोवरी न मोक्ष । तरी पुण्यपक्ष जोडावा की ॥३१॥
पुण्यचिया योगे चित्तशुद्धी होय । हाच सदुपाय आचरावा ॥३२॥
तेणे ज्ञान होय मग ब्रह्मभाव । नसे पुनर्भव मग त्यासी ॥३३॥
ब्रह्मप्रतिष्ठेते पावतसे नर । चुके येरझार ज्ञान होतां ॥३४॥
म्हणोनि क्षणोक्षणी विचार करावा । सन्मार्ग धरावा शास्त्रशुद्ध ॥३५॥
शास्त्रविहित कर्मे शुभ आचरावी । ईश्वरी ठेवावी निजमति ॥३६॥
भजन पूजन करावें देवाचे । अखंड नाम वाचे वदावे की ॥३७॥
ईशभजनाने सर्व सिद्धि होय । सेवा गुरुपाय निष्ठा पूर्ण ॥३८॥
ईश्वरकृपेने तराल सागर । भव हा दुस्तर पार होय ॥३९॥
विनायक म्हणे भजनी सादर । व्हावे निरंतर हाच मार्ग ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP