मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
दत्त भार्गव भेट

श्रीदत्त भजन गाथा - दत्त भार्गव भेट

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


रेणुकेने नेले जधी भार्गवरामा । दत्ता पूर्णकामा भेटावया ॥१॥
सह्याद्रि शिखरी प्रथमभेट होता । निज अभद्रता कथीयेली ॥२॥
मी तो व्रात्य असे संस्कार मज नाही । पापात्मा मी पाही अवन्द्यमी ॥३॥
माझ्या दर्शनाने निरय प्राप्त होय । परतोनी जाय सांगताती ॥४॥
राम स्तब्ध झाले मति गोंधळली । तेव्हा पुढे झाली श्रीरेणुका ॥५॥
तुम्ही परब्रह्म तुम्ही शिवमूर्ति । तुम्ही परंज्योग्ति परमात्मा ॥६॥
फ़सवितां माझ्या कांहो तनयासी । म्यांच दर्शनासी आणियेला ॥७॥
परिसोनी शब्द त्या रेणुकेचा । संभ्रमदेवाचा काय वानूं ॥८॥
उठोनियां पुढे लगबग गेले । बहु प्रशंसीले तिजलागी ॥९॥
विद्यास्वरुपिणी उमा तूं प्रत्यक्ष । सकळांसी साक्ष तुझी सदा ॥१०॥
शिवासह वास तुज निरन्तर । शिवसाक्षात्कार तुझ्यायोगे ॥११॥
जे का शिवरुप सकल ब्रह्माण्डांत । प्रत्यक्ष ते होत तुझ्या कृपे ॥१२॥
जगाचि तूं माय दयेचि तूं खनि । तुज विश्वजननी कोण जाणे ॥१३॥
ऐशी एकमेकां खुणेची बोलणी । काय माझी वाणी बोलेल इ ॥१४॥
मग पुसताती ऐशी कांहे दशा । सांगे ती त्र्यधीशा सर्ववृत्त ॥१५॥
क्रुद्ध झाले देव वदले शापवाणी । उन्मत्त नृप झणी भस्म व्हावे ॥१६॥
तंव पुढे झाले मग भार्गवराम । कथिला निजकाम प्रतिज्ञेचा ॥१७॥
त्रि:सप्त पृथिवी नि:क्षत्र करीन । ऐसे मी वचन बोलिलोंसे ॥१८॥
साच करा देवा पाय मी धरीतो । विजय मागतो दत्तात्रेय ॥१९॥
मग आशीर्वाद दिधला विजयाचा । सद्गुरुनी साचा रामालागी ॥२०॥
आचार्यत्व केले स्वये दत्तजीनी । जातां सहगमनीं रेणुका ती ॥२१॥
दत्तनिरोपाने भार्गव जिंकीली । त्रि:सप्त वेळां भली अवनी हे ॥२२॥
सोमयाग केला आचार्य दत्त झाले । कश्यपाते दिले महीदान ॥२३॥
विनायक म्हणे माहात्म्य दत्ताचे । काय माझ्या वाचे बोलावे म्यां ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 16, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP