मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
विष्णुप्रबोध

श्रीदत्त भजन गाथा - विष्णुप्रबोध

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. १४/११/१९२९
जागे व्हावे आतां श्रीगुरुमाधवा । निजमुख दावा आम्हांलागी ॥१॥
आम्ही दर्शनासी बहुत उत्सुक । त्रैलोक्य पालक दावा मुख ॥२॥
प्रबोधोत्सव मंगल पातला । आनंद सर्वाला थोर झाला ॥३॥
नियमव्रतादिक भक्तांनी मांडिली । आतां पूर्ण केली पाहिजेत ॥४॥
चातुर्मासाचा हा शेवट लाभला । पुण्याईने भला आम्हांलागी ॥५॥
तरी कृतकृत्य आम्हांसी करावे । कृपेने पहावे आम्हांकडे ॥६॥
लक्षुमीचे पति वैकुठीचे राजे । वात्सल्यत्बे गाजे कीर्ति साची ॥७॥
शेषासी शयन वास सागरासी । आनंद वसनेसी झळकत ॥८॥
पदतळीं रमा नाभीतूनी ब्रह्मा । प्रभा बहु श्यामा आनंदाची ॥९॥
घन:श्याम प्रभु तेजोधाम पूर्ण । कुंडलांनी कर्ण शोभताती ॥१०॥
मुकुट शिरी शोभे कंठी वनमाला । वैजयंती गळां शोभा देत ॥११॥
तडित ते झाले वसन देवाचे । वैभव मी वाचे काय बोलू ॥१२॥
कुटाळ जगाचा नारद प्रसिद्ध । सदा असे सिद्ध यश गाया ॥१३॥
मूर्तिमंत जो कां चढेल विख्यात । चढेलांसी देत उपमा ज्याची ॥१४॥
वाहन तो तुझा सेवेसी सादर । वाही स्कंधावर तुजलागी ॥१५॥
दर्पाची जे मूर्ति मूर्त अहंकार । जयाचा फ़ूत्कार जग जाणे ॥१६॥
सहस्त्रफ़णी झाला देवाचे शयन । काय मी वर्णन करावे की ॥१७॥
छिनाळ जे नारी परम चंचळ । सोडीना पदतळ स्थिरावली ॥१८॥
चुरी पदयुग्म झाली पददासी । कोण महिम्यासी गाईल की ॥१९॥
सनकादि झाले भाट ज्या देवाचे । वर्णन मद्वाचे केवी होय ॥२०॥
वैकुंठ धामी आज होवोनियां जागा । करी कृपापांगा आम्हांवरी ॥२१॥
आम्ही दीन हीन शरण पदासीं । मागत अभयासी तूजपाशी ॥२२॥
वैरीयानी आम्हां गांजीयेले थोर । तयांचा संहार करा नाथा ॥२३॥
विष्णुभक्तीचा की उत्कर्ष कराया । ब्रीद जागवाया कलियुगी ॥२४॥
रावण कुंभकर्ण दैत्य हे मारावे । आम्हांसी करावे निर्भय गा ॥२५॥
हिरण्याक्ष हिरण्यकशिपुदानव । मारावे माधव आम्हांसाठी ॥२६॥
कंस चाणूर हे परम उन्मत्त । मारावे समस्त देवराया ॥२७॥
बौद्धरुप आतां टाकुनी नटावे । कलंकी त्वां व्हावे धर्मासाठी ॥२८॥
आम्हासाठी नाथा शस्त्र उचलावे । प्रसन्न करावे निजहाती ॥२९॥
गरुडवाहना त्वरित पावावे । वैर्‍यांते मारावे आमुचीया ॥३०॥
धर्मद्वेषक जे द्वेषक स्थानाचे । द्वेषी भजनाचे पापी जे कां ॥३१॥
साधुसंतासी जे धरिताती वैर । तयांचा संहार करावा की ॥३२॥
छ्ळण करीति वृथा जे आमुचे । नर पाखंडाचे पुतळे जे ॥३३॥
परम हिंसक पापी दुराचार । जयांसी विचार नाही मुळी ॥३४॥
अविवेकी ऐसे स्वार्थाचे जे दास । जे का परस्वास हरिताती ॥३५॥
साधु सज्जनांसी ज्यांचा वृथा द्रोह । पाडिती संदेह भक्तांलागी ॥३६॥
ऐसे जे कां नाथा उन्मत्त पामर । तयांचा संहार करी वेगे ॥३७॥
बहुत पीडलो बहुत गांजलो । म्हणुनीयां आलो शरण तूज॥३८॥
तरी रक्षी रक्षी रक्षी चक्रपाणी । दीन-विनवणी साच करी ॥३९॥
नको अंत पाहूं उशिर नको लावूं । तुजला विनवूं किती सांग ॥४०॥
आज प्रबोधन संत म्हणताती । तुजला श्रीपती आळवीती ॥४१॥
द्वादशी प्रिय परम असे माधवाला । उपमा इजला दुजी नाही ॥४२॥
तरी विश्वंभरा आतां कृपा करी । वैरी सर्व मारी आमुचे ते ॥४३॥
निवटोनी दैत्य निर्भय आम्हां करीं । श्रीगुरु श्रीहरी रमाधवा ॥४४॥
कळकळीची माझी देवा विनवणी । व्यथा अंत:करणी बाधे फ़ार ॥४५॥
म्हणुनी पुन्हां पुन्हां तुजला प्रार्थितो । पदर पसरीतो तुझेपुढे ॥४६॥
भक्तीकार्यासाठी उपासनेसाठी । निजब्रीदासाठी परंधामा  ॥४७॥
निजस्थानासाठी निजयशासाठी । सद्धर्माचेसाठी प्रभुराया ॥४८॥
आम्हां भक्तांसाठी स्वीय जनासाठी । भजनमार्गासाठी प्रार्थितसे ॥४९॥
वैरी निवटावे आमुचे समस्त । जय भगवंत कृपानिधे ॥५०॥
विनायक म्हणे वदविले स्तोत्र । जे इहपरत्र शुभदयी ॥५१॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP