मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
भिल्लीणी आख्यान

श्रीदत्त भजन गाथा - भिल्लीणी आख्यान

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


भिल्लीणी आख्यान
गुरुवार ता. २०-२-१९३०
देणे शंकराचे त्यासी न उपमा । दातृत्वाची सीमा तेथे होई ॥१॥
ऐसा नाही दाता कोणी त्रिभुवनी । सर्वस्व देवोनी जो का टाकी ॥२॥
दिधली निजकांता तया रावणासी । तरी या देण्यासी म्हणो काय ॥३॥
इतुकेंच नोहे दिधले आत्मलिंग । घेत स्वयें जोग सदाशिव ॥४॥
राख फ़ांसी आंगा सदा दिगंबर । करित संचार गिरिकंदरी ॥५॥
मागे जे जे कांही कोणीहि तयासीं । देतो अविचारेंसी सदाशिव ॥६॥
भस्मासुरा देई शंभु दिव्यवर । ठेवितां शिरी कर भस्म होई ॥७॥
द्वेषवुद्धिने तूं ठेविसील जरी । भस्म एकसरी वैरी होई ॥८॥
जगताचेसाठी स्वये विष प्याला । नीलकण्ठ भला शोभतसे ॥९॥
भगीरथ आणि गंगा अवनीवरी । घेत निजशिरी सदाशिव ॥१०॥
भोळा देव त्याचे अमित भोळेपण । सुलभकोप जाण सदाशिव ॥११॥
खेळतां उभेसी विनोद घडला । सहज कोपला हार येतां ॥१२॥
चिडोनियां जाई गिरीकंदरासी । चिंता गिरिजेसी प्राप्त झाली ॥१३॥
लावोनी समाधि तपासि बैसला । उघडिना मला निजनेत्र ॥१४॥
भिल्लीणीचा वेष घेवोनि पार्वती । सखीयां सांगती तेथे जाई ॥१५॥
परम वेल्हाळ नटली गिरिजा । शृंगाराच्या चोजा कोण वर्णी ॥१६॥
नटुनी शृंगारे तेथे नृत्य करी । गातसे कुसरी उमादेवी ॥१७॥
भुलविला शंभु चळविले ध्यान । भुलविले मन बैराग्याचे ॥१८॥
पाठीलागे मग दाढी मिशावाला । दीनवाणा झाला आसक्त तो ॥१९॥
आंगालागी असे राख फ़ांसीयेला । उडी घेत भली तिच्या पदीं ॥२०॥
तो ती नेत्र मोडी कटाक्षाने विन्धी । मन्मथाचा व्याधि बाधे थोर ॥२१॥
फ़सवोनि ऐसा कैलासी आणिला । स्थानी बैसविला सदाशिव ॥२२॥
भिल्लीणींचे रुप टाकोनियां सती । निजरुपाप्रति दावित ती ॥२३॥
देखतां पार्वती परम लाजला । भोळेपणा भला अनिवार ॥२४॥
अमर्याद भोळा सहज फ़सतो । सर्वस्व हरतो सदा शंभु ॥२५॥
अल्पही जरी सेवा घडली तयाची । बहुत मोलाची होत असे ॥२६॥
अनिवार फ़ळ देत सदाशिव । त्याचा भोळा भाव भक्तांपाशी ॥२७॥
विनायक म्हणे भजावा तो शिव । मग होई शिव सर्वदाही ॥२८॥
==
धांवा
गुरुवार ता. २७-२-१९३०
क्षमा व्हावी नाथा माझे अपराधां । मज पापबाधा होवो नेदी ॥१॥
मज न बांधावे दुरित बा कांही । कृपे लवलाही निवारावे ॥२॥
याचसाठी नाथा धरिले चरण । तुज लोटांगण घालीतसे ॥३॥
आश्रय मी केला तुझा गुरुराया । शरण होवोनिया तुझे पायां ॥४॥
लपवी, पाठीसीं मजलागी घाल । अज्ञान मी बाल तूझा असे ॥५॥
तूजपाशी दया तूं तो करुणामूर्ति । क्षमा तूं श्रीपति मज करी ॥६॥
तुवां अव्हेरितां मग म्यां कोठे जावे । कोणा आश्रयावे सांग दत्ता ॥७॥
विश्वास धरोनि धरिली तुझी कांस । माझी आतां अस पुरवीं दत्ता ॥८॥
मज क्षमा करीं मज पाठी घाली । मजला अघालि बाधों नेदी ॥९॥
तूझीया कृपेने होईल अघनाश । ऐसा जगदीश भाव माझा ॥१०॥
माझ्या ह्रदयांत तुझा असे प्रकाश । मी तो सावकाश अनुभवीतो ॥११॥
सुखाची तूं मूर्ति मूर्त तूं आनंद । सन्मुख वरद मज सदा ॥१२॥
कूर्म दृष्टीसम करिसी तूं देवा । सुख माझ्या जीवा सदा देसी ॥१३॥
अमृताचे स्नान अमृताचे पान । मज दयाघन तुझी दृष्टी ॥१४॥
परम कृपेची परम सुखाची । परम आनंदाची तुझी दृष्टी ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP