मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
देव कार्यासाठी नयज्ञतेची जरुरी-मारुतीचा दृष्टांत

श्रीदत्त भजन गाथा - देव कार्यासाठी नयज्ञतेची जरुरी-मारुतीचा दृष्टांत

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


बुद्धिबल तैसा थोर पराक्रम । याचे जे का धाम असे सदा ॥१॥
देश काल आणि निमित्तां जाणता । ज्यांची नयज्ञता अपूर्वची ॥२॥
चतुर व्यवहारी पूर्ण जो शहाणा । ज्याचा दृढपणा अलौकिक ॥३॥
तोच कार्यकर्ता सिद्धीते पावतो । तोच धन्य होतो जगत्रयी ॥४॥
सीता शोधनार्थ एकला समर्थ । जाहला सिद्धार्थ वायुपुत्र ॥५॥
तनमनधन जेणे रामपायी । अर्पोनी तत्कार्यी झटला जो ॥६॥
दृष्टांन्तासी त्याचे योजुनी चरित । कार्य आचरित रहावे की ॥७॥
विनायक म्हणे तेणे सिद्ध कार्य । होईल निश्चय हा जाणावा ॥८॥
=
धांवा
गुरुवार ता. १७-४-१९३०
नाहीच का दया येणार तुम्हांला । नैष्ठुर्य मनाला शिवेल का ॥१॥
काय होय अग्नि जलासम शीत । शर्करेचे जात मधुरपण ॥२॥
जाळीलो काय पाणी काय त्याचा धर्म । मजलागी वर्म कळेनाच ॥३॥
काय मृदुल पुष्पे शस्त्रांसम होती । अमृते बनती विषासम ॥४॥
पवनाची गति काय बा कुंठेल । जड तो होईल काय सांग ॥५॥
काय नवनीत दगड बनेल । कपिला स्त्रवेल विष काय ॥६॥
काय अंध:कार झांकिल सूर्याला। उष्णता चंद्राला काय येई ॥७॥
काय जलचरे आकाशी उड्डाण । करतील जाण प्रभु दत्ता ॥८॥
नाही कधी ऐसे ऐकियेले कानी । धर्म जात गळुनी धर्मीयांचा ।\९॥
ज्याचा जैसा धर्म तैसाच वागत । उणेपण येत कधी न तया ॥१०॥
कधी न भिन्नता धर्मासीं घडत । स्वभाव प्रगटत कांही झाल्या ॥११॥
विनायक म्हणे काय दयाघना । शिवे तूझ्या मना कठोरपण ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP