मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
कनवाळू देव दृष्टांत

श्रीदत्त भजन गाथा - कनवाळू देव दृष्टांत

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


मारयिले दैत्य वैकुण्ठ्य स्थापिले । महिमान भले ख्यात लोकी ॥१॥
मूठभर पोहे सुदामा ब्राह्मण । करितां अर्पण काय केले ॥२॥
द्वारावती सम सुवर्ण नगरी । दिधली श्रीहरी निजकृपे ॥३॥
भिल्लीणीची बोरे उच्छिष्ट भक्षिसी । तिजलागी नेसी निजधामी ॥४॥
पद-रज तूझा अहिल्ये स्पर्शतां । शापविमुक्तता प्राप्त झाली ॥५॥
वैरियाचा भ्राता शरणागत होतां । तया अंगिकृतता केली तुवां ॥६॥
पांच वरुषाचे बालक वेल्हाळ । अंतरी विव्हळ अपमाने ॥७॥
तया अढळपद देउनि अनुग्रहिले । माहात्म्य थोर भले ऐसे तुझे ॥८॥
भोळ्या गवळणीविद्ध काम-बाणी । तुवां चक्रपाणी शांत केल्या ॥९॥
गवळ्यांचे पोर केला अंगिकार । त्यांचा बडिवार वाढवीला ॥१०॥
कुब्जादासी एक वांकुडि आठांठायी । संभोग ह्रदयी इच्छितसे ॥११॥
तिचा काम तुवां पुरविला देवा । तुझा काय गावा महिमा सांग ॥१२॥
पाण्डवांचे दास्य केले रात्रंदिन । संकटि घालून स्वये घेसी ॥१३॥
लाभ हानि मृत्यु जो निजदासांचा । निज शिरीं साचा घेतोसी तूं ॥१४॥
विनायक म्हणे तुज उपमा न । नाही दयाघन त्रैलोक्यांत ॥१५॥
==
कधी ?
दया कधी करणार । उडी कधी घालणार ॥१॥
संकटांत तारणार । माझी पाठ राखणार ॥२॥
अभिमान धरणार । मजलागी तारणार ॥३॥
मजसाठी कळवळणार । कधी धांव तूं घेणार ॥४॥
हांकेसी तूं हांक देणार । कधी माझा तूं होणार ॥५॥
कधी अमृत देणार । चिंता दूर करणार ॥६॥
प्रसन्न मज राखणार । चित्त कधी विकसवणार ॥७॥
मज धैर्यासी देणार । पत माझी राखणार ॥८॥
शब्द सत्य करणार । इच्छा माझी पुरविणार ॥९॥
भय माझे हरणार । विघ्ननाश करणार ॥१०॥
कधी प्रसन्न होणार । कधी मज पावणार ॥११॥
विनायका करणार । निर्भय कधी परमोदार ॥१२॥
==
धांवा
जोडोनियां दोन्ही हात । तुजलागी मी प्रार्थित ॥१॥
अपराध क्षमा करी । घेई आतां मज पदरी ॥२॥
तुझ्या पायींचा मी दास । तुझी धरिलीसे कांस ॥३॥
धरोनियां पोटी आस । करीतसे भजनास ॥४॥
अंत नको पाहूं आता । कृपा करी भगवंता ॥५॥
बापुडा मी दीन शरण । तुझे धरिले चरण ॥६॥
अंगिकारी मायाबाप । शमविं आतां माझ्या तापा ॥७॥
लोटांगणे मी घालीतो । परोपरी आळवीतो ॥८॥
तुझा धांवा मी करितो । तुझी वाट बहु पाहतो ॥९॥
उताविळ झालो फ़ार । उडी घेई कृपाकर ॥१०॥
अनाथाचा तूंच नाथ । दीनाचा तूं धनी समर्थ ॥११॥
तरी आतां प्रगट होई । मजलागी झाली घाई ॥१२॥
मज धीर मुळि निघेना । करुं काय अत्रिनंदना ॥१३॥
तुझ्या सेवेमाजि जन्म । घातला मी पूर्णकाम ॥१४॥
ग्वाही केली तुझ्या कीर्तिची । घोषणा की तव नामाची ॥१५॥
तूझे यश मी गाईले । ह्र्दयांत तुज पूजिले ॥१६॥
अहोरात्र तुझे स्मरण । वाहिले तुज अंत:करण ॥१७॥
अशनि शयनीं आणि पानी । स्मरलो मी तूज मनी ॥१८॥
विसर नाही कधी तुझा । प्राणचि तूं जैसा माझा ॥१९॥
प्राणाचाही तूंच प्राण । आत्माराम नारायण ॥२०॥
तरी आतां प्रगट नाथा । उडी घाल श्रीसमर्था ॥२१॥
विनायक करी प्रार्थना । धांव घ्यावी दयाघना ॥२२॥
==
धांवा
(प्रवचनांत झालेले )
व्यर्थ माझा देवा जन्म । व्यर्थ झाले माझे कर्म ॥१॥
व्यर्थ झाली उपासना । तैशी भक्तीची भावना ॥२॥
व्यर्थ झाला माझा निश्चय । किती करुं हायहाय ॥३॥
आशाभंग माझा झाला । सर्वस्वाचा घात भला ॥४॥
व्यर्थ झाले तूझे नाम । जे कां जपलो पूर्णकाम ।\५॥
देवा घाल आतां उडी । संकटांत या तांतडी ॥६॥
वांचवीणे तुझ्या हाती । यश देणे त्वां श्रीपति ॥७॥
विनायक म्हणे देवा । मज आतां त्वरित पावा ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP