मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
कर्माने मोक्ष मिळत नाही

श्रीदत्त भजन गाथा - कर्माने मोक्ष मिळत नाही

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


जरी कर्मे मोक्ष म्हणाल प्राप्त होत । तरी तो दुरावत जडत्वाने ॥१॥
कर्माचीया योगे जड्त्व येतसे । बद्धता होतसे जीवालागी ॥२॥
फ़लाभिसंधिते धरोनियां कर्म । करित परम मानव हो ॥३॥
अविवेकी मन इंद्रिये सरस । वश वासनेत असे सदा ॥४॥
तेणे याचे मन इंद्रिये ही तैशी । बद्ध विषयांसी अनुबंधे ॥५॥
मग चित्तशुद्धी कैशी प्राप्त होत । ज्ञान प्रकाशत कैसे याला ॥६॥
भृत्य वासनेचा कैसा मुक्त होय । जोवरि ह्रदय शुद्ध नाही ॥७॥
तेणे मंत्रसिद्धी यास होत नाही । देव बद्ध पाही याचे सदा ॥८॥
मंत्र वायां होती देव न पावती । मग कैची गति प्राप्त याला ॥९॥
देवांचाही यास न घडे साक्षात्कार । मग ज्ञान विस्तार दूर जाणा ॥१०॥
ज्ञानापासोनीयां दूर हा राहतो । मुक्ती न पावतो कर्मयोगे ॥११॥
विनायक म्हणे उपासना हेच । साधन असे साच जाणावे की ॥१२॥
योग सिद्ध झाला जयां दैत्यांलागी । प्रमत्त ते जगी थोर झाले ॥१॥
ऐसा इतिहास नित्याचा सांगतो । सामर्थ्य वर्णितो दैत्याचे की ॥२॥
सामर्थ्य हे नोहे मोक्षासी कारण । परमार्थ जाण दुरावतो ॥३॥
जेव्हा सामर्थ्याचा होय दुरुपयोग । तेव्हा अपवर्ग साधेनाच ॥४॥
त्रैलोक्यांत जरी दैत्य राजे झाले । तरी सर्व मेले इतिहास ॥५॥
कोणा न तरला योगसिद्धिबळे । विवेकाने वळे परमार्थ ॥६॥
ज्ञानप्रकाशन जेव्हा होत जाणा । होय विचारणा परमार्थी ॥७॥
तेव्हांच परमार्थी गति प्राप्त होय । तेव्हां नर होत मुक्त जाणा ॥८॥
शुंभनिशुंभांचा घडला वृत्तांत । हेंच शिकवीत सर्वालागी ॥९॥
विनायक म्हणे भजा भगवंता । तरी मुक्ती हाता येईल की ॥१०॥
==
कर्माने मोक्ष मिळत नाही

मर्त्यलोकी शुभ कर्मांते करिती । देवपणा पावती देवलोकी ॥१॥
परि तेही मग संकटी पडती । सामर्थ्य राहती कर्माची की ॥२॥
जेव्हा योगसिद्ध पुरुषा गांठी पडे । सिद्धी त्यची नडे देवालागी ॥३॥
स्थानभ्रष्ट होती विपत्ती भोगिती । कर्मफ़ळे होती अस्तंगत ॥४॥
जेव्हा भगवंता शरण ते जाती । तेव्हांच सद्गती प्राप्त तयां ॥५॥
हाच इतिहास आम्हां बोध करित । जाणा विचारवंत विचाराने ॥६॥
विनायक म्हणे कर्म व्यर्थ आहे । विघ्नांलागी लाहे फ़ळ्काळी ॥७॥


N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP