मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
देही अनासक्ति व ईश्वरी अनुरक्ति

श्रीदत्त भजन गाथा - देही अनासक्ति व ईश्वरी अनुरक्ति

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


कधीतरी देह असे पडणार । तयी प्रेमभर देवो नये ॥१॥
देहाचा गौरव किंवा विटंबणा । आणूं नये मना कदापिही ॥२॥
देह हा देवाचा विचार करावा । ईश्वरी योजावा त्याचा त्यासी ॥३॥
कोणी पूजा करो कोणी त्यासी दंडो । तेथे नये भांडो वेड्यासम ॥४॥
जी का तूझे ठायी असे सपन्नता । त्याची रसिकता देवालागी ॥५॥
देव करिल तुझे चोज हे समज । विवेक उमज मनामध्ये ॥६॥
सापत्न मातेची जे का विषमता । तेणे तूं विद्वता मानूं नको ॥७॥
जगा सांग काय तुझे बा कौतुक । तो जननी जनक करुं जाणे ॥८॥
तुझीया गुणांचे करील तो चीज । तया आहे चोज तुझे सदा ॥९॥
तुज चोजविता देव निरंतर । ठेवी मनी सार हेच सदा ॥१०॥
मग देवापाशी ऐक्य तूं साधोनी । जाय बा रंगोनी भजनांत ॥११॥
विसर देहासी विसर गुणांसी । विसर गौरवासी सर्व कांही ॥१२॥
विसरोनी आपणा देवचि तूं होई । गोठोनी तूं जाई देवामध्ये ॥१३॥
समरस होई मग त्या रसा गाई । देवत्वा तूं जाई सदेहचि ॥१४॥
होवोनिया देव देवपणे राहे । देवत्वाते लाहे देवकृपे ॥१५॥
विनायक म्हणे देव प्रगटेल । अनुभव येईल निश्चयेसी ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 16, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP