मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|
दत्तदासांची श्रीमंती

श्रीदत्त भजन गाथा - दत्तदासांची श्रीमंती

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


गुरुवार ता. १५/८/१९२९
आम्ही तृप्त सदा दत्तजीचे दास । पुरविली आस दत्तदेवे ॥१॥
आशेचा हा गांव ओस असे झाला । आमुच्या दृष्टीला भेद नाही ॥२॥
राव रंक सम एकचि स्वरुप । सर्व मायबाप दत्तात्रेय ॥३॥
मिळायाचे सर्व मजला मिळाले । नाहीच उरले आतां काही ॥४॥
तृप्तिचे ढेकर वाचेचे उच्चार । बोलती अंतर जैसे माझे ॥५॥
आमुचिया भाग्या सीमा नसे जगी । आमुची सलगी दत्तात्रेया ॥६॥
ब्रह्माण्ड हे झाले आम्हां दत्तात्रेय । होय आम्हां सोय दत्तात्रेय ॥७॥
जिकडे पहावे तिकडे आनंद । वासुदेवानंद गुरुनाथ ॥८॥
जन्मोजन्मीचा तो सखा हो आमुचा । अनुबंध त्याचा सदा आम्हां ॥९॥
अशनीं शयनीं आमुचा सोंगडी । सखा एक गडी आमुचा तो ॥१०॥
स्मरण करितां प्रगटे गुरुदत्त । वेष अवधूत दिगंबर ॥११॥
कृपारुपी मूर्ति दयेची की मूस । स्त्रवत कृपेस आम्हांवरी ॥१२॥
महानद जणुं दयेचा नटला । सुकाळ आम्हांला दयेचा कीम ॥१३॥
आतां काय उणे आम्हां लाडक्यांसी । प्रभुचे दासांसी जगीं सांगा ॥१४॥
आम्ही प्रिय त्याला जैसे त्याचे प्राण । आम्हां काय वाण उरे मग ॥१५॥
प्राणांहुनी प्रिय अधिक तो मानी । ये लगबगोनी आम्हांसाठी ॥१६॥
किती कळवळा आमुचा तयासीं । काय वचनासीं वोलावे म्यां ॥१७॥
मारियेले मज दत्तदेवे । त्याचिया वैभवे शोभलो मी ॥१८॥
विनायक म्हणे आशा माझी पूर्ण । केली नारायण प्रेमाने त्वां ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 05, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP