मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ७९

क्रीडा खंड - अध्याय ७९

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

सिंधूच्या पीडेस्तव, त्यजिला कैलास शंभुनें त्वरित ।

तेथुन मेरुवरती, पत्‍नीसह राहण्यास तो जात ॥१॥

यज्ञादि सर्व कर्मे, लोपलिं म्हणुनी समस्त ऋषि गेले ।

तेथें गिरिजेसह ते, राहति शंभू असें विधी बोले ॥२॥

पुसते गिरिजा त्यांना, सार्‍या देवांस मुख्य पतिनाथा ।

यास्तव संबोधिति ते, देव महादेव हो जगन्नाथा ॥३॥

ऐसें असून आपण, भजतां कोणास हें कथा मजसी ।

यावरि शंभु तियेला, म्हणती कांते कथीन मी तुजसी ॥४॥

जन-हित-साधक आहे, उघडुनि दावीं प्रिये तुला मी तें ।

त्रिगुणांस आवरी तो, गुणेश नामें प्रथीत सुर मातें ॥५॥

आणखि जगास रक्षी, त्यातें वदती सु=भक्त परामात्मा ।

आहे पूर्ण-ब्रह्मचि, आहे जगतांत तोचि जीवात्मा ॥६॥

त्याचें ध्यान निरंतर, करितों आम्ही यथाविधी कांते ।

त्यातें भजण्या तुजसी, एकाक्षरमंत्र सांगतों तूंतें ॥७॥

या मंत्राचा जप तूं, करिसी नेमें रवी-मितें वर्षे ।

म्हणजे स्वरुप-ज्ञानचि, समजों येईल कीं तुला हर्षे ॥८॥

ऐसें सांगुन तिजला, शिव देती मंत्र तेधवां तीस ।

मंत्रोपदेश होतां, गेली गिरिवरि सु-मंत्र जपण्यास ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP