मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय २३

क्रीडा खंड - अध्याय २३

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

योजी विनायकाला, भोजन द्यावें म्हणोन हें विप्र ।

गेला खेळगडयांशीं, समयीं खेळावयास प्रभु-विप्र ॥१॥

भूपति सभेंत बसले, वेश्यांचें नृत्य पाहते झाले ।

त्या समयीं स्वर्गांतिल, सनक सनंदन सभेमधें आले ॥२॥

त्यांचें स्वागत केलें, कारण पुशिलें पुरांत येण्याचें ।

आलों भूपति आम्ही, दर्शन घेण्या विनायक-प्रभुचें ॥३॥

इतुकें भाषण होतां, कश्यपनंदन तिथें कसा आला ।

मोदक भक्षित भक्षित, खेळत खेळत सभेमधें आला ॥४॥

सनक सनंदन यांना, दाखवि नृपती विनायका त्यास ।

ऐकुन भाषण त्यांचें, अदितीनंदन वदे असें त्यांस ॥५॥

रम्य अशा स्वर्गाचा, त्याग करुनियां इथें वृथा आला ।

ज्ञात्यांस योग्य स्वर्गचि, वाटे मजला मुनींस तो वदला ॥६॥

सनक सनंदन वदले, मोहित मति आमुची असे झाली ।

यास्तव येथें आलों स्वर्गी जाण्यास याचना केली ॥७॥

सनक सनंदन यांना, भूपति वदला करा इथें अशन ।

नंतर स्वस्थपणानें, स्वर्गा जावें म्हणे तया लीन ॥८॥

नंतर दोघे वदले, क्षत्रियसदनीं न सेवितों कांहीं ।

बोलुन निरोप घेती, गेले गंगेस तेधवां दोही ॥९॥

(दिंडी)

विनायकही जात मुलांसंगें ।

स्नान करितो बालकांसवें गंगें ।

येइ परतोनी शुक्लगृहीं गेला ।

देइ भोजन विद्रुमा स्वयें त्याला ॥१०॥

उभय दंपत्या मोद बहू होई ।

मुदित नयनांतुन उदक असें येई ।

बाहुपाशानें धरित सुरानंदा ।

धन्य केलें कीं मदिय गृहानंदा ॥११॥

त्यास भोजन तें देत शुक्लपत्‍नी ।

करित आयति ती बहुत स्वयें यत्‍नीं ।

पात्रिं भाकर वाढीत तया ताजी ।

तशी भुरकाया वाढितसे कांजी ॥१२॥

अन्न पाहुन हें हंसति मुलें सारीं ।

अन्न सेउनियां भुरके बहू मारी ।

घास घासाशीं पीत असे पाणी ।

असा जेवितसे तेथ परशुपाणी ॥१३॥

बहुत पक्वान्नें करुन सर्व लोक ।

शोध करिताती सदनिंही अनेक ।

असे शुक्लाच्या सदनिं जेविताहे ।

दहा हस्तांनीं पेज भक्षिताहे ॥१४॥

महोत्कट हें रुप धरी तेथें ।

करित भोजन तो शुक्लगृहीं तेथें ।

करित भोजन तो सांग सुरानंद ।

बहुत झाला तेधवां तया मोद ॥१५॥

(गीति)

मुखशुद्धीही दिधली, अमल-कंठी विनायक प्रभुला ।

जेउन तोषित झाला, भक्तीनें तुष्टलों असे वदला ॥१६॥

इच्छित वरास मागे, वदला विप्रास तेधवां देव ।

तुझिया ठायीं माझी, भक्ति जडावी असा मनीं भाव ॥१७॥

(इंद्रवज्रा)

संसारतापें मज वीट आला । मुक्ती करावी प्रणती पदांला ।

बोले तथास्तु द्वयपाणि होत । विप्रागृहीं तो धन पूर्ण देत ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP