मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ३०

क्रीडा खंड - अध्याय ३०

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(उपेंद्रवज्रा)

विरोचनाचा सुत देवभक्त । बली असे नाम तयास उक्त ।

गुरु असे शुक्र तया कुळासी । बलीगृहीं आणवि पूजनासी ॥१॥

यथाविधी पूजुन तो वदे कीं । स्वर्गीं करी इंद्रच राज्य कीं कीं ।

अहो असे बंधुच तो खरा कीं । न देतसे भाग आम्हांस तो कीं ॥२॥

मनास शंका मम येत आहे । म्हणून आतां गुरु पूसतों हें ।

अहो समाधान करा मदीय । वदे गुरु त्या पुढतीच काय ॥३॥

(गीति)

तुमचे पूर्वज यांनीं, केले हिश्श्यास ते बहू यत्‍न ।

झाले निष्फळ म्हणुनि, बसले सारे त्यजून कीं यत्‍न ॥४॥

करितां शत-यज्ञांसी, त्याला लाभे पुरंदरीं राज्य ।

यास्तव यज्ञा करिं तूं, सत्य-पथीं मिळविणेंच तें राज्य ॥५॥

गुरुच्या बोधा परि तो, पाचारित ते वशिष्ट भृगु आदी ।

ऋषिजन येती करिती, मंडप कुंडें ससिद्ध समिधादी ॥६॥

याज्ञीकि मातृकांची, मंडपरक्षक प्रमूख देवांची ।

योग्य स्थलींच व्यासा, स्थापन करिती मुनी तिथें त्यांची ॥७॥

पत्‍नीसहीत बलिनें, धवल पटाचें करुन परिधान ।

यज्ञाची दीक्षा ती, घेउन बैसे सु-सिद्ध होऊन ॥८॥

त्यासी प्रधान असती, सर्व प्रजाजन तसेच अनुकूल ।

पत्‍नीसहीत बलि तो, चिंतुन देवास कार्य हो सुफल ॥९॥

पूर्वांग सर्व विधी कीं, ऋत्विज हे करिति वेद सूत्रांनीं ।

पश्वालंभ विधी हा, यशामाजी प्रमूख योजूनी ॥१०॥

यज्ञांतिल देवांना, ज्याचा त्याचा म्हणून मंत्र मुनी ।

आहुति देती कुंडीं, मग ओतिती वसोरधार मुनी ॥११॥

यापरि उत्तर आंगा, सारुनि रथिं बैसला सतीसहित ।

अवभृत स्नानीं बलि तो, वाजति वाद्यें निघे प्रजेसहित ॥१२॥

ऐशा वेळीं चाले, वेदांचा घोष साम-गायन कीं ।

परतुन येतां स्थलिं त्या, दानांनीं विप्र तोषवी बलि कीं ॥१३॥

एणेंपरि त्या बलिनें, नव्याण्णव यज्ञ पूर्ण कीं केले ।

शत संख्य यज्ञ करितां, इंद्राचें काळजींत मन गेलें ॥१४॥

ऐशा वेळीं विष्णू, वास करी क्षीरसागरीं व्यासा ।

कमलाचरण चुरित ती, नारद तुंबर सु-गायनीं सुरसा ॥१५॥

सुरसा प्रयुक्त करिती, गुणवर्णन हें तसेच गंधर्व ।

आणिक गायन करिती, स्वर्गीच्या अप्सराहि त्या सर्व ॥१६॥

असल्या वेळीं स्मरणा, विष्णूचें करुन वृत्त कथितात ।

संकट जाणुन त्याचें, आश्वासन देउनी अभय त्यास ॥१७॥

अदिती उदरीं तेव्हां, विष्णु करी कीं प्रवेश सत्वर तो ।

दश-मास पूर्ण भरतां, उत्तमसा पुत्र जाहला हरि तो ॥१८॥

अदिती कश्यप यांना, विष्णूनें कळविलें स्वकियरुपें ।

पूर्वी तपास केलें, यास्तव अवतार घेत सुतरुपें ॥१९॥

भू-भार शरण करणें, कार्य असे कीं मदीय हक्काचें ।

ऐसें बोलुन विष्णू, बालस्वरुपा धरुन आधींचें ॥२०॥

उदरीं जन्मुन तेव्हां, रुदन केलें त्वरीत त्या सदनीं ।

करिता झाला नंतर, कश्यप जातक यथाविधी सु-मनीं ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP