मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय १०

क्रीडा खंड - अध्याय १०

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(शार्दूलविक्रीडित)

लागे पंचम अब्द यास्तव सुता चौलादि केलें असे ।

मौंजीबंधन तें करी समयिं तो उत्साह भारी दिसे ।

आले देव ऋषी असूर बहुही गंधर्व यक्षादिक ।

तैसे वैश्य नि शूद्रही सदनिं त्या आले बहू याचक ॥१॥

देती कश्यप यांस ते प्रचुर कीं आहेर भिक्षावळी ।

वाद्यें वाजति त्या स्थळीं प्रचुरशीं आनंदली मंडळी ।

आधीं पूजन तें करी गणपती देव प्रतिष्ठा करी ।

चाले कृत्य पुढें यथाविधि असे तांदूळ देती करीं ॥२॥

मध्यें अंतपटा धरुन बटु नी तातावरी अर्पिले ।

मौजींबंधन तें करुन बटुशीं मंत्रासही बोधिलें ।

ऐसी वेळ बघोन दानव अहो आले तिथें पांच कीं ।

तंडूलासम त्या बटूवरि तदा टाकीत अस्त्रांस कीं ॥३॥

जाणूनी बटुनें तयावरि हळू तांदूळ कीं टाकिले ।

त्यायोगें मृत ते तिथेंच पडले वेषांतरीं देखिले ।

देवांनीं बघतां बटूवरिच कीं पुष्पें बहू वाहिलीं ।

प्रेतें नेउन तीं दुरी तिथुनियां गर्तींच तीं टाकिलीं ॥४॥

(ओवी)

पिंगाक्ष आणि विधात । पिंगल आणी चपल येत ।

विशाल हे तेथें दिसत । विप्रवेष धरुनियां ॥५॥

(साकी)

नंतर बटुला दंड कमंडलू देत अशी दीक्षा ।

मौंजी बांधुनी वस्त्रें देउनि जननी घाली भिक्षा ॥६॥

धृ०॥सुन सुन कथनासी केलें उपनयनासी ।

होमहवनही कश्यप सारें समाप्त तेव्हां करिती ।

नंतर बटुला गायत्रीचा मंत्र तात ते देती ॥७॥

समारंभ हा थोर जाहला जमले असंख्य लोक ।

त्यांनीं बटुला भिक्षा दिधली केलें बहु कौतूक ॥८॥

(गीति)

बटुला वशिष्ठ नेई, विधिसदनीं दर्शनार्थ प्रेमानें ।

तीर्थ प्राशुन दिधलें, प्रफुल्ल चिर-कमल-पुष्प सुमनानें ॥९॥

विधिनें नाम तयाला, दिधलें हें ’ब्रह्मनस्पती’ ऐसें ।

ऐका मुनी तुम्हीं हो, सांगतसे सूत ती सभा बैसे ॥१०॥

बटुला स्वकंठिंची ती, माळा अर्पी कुबेर बहुमानें ।

नाम ’सुरानंद’ तया, दिधलें त्यानें बहूत आवडिनें ॥११॥

वरुणानें पाश तया, देउन ठेवी महोत्कटा नाम ।

’सर्वप्रीय’ असें हें, ऐका ऋषि हो तृतीय तें नाम ॥१२॥

शंकर त्रिशूळ डमरुं, देउन ठेवी बटूस नाम मुनी ।

ऐका सूत म्हणे त्या, उज्ज्वल हें ’भालचंद्र’ त्या म्हणुनी ॥१३॥

देवांनीं त्या बटुला, परशू दिधला करांत धरण्यास ।

’परशूहस्त’ असें हें संबोधित नाम ठेविलें त्यास ॥१४॥

उदधी शेष नि वायू, इत्यादिक पूजिती स्वयें बटुला ।

दिधल्या अनेक वस्तू, इंद्रानें पूजिलें नसे बटुला ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP