मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय १९

क्रीडा खंड - अध्याय १९

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

ज्योतिषिरुपी राक्षस, वधिला सत्वर विनायकें सहज ।

केलें कौतुक त्याचें, लोकांना दाखवी प्रभू मौज ॥१॥

(उपेंद्रवज्रा)

नरांतका मात कळेचि जेव्हां । असूर तापें बहुसाळ तेव्हां ।

बलिष्ठ झाले विधिच्या वरानें । असूर ऐसें निरवी त्वरेनें ॥२॥

(दोधक)

कूपक-कंदर दैत्यचि दोघे । घेउन जाती सैन्यच दोघे ।

संनिध येतच पट्टणिं जेव्हां । ठेविति सैन्यहि दूरच तेव्हां ॥३॥

कूपक-कंदर बोलति काय । कूपक रुपच घेउन जाय ।

कंदर होउन बालक खेळा । कूपिंच लोटुन देइच बाळां ॥४॥

मंडुकरुपच घेउन बाला । खाउन टाकिन मीचहि त्याला ।

कूपक-कंदर घेउन सोंगें । मारिति हांकच लोटित आंगें ॥५॥

खेळति बालक कांठिंच मोदें । पोहत बालक आंतच छंदें ।

पाहुन मंडुक ओढित पायीं । कूपिंच शब्द किं ऐकुंच येयी ॥६॥

(गीति)

बुडतों बुडतों मजला, शब्द निघे सोड सोड दोघांचे ।

राक्षसमाया म्हणुनी, मज्जनिं तत्पर नसेच धीराचे ॥७॥

भूपति शोक करी कीं, शूर विनायक असोन तो फसला ।

ऐसा प्रसंग त्याला, कळला नाहीं सखेदसा वदला ॥८॥

इकडे विनायकाला, कंदर आणी तळींच पोहोनी ।

कूपक बहूत हर्षे, मारुं आपण तयास कीं मिळुनी ॥९॥

राक्षस ऋणास फेडूं, ऐसें भावी मनांत कूपक तो ।

कूपकमुखांत बालक, जाणुन सहचर त्वरीतसा धरितो ॥१०॥

तेव्हां बालकरुपा, सोडुन झाला त्वरीत राक्षस कीं ।

कूपकमुखास फोडी, मजला गिळिलें म्हणून क्रोधित कीं ॥११॥

तुंबळ युद्ध परस्पर, करिते झाले तिथेंच ते असुर ।

सुंदोपसुंद पूर्वी, लढले जैसे परस्परें वीर ॥१२॥

युद्धामध्यें त्यांचा, मृत्यू झाला परस्परां हातीं ।

अद्‌भुत प्रकार पाहुन, जन सारे ते मुदीतसे होती ॥१३॥

खेळत नृपांगणीं तो, बाळांसंगें विनायक प्रेमें ।

देखुन भूपति तेव्हां, कौतुक करितो जनांसह प्रेमें ॥१४॥

विधिनें व्यासा कथिल्या, गोष्टी ऐशा पुनीतशा भारी ।

त्या सोमकांतराया, भृगु सांगति रुग्णताप त्या हारी ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP