मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
ब्रह्मनिष्ठांची लक्षणे

ब्रह्मनिष्ठांची लक्षणे

प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली .


२३७
वर्म जाणे तो विरळा । त्याची लक्षणें पै सोळा देही देव पाहे डोळा । तो चि ब्रह्म -ज्ञानी जन निंदो अथवा वंदो । तया नाही भेदाभेद विधि -निषेधाचे शब्द । अंगी न बाणती कार्य कारण कर्तव्यता । हें पिसें नाहीं सर्वथा उन्मनी समाधि अवस्था । न मोडे जयाची कर्म - अकर्माचा ताठा । न बाणें चि अंगीं वोखटा वाउग्या त्यां चेष्टा । करी ना कांहीं शरण एका जनार्दनी । तो चि एक ब्रह्मज्ञानी तयाचे दर्शनी । प्राणियासि उध्दार
भावार्थ
ब्रह्म-स्वरुपाचे रहस्य जाणणारा ब्रह्मनिष्ठ सोळा लक्षणांनी ओळखला जातो. जो आपल्या देहातच देव पाहतो तो खरा ब्रह्मज्ञानी समजावा. लोकांनी केलेली निंदा किंवा स्तुती तो समान भावानें स्विकारतो. कोणी स्विकार अगर धिक्कार करो ब्रह्मज्ञानी भेदाभेद मानत नाही. असा ब्रह्मज्ञानी कार्य व त्याची कारणे यांची चर्चा करीत नाही. त्याची उन्मनी व समाधी अवस्था कधी भंग पावत नाही. ब्रह्मज्ञानी आपण केलेल्या कामाचा किंवा न केलेल्या अयोग्य कामाचा कधी गर्व मानत नाही. निरुपयोगी प्रयत्नांचा हव्यास धरीत नाही. अशा ब्रह्मज्ञात्याला एका जनार्दनी शरण जातात, त्याच्या केवळ दर्शनाने अनेकांचा उध्दार होतो असे ते म्हणतात. 
२३८
निरपेक्ष निरद्वंद्व तो चि ब्रह्म-ज्ञानी नायके चि कानीं परापवाद सर्वदा सबाह्य अंतरीं शुचित्व न देखे न दावी महत्त्व जगीं वाया एका जनार्दनी पूर्णपणें धाला शेजेचा मुराला रसीं उतरून
भावार्थ
जो मनाने पूर्णपणे निरपेक्ष आहे, ज्याला कुणाकडूनही कांही मिळावे अशी अपेक्षा नाही तो ब्रह्मज्ञानी समजावा. तो सदोदित अंतर्बाह्य शुध्द, निर्मल असतो कारण तो इतरांची निंदा किंवा स्तुति कानाने ऐकण्याचे टाळतो. ब्रह्मज्ञानी इतरांचा मोठेपणा डोळ्यांनी बघत नाही आणि स्वता:चा मोठेपणा जगाला दाखवत नाही. एका जनार्दनी म्हणतात, हा ब्रह्मज्ञानी स्वता:च्या आत्मानंदांत रममाण असतो. परिपक्व झालेले फळ आढींत घातले असतां जसे मधुर आणि रसमय बनते तसा हा ब्रह्मज्ञानी समजावा. 
२३९
जागा परीं निजला दिसे । कर्म करी स्फुरण नसे सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा संकल्प विकल्पाची ख्याति । उपजे चि ना कदा चित्तीं या परी जनी असोनि वेगळा । एका जनार्दनी पाहे डोळा
भावार्थ
ब्रह्मज्ञानी सदैव जागृत असुनही निश्चल, शांत असतो. सतत कर्मरत असूनही कर्माचे स्फुरण चढले आहे असे वाटत नाही. निवांत मनांत संकल्प, विकल्पाचे तरंग उठत नाही. अशा प्रकारे लोकांमध्ये वावरत असूनही सर्वांपेक्षा निराळा असतो असे एका जनार्दनी म्हणतात. 
२४०
दृष्टी देखे पर-ब्रह्म । श्रवणीं ऐके पर-ब्रह्म रसना सेवी ब्रह्मरस । सदा आनंद उल्हास गुरु-कृपेचे हें वर्म ।जग देखे पर-ब्रह्म एका जनार्दनी चराचर अवघें ज्यासी परात्पर
भावार्थ
ब्रह्मज्ञानी आपल्या डोळ्यांनी केवळ परब्रह्मच पहातो. कानांनी केवळ परब्रह्मच ऐकतो. जिव्हेनें केवळ ब्रह्मरसच सेवन करतो. चित्त सतत आनंद व उल्हासानें उचंबळत असते. सर्व जग हे ब्रह्मज्ञानीला षर-ब्रह्म च वाटते. अवघी सजीव निर्जीव सृष्टी परब्रह्माचेच प्रतिबिंब आहे असा अनुभव येणे हे गरु-कृपेचे रहस्य आहे असे एका जनार्दनी म्हणतात. 
२४१
ब्रह्मस्थितीचे हें वर्म । तुज दावितों सुगम सर्वां भूती भगवद्भाव । अभेदत्वें आपण चि देव संसार ब्रह्म-स्मृति । सांडोनिया अहंकृति शरण एका जनार्दन । कृपा पावला परिपूर्ण
भावार्थ
एका जनार्दन ब्रह्मस्थितीचे रहस्य वर्णन करुन सांगतात, सर्व चराचर हे भगवंताने अंशरुपाने व्यापले आहे असा भगवद्भाव मनांत निर्माण होऊन आपण परमेश्वराचे च अंशरुप आहोत , देव व भक्त यांत द्वैत नाही असा अद्वैताचा प्रत्यक्ष अनुभव येऊन अहंकार, मी-पणा गळून पडणे हे गुरु-कृपेचे लक्षण आहे असे एका जनार्दन सांगतात. 

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP