मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
श्रीविठ्ठलमहात्म्य

श्रीविठ्ठलमहात्म्य

प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली.


आवडीच्या सुखा सुखावला । वैकुंठ सांडोनीं पंढरिये आला ॥१॥ देखोनियां पुंडलिका उभा सम पाई देखा ॥२॥ न बैसे खालीं । युगे अठ्ठावीस जालीं ॥३॥ ऐशी भक्ताची माउली । उभी तिष्ठत राहिली ॥४॥ एका जनार्दनीं देव । उभा राहिला स्वयमेव ॥५॥
भावार्थ
भक्तिप्रेमाने सुखावलेला पांडुरंग वैकुंठ सोडून पंढरीला आला आणि भक्तराज पुंडलिकाला पाहून विटेवर समचरण ठेवून अठ्ठाविस युगांपासून तिष्ठत उभा आहे. एका जनार्दनीं म्हणतात, पांडुरंग रुपानें स्वयमेव परब्रह्म भक्तासाठी वाट पाहत आहे. 

धन्य धन्य पुंडलिका तारिले लोका सकळां ॥१॥ तुझें भाकेगुंतुनी यथें । तारीन पतीत युगायुगीं ॥३॥ भाळे भोळे येतील जैसे । दरुशनें ते तैसे वैकुंठी ॥३॥ एका जनार्दनीं देऊनी वर । राहे विटेवर मग उभा ॥४॥
भावार्थ
धन्य धन्य पुंडलिक असे म्हणुन एका जनार्दनीं सांगतात, परब्रह्म सच्चिदानंद परमेश्वर भक्तांचे मनोगत जाणून भक्त पुंडलिकाला वरदान देतात कीं, दर्शनास येणार्या सर्वपतितांचा उध्दार करण्यासाठी वचनबध्द आहे. आपले वचन पूर्ण करण्यसाठी देव विटेवर उभे आहेत. 

भक्तांदारी उभाचि तिष्ठे । न बोले न बसै खालुता ॥१॥ युगे जाहलीं अठ्ठावीस । धरुनी आस उभाची ॥२॥ जड मूढ हीन दीन । तारी दरुशनें एकाची ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा वर । दिधला साचार भक्तांसी ॥४॥
भावार्थ
भक्ताला दिलेले वरदान खरे (साचार) करण्यासाठी परमात्मा अठ्ठाविस युगांपासून तिष्ठत उभा राहिला आहे. खाली न बसतां मुकपणे आस धरुन, जड, मूढ(अजाण) दीनदुबळे यांना दर्शन देऊन पतितांचा उध्दार करुन वचनपूर्ती करतो. असे एका जनार्दनीं या अभंगात म्हणतात. 

घेऊनियां परिवारा । आला असे पंढरपुरा ॥१॥ भक्ता पुंडलिकासाठीं । उभा ठेवुनी कर कंटीं ॥२॥ केशर कस्तुरी चंदन टिळा । कांसे शोभे सोनसळा ॥३॥ वामांकीं शोभे रुक्मिणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥
भावार्थ
वैकुंठीचा राणा भक्त पुंडलिकासाठी परिवारासह पंढरपुरा आला. केशर, कस्तुरी मिश्रीत चंदनाचा टिळा कपाळीं रेखून, पिवळा पितांबर लेवून, दोन्ही कर कटावर ठेवून विटेवर समचरणी उभा ठाकला आहे. डाविकडे रुक्मिणी शोभून दिसत आहे. एका जनार्दनीं विठ्ठल भेटीचे असै वर्णन या अभंगांत करतात. 

एकरुप मन जालेंसें दोघांचे । देव आणि भक्तांचे रूप एका ॥१॥ पुंडलिका कारणें समुच्चय उभा । त्रैलोक्याची शोभा पांडुरंग ॥२॥ ध्यातां चित्त निवे पाहतां पहावें । एका जनार्दनीं साठवीं हृदयीं रुप ॥३॥
भावार्थ
देव आणि भक्तांचे मन एकरूप झाले. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही भुवनांत शोभून दिसणारे परब्रह्म पांडुरंग आणि भक्तीप्रैमाने कृतार्थ झालेला भक्तराज पुंडलिक यांच्या रुपाचे ध्यान लागले असतां चित्ताला विलक्षण शांतीसुखाचा लाभ होतो. एका जनार्दनीं म्हणतात, हे रुप हृदयांत सांठवावें. 

ऐशी आवडी मीनली सुखा ।देव उभा भक्तद्वारीं देखा ॥१॥ धन्य धन्य पुंडलिका । उभे केले वैकुंठनायका ॥२॥ युगे अठ्ठावीस नीट । उभा विटे कर ठेवुनियां कर ॥३॥ एका जनार्दनीं शरण जाऊं । काया वाचा मनें त्यासी ध्याऊं ॥४॥
भावार्थ
भक्ताच्या भक्तिप्रेमाने सुखावलेला पांडुरंग भक्ताच्या दारी अठ्ठाविस युगांपासून कर कटीवर ठेवून उभा आहे. वैकुंठनायकाला भक्तिरंगात रंगवून टाकणारा पुंडलिक धन्य होय असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, या देव भक्ताला शरण जावें, देहाने, वाचेने, मनाने त्यांचे सतत चिंतन करावे. 

विठ्ठल रुक्मिणी राही सत्यभामा । एकरुपी परमात्मा पंढरीये ॥१॥ कैवल्य उघडें क्षीरसागर निवासी । तपे पुंडलिकासी वश्य जाहलें ॥२॥ अणुरेणुपासोनि भरूनि उरला । तो म्यां देखियेला पंढरिये ॥३॥ एका जनार्दनीं सांवळा श्रीकृष्ण । जनीं जनार्दन पूर्ण भरला ॥४॥
भावार्थ
क्षीरसागरांत निवास करणारा कैवल्यदानी परात्पर परमात्मा रुक्मिणी, सत्यभामेसह भक्त पुंडलिकाच्या तपाने प्रसन्न होऊन पंढरींत आले. जे परब्रह्म विश्र्वातील सर्व अणुरेणुंत भरून उरले ते पंढरींत पहायला मिळाले. एका जनार्दनीं म्हणतात, सावळ्या श्रीकृष्णाचे हे विश्वव्यापी रुप सर्व जन मानसांत प्रतिबिंबित झाले आहे. 

कैसा पुंडलीका उभा केला । वैकुंठाहुनी भक्ती चाळविला ॥१॥ नेणें रे कैसे वोळलें । अधीन केलें आपुलिया ॥२॥ दर्श़नमात्रें प्राणिया उध्दार । ऐशी किर्ति चराचरा ॥३॥ एका जनार्दनीं म्हणे पुंडलिका । भक्त शिरोमणी तूंचि लेखा ॥४॥
भावार्थ
एकनिष्ठ भक्तीने पुंडलिकाने वैकुंठ नायकाला आपल्या अधीन केलें. हा चमत्कार कसा झाला हे समजणे कठीण आहे. केवळ दर्शनाने सर्व प्रकारच्या प्राण्यांचा उध्दार होईल अशी किर्ति चराचरांत पसरली. एका जनार्दनीं म्हणतात, पुंडलिक भक्त शिरोमणी म्हणून ओळखला जातो. 

डोळियाची भूक हारपली । पाहतां श्रीविठ्ठल माउली ॥१॥ पुंडलिके बरवें केलें । परब्रह्म उभें केलें ॥२॥ अठ्ठावीस युगें जालीं । अद्यापि न बैसें खालीं ॥३॥ उभा राहिला तिष्ठत । आलियासीं क्षेम देत ॥४॥ ऐसा कृपाळु दीनाचा । एका जनार्दनीं साचा ॥५॥
भावार्थ
पुंडलिकाच्या अनन्य भक्तीने प्रत्यक्ष परात्पर परब्रह्म पंढरींत विटेवर उभे केले. अठ्ठावीस युगांपासून परमात्मा तिष्ठत उभा आहे. दर्शनास येत असलेल्या भक्तांना ईच्छादान देत आहे. दीनदुबळ्यांना कृपेची सावली देत उभा आहे. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तराज पुंडलिकाचा सर्व भक्तांवर हा मोठा उपकार आहे. श्रीविठ्ठलाच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणे फिटले. 
१०
म्हणती दक्षिण द्वारका । पुण्यभूमी वैकुंठ लेखा । पाहूनिया पुंडलिका । राहिलासे उभा विटेवरी ॥१॥ काय वर्णावा महिमा।न कळेचि आगम निगमा । वेदादिक पावले उपरमा । जयासी पैं वर्णितां ॥२॥ तो आला आपुले पायीं । भक्त इच्छा धरूनी हृदयीं । एका जनार्दनीं साची । सर्वांवरीं सारखी ॥३॥
भावार्थ
पंढरी दक्षिण द्वारका या नावाने ओळखली जाते. पंढरी वैकुंठा सारखी पुण्यनगरी आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे. पुंडलिकाला पाहून विटेवर समचरणीं उभा राहिलेल्या विठ्ठलाचा महिमा वर्णन करणे अशक्य आहे. चार वेद आणि सहा शास्त्रे यांनाही हे परब्रह्म स्वरुप पूर्णपणे जाणता आले नाही. ज्याचे वर्णन करतांना वेद मूक झाले. असा पंढरीचा राणा स्वता:च्या पायाने पंढरींत आला. भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी तिष्ठत उभा राहिला आणि भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी वरदान दिले. या पांडुरंगाची सर्व भक्तांवर सारखीच माया आहे असे एका जनार्दनीं सांगतात. 
११
उभा पुंडलिकापुढें । कटीं कर ठेउनी रुपडें ॥१॥ पाहतां वेडावलें मन। शिवा लागलेंसे ध्यान ॥२॥ सनकादिक वेडावले । तें पुंडलिकें भुलविले ॥३॥ भक्तां देखोनि भुलला ।एका जनार्दनीं सांवळां ॥४॥
भावार्थ
कर कटीवर ठेवून विटेवर उभा असलेल्या सावळ्या सुंदर पांडुरंगाचे रुप मन वेडावून टाकते, सनकादिक ऋषीं या दर्शनासाठी आतुर होतात आणि शिवशंकराला या रुपाचे ध्यान लागते. एका जनार्दनीं म्हणतात, सावळा श्रीहरी भक्तराज पुंडलिकाची प्रेमभक्ती पाहून भुलला. 
१२
आला पुंडलिकासाठीं । उभा सम पाय विटीं ॥१॥ विठु मदनाचा पुतळा । भुलावणा तो सकळां ॥२॥ अराध्य दैवत शिवाचें । कीर्तनी उघडाची नाचें ॥३॥ एका जनार्दनीं मन । वोवाळावें पायांवरून ॥४॥
भावार्थ
पंढरीचा विठुराया मदनाचा पुतळा असून सर्व भक्तांना भुलवाणारा आहे. शिवशंकराचे आराध्यदैवत असलेला परमात्मा कीर्तनाच्या रंगात देहभान विसरून नाचतो. विठ्ठलाचे असे वर्णन करुन एका जनार्दनीं म्हणतात, पुंडलिकाच्या भक्तीनें वेडा होऊन पंढरींत आलेला परमात्मा समचरणीं विटेवर उभा आहे. त्या भक्तवत्सल पांडुरंगाच्या चरणांवरुन मन ओवाळून टाकावें. 
१३
सर्वांचे जे मूळ सर्वांचे जें स्थल । ते पदयुगल विटेवरी ॥१॥ साजिरें साजिरें कर दोन्हीं कटी। उभा असे तटी भीवरेच्या ॥२॥ नये ध्याना मना आगमाच्या खुणा । कैलासीचा राणा ध्यात जया ॥३॥ एका जनार्दनीं पुरे परता दुरी । पुंडलिकाचे द्वारीं उभा विटे ॥४॥
भावार्थ
सर्व चराचर सृष्टी जेथुन उत्पन्न झाली आणि ही सृष्टी जेथे विलीन होते ते परात्पर परब्रह्म भीवरेच्या तीरावर साजिरे गोजिरे कर कटीवर ठेवून विटेवर उभेठाकलेआहे. पराकाष्ठेची योगसाधना करुनही योगी जनांना ध्यानांत सापडत नाही, वेद, पुराणे ज्या स्वरुपाचे यथार्थ वर्णन करु शकत नाही, कैलासीचा राणा निरंतर ज्याचे ध्यान करतो. जे स्वरुप परावाणीच्या पलिकडे ब्रह्मलोकांत निवास करते ते परब्रह्म पुंडलिकाचे दारी विटेवर उभे आहे असे एका जनार्दनीं या अभंगात वर्णन करतात. 
१४
ॐकार सह मकार आदि अंत नाहीं जया । ते पुंडलिकें भुलवोनी आणिलें या ठायां ॥१॥ भुललें वो माय पुंडलिकाप्रीती। उभाचि राहे परी खेद न करी चित्तीं ॥२॥ अठरा पुराणांसी वाढ शास्त्रे वेवादिती । तो सांवळा श्रीकृष्ण उभा विटे पुंडलिकाचे भक्ती ॥३॥ वेद वेदांतरें मत मतांतरें न कळे श्रुती पैं वेवादती । तो एका जनार्दनाचे हृदयीं सांवळा घेऊनि बुंथी ॥४॥
भावार्थ
ब्रह्मा, विष्णु, महेश ही तिन्ही ज्या स्वरुपांत एकवटलेली आहेत , ज्याचा आरंभ आणि अंत वेदशास्त्रांना आकलन होत नाही असे परब्रह्म सच्चिदानंद स्वरुप पुंडलिकाने भक्ती रसाने भुलवून आणले. अठ्ठावीस युगांपासून चित्तांत खेद न करतां सावळा श्रीहरी विटेवर उभा राहिला आहे. वेदशास्त्रे, श्रुती या परब्रम्ह स्वरुपाविषयी विविध प्रकारची मते व्यक्त करुन वादविवाद करतात. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, चित्तांत या सावळ्या श्रीहरीला धारण करुन त्याचे ध्यान करावे. 
१६
परात्पर परिपूर्ण सच्चिदानंदघन । सर्वा अधिष्ठान दैवताचें गे माय ॥१॥ तें लाधलें लाभलें पुंडलिकाचे प्रीती । येत पंढरीप्रती अनायसें गे माय ॥२॥ जगदंबा पसारा लपवोनि सारा गे माय। धरियेला थारा पुंडलिकाचेनि प्रेमें गे माय ॥३॥ ओहं मा न कळे कांहीं सोहं देती ग्वाही गे माय । काहमाची तुटली बुंथी एका जनार्दनीं प्रीती गे माय ॥४॥
भावार्थ
सर्व चराचर सृष्टी ज्या देवतेच्या आधाराने निर्माण होते आणि लयास जाते असा चिरंतन, आनंदस्वरुप परिपूर्ण परमात्मा भक्त पुंडलिकाच्या भक्तीप्रेमाने सर्व भाविकांना लाभला. अनायसे पंढरींत अवतरला. मायेचा सारा पसारा बाजूला सारुन पुंडलिकाच्या प्रेमाचा आसरा घेतला. एका जनार्दनीं म्हणतात, परब्रह्म परमात्म्याच्या दर्शनाने मी कोण ?या संशयाचे निराकरण झाले आणि देव आणि भक्त यांच्या एकरुपतेचा प्रत्यय आला. 
१७
वर्णितां वेदमती कुंठित पैं जाली । पुराणें भागलीं विवादितां ॥१॥ सोपारा सुगम पुंडलिकापाठीं । उभा जगजेठी विटेवरीं ॥२॥ लक्ष्मी ते स्वयें रुक्मिणी शोभत । विंझणैं वारीतसत्यभामा ॥३॥ सांडुनि रत्नकिळा गळां तुळसीमाळा । चंदनाचा टिळा कैशरयुक्त ॥४॥ गोपाळ गजरें आनंदे नाचती । मध्ये विठ्ठलमूर्ति प्रेमे रंगें ॥५॥ मनाचे मोहन योगाचे निजधन । एका जनार्दनीं शरण विटैवरीं ॥६॥
भावार्थ
ज्या स्वरुपाचे वर्ण़न करतांना वेदांची मती कुंठित झाली, ज्याचा स्वरुपाचा यथार्थ निर्णय करतांना अठरा पुराणे वाद-विवाद करुन थकून गेली. असा जगजेठी पुंडलिकाच्या अनन्य भक्तीने भाविकांना सहजसोपा झाला. विटंवर रुक्मिणी सह उभ्या असलेल्या श्रीहरीला सत्यभामा पंख्याने वारा घालीत आहे. मौल्यवान रत्नहाराचा त्याग करून श्रीहरीने तुळशीची माळ परिधान केली आहे. केशरयुक्त चंदनाचा टिळा कपाळावर शोभून दिसतो. विठ्ठलाचे सभोवती गोपाळ हरीनामाचा गजर करुन आनंदानै नाचत आहेत. सर्वांचे मन मोहून टाकणारा या योगेश्वर श्री कृष्णाला एका जनार्दनीं अनन्य भक्तीने शरण जातात. 
१८
स्थूल ना सूक्ष्म कारण ना महाकारण । यापरतां वेगळाचि जाण आहे गे माय ॥१॥ पुंडलिकाचे प्रेमें मौनस्थ उभा । कोणा न बोले उगला उभा ठेला गे माय ॥२॥ निंद्य वंद्य जगीं याचे भेटीलागीं । दरुशनें उध्दार वेगीं तयां गे माय ॥३॥ ऐसा लाघवी खेळ खेळोनी निराळा । एका जनार्दनीं डोळां देखिला गे माय ॥४॥
भावार्थ
स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चारही देहांपेक्षा वेगळा असलेला पांडुरंग पुंडलिकाच्या अनन्य भक्तीप्रेमाने मुकपणे विटेवर उभा आहे. एका शब्दानेही कोणाशी संभाषण न करता, वंदनीय तसेच निंदनीय असा भेदभाव न बाळगता दर्शनास येणार्या सर्व भाविकांचा उध्दार करीत आहे. अत्यंत आपुलकीने भक्तांशी खेळ खेळणारा हा परमात्मा अलिप्तपणे निराळा आहे. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, असा हा निर्विकल्प पंढरीचा राणा डोळ्यांनी प्रत्यक्ष पहावयास मिळाला. 
१९
अभक्त सभक्त दोघांसी सारखा दिसे । लवणी जैसैं न दिसे दुजेपण गे माय ॥१॥ ऐसा परात्पर सोइरा पुंडलिकाचे पाठीं । मौन्य वाक्पुटीं धरूनी गे माय ॥२॥ पुण्य पाप सर्व देखतसे दृष्टीं । चालवी सर्व सृष्टी गे माय ॥३॥ ऐसा वेषधारी उभा भीवरेतीरीं एका जनार्दनीं । अंतरीं दृढ ठसावे गे माय ॥४॥
भावार्थ
अभक्त आणि सभक्त तसेच पाप पुण्य असा भेदाभेद न करता सर्वांना समदृष्टीने अवलोकन करणारा, ह्या चराचर सृष्टीतिल सर्व व्यवहार अलिप्तपणे चालवणारा, नाना वेषधारी, बहुरुपी परात्पर परमात्मा भीवरेच्या तीरावर भक्त पुंडलिकाचा सोइरा बनून त्याच्या पाठीशी मौन धरुन उभा राहिला आहे. परब्रह्म परमात्म्याचे हे रुप अंत:करणांत कायमचे दृढपणे धारण करावे अशी ईच्छा एका जनार्दनीं या अभंगात व्यक्त करतात. 
२०
विठ्ठल सांवळा पंढरीये उभा । धन्य त्याची शोभा शोभतसे ॥१॥ पुंडलिका मागें कर ठेवूनी कटीं । समपाय विटीं देखियेला ॥२॥ राही रखुमाई शोभती त्या बाहीं । वैष्णव दोही बाहीं गरूडपारी ॥३॥ एका जनार्दनीं पाहूनियां ध्यान । मनाचे उन्मन होत असे ॥४॥
भावार्थ
सांवळा श्रीहरी भक्तराज पुंडलिकाच्या मागे दोन्ही हात कमरेवर ठेवून, विटेवर समचरण ठेवून गरुडपारी उभा आहे. विठ्ठलाच्या बाजूला रुक्मिणी शोभून दिसत आहे. वैष्णवांचा मेळा सभोवताली जमला आहे. एका जनार्दनीं म्हणतात, विठोबाचे हे नयनरम्य रुप पाहून मन परमात्म्याच्या रुपाशी एकरुप होऊन उन्मनी (उच्चतर अवस्थेत ) स्थिर होते. 
२१
अणुरेणुपासोनि सबाह्य भरला । भरुनी उरला संतांपुढे ॥१॥ उघडाचि दिसे सर्वां ठायीं वसे । मागणेचि नसे दुजें कांहीं ॥२॥ कर ठेवुनि कटीं तिष्ठत रहाणें । वाट ते पहाणें मागेल कांहीं ॥३॥ चंद्रभागा तीर पुंडलिकासमोर । एका जनार्दनीं हरिहर उभे राहाताती ॥४॥
भावार्थ
चराचर सृष्टीतिल अणुरेणुंमध्यें अंतरबाह्य व्यापून उरलेला हा परमात्मा उघडपणे संतासमवेत उभा ठाकला आहे. कर कटीवर ठेवून पुंडलिकासमोर तिष्ठत उभा आहे. चंद्रभागेच्या तीरावर मुकपणे उभ्या असलेल्या सांवळ्या श्रीकृष्णाच्या दर्श़नासाठी शिवशंकर विष्णुसह उभे आहेत असे एका जनार्दनीं म्हणतात. 
२२
ध्वज वज्रांकुश शोभती चरणीं । तो उभा रंगणीं वैष्णवांचे ॥१॥ झळकतसे हातीं पद्म आणि गदा । पुंडलिक वरदा उभा विटे ॥२॥ चरणीं भागीरथी गंगा ती शोभली । भक्तांची क्षाळिली महत्पापें ॥३॥ एका जनार्दनीं सकळ तीर्थराव । उभा राहे प्रभव विटेवरी ॥४॥
भावार्थ
ध्वज, वज्र, अंकुश ज्याच्या चरणीं शोभून दिसतात, करांत कमळ आणि एका हातीं गदा घेऊन पुंडलिकाला वरदान देणारा श्रीहरी विटेवर उभा आहे. गंगा भागिरथी प्रमाणे चरण स्पर्शाने पावन झालेली चंद्रभागा भक्तांची महापापे धुवून काढीत आहे. एका जनार्दनीं म्हणतात, सकळ तीर्थस्थानांचा अधिपती असलेला परमात्मा पांडुरंग विटेवर उभा आहे. 
२३
सुकुमार हरीची पाऊलें । सुंदर हरीचीं पाउलें ॥१॥ भीमातटीं देखिलैं । वोळलें तें पुंडलिका ॥२॥ शेषशयनीं जीं पाऊलें । लक्ष्मीकरीं तीं पाऊलें ॥३॥ गरूडपृष्ठीं जीं पाऊलें । बळीयागी तीं पाउलें ॥४॥ विटेवरी जी पाउले । एका जनार्दनीं तीं पाउलें ॥५॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनीं श्रीहरीच्या सुकुमार सुंदर पाउलांचे अत्यंत समर्पक वर्णन करतात. क्षीरसागरांत शेष नागाच्या शय्येवर विश्रांती घेणार्या भगवतांची पाऊलें लक्ष्मी ज्यांची चरणसेवा करते त्या भगवान विष्णुंची पाउलें, गरुडाच्या पाठीवर विसावलेली पाऊलें , बळीराजाला तीन पाउलांच्या भूमीचे दान मागून त्याला पाताळांत लोटणारी बलशाली पाउले, भक्तराज पुंडलिकाला वर देऊन विटेवर उभी राहिलेली ही सुकुमार सुंदर पाऊले आहेत असे एका जनार्दनीं सांगतात. 
२४
या पाउलासाठीं लक्ष्मी पिसी । सनकादिक वेडावले मानसीं ॥१॥ सुख जोडलें पुंडलिकासी । विटेवरी हृषीकेशी ॥२॥ म्हणे जनार्दनाचा एका । धन्य धन्य पुंडलिका ॥३॥
भावार्थ
ज्या पाउलांच्या सेवेसाठी लक्ष्मी आतुरलेली असते, सनकादिक ऋषीं मनापासून ज्या चरणांची अभिलाषा करतात त्या हृषीकेशीची परमपावन पाऊलें भक्त पुंडलिकाच्या सुखासाठी विटेवर उभी आहेत तो भक्तराज पुंडलिक धन्य होय असे एका जनार्दनीं म्हणतात. 
२५
चरण गोमटे गे माय । पाहतां पाहतां मन न धाय । पुनरपि फिरूनी तेथें जाय । ऐसा वेध होय तयाचा गे माय ॥धृ०॥ नवल गे माय न कळे वेदां । अचोज विवादा शास्त्रांचिया ॥१॥ पुराणें भागलीं दरूशने वेडावलीं । कांही केलिया न कळे तयां ॥२॥ या पुंडलिकिचे आवडीं विटे धरूनी मीस । युगें अठृठावीस उभा असे ॥३॥ परे परता परात्पर पश्यंती न कळे विचार । या मध्यमा वैखरीचा निर्धार थकीत ठेला ॥४॥ एका जनार्दनीं आहे तैसा देखिला । सबाह्य भरला हृदयीं गे माय ॥५॥
भावार्थ
भक्त पुंडलिकाच्या भक्तीप्रेमासाठी अठ्ठावीस युगे पांडुरंग विटेवर उभा आहे. नवलाची गोष्ट म्हणजे चारी वेदांना ज्याच्या स्वरुपाचे यथार्थ आकलन झाले नाही , साही शास्त्रे अथक वादविवाद करुनही ज्या स्वरुपाचा निर्णय करु शकली नाही. अठरा पुराणे आणि दर्शने ज्याचा महिमा वर्णन करतांना थकून मूक झाली. मध्यमा वैखरीच नव्हे तर परा पश्यंती या चारी वाणी स्तब्ध झाल्या. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पंढरीनाथाचे हे गोमटे चरण पाहतांना तो देवाधिदेव अंतरबाह्य हृदय व्यापून राहिला. कितीही वेळ त्या चरणांचे दर्श़न घेतले तरी मनाचे समाधान होईना. त्या स्वरुपाचा असा वेध लागला कीं, मन परत परत माघारीं जाऊन तेथे गुंतून पडते. 
२६
जे या चराचरीं गोमटें । पाहतां वेदां वाट न फुटें । तें पुंडलिकाचे पेठे । उभें नीट विटेवरी ॥१॥ सोपारा सोपारा झाला आम्हां । शास्त्रें वर्णिता महिमा । नकळे जो आगमा निगमा । वंद्य पुराणा तिही लोकीं ॥२॥ सहस्त्र मुखांचे ठेवणें । योगी ध्याती ज्या ध्यानें । तो नाचतो किर्तनें । प्रेमभक्त देखोनी ॥३॥ एका जनार्दनीं देखा । आम्हां झाला सुलभ सोपा । निवारूनी भवतापा । उतरीं पार निर्धारें ॥४॥
भावार्थ
या चराचर सृष्टींत जे अतिशय सुंदर आहे, ते स्वरुप पाहून वेद मुक होतात, तो पांडुरंग पुंडलिकाच्या पंढरींत विटेवर समचरणीं उभा आहे. साही शास्त्रे या परमात्म स्वरुपाचा महिमा गातात परंतु तो वेदांना सुध्दा पूर्णपणे आकलन झाला नाही तो सामान्य भाविकांना भक्तिमार्गाने सहज सुलभ झाला आहे. अठरा पुराणे तिन्ही लोकी मान्य झाली असून सहस्त्र मुखांचा शेष ज्या परत्पर परमेशाचे वर्णन करतांना थकून गेला तो देवाधिदेव प्रेमळ भक्तांची भक्ती पाहून किर्तनरंगी रंगून नाचतो. ऐका जनार्दनीं म्हणतात, भागवत धर्म आचरणास सोपा असून भवताप नाहिसे करुन भाविकांचा उध्दार करतो. 
२७
आनंदाचा कंद उभा पांडुरंग । गोपाळांचा संघ भोवता उभा ॥१॥ चंद्रभागा तीरी शोभे पुंडलिक । संत अलौकिक गर्जताती ॥२॥ भोळे भाळे जन गाती । ते साबडे विठ्ठला आवडे प्रेम त्यांचे ॥३॥ नारीनर मिळाले आनंदे गजर । होत जयजयकार महाद्वारी ॥४॥ एका जनार्दनी प्रेमळ ते जन । करिती भजन विठोबाचे ॥५॥
भावार्थ
सच्चिदानंद परमात्मा पांडुरंगरुपाने विटेवर उभा असून भोवताली गोपाळांचा मेळा उभा आहे. चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिक, हरीनामाचा गजर करीत असलेल्या संतांच्या मेळाव्यात शोभून दिसत आहे. भोळेभाबडे भाविक हरीनामाचा जयजयकार करीत आहेत, ह्या प्रेमळभक्तांचा प्रेमभाव विठ्ठलाला विशेष आवडतो. एका जनार्दनी म्हणतात, हे प्रेमळ भक्त अनन्यभावाने विठोबाचे भजन करतात. 
२८
अनंताचे गुण अनंत अपार । न कळेचि पार श्रुतीशास्त्री ॥१॥ तो हा महाराज विटेवरी उभा । लावण्याचा गाभा शोभतसे ॥२॥ कटावरी कर ठेवी जगजेठी । पाहे कृपादृष्टी मित्रांकडे ॥३॥ पुंडलिकाचे तेजे जोडलासे ठेवा । एका जनार्दनी सेवा देई देवा ॥४॥
भावार्थ
ज्या अनंताच्या गुणांचा पार वेद आणि श्रुतींना कळत नाही, तो अपरंपार गुणसागर परमात्मा विटेवर कटीवर कर ठेवून उभा आहे. लावण्याचा गाभा असा तो जगजेठी आपला मित्र पुंडलिकाकडे कृपादृष्टीने बघत आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, पुंडलिकाच्या भक्तीप्रेमाने हा पांडुरंगरुपी ठेवा पंढरीसी जोडला गेला आहे. त्याची सेवा करुन कृतार्थ व्हावे. 
२९
विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानूं ॥१॥ कटी पितांबर तुळशीचे हार । उभा सर्वेश्वर भक्तिकाजा ॥२॥ लावण्य रुपडें पाहे पुंडलिक । आणिक सम्यक नसे दुजा ॥३॥ पाहतां पाहतां विश्रांती पैं जागी । एका जनार्दनीं माउली संतांची ते॥४॥

भावार्थ
कटीवर पितांबर, गळ्यांत तुळशीचे हार धारण करून सर्व विश्वाचा परमेश्वर भक्तांच्या उद्धारासाठी विटेवर उभा आहे. या आनंदघन श्रीहरीच्या मुखाची शोभा अवर्णनीय आहे. या लावण्यरुपाची शोभा भक्त पुंडलिक डोळे भरुन बघत आहे. या एकमेव, अद्वितीय सर्वेश्वराचे रुप पाहतांना सर्व कामना पूर्ण होउन मन अपूर्व शांततेने भरुन जाते. सर्व संतांची माउली असलेला हा पांडुरंग भाविकांचे विश्रांतीस्थान आहे असे एका जनार्दनीं म्हणतात. 
३०
सर्वाघटीं बिंबला व्यापून राहिला । पुंडलिके उभा केला विटेवरी ॥१॥ सांवळा चतुर्भुज कांसे पितांबर । वैजयंती माळ शोभे कंठीं ॥२॥ कटावरी कर पाउलें साजिरीं । उभा तो श्रीहरी विटेवरीं ॥३॥ एका जनार्दनीं बिंबें तो बिंबला । बिंब बिंबोनी ठेला देहामाजी ॥४॥
भावार्थ
चराचर सृष्टीतिल प्रत्येक अणुरेणुत प्रतिबिंबीत होऊन सर्व विश्वांत व्यापून असलेला हा चतुर्भुज, पितांबरधारी, सावळ्या रंगाचा हा विश्वंभर साजिरे समचरण विटेवर ठेवून पुंडलिका साठी उभा आहे. श्रीहरीने गळ्यांत वैजयंती माळ परिधान केली असून दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत. एका जनार्दनीं म्हणतात, आत्मरुपाने हा परमात्मा प्रत्येक देहांत प्रतिबिंबित झाला आहे. 
३१
आदि भध्य अंत न कळे कोणासी । तो हृषिकेशी पंढरिये ॥१॥ जया वेवादती साही दरूशनें । न कळे म्हणोन स्तब्ध जाहलीं ॥२॥ वेडावल्या श्रुती नेती पै म्हणती । तो पुंडलिकाचे प्रीतीं विटे उभा ॥३॥ एका जनार्दनीं आनंदाचा कंद । उभा सच्चिदानंद भीमातीरीं ॥४॥
भावार्थ
प्रत्येक देहांत आत्मरुपाने वास करुन जो सर्व इंद्रियांना आनंद देतो, जो अनादि, अनंत असून ज्याचा आरंभ, मध्य, अंत कुणालाही निश्चित करता येत नाही तो हृषिकेशी पुंडलिकाच्या प्रेमभक्तिसाठी विटेवर उभा आहे. साही दर्शने ज्या स्वरुपाचे वर्णन करतांना वादविवाद करतांना पूर्ण आकलन न झाल्याने थकून स्तब्ध झाली. श्रुती न इति असे म्हणुन नि:शब्द झाल्या तो सच्चिदानंद परमात्मा भीमातिरी उभा आहे असे एका जनार्दनीं म्हणतात. 
३२
देती मोक्ष मुक्ति वांटितसे फुका । ऐसा निश्चयो देखा करुनी ठेलो ॥१॥ सांवळें रूपडें गोजिरें गोमटें । उभें पुंडलिकें पेठे पंढरीचे ॥२॥ वांटितसे इच्छा जयासी जे आहे । उभारूनी बाह्या देत असे ॥३॥ एका जनार्दनीं देतां न सरे मागे। जाहली असती युगें अठ्ठावीस ॥४॥
भावार्थ
अत्यंत शोभिवंत साजिरेगोजिरे सांवळे रुप धारण करुन श्रीहरी पुंडलिकाच्या नगरी पंढरीला उभा असून भाविकांच्या मनोकामना पूर्ण करीत आहे . मोक्ष आणि मुक्ति यांची लयलूट होत असून पुंडलिकाला दिलेले वरदान खरे करीत आहे. एका जनार्दनीं म्हणतात, अठ्ठाविस युगांपासून पांडुरंग दोन्ही हातांनी भक्तांना इच्छिले फळ देत आहे. 
३३
अगाध चरणांचे महिमान। वाणितां वेदा पडिलें मौन्य ॥१॥ पुराणें वर्णितां भागलीं । सहाशास्त्रे वेडावलीं ॥२॥ तें पुंडलिकाचे लोभें । एका जनार्दनीं विटे उभे ॥३॥
भावार्थ
पांडुरंगाच्या चरणांचा महिमा वर्णन करताना चारी वेद नि:शब्द बनले. श्रीहरीच्या लीलांचे गुणगान गातांना अठरा पुराणे थकून गेली. परात्पर परमेश्वराच्या स्वरुपाचे यथार्थ आकलन न झाल्याने सहा शास्त्रे हतबल झाली. तो विश्वव्यापक विश्वेश्वर पुंडलिकाच्या भक्तीप्रेमामुळे विटेवर उभा आहे. असे एका जनार्दनीं या अभंगात कथन करतात. 
३४
एकाच्या कैवारें । कली मारिले सर्व धुरे । तयांसी ते बरे । आपणाशीं ठेवी ॥१॥ ऐसा कृपावंत स्नेहाळ । भरलें कीर्ती भूमंडळ तया स्मरे हळाहळ । निशीदिनीं ॥२॥ भक्ति भावाचेनि प्रेमें । द्वारपाळ जाहला समे । अद्यापि तिष्ठे नेमें । वचन तें नुल्लंघी ॥३॥ अंकितपणें तिष्टत उभा । एका जनार्दनीं धन्य शोभा । पुंडलिकाच्या लोभा । युगें अठ्ठवीस ॥४॥
भावार्थ
एका अर्जुनाच्या प्रेमासाठी कौरवांचा सर्व सैन्यासह विनाश करून पांडवांचा सांभाळ करणारा कृपावंत, प्रेमळ श्रीहरीची किर्ती भुमंडळांत गर्जत आहे. पुंडलिकाच्या भक्तिभावाने वेडा होऊन त्याच्या द्वारपाळ बनून विटेवर तिष्टत उभा आहे. समुद्रमंथनातून निघालेले हळाहळ पचवणारे शिवशंकर या भक्तांच्या अंकित असलेल्या श्रीहरीचे रात्रंदिवस ध्यान करतात. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पुंडलिकासाठी तिष्टत उभा असलेल्या या पांडुरंगाची शोभा अवर्णनीय आहे. 
३५
कल्पतरू दाता पुंडलिक मुनी । तयासाठीं परब्रह्म तिष्टे अझुनी ॥१॥ नवलाव गे माय नवलाव गे माय विटे ठेऊनी पाय उभा असे ॥२॥ शेष श्रमला शास्त्र भागलें । वेवादिती वहिली अठरा ज्यासी ॥३॥ आदि अंत कोणा न कळे जयाचा । मौनावली वाचा वेदादिकीं॥४॥ तो डोळेभरीं पाहिला श्रीहरी । एका जनार्दनीं येरजारी खुंटली देवा ॥५॥
भावार्थ
ज्या परात्पर परब्रह्ममाचा महिमा वर्णन करताना सहस्र जिव्हा असलेला शेष नाग अवाक् झाला. साही शास्त्रे आणि अठरा पुराणे ज्याचे वर्णन करतांना असमर्थ ठरली . ज्याचा आदि अंत कुणालाही सांगता येत नाही, जेथे परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चारी वाणी तटस्थ होतात तो श्रीहरी विटेवर उभा आहे ही मोठी नवलाची गोष्ट आहे या परब्रह्म परमेशाला डोळे भरुन पाहिला आणि जन्म मरणाच्या चक्रातून कायमची सुटका झाली असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, भक्तराज पुंडलिक भाविकांसाठी कल्पतरू आहे, मोक्षमुक्तीचे फळ देणारा!
३६
क्षीरसागरीचें निजरूपडें । पुंडलिकाचेनि पडिपाडें । उभें असे तें रोकडें । पंढरिये गोजिरें ॥१॥ पहा पहा डोळेभरी । शंख चक्र मिरवे करीं । कास कसिली पितांबरी । हृदयावरी वैजयंती ॥२॥ भीमरथी वाहे पुढं । करीत पापाचा रगडा । पुंडलिकाचे भिडा । उभा उगा राहिला ॥३॥ शरण एका जनार्दनीं । त्रैलोक्याचा धनी । नाचतो कीर्तनीं । भक्तांमागे सर्वदा ॥४॥
भावार्थ
क्षीरसागरांत निवास करणारे लक्ष्मीपती श्रीविष्णु पुंडलिकाच्या वचनपूर्तीसाठी गोजिरे रुप धारण करून भक्तांना साक्षात दर्शन देण्यासाठी पंढरीत उभे आहेत. हातामध्ये शंख, चक्र घेऊन , गळ्यांत वैजयंती माळ लेऊन, कमरेला पितांबर कसून भीमेच्या तीरावर उभे आहेत. भीमेच्या प्रवाहांत भाविकांचे पापक्षालन करून भक्त पुंडलिकाला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी मौन धारण करून तिष्ठत उभे आहे. जनार्दनस्वामींचे शरणागत असलेले एका जनार्दनीं म्हणतात, त्रैलोक्याचा स्वामी भगवान श्रीकृष्ण भक्तांमागे उभे राहून कीर्तनांत नाचतात, त्यांचे हे रुप डोळे भरून पहावे. 
३७
बहुती वर्णिला बहुतीं ध्याईला । परी तो पाहिला पुंडलिका ॥१॥ करूनी कैवाड उभा केला नीट । धरुनी दोन्ही कर कटीं देखा ॥२॥ पंचमहापातकी येताती ज्या भावे । दरूशनें त्या द्यावें वैकुंठपद ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांचा अंकीत । उभाची तिष्टत अठ्ठावीस युगे ॥४॥
भावार्थ
ज्या भगवंता साठी अनेक साधकांनी ध्यानधारणा, तप केले , अठरा पुराणे लिहून अनेकांनी ज्याच्या रुपाचे वर्णन केले तो भगवान पुंडलिकाने भक्तीयोगाने कैद करुन विटेवर नीट उभा केला . दोन्ही कर कटीवर ठेवून उभे असलेले ह्या परब्रह्म रूपाचे दर्शन घेण्यासाठी अनेक महापातकी येतात आणि केवळ दर्शनाने वैकुंठपदाचा लाभ घेतात. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, भक्तांचा अंकित असा परमेश्वर अठ्ठविस युगांपासून विटेवर उभा आहे. 
३८
येऊनियां पंढरपुरा । उभा सामोरा पुंडलिका ॥१॥ उभारूनी बाह्या हात । भक्तां इच्छिले तें देत ॥२॥ भलते याती नारीनर । दरूशनें उध्दार सर्वांसी ॥३॥ साक्ष भीमरथी आई । एका जनार्दनीं पाही ॥४॥
भावार्थ
वैकुंठनायक श्रीपती पंढरपुरला येऊन भक्तराज पुंडलिकासमोर उभा ठाकून दोन्ही हात उभारून भक्तांना इच्छित दान देत आहे. जातीभेद, लिंगभेद न करतां दर्शनाने सर्वांचा उद्धार करीत आहे या अलौकिक दानाला भिमानदीचा प्रवाह साक्षित्वानें अखंडपणे वाहत आहे असे एका जनार्दनीं सांगतात. 
३९
सखी पुसे सखियेसी । युगे झालीं अठ्ठावीसी । उभा ऐकिला संतांमुखीं । अद्यापी वर । कटावरी कर । भीवरा तीर । वाळुवंटीं संतसभा सभा ॥१॥ देव कांहो विटेवरी उभा उभा ॥ध्रृ०॥ पुसूं नका बाई । वेदासी काई । कळलेंचि नाही । शेष शिणल्या जाहल्या द्विसहस्र जिभा जिभा ॥२॥ जेथें करिताती गोपाळकाला । हरीनामीं तयांचा गलबला । देव भावाचा भुकेला । मिळाले संत मदनारी । तो हरी आला । तयांचिया लोभा लोभा ॥३॥ हरी वैकुंठाहूनी । आला पुंडलिक लागुनी । उभा राहिला अझुनीं । युगानुयुगे । भक्तांसंगे । एका जनार्दनीं संतशोभा शोभा ॥४॥
भावार्थ
चंद्रभागेच्या वाळवंटी संतसभा भरली असतांना अठ्ठावीस युगांपासून देव विटेवर उभा आहे अशी संतवाणी ऐकून सखी आपल्या सखीला देव विटेवर का उभा आहे असा प्रश्न विचारते. ह्या प्रश्नाचे समाधान सहस्रजिव्हाधारी शेष नाग च काय पण चारी वेद ही करु शकले नाही. भिवरेच्या तीरावर सगळे गोपाळ मिळून गोपाळकाला करतात. विठ्ठलनामाचा गजर करीत आनंदाने नाचतात . या भोळ्या भाबड्या भाविकांच्या भक्तिभावाला भुकेलेला श्रीहरी त्यांच्या लोभाने वैकुंठ सोडून भक्त पुंडलिका साठी पंढरपुरी येऊन विटेवर उभा आहे. 
४०
श्यामसुंदर मूर्ति विटेवरी साजिरी । पाउलें गोजिरी कोवळीं ती ॥१॥ ध्वजवज्रांकुश चिन्हे मिरवती । कटीं धरीले कर अनुपम्य शोभत ॥२॥ ऐसा देखिला देव विठ्ठलु माझे । एका जनार्दनीं त्यासी गाये ॥३॥
भावार्थ
ध्वज, वज्र, अंकुश या चिन्हांनी सुशोभित अशी श्यामसुंदर विठ्ठलमूर्ति गोजिरे पाउले विटेवर ठेवून उभी आहे. कमरेवर ठेवलेले दोन्ही कर अनुपम्य शोभून दिसतात. असा विठ्ठल डोळे भरुन पाहून एका जनार्दनीं या अभंगात देवाचे गुणगान करतात. 
४१
देव सुंदर घनसांवळा । कांसे सोनसळा नेसला ॥१॥ चरणीं वाळे बाकी गजर । मुकुट कुंडलें मनोहर ॥२॥ बाही बाहुवाटे मकराकार । गळां शोभे वैजयंती हार ॥३॥ एका जनार्दनीं ध्यान । विटे शोभे समचरण ॥४॥
भावार्थ
समचरण विटेवर ठेवून उभ्या असलेल्या , मेघश्याम, सुंदर विठ्ठलाचे वर्णन एका जनार्दनीं या अभंगात करतात. या सावळ्या रंगाच्या मूर्तिच्या चरणीं छोट्या घंटा लावलेले वाळे, मस्तकावर मनोहर मुकुट, कानामध्यें कुंडले आणि गळ्यांत वैजयंती माळ शोभून दिसते आहे आहे. कटीवर ठेवलेले सुबक सुंदर बाहु मकराकार (माश्याचा आकाराचे) आहेत. 
४२
चतुर्भुज साजरी शोभा । चिन्मात्र गाभा साकार ॥१॥ शंख चक्र गदा कमळ । कांसे पीतांबर सोज्वळ ॥२॥ मुगुट कुंडले मेखला । श्रीवत्स शोभे वक्षस्थळां ॥३॥ निर्गुण सगुण ऐसे ठाण । एका जनार्दनीं ध्यान ॥४॥
भावार्थ
चिरंतन चैतन्याचा गाभा, निर्गुण, निराकार, परब्रह्म चतुर्भुज, सगुण रूप धारण करून भक्तांसाठी उभा आहे. चारी भुजा शंख, चक्र, गदा , पद्म धारण केल्याने सुशोभित दिसत आहेत. कटीवर सोज्वळ पीतांबर कसला असून वर मेखला शोभत आहे. मस्तकीं मुगुट, कानी कुंडले डुलत आहेत. वक्षस्थळावर(छाती) भक्ताची पदचिन्ह दिसत आहेत. निर्गुण परमेशाच्या या सगुण, साकार रुपाचे ध्यान एका जनार्दनीं अनन्य भावाने करीत आहेत. 
४३
परब्रह्म पुतळा कौस्तुभ गळां । वैजयंती माळा कंठी शोभे ॥१॥ शंख चक्र गदा पद्म शोभे करीं । पीतांबरधारी चतुर्भुज ॥२॥ कटीं कडदोसें वाळे वाक्या पायीं । सुंदर रूप कान्हाई शोभता ॥३॥ लेणीयांचे लेणे भूषण साजिरें । एका जनार्दनीं गोजिरें चरण दोन्ही ॥४॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनीं वैकुंठीचा राणा परब्रह्म परमेशाचे वर्णन करीत आहेत. गळ्यामध्यें वैजयंती माळ कौस्तुभ मण्यासह शोभून दिसत आहे. पीतांबरधारी भगवंताने चारी हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म धारण केले असून कटीवर कडदोरा व पायांमध्ये वाळे व वाक्या दिसत आहेत. कान्होबाच्या या सुंदर रूपाने धारण केलेल्या अलंकारांना अधिक तेज आले आहे. 
४४
चंद्र पौर्णिमेचा शोभतो गगनीं । तैसा मोक्षदानी विटेवरी ॥१॥ बाळ सूर्य सम अंगकांती कळा । परब्रम्ह पुतळा विटेवरी ॥२॥ मृगनाभी टिळक मळवटीं शोभला ।तो घननीळ सांवळा विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं ध्याचें ध्यान । ते समचरण विटेवरी ॥४॥
भावार्थ
भाविकांना मोक्ष-मुक्ती चे दान देणारा परमात्मा पौर्णिमेच्या चंद्र जसा आकाशांत शोभून दिसतो तसा विटेवर शोभत आहे. या परब्रह्म पुतळ्याची अंगकांती बालसूर्या सारखी तेजस्वी असून भाळीं कस्तुरी तिलक लावला आहे. मेघासारखा सांवळा पांडुरंग समचरण विटेवर ठेवून उभा आहे. त्याचे निरंतर ध्यान मनाला लागते असे एका जनार्दनीं म्हणतात. 
४५
अंगी चंदनाची उटी । माथां शोभे मयोरवेटी ॥१॥ शंख चक्र पद्म करीं । उभा विटेवरी श्रीहरी ॥२॥ भोवते उभे सनकादिक । नारद तुंबरादि आणिक ॥३॥ ऐसा आनंद सोहळा । एका जनार्दनीं पाहे डोळां ॥४॥
भावार्थ
चंदनाची उटी अंगाला लावलेला, मस्तकावर मोरपिसांचा तुरा खोवलेला, हातांमध्ये शंख, चक्र, कमळ धारण केलेला श्रीहरी विटेवर उभा असून सभोवतालीं नारद, तुंबर उभे आहेत असा आनंद सोहळा एका जनार्दनीं अवलोकन करीत आहेत. असे या अभंगांत सांगतात. 
४६
शोभती दोनी कटीं कर । रूप सांवळें सुंदर । केशराची उटी नागर । गळां माळ वैजयंती ॥१॥ वेधें वेधक हा कान्हा । पहा वेधतुसे मना । न बैसेचि ध्याना । योगियांच्या सर्वदा ॥२॥ उभारूनी दोन्ही बाह्या । भाविकांची वाट पाहे । शाहाणे न लभती पाय । तया स्थळीं जाऊनी ॥३॥ ऐसा उदार मोक्षदानी । गोपी वेधक चक्रपाणी । शरण एका जनार्दनीं नाठवे दुजे सर्वदा ॥४॥
भावार्थ
सर्वांगाला केशराची उटी लावून , गळ्यांत वैजयंती माळ परिधान करून दोन्हीं कर कमरेवर ठेवून भाविकांची वाट पाहत उभा असलेला हा कान्हा अंत:करणाला वेध लावतो. हे सांवळे सुंदर रुप निरंतर ध्यान लावून साधना करणार्या योगीजनांना ध्यानात सापडत नाही. वेदशास्त्र जाणणार्या ज्ञानी लोकांना पंढरीला जाऊनही या चरणांचे दर्शन घडत नाही. तो उदार मोक्षदानी चक्रपाणी सामान्य गोप-गोपींच्या भक्तीला भुलून युगानुयुगे वाट पाहतो. एका जनार्दनीं या पांडुरंगाला अनन्यभावे शरण जातात. 
४८
सगुण निर्गुण मूर्ति उभी असे विटे । कोटी सूर्य दाटे प्रभा तेथें ॥१॥ सुंदर सगुण मूर्ति चतुर्भुज । पाहतां पूर्वज उध्दरती ॥२॥ त्रिभुवनीं गाजे ब्रीदाचा तोडर । तोचि कटीं कर उभा विटे ॥३॥ एका जनार्दनीं नातुडे जो वेदां । उभा तो मर्यादा धरूनि पाठी ॥४॥
भावार्थ
सत्व, रज, तम या गुणांच्या अतित असलेल्या परब्रह्म परमात्म्याचे सगुण रूप विटेवर उभे आहे. कोटी सूर्याचे तेज या मूर्तीच्या मुखावर एकवटले आहे. ही सगुण, सुंदर, चतुर्भुज मूर्ति पाहताच अनंत पापांच्या राशी लयास जावून पूर्वजांचा उध्दार होतो. भक्त वत्सल हे भगवंताचे ब्रीद स्वर्ग पृथ्वी आणि नरक या तिन्ही भुवनांत गाजत असून करातिल तोडर हे ब्रीद सार्थ करतो. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, ज्याच्या स्वरुपाचे रहस्य वेदांना सुध्दां आकलन होत नाही तो देवाधिदेव भक्तिच्या मर्यादा सांभाळून विटेवर उभा आहे. 
४९
आल्हाददायक श्रीमुख चांगले । पाहतां मोहिले भक्त सर्व ॥१॥ गाई गोपाळ वेधिल्या गोपिका । श्रीमुख सुंदर देखा साजिरे तें ॥२॥ आल्हाददायक तें मुखकमळ । वैजयंती माळ हृदयावरी ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां रुपडें । आनंदी आनंद जोडे आपोआप ॥३॥
भावार्थ
पांडुरंगाचे प्रसन्न श्रीमुख पाहून सर्व भाविकांचे मन मोहून जाते. गोपाळ गोपिकाच नव्हे तर गाई सुध्दां त्या रूपाकडे आकर्षित होतात. गळ्यांत वैजयंतीमाला असलेले हे मुखकमल अतिशय आल्हाददायक दिसते. असे वर्णन करुन एका जनार्दनीं म्हणतात, हे रूप पाहतांच मनातील आनंदाला भरती येते. 
५०
व्यापक तो हरी पंढरिये राहिला । वेदांदिकां अबोला जयाचा तो ॥१॥ सांवळें नागर कटीं ठेउनी कर । वैजयंती हार तुळशी गळां ॥२॥ एका जनार्दनीं विश्वव्यापक । उभाची सम्यक विटेवरी ॥३॥
भावार्थ
विश्वंभर विश्वव्यापक परमेश्वर मूर्तरूपांत पंढरींत निवास करतो. सांवळे, सुंदर कर कमरेवर ठेवून भक्ती प्रेमामुळे हा वैकुंठपती विटेवर तिष्ठत उभा आहे. परब्रह्मपरमेशाचे हे स्वरूप पाहून वेडावलेले वेद मूक झाले आहेत असे एका जनार्दनीं या अभंगात कथन करतात. 
५१
जयाकारणें योगी रिघती कपाटीं । तो उभा असे तटीं चंद्रभागे ॥१॥ सांवळे रूपडें गोजिरे गोमटें ।धरिलें दोन्ही विटे समचरण ॥२॥ वैजयंती माळा तुळशीहार मिरवला । निढळीं शोभला चंदन वो माय ॥३॥ एका जनार्दनीं मौन्य धरूनी उभा । चैतन्याचा गाभा पांडुरंग ॥४॥
भावार्थ
ज्या स्वरुपाचे यथार्थ ज्ञान मिळवण्यासाठी योगीजन गिरीकंदरी राहून निरंतर तप करतात तो चैतन्याचा गाभा पांडुरंग चंद्रभागेच्या तीरावर उभा आहे. सांवळ्या रंगाचे गोजिरे सुंदर रूप धारण करून विटेवर समचरण ठेवून उभा आहे. कपाळीं चंदनाचा टिळा, गळ्यांत तुळशीहार आणि वैजंयती माळ शोभून दिसत आहे. एका जनार्दनीं मूकपणे या पांडुरंगाचे रूप डोळ्यांत साठवत आहेत. 
५३
गगनामाजीं जैसे शोभे तारांगण ।तैसा विटेवरी शोभे समचरण ॥१॥ देखतांचि मना समाधान होय । आनंदी आनंद होय ध्यातां जया ॥२॥ चतुर्भुज शंख चक्र ते शोभती । गळां वैजयंती मिरवे शोभा ॥३॥ कांसे पीतांबर मेखला झळाळ । एका जनार्दनीं भाळ पायांवरी ॥४॥
भावार्थ
आकाशात जसे चंद्र आणि चांदण्या शोभून दिसतात तसा विटेवर समचरण ठेवून उभा असलेला, शोभून दिसणारा पांडुरंग पाहून मनाला समाधान होते. या पुरुषोत्तमाचे ध्यान धरल्यास चित्त आनंदित होते. चारही भुजांत शंख, चक्र, गदा, पद्म आणि गळ्यातील वैजयंतीमाळेची शोभा केवळ अवर्णनीय आहे. कमरेला पीतांबर व त्यावर मेखला झळकत आहे असे वर्णन करुन एका जनार्दनी भक्तीभावाने पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवतात. 
५४
अनंताचे अनंत गुण । अपार पार हे लक्षण । तो समचरण ठेवून । विटे उभा राहिला ॥१॥ करी दास्यत्व काळ । भक्तजना प्रतिपाळ । उदार आणि स्नेहाळ । तो उभा भीवरे ॥२॥ धीर सर्वस्वे बळसागर । निद्रा करी शेषावर । लक्ष्मी समोर । तिष्ठतौ सर्वदा ॥३॥ खेळे कौतुके खेळ । तोडी भक्तांचे मायाजाळ । एका जनार्दनी कृपाळ । स्वामी माझा विठ्ठल ॥४॥
भावार्थ
अनंत गुणांचा सागर असलेला, ज्याचा महिमा अपरंपार असून काळाचा नियंता शिवशंकर ज्याचे दास्यत्व करीत आहे, जो अत्यंत उदार, प्रेमळपणे भक्तांचा सांभाळ करणारा आहे असा देवाधिदेव भीवरेच्या तिरी उभा आहे. अत्यंत धीरोदात्त, बलशाली भगवंत क्षीरसमुद्रात शेषशय्येवर निद्रा करतो. सदासर्वदा प्रत्यक्ष लक्ष्मी सेवेसाठी समोर आहे, असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, अत्यंत कृपाळु असा परमेश्वर कौतुकाने लीला करून भक्तांचे विश्वरुपी मायाजाल तोडून मोक्षपद देणारा विठ्ठल भक्तांचा स्वामी आहे. 
५५
वेदे सांगितले पुराणी आनुवादिले । शास्त्र बोले बोलत पांगुळले ॥१॥ न कळेचि कोणा शेषादिका मती । कुंठिता निश्चिती राहियेल्या ॥२॥ श्रुती अनुवादती नेति नेति पार । तोचि सर्वेश्वर उभा विटे ॥३॥ एका जनार्दनी ठेवुन कटी कर । उभा असे तीरी भीवरेच्या ॥४॥
भावार्थ
सर्वेश्वर सर्वव्यापी भगवंताची चारी वेद भरभरुन स्तुती करतात. अठरा पुराणे भक्तांच्या अनेक कथा सांगून वेदांना अनुमोदन देतात. सहस्र मुखांचा शेष या परब्रह्म परमेशाचे स्वरूप वर्णन करतांना मती गुंग होऊन मूक होतो. व्यतिरेकाने या सर्वेश्वराचे स्वरूप निश्चित करतांना श्रुती हतबल होतात असे मत व्यक्त करुन एका जनार्दनी म्हणतात, वेद, श्रुती, पुराणे यांना अनाकलनीय असा हा परमात्मा कटीवर कर ठेवून भीवरेच्या तीरावर उभा आहे. 
५६
वेदांचा विवेक शास्त्रांचा हा बोध । तो हा परमानंद विठ्ठलमूर्ती ॥१॥ पुराणासी वाड साधनांचे कोड । ते गोडाचे गोड विठ्ठलमूर्ती ॥२॥ ब्रह्मादी वंदिती शिवादि ज्या ध्याती । सर्वांसी विश्रांती विठ्ठलमूर्ती ॥३॥ मुनीजनांचे ध्यान परम पावन । एका जनार्दनी पावन विठ्ठलमूर्ती ॥४॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनी पंढरीच्या विठ्ठलाचा अगाध महिमा वर्णन करतात. हा पांडुरंग वेदमूर्ती असून ज्ञानाची खाण आहे. अठरा पुराणे भागवत धर्मातितील भक्तीरसाचे सविस्तर वर्णन करतात. या मधुर भक्तीरसाचे माधुर्य या विठ्ठलमूर्तीत एकवटले आहे. सृष्टीचे सृजन करणारे ब्रह्मदेव या पांडुरंगाला वंदन करतात आणि शिवादिदेव या विठ्ठलमूर्तीचे ध्यान करतात. मुनीजनांच्या तपसाधनेचा, ध्यानधारणेचा हा परमात्मा हा आवडता विषय आहे. परम पावन अशी ही विठ्ठलमूर्ती आहे. 
५७
वेदी जैसा वर्णिला । तैसा विटेवरी देखिला ॥१॥ पुराणे सांगती ज्या गोष्टी । तो विटेवरी जगजेठी ॥२॥ शास्त्रे वेवादती पाही । तोचि विटे समपाई ॥३॥ न कळे न कळे आगमा । निगमांही न कळे सीमा ॥४॥ जाला अंकित आपण । एका जनार्दनी शरण ॥५॥
भावार्थ
वेदांनी या जगजेठीचे जसे वर्णन केले आहे, त्याच स्वरूपांत तो विटेवर पाहिला असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पुराणे कथारूपाने आणि साही शास्त्रे वादविवाद करून ज्या परमेशाचे गुणगान करतात तोच विटेवर समचरणीं उभा आहे. भक्तीप्रेमाने अंकित असलेल्या या भगवंताच्या महिमा चारी वेद, श्रुती , पुराणे यथार्थपणे करू शकत नाही. त्या पांडुरंगाला अन्यनभावे शरण जावे. 
५८
वेदांचे सार निगमाचे माहेर । तो हा परात्पर उभा विटे ॥१॥ शास्त्रांचे निजघर पुराणाचे निजसार । तो हा विश्वंभर उभा विटे ॥२॥ काळाचा तो काळ भक्तांचा प्रतिपाळ । तो हा दीनदयाळ उभा विटे ॥३॥ एका जनार्दनीं शोभे दीनमणी । भक्त भाग्य धणी पंढरीये ॥४॥
भावार्थ
विटेवर उभा असलेला हा विश्वंभर चारी वेदांचे सार असून श्रुतींचे माहेरघर आहे. साही शास्त्रे याच परमात्म तत्वातून निर्माण झाली असून अठराही पुराणे याच पुराणपुरूषाच्या चरित्रकथा सांगतात. सृष्टीचा संहार करणार्या काळावर ज्याची सत्ता चालते तो दीनदयाळ भक्तांचा सांभाळ करण्यासाठी विटेवर सूर्यासारखा तळपत उभा आहे. एका जनार्दनीं म्हणतात, पंढरपूरच्या भक्तांचे भाग्य च फळाला आले आहे. 
५९
जयाची समदृष्टी पाहूं धांवे मन । शोभते चरण विटेवरी ॥१॥ कानडे कानडे वेदांसी कानडें । श्रुतीसी जो नातुडें गीतीं गातां ॥२॥ परात्पर साजिरें बाळरूप गोजिरे । भाग्याचे साजिरे नरनारी ॥३॥ एका जनार्दनीं कैवल्य जिव्हाळा । मदनाचा पुतळा विटेवरी ॥४॥
भावार्थ
ज्याच्या दर्शन सुखासाठी भाविकांचे मन आतुर होते त्या कानडा ( देह तीन ठिकाणी वाकवून उभा असलेला) विठ्ठलाचे चरण विटेवर शोभून दिसतात. वेद आणि श्रुती या कैवल्यदानी पांडुरंगाचे सतत गुणगान करतात त्यांना सुध्दां त्या स्वरुपाचे रहस्य पूर्णपणे आकलन होत नाही. परात्पर परब्रह्माचे सांवळे, गोजिरे बाळरूप ज्यांच्या घरीं नांदत आहे ते पंढरीचे निवासी भाग्यवंत आहेत असे एका जनार्दनीं म्हणतात. 
६०
वेदांचें सार निगमाचें माहेर । तो हा परात्पर उभा विटे ॥१॥ शास्त्रांचे निजघर पुराणाचे निजसार । तो हा विश्वंभर उभा विटे ॥२॥ काळाचा तो काळ भक्तांचा प्रतिपाळ । तो हा दीनदयाळ उभा वाटे ॥३॥ एका जनार्दनीं शोभे दीनमणी । भक्त भाग्य धणी पंढरीये ॥४॥
भावार्थ
ज्याच्या स्वरूपातून चारी वेद निर्माण झाले आहेत, सारी उपनिषदे जेथून उत्पन्न झाली आहेत तो परात्पर परमात्मा साही शास्त्रे आणि अठरा पुराणे यांच्या चिंतनाचा मुख्य विषय आहे. प्रत्यक्ष काळावर ज्याची सत्ता चालते तो दीनदयाळ भक्तांचा सतत सांभाळ करतो. एका जनार्दनीं म्हणतात, पंढरीच्या भक्त-जनांचे भाग्य फळाला आले असून हा विश्वंभर उगवत्या सूर्याप्रमाणे विटेवर शोभून दिसत आहे. 
६१
जया कारणें वेद अनुवादती । शास्त्रे पुराणें भांडती ॥१॥ तो हा देवाधिदेव बरवा । विठ्ठल ठावा जगासी ॥२॥ नये श्रुतीसी अनुमाना । तो देखणा पुंडलिका ॥३॥ आगमा निगमा, न कळें पार । एका जनार्दनीं निर्धार ॥४॥
भावार्थ
चारी वेद ज्याच्या उपदेशाचे अनुसरण करतात. शास्त्रे, पुराणे ज्याच्या स्वरूपाची चर्चा करीत वादविवाद करतात तो देवाधिदेव विठ्ठल रूपाने सर्व भाविकांना माहित आहे. श्रुती ज्याचे स्वरूप आकलन करू शकत नाही तो भक्त पुंडलिकाने सहज प्रेम भक्तीने आपलासा केला आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात , या अपरंपार विश्वंभराचा महिमा वेद, उपनिषदे यांना निश्चितच समजला नाही. 
६२
शेषादिक श्रमले वेद मौनावले । पुराणे भागलीं न कळे त्यांसी ॥१॥ तोचि हा सोपा सुलभ सर्वांसी । विठ्ठल पंढरीसी उघड डोळा ॥२॥ शास्त्रांचिया मता न कळे लाघव । तो हा विठ्ठलदेव भीमातीरीं ॥३॥ कर्म धर्म जयालागीं आरती । ती ही उभी मूर्ति विटेवरी ॥४॥ आगमा निगमां न कळे दुर्गमा ।एका जनार्दनीं प्रेमा भाविकांसी ॥५॥
भावार्थ
सहस्त्र मुखे असलेला शेष नाग या परब्रह्म स्वरूपाचे वर्णन करतांना थकून गेला. वेद नि:शब्द होऊन त्यांनी मौन धारण केले. त्या पूर्णानंद परमेश्वर चरित्राच्या कथा सांगून पुराणे स्तब्ध झाली. शास्त्रांची मती कुंठित झाली. ज्याच्या प्राप्तीसाठीं कर्मयोगी यज्ञ जप तप करतात, तत्वज्ञानी तर्कशास्त्राचा आधारावर हे परमात्म तत्व जाणून घेण्याचा अटोकाट प्रयास करतात तो वेदमूर्ती पांडुरंग भाविकांची वाट पहात विटेवर उभा आहे असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात. 
६३
पाउलें गोजिरी ध्यान विटे मिरवलें । शोभत तान्हुलें यशोदेचे ॥१॥ न कळे पूराणां शास्त्रादि साम्यता । तो हरी तत्वतां पंढरिये ॥२॥ एका जनार्दनीं ऐक्यरूप होउनी । भक्तांची आयणी पुरवितसे ॥३॥
भावार्थ
गोजिरे पाउले विटेवर ठेवून उभा असलेला यशोदेचा कान्हा शोभून दिसते आहे. शास्त्रे आणि पुराणे यांचे ज्याच्या स्वरूपाविषयी एकमत होत नाही तो श्रीहरी भाविकांच्या भोळ्या भक्तीप्रेमाशी एकरुप होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करीत आहे असे एका जनार्दनीं म्हणतात. 
६४
परा ही पश्यंती मध्यमा वैखरी । वसे तो श्रीहरी पंढरीये देखा ॥१॥ चारी वाचा तया सदोदित गाती । पुराणें भांडती अहोरात्र ॥२॥ वेद श्रुति नेति नेति म्हणताती । तो पुंडलिकापुढें प्रीती उभा असे ॥३॥ सनकसनंदन जयासी पैं ध्याती । तो हरी बाळमूर्ती खेळतसे ॥४॥ योगियां हृदयींचें ठेवणें सर्वथा । एका जनार्दनीं तत्वतां वोळखिलें ॥५॥
भावार्थ
परा, पश्यंती, मध्यमा वैखरी या चारी वाणी सदोदित ज्याच्या गुणरुपाचा महिमा गातात, पुराणे रात्रंदिवस वादविवाद करतात, वेद आणि उपनिषदे ज्याचे स्वरूप जाणून घेण्यासाठी तत्वज्ञानाचा आधार घेऊन अट्टाहास करतात. तो श्रीहरी भक्तराज पुंडलिकापुढे भक्तीप्रेमाने वेडा होऊन उभा आहे. सनक, सनंदन मुनी ज्याचे ध्यान लावून साधना करतात तो श्रीहरी बाळस्वरूपांत गोप गोपिकांसवे क्रीडा करतो. हेच परमात्मा तत्व योगी जनांच्या अंतरीचा ठेवा आहे असे एका जनार्दनीं म्हणतात. 
६५
योगियांचा योग साधन तें चांग । तो पांडुरंग विटेवरी ॥१॥ मुमुक्षु संपदा ज्ञानीयांचा बांधा । तो पांडुरंग बोधा विटेवरी ॥२॥ सच्चिदानंद अमूर्त मधुसूदन । एका जनार्दन विटेवरी ॥३॥
भावार्थ
योगी जनांच्या योग साधनेचे लक्ष असलेला पांडुरंग पंढरीला विटेवर उभा आहे. मोक्षसंपदा संपादन करण्यासाठी यज्ञयाग, जप, तप अशी खडतर साधना करणारे योगी ज्या परमात्म तत्वाचे निरंतर चिंतन करतात तो सच्चिदानंद , निराकार, निर्गुण मधुसुदन विठ्ठलरूपाने विटेवर उभा आहे असे एका जनार्दनीं सांगतात. 
६६
कर्मी कर्मठपणा धर्मी धर्मिष्ठपण । हीं दोन्ही अनुसंधाने चुकती जगीं ॥१॥ कर्माचे जें कर्म धर्माचा अधिधर्म । तो हा सर्वोत्तम विटेवरी ॥२॥ निगमाचे निजसार आगमाचे भांडार । न कळे ज्याचा पार वेदशास्त्रा ॥३॥ एका जनार्दनीं श्रुतीसी नाकळे । तो भक्तिवळें उभा विटे ॥४॥
भावार्थ
यज्ञयाग, पूजा अर्चना, जप, तप ईश्वर प्राप्ती साठी ही कर्मे करणार्या कर्मयोग्यामध्यें निर्माण होणारा कर्मठपणा आणि धर्मनिष्ठ धार्मिक मार्तंडामध्ये असलेला अंध धर्माभिमान असे दोष निर्माण होतात असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, कर्मयोग्यांचा कर्मयोग, धार्मिकांचे धर्मतत्व तसेच उपनिषदांचे सार आणि वेदांचे तत्वज्ञान भगवतभक्ती रुपाने विटेवर उभे आहे. पांडुरंगाचा हा अवतार वेद आणि श्रृती यांना अनाकलनीय आहे. 
६७
सिध्द साधक जया हृदयीं ध्याती । तो गोपिकेचा पती विठ्ठलराव ॥१॥ सांवळें सांवळें रूप ते सांवळें । देखतांचि डोळे प्रेमयुक्त ॥२॥ जीवाचे जीवन मनाचें उन्मन । चैतन्यघन पूर्ण विटेवरीं ॥३॥ एका जनार्दनीं आनंद अद्वय । न कळे त्याची सोय ब्रह्मादिकां ॥४॥
भावार्थ
जे जे जगीं जगते त्यांना चैतन्य देणारा, मनाचे उदात्तीकरण करणारा असा चैतन्यमूर्ती, गोपीकेचा स्वामी सांवळा विठ्ठल विटेवर उभा असून त्याच्या दर्शनाने अंतरांत प्रेम दाटून येते. एका जनार्दनीं म्हणतात, हा चैतन्यघन परमात्मा अद्वितीय आनंद देणारा असून ब्रह्मादिक देव याच्या अवतार लीलांचे रहस्य जाणूं शकत नाही. 
६८
सप्त दिन जेणे गोवर्धन धरिला । काळिया नाथिला देउनी पाय ॥१॥ तो हा गोपवेषे आला पंढरपुरा । भक्त समचारा विठ्ठल देवो ॥२॥ बाळपणीं जेणे पूतने शोषले । अघ बघ मारिले खेळु खेळे ॥३॥ कंसचाणुराचा करूनियां घात । केला मथुरानाथ उग्रसेन ॥४॥ समुद्राचे तटीं द्वारके उभविलें । सोळा सहस्त्र केले कुटुंबासी ॥५॥ धर्माचीये घरीं उच्छिष्ट काढिलें । दुष्ट या वधिलें कौरवांसी ॥६॥ एका जनार्दनीं ऐसी बाळलीला । खेळ खेळोनी वेगळा पंढरीये ॥७॥
भावार्थ
इंद्राच्या क्रोधाने कोसळणार्या मुसळधार पावसापासून गोकुळातिल लोकांचे रक्षण करण्यासाठी श्री कृष्णाने गोवर्धन पर्वत एका करांगुलीवर सात दिवस तोलून धरला. यमेनेच्या डोहांत राहून पाणी विषारी करणार्या कालिया नागाला यमुनापार केले. बाळपणीं ज्याने पुतना राक्षसीच्या शरीरातिल विष शोषून तिला ठार केले. खेळ खेळताना याच श्रीहरीने अघ, मघ या राक्षसांचा संहार केला. आपला कंसमामा आणि चाणुराचा वध करुन मथुरा नगरीला जुलमी राजसत्तेतून मुक्त करून पदभ्रष्ट झालेल्या आपल्या आजोबांना राजपद मिळवून दिले. सागराच्या तटावर द्वारका नावाची सुंदर नगरी वसविली. नरकासुराचा कारागृहातून सोळा सहस्र स्त्रियांची मुक्तता करून त्यांना पत्नीपदाचा मान देवून सन्मानाने जगण्याचा मार्ग मोकळा केला. पांडवांच्या राजसूय यज्ञाचे वेळी आपले राजपद विसरून श्रम प्रतिष्ठा वाढविण्यासाठी उष्टया पत्रावळी उचलण्याचे काम केलें. कौरवांची जुलमी सत्ता उखडून टाकून पांडवांना न्यायाचे राज्य स्थापन करण्यासाठी मदत केली. श्री कृष्ण चरित्रातिल या महत्वाच्या घटना सांगून एका जनार्दनीं म्हणतात, असा पुरुषोत्तम भक्तांच्या उध्दारासाठी गोपवेष धारण करुन पंढरपुरा आला. या बाळलीला खेळून त्या पासून वेगळा होउन विठ्ठरूपानें समचरणीं विटेवर उभा आहे. 
६९ अवघियांसी विश्रांतीस्थान । एक विठ्ठल चरण ॥१॥ देह वाचा अवस्थात्रय ।अवघें विठ्ठलमय होय ॥२॥ जागृतीं स्वप्नीं सुषुप्तीं । अवघा विठ्ठलचि चित्ती ॥३॥ जनीं वनीं विजनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥
भावार्थ
विटेवरचे विठ्ठलचरण हे भाविकांचे विश्रांतीस्थान असून या चरणांचे दर्शन होतांच काया, वाचा, मन हे या विठ्ठलरूपाशी एकरुप होतात. जागेपणीं , स्वप्नांत आणि गाढ निद्रेत असताना हे विठ्ठरुप चित्ताला व्यापून राहते. नगरांत, जनसमुदायांत, वनांत किंवा निर्जनस्थळीं सर्वत्र हा विठ्ठल भरून राहिलेला आहे अशी प्रचिती येते. एका जनार्दनीं परमात्म दर्शनाचा हा आगळावेगळा अनुभव या अभंगात वर्णन करतात. 
७०
जयालागीं शिणती रात्रंदिन । यज्ञ यागादी करिती हवन । ध्येय ध्यान धारणा अनुष्ठान । साधिती अष्टांग आणि पवन ॥१॥ तो गे माय सोपा केला सर्वांसी । लांचावला देखोनि भक्तीसी । उभा राहिला युगे अठ्ठावीस विटेसी । न बोले न बैसे नुल्लंघी मर्यादेसी ॥२॥ एका जनार्दनीं कृपेचा सागर । भक्त करूणाकर तारू हा दुस्तर । उभा भीवरेचे तीरीं कटीं धरुनी कर । जडजीवां दरूशने उध्दार ॥३॥
भावार्थ
ज्या परात्पर परमेशासाठी साधक रात्रंदिवस विविध प्रकारे साधना करतात. यज्ञ, याग, होमहवन करतात. तर कांहीं ध्यान, धारणा, व्रत, अनुष्ठाने करतात. हटयोगी अष्टांग योगाची साधना करतात. तो भगवंत भक्तिमार्गाने सामान्य जनांसाठी सहजसुलभ केला. भोळ्याभाबड्या भक्तिभावाने वेडा होऊन अठ्ठाविस युगे विटेवर उभा राहिला आहे. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तांवर करुणा करणारा हा कृपासागर असून भवसागर तारून नेणारा नावाडी भीवरेच्या तीरावर उभा राहून आपल्या चरण दर्शनाने जड जीवांचा उध्दार करतो. 
७१ सर्वा आदि मूळ न कळे अकळ । तो भक्त प्रतिपाळ भीमातीरीं ॥१॥ योगियांच्या ध्याना न ये अनुमाना । कैलासीचा राणा ध्यात ज्यासी ॥२॥ शुकादिका ज्याचा वेध अहर्निशीं तो उभा हृषिकेशी विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं ब्रह्म परिपूर्ण । सगुण निर्गुण तोचि एक ॥४॥
भावार्थ
अनादी अनंत निर्गुण निराकार परब्रह्म भक्तांचा प्रतिपाळ करण्यासाठी सगुणरुपांत प्रकट होऊन भिमातिरी साकार रूपांत उभे आहे. ज्याच्या स्वरुपाचे कैलासीचा राणा निरंतर ध्यान करतो. शुका सारखे परम विरागी रात्रंदिवस ज्याच्या स्वरुपाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात तो सर्व इंद्रियांना सुखानंद देणारा (हषिकेशी) जीवसृष्टीचे आदिमूळ आहे असे स्पष्ट करून एका जनार्दनीं म्हणतात, सगुण निर्गुण ही दोन्हीं एकाच परब्रह्माची दोन रुपे आहेत. 
७२
सगुण निर्गुण बुंथीचे आवरण । ब्रह्म सनातन पंढरीये ॥१॥ तो हा श्रीहरी नंदाचा खिल्लारी । योगी चराचरीं ध्याती जया ॥२॥ शिवाचे जे ध्येय मुनिजनांचे ध्यान । ब्रह्म परिपूर्ण पंढरिये ॥३॥ एका जनार्दनीं अठरां निराळा । लाविलासे चाळा सहां चहुंसी ॥४॥
भावार्थ
कळीकाळाचा नियंता शिवशंकर, मुनिजन आणि योगीजन ज्याच्या स्वरुपाचे यथार्थ ज्ञान मिळवण्यासाठी ध्यानमग्न होऊन अविरत साधना करतात ते सनातन परब्रह्म श्रीहरी रुपाने नंदाच्या घरीं गाई राखतो. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, सगुण आणि निर्गुण हे केवळ देहाचे आवरण असून अठरा पुराणे ज्या स्वरुपाचे वर्णन करतात ते अनाकलनीय असून चारी वेद आणि साही शास्त्रे या स्वरुपाचे रहस्य जाणून घेण्यासाठी सतत प्रयत्न करतात. 
७३
कैवल्याची रासी वैष्णवांच्या घरीं । मुक्ति भुक्ति कामारी आहे जेथे ॥१॥ तो हा विठ्ठल निधार परेपरता उभा । सांवळी ती प्रभा अंगकांती ॥२॥ मुनिजनांचे ध्येय योगियांचे उन्मन । ज्या पैं माझें लीन चित्त जाहलें ॥३॥ जया अष्टांग योगां सांकडें साधित । तें उघडें पाहतां उभे विटेवरीं ॥४॥ एका जनार्दनीं सगुण निर्गुण । यापरतां चैतन्यघन उभा असे ॥५॥
भावार्थ
ज्या वैष्णवांच्या घरी भुक्ति मुक्ति पाणी भरतात तेथें सावळ्या रंगाची तेजस्वी अंगकांती असलेला कैवल्यदाता श्रीहरी विठ्ठलरुपाने उभा राहिला आहे. मुनीजनांची ध्येयपूर्ती करणारा , योगीजनांच्या योगसाधनेत मनाचे उन्मन (उच्चतर पातळीवर) स्थिर करण्यात सहाय्य करणारा, अष्टांग योगाची साधना करणार्यांच्या योगसाधनेतिल अडचणी (सांकडें) दूर करणारा , सगुण निर्गुण या पलिकडचे चैतन्यतत्व भाविकांना दर्शन देण्यासाठी विटेवर उभे आहे असे एका जनार्दनीं या अभंगात म्हणतात. 
७४
एकाचीं काजें फिटलें सांकडे । उगविली कोडे बहुतांची ॥१॥ तोचि हरी उभा चंद्रभागा तरी । कर ठेउनी कटीं अवलोकित ॥२॥ पडतां संकट धांवतसे मागें । गोपाळांचिया संगे काला करी ॥३॥ चोरूनी शिदोरी खाय वनमाळी । प्रेमाचे कल्लोळीं आनंदाने ॥४॥ यज्ञ अवदानीं करी वांकुडें तोंड । लोणी चोरितां भांड गौळणी म्हणती ॥५॥ एका जनार्दनीं ठेवणें संतांचे उभें तें साचे विटेवरी ॥६॥
भावार्थ
एका भक्त पुंडलिकासाठी अनेक भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारा श्रीहरी चंद्रभागेच्या तिरावर दोन्ही कर कटीवर ठेवून अवलोकन (निरिक्षण) करीत उभा आहे. संकटकाळीं तो भक्तांना मदत करण्यासाठी धांवत जातो. गोपाळांबरोबर गोपालकाला करतो. यज्ञातिल अविर्भाग (प्रसाद) स्विकारतांना नाराज असलेला श्रीपती गौळणींघरचे लोणी आणि शिदोरी चोरुन आनंदाने खातो. एका जनार्दनीं म्हणतात, संतांघरचा हा ठेवा पंढरीला विटेवर उभा आहे. 
७५
एकाचिया द्वारीं भीकचि मागणें । उभेंचि राहाणें एका द्वारी ॥१॥ एकाचिया घरीं उच्छिष्ट काढणे । लोणी जें चोरणें एका घरी ॥२॥ एकाचिये घरीं न खाये पक्वान्न । खाय भाजीपान एका घरीं ॥३॥ एकाचिये घरीं व्यापुनी राहाणें । एकाती तो देणें भुक्तिमुक्ती ॥४॥ एका जनार्दनीं सर्वठायीं असे । तो पंढरीये वसे विटेवरी ॥५॥
भावार्थ
वामन अवतारांत दैत्यराजा बळी याच्या दारांत उभे राहून तीन पावले भूमीचे दान मागणारा श्रीपती राजसूय यज्ञांत पांडवांच्या घरीं उष्टया पत्रावळी उचलतो. नंद यशोदेच्या घरचे लोणी चोरून खातो. दुर्योधनाच्या राजवाड्यातिल पक्वानें नाकारणारा श्रीहरी द्रौपदीच्या थाळीतिल भाजीचे उरलेले पान खाऊन तृप्त होतो. सुदाम्याचे पोहे मिटक्या मारत खातो आणि विदुराच्या घरी समाधानाने निवास करतो. भोळ्याभाबड्या भाविकांना भुक्तिमुक्ती देणारे, सर्व जिवांमध्ये चैतन्यरुपाने अस्तित्वांत असणारे परब्रह्म पंढरींत विटेवर उभे आहे असे एका जनार्दनीं म्हणतात. 
७६
कृपाळु माउली अनाथा साउली । उभी ती राहिली विटेवरी ॥१॥ भक्त करूणाकर कैवल्याचा दानी । उभा तो जघनी ठेवूनी कर ॥२॥ मोक्षमुक्ति फुका वाटितो दरुशने । नाही थोर सान तयासी तेथे ॥३॥ एका जनार्दनी एकपणे उभा । कैवल्याचा गाभा पांडुरंग ॥४॥
भावार्थ
अनाथांना आपल्या कृपेची सावली देणारी विठ्ठलमाऊली विटेवर उभी ठाकली आहे. भक्तांवर करूणा करून त्यांना मोक्षपद देणारा कैवल्यदानी उच्चनीच, लहानथोर असा भेदभाव न करता केवळ भक्तीभावाने दर्शनास येणार्‍या सर्वांना मोक्ष-मुक्तीचे दान देणारा कैवल्याचा गाभा एकपणे उभा आहे असे एका जनार्दनी या अभंगात स्पष्ट करतात. 
७७
सकळ देवा शिरोमणी । सकळ तीर्थे वंदिती चरणी । सकळासी मुगुटमणी । तो उभा पंढरीये ॥१॥ सकळ तेजाचा पुतळा । सकळ जयांच्या अंगी कळा । सकळ जीवांचा आकळा । तो उभा राहिला विटेवरी ॥२॥ सकळ मंत्रांचा मंत्र । सोपा सकळ पवित्र । सकळ पर्वकाळ परत्र । दर्शनेचि घडती ॥३॥ सकळ अधिष्ठानांचे सार । सकळ गुह्यांचे माहेर । सकळ भक्तांचे जे घर । निजमंदिर पंढरी ॥४॥ सकळ वैराग्याचा निधी । सकळां कृपेची तो मांदी । एका जनार्दनी निरूपाधी । आशापाश विरहित ॥५॥
भावार्थ
सर्व पवित्र तीर्थे ज्याच्या चरणांना वंदन करतात असा देवाधिदेव पंढरीत उभा आहे. सर्व विद्या आणि कला ज्याला अवगत आहेत असा अत्यंत तेज:पुंज असा पंढरीनाथ विटेवर उभा राहिला आहे. सर्व पवित्र मंत्रांना ज्याचे अधिष्ठान आहे, तो सकळ गुह्य गोष्टींचे माहेरघर असून त्याचे मंगलमय मंदिर पंढरी हे सकळ भक्तांचे घर आहे. वैराग्यरुपी धनाचा मालक असून आशापाशविरहित आहे. या पंढरीनाथाला कोणत्याही प्रकारची उपाधी नसून सकळांवर कृपेची सावली धरणारी कृपामुर्ती आहे असे एका जनार्दनी या अभंगात म्हणतात. 
७८
जीव शिव व्यापूनि राहिला वेगळा । परब्रह्म पुतळा विटेवरी ॥१॥ तयाचिये पायी वेधले मन । झाले समाधान पाहता रुप ॥२॥ विश्रांति समाधि लोपोनिया ठेली । पाहता सावळी मूर्ति देखा ॥३॥ एका जनार्दनी सर्वा वेगळा । तो बाळलीला खेळे कृष्ण ॥४॥
भावार्थ
चैतन्यरुपाने सजीवसृष्टीतील सर्व जीवांना आणि ध्यानरुपाने जो शिवाच्या मनाला व्यापून उरले ते परब्रह्म विटेवर उभे आहे. त्याच्या चरणांशी मन खिळून राहते आणि रुप पाहून मन समाधानाने भरून जाते. समाधी अवस्थेतील विश्रांती लाभून चित्त त्या सावळ्या मुर्तीशी एकरूप होते. एका जनार्दनी म्हणतात, सर्वांठायी असुनही सर्वांपेक्षा वेगळा असलेला हा श्रीहरी बाळलीला करीत आहे. 
७९
एकपणे एक पाहता जग दिसे । योगियांसी पिसे सदा ज्याचे ॥१॥ आनंद अद्वय नित्य निरामय । परापश्यंति वेगळा हाय पंढरिये ॥२॥ व्यापक विश्वंभर भरूनि उरला । तो प्रत्यक्ष संचला कीर्तन मेळी ॥३॥ एका जनार्दनी त्रिगुणावेगळा । पहा पहा डोळा विठ्ठल देव ॥४॥
भावार्थ
ज्याच्या रुपाचे एकाग्रपणे दर्शन घेताना त्या स्वरुपात सर्व विश्व एकपणे प्रत्ययास येते, त्या स्वरुपाचा योगीजनांना सतत वेध लागतो. हे परब्रह्मस्वरुप आनंदमय, अद्वितीय, निरामय असून परा-पश्यंती वाणीलासुध्दा यथार्थ वर्णन करता येत नाही. तोच हा विश्वव्यापक विश्वंभर वैष्णवांच्या कीर्तनमेळ्यात प्रत्यक्ष दिसतो. सत्व, रज, तम या तिन्ही गुणांनी व्यापलेल्या चराचर सृष्टीतील सर्व जीवांपेक्षा वेगळा असलेला विठ्ठल डोळे भरून पहावा असे एका जनार्दनी सांगतात. 
८०
चैतन्याचा साक्षी सर्वांसी परिक्षी । अलक्षाच्या लक्षी न ये ध्याना ॥१॥ बहुत भागले बहुत श्रमले । परी नाही लाभले रूप ज्याचे ॥२॥ भक्तांचेनि भावे पंढरिये उभा । आनंदाचा गाभा सावळा तो ॥३॥ एका जनार्दनी तो सर्वव्यापक । उभा आहे नायक वैकुंठीचा ॥४॥
भावार्थ
चैतन्यमय परमात्मा सर्वांचे परिक्षण करीत असतो. परंतु हे लक्षात न घेणार्‍यांना ते उमजत नाही. योग-याग विधी करुन भागलेल्या, ध्यानधरणा करुन थकलेल्या साधकांना या रुपाचे दर्शन घडत नाही. भोळ्याभाबड्या भक्तीला भुलून तो सर्वव्यापक, वैकुंठीचा नायक सावळ्या विठ्ठलाचे रूप घेऊन भक्तांचा आनंदगाभा बनून पंढरीत उभा आहे असे एका जनार्दनी म्हणतात. 
८१
वेडावला वेडावला । उभा ठेला मौन्यची ॥१॥ ब्रह्मादिका अंत न कळे रूपाची । तो माझे माझे साचा भक्ता म्हणे ॥२॥ कमळाचरणी विनटली न कळे तीस थोरी । ते चरण विटेवरी देखियेले ॥३॥ एका जनार्दनी विश्वव्यापक हरी । सबाह्य अभ्यंतरी कोंदलासे ॥४॥
भावार्थ
भक्तराज पुंडलिकाच्या भगवद्भक्तीने वेडावलेला श्रीहरी मौन धारण करून विटेवर उभा आहे. अनन्य भक्तांना त्याने आपलेसे केले आहे. श्रीहरीच्या चरणकमळांची सतत सेवा करणार्‍या लक्ष्मीला ज्या चरणांची थोरवी कळली नाही, ते चरण विटेवर पाहिले. एका जनार्दनी म्हणतात, विश्वव्यापक हरी या विश्वाला अंतरबाह्य कोंदून राहिला आहे. 
८२
समचरणी उभा चैतन्याचा गाभा । त्रैलोक्याची शोभा पांडुरंग ॥१॥ भक्तांचे जीवन साधकांचे साधन । सुखाचे निधान पांडुरंग ॥२॥ मुक्ति कल्पद्रुम महाफळ उत्तम । गोपिकांचा काम पांडुरंग ॥३॥ एकाएकी विनटला तो सदा संचला । एका जनार्दनी भेटला पांडुरंग ॥४॥
भावार्थ
स्वर्ग, पृथ्वी व पाताळ या तिन्ही लोकांची शोभा वाढवणारा चैतन्यरुपी पांडुरंग हा भक्तांचे जीवन, साधकांची साधना आणि सकळजनांचे सुखनिधान आहे. एकाएकी प्रकट झालेला, मुक्तीरूपी फळ देणारा हा कल्पवृक्ष असून सदासर्वदा भक्तांच्या उध्दारासाठी उभा राहिला आहे असे एका जनार्दनी या अभंगात म्हणतात. 
८३
देवो न कळे अभाविका । उघड पंढरीसी देखा । भोळे सकळां भाविका । ठाऊका असे ॥१॥ न कळे तयाचे विंदान । भेटी जाता वेधी मन । तोडले बंधन । संसाराचे क्षणार्धे ॥२॥ रुप पाहता गोजिरे । आवडे डोळिया साजिरे । चित्त तेथे झुरे । पापांचे सकळ ॥३॥ नुरे काम आणि क्रोध । अवघा तो परमानंद । एका जनार्दनी गोविंद । अभेदपणे पाहता ॥४॥
भावार्थ
भोळ्याभाबड्या सर्व भाविकांना ठाऊक असलेला देव अभाविक लोकांना कळत नाही. त्या देवाचे दर्शन होताच मन त्या चरणांशी खिळून राहते. संसाराची सारी बंधने आपोआप तुटून पडतात. देवाचे साजिरे रूप पाहतांना डोळ्यांचे पारणे फिटते. त्या चरणांशी चित्त एकरुप होताच मनातील काम-क्रोध विकार लोप पावून केवळ परमानंदाने मन भरून जाते. एका जनार्दनी म्हणतात, या परमानंदासाठी गोविंदरूपाचे दर्शन अभेदपणे (अद्वैतभावाने) घ्यावे. 
८४
अनन्य शरण विठोबास निघाले । ते जीवन्मुक्त जाले याचि देही ॥१॥ देही याचि देवो विटेवरी पाहे । सबाह्य उभा आहे कर कटी ॥२॥ कर कटी उभा लावण्याचा गाभा । श्रीमुखाची शोभा काय वानू ॥३॥ कोटी रवीतेज वोवाळावे चरणी । एका जनार्दनी धन्य तोची ॥४॥
भावार्थ
दोन्ही कर कटीवर ठेवून उभा असलेला विठोबा लावण्याचा गाभा असून त्याच्या मुखकमळाची शोभा अवर्णनीय आहे. कोटी सूर्याचे तेज या विठ्ठलमूर्तीच्या चरणांवरून ओवाळून टाकावे. असे कथन करून एका जनार्दनी म्हणतात, जे भक्त या चरणांशी संपूर्ण शरणागत होतात ते याच देही जीवन्मुक्त होतात, ते धन्य होत. 
८५
उभा विटेवरी । कट धरूनिया करी । भीमा ती सामोरी । वहात आहे ॥१॥ जाऊ तया ठाया । आनंद तेणे काय । वैष्णवांचिया पाया । लोटांगणी ॥२॥ कर्माकर्म नाही वाद । भेदभ्रम नाही भेद । वैष्णवांचा छंद । नाम गाती आनंदे ॥३॥ सुख अनुपम्य अभेदे । एका जनार्दनी छंदे । गाता नाचता आल्हादे । प्रेम जोडे ॥४॥
भावार्थ भीमा नदीच्या तीरावर कटी दोन्ही हातांनी धरून पांडुरंग विटेवर उभा आहे. त्याठिकाणी कर्म, अकर्म, विकर्म याविषयी वाद नाही. अमंगळ भेदाभेद नाही, अभेदाचे अनुपम सुख नांदत आहे. टाळ-चिपळ्यांच्या तालावर वैष्णव आनंदाने हरिनामाचा गजर करीत नाचत आहेत. तेथे वैष्णवांच्या पायी लोटांगणी जाण्यात अनुपम आनंद आहे. एका जनार्दनी म्हणतात, हरीनामाच्या छंदात गात नाचतांना भक्तीप्रेमाने मन भरून जाते. 
८६
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥ कानडा विठ्ठल नामे बरवा । कानडा विठ्ठल हृदयी ध्यावा ॥२॥ कानडा विठ्ठल रूपे सावळा । कानड विठ्ठल पाहिला डोळा ॥३॥ कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥ कानडा विठ्ठल कानडा बोले । कानड्या विठ्ठले मन वेधियेले ॥५॥ वेधियेले मन कानडीयाने माझे । एका जनार्दनी दुजे नाठवेची ॥६॥
भावार्थ
तीन ठिकाणी देह वाकवून विटेवर उभ्या असलेल्या कानडा विठ्ठलाच्या गोड नामाचा गजर करीत त्याला चित्तात धारण करावा. या कानड्या विठ्ठलाचे सावळे रूप डोळे भरून पहावे. कानडा विठ्ठलाचे कानडे बोल भक्तांचे मन वेधून घेतात. हा कानडा विठ्ठल मन असे गुंतवून ठेवतो की संसारातील सर्व तापत्रयांचा विसर पडतो असे एका जनार्दनी म्हणतात. 
८७
तीर्थ कानडे देव कानडे । क्षेत्र कानडे पंढरिये ॥१॥ विठ्ठल कानडे भक्त हे कानडे । पुंडलिके उघडे उभे केले ॥२॥ कानडीया देवा चालविले भक्ते । कवतुके तयाते उभे केले ॥३॥ एका जनार्दनी भक्तांचिया चाडा । विठ्ठल कानडा विटेवरी ॥४॥
भावार्थ
पंढरपुरी भीमानदीच्या प्रवाहाने चंद्रकोरीसारखे वळण घेतले आहे. त्यामुळे हा तीर्थप्रवाह व तीरावर वसलेले क्षेत्र दोन्ही कानडे असून सावळा पांडुरंगही भीमेच्या सन्मुख विटेवर तीन ठिकाणी वाकून उभा आहे. या कानडा विठ्ठलाचे भक्तही कानडे आहेत असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, देव पुंडलिकाच्या भक्तीसाठी कौतुकाने उभा आहे. 
८८
उतावेळपणे उभा । त्रैलोक्य शोभा पंढरिये ॥१॥ मना छंद घेई वाचे । विठ्ठल साचे पाहू डोळा ॥२॥ गळा तुळशीच्या माळा । केशर टिळा लल्लाटी ॥३॥ चंदनाची शोभे उटी । वैजयंती कंठी मिरवत ॥४॥ दृष्टी धाय पाहता रूप । एका जनार्दनी स्वरुप ॥५॥
भावार्थ
त्रैलोक्याची शोभा वाढवणारा परमात्मा पंढरीत भक्तांची उताविळ होऊन वाट पहात उभा आहे. मनाने विठ्ठलनामाचा छंद घेऊन निराकार परब्रह्माचे साकार रूप डोळे भरून पहावे. गळ्यात वैजयंतीमाळेसह तुळशीच्या माळा शोभत आहेत, कपाळावर केशरी टिळा असून अंगाला चंदनाची उटी लावली आहे. एका जनार्दनी म्हणतात, हे सावळे सुंदर रूप डोळ्यात साठवण्यासाठी नजर परत-परत धाव घेते. 
८९
जया कारणे योगयाग तपे करती । ती हे उभी बाळ विठ्ठलमूर्ती । अंगी तेजाची न माय दीप्ती । कंठी वैजयंती शोभती गे माय ॥१॥ तयाचा वेधु लागला जीवी । क्षण परता नोहे देही । काया वाचा मने भावी । वेगे वेधक गे माये ॥२॥ न माये त्रैलोकी तो उभा विटी । दोन्ही कर समपदे ठेवुनी कटी । सर्वांगी चंदन कस्तुरी उटी । वामभागी रूक्मिणी गोमटी गे माय ॥३॥ ऐसा सर्व सुखाचा आगरू । उभारूनी बाह्या देत अभयकरू । एका जनार्दनी निर्धारू । विठ्ठलराज गे माय ॥४॥
भावार्थ
ज्या परमात्म्याचे दर्शन व्हावे म्हणुन योगी योग-याग आणि तपस्वी तप करतात तो विठ्ठल बाळरूप धारण करून उभा आहे. तेजाची प्रभा देही न सामावल्याने आसमंतात पसरली आहे. त्रैलोकी भरुन उरलेले हे परब्रह्मस्वरुप दोन्ही कर कटीवर ठेवून विटेवर सामावले आहे. सर्वांगावर कस्तुरीमिश्रित चंदनाची उटी लावली असून कंठात वैजयंतीमाळ धारण केली आहे. डाव्या बाजूला गोमटी रूक्मिणी उभी आहे. असा सर्वसुखाचे निधान असलेला विठ्ठलराज दोन्ही हात उभारून भक्तजनांना अभयदान देत आहे. एका जनार्दनी देव-भक्तांच्या सोहळ्याचे वर्णन या अभंगात करतात. 
९०
वैजयंती माळ किरीट कुंडले । रुप ते सावळे विटेवरी ॥१॥ वेधले वो मन तयाच्या चरणी । होताती पारणी डोळीयांची ॥२॥ पुराणासी वाड शास्त्रासी ते गूढ । ते आम्हालागी उघड परब्रह्म ॥३॥ ध्यानी ध्याती मुनी चिंतिती आसनी । तो हा चक्रपाणी सुलभ आम्हा ॥४॥ सन्मुख भीवरामध्ये पुंडलिक । एका जनार्दनी सुख धन्य धन्य ॥५॥
भावार्थ
अठरा पुराणे ज्याचा चरित्रमहिमा वर्णन करण्यास असमर्थ ठरली, योगी आणि मुनिजन सतत ध्यानमग्न होऊन ज्याची आराधना करतात तो चक्रपाणी भोळ्या भाविकांच्या भक्तिने सहज वश होतो. एका जनार्दनी म्हणतात, कंठी वैजयंती माळ, मस्तकी मुकुट, कानी कुंडले लेऊन विटेवर उभ्या असलेल्या या सावळ्या रुपाचे चरण मन वेधून घेतात, डोळ्याचे पारणे फिटते. 
९१
न कळे जयाचे महिमान । वेदश्रुतीसी पडिले मौन । वेडावले दरूशन । जयालागी पाहता ॥१॥ तोचि उभा विटेवरी । भक्त करुणाकर हरी । रूक्मिणी निर्धारी । वामभागी शोभती ॥२॥ गरूड सन्मुख उभा । शोभे चैतन्याचा गाभा । नभी लोपली तेजप्रभा । ऐसा उभा विठ्ठल ॥३॥ मन ध्याता न धाये । दृष्टी पाहता न समाये । एका जनार्दनी पाय । वंदू त्याचे आवडी ॥४॥
भावार्थ
भक्तांचा करुणाकर श्रीहरी विटेवर उभा असून वामांगी रूक्मिणी आणि समोर गरुड हात जोडून उभा आहे. चैतन्यरुपाने शोभून दिसणार्‍या विठ्ठलमूर्तीच्या मुखावरील तेज गगनात सामावत नाही. या श्रीहरीचा महिमा वर्णन करतांना वेदश्रुती नि:शब्द होतात. अविरत ध्यान धरूनही मनाचे समाधान होत नाही. एकटक दर्शनसुख घेऊनही तो नजरेत सामावत नाही, असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीचरणांना आवडीने वंदन करावे. 
९२
पाहता विठ्ठल रूप । अवघा निवारिला ताप ॥१॥ ध्यानी आणिता ते रूप । अवघा विराला संकल्प ॥२॥ बैसलासे डोळा । एका जनार्दनी सावळा ॥३॥
भावार्थ
एका जनार्दनी या अभंगात म्हणतात, सावळे विठ्ठलरूप डोळ्यात रुतून बसते. त्या दर्शनाने त्रिविध (आधिभौतिक, आध्यात्मिक, आधिदैविक) तापांचे निवारण होते. सारे संकल्प, विकल्प विरून जातात. 
९३
आणिकाचे मते सायास न करणे । आम्हासी पाहुणे पंढरीराव ॥१॥ डोळा भरूनिया पाहिले देवासी । तेणे चौर्यांशी चुकली सत्य ॥२॥ एका जनार्दनी देवाधिदेव । देखिला स्वयमेव विटेवरी ॥३॥
भावार्थ
देवाधिदेव स्वयमेव विटेवर उभा असलेला पाहिला आणि चौर्यांशी लक्ष योनींमधील जन्म-मृत्युचे फेरे चुकले. आता आणिक सायास करण्याची गरज नाही, कारण पंढरीनाथ भक्तांचे पाहुणे असून आनंदाने पंढरीत नांदत आहेत. 
९४
स्वर्गसुख आम्ही मानू जैसा ओक । सांडूनिया सुख पंढरीचे ॥१॥ पंढरी पावन चंद्रभागा स्थान । आहे तो निधान विठ्ठल देव ॥२॥ मध्यस्थळी राहे पुंडलिक मुनी । तयाचे दर्शनी पातक हरे ॥३॥ दोन्ही कर कटी उभा जगजेठी । एका जनार्दनी भेटी सुख होय ॥४॥
भावार्थ
चंद्रभागेच्या तीरावरील पंढरी पावन तीर्थक्षेत्र असून विठ्ठल देव भक्तांचा अमोल ठेवा आहे. भक्तराज पुंडलिक मध्यभागी उभा असून त्याच्या दर्शनाने पातकांच्या राशी जळून जातात. वैकुंठीचा जगजेठी दोन्ही कर कटी ठेवून उभा आहे. पंढरीच्या या सुखापुढे स्वर्गसुख तुच्छ वाटते. पांडुरंगभेटीचे हे सुख अतुलनीय आहे असे एका जनार्दनी या अभंगात म्हणतात. 
९५
कैसे चरण गोमटे । देखिले विटे पंढरीये ॥१॥ पाहतांचि वेधले मन । जाहले समाधान जीव शिवा ॥२॥ विश्रांतीचे विश्रांतिघर । आगमानिगमाचे माहेर ॥३॥ म्हणे एका जनार्दनी । काया कुर्वंडी करूनी ॥४॥
भावार्थ
पंढरीला विटेवर ठाकलेले दोन गोमटे चरण पाहून मनाला वेध लागले. देह आणि देह धारण करणारा आत्मा दोघांनाही विलक्षण समाधान झाले. वेद आणि श्रुती यांचे माहेर असलेले हे तीर्थक्षेत्र विश्रांतीचे विश्रांतीघर आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, या चरणांवरून देह ओवाळून कुर्वंडी करावा असे वाटते. 
'९६
उंचा उंचपण नीचा नीचपण । ते नाही कारण विठ्ठलभेटी ॥१॥ उंच नीच याती असो भलते जाती । विठ्ठल म्हणता मुक्ती जड जीवा ॥२॥ उभारूनी बाह्या कटी कर उभा । एका जनार्दनी शोभा विटेवरी ॥३॥
भावार्थ
दोन्ही हात उभारून भाविकांच्या भेटीसाठी विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या चरणी उच्च-नीच असा दुजाभाव नाही. उच्च जातीला श्रेष्ठत्व नाही, नीच जाती कनिष्ठ मानली जात नाही. विठ्ठलाच्या केवळ नामस्मरणाने जड जीवांना मुक्तीचे वरदान लाभते असे एका जनार्दनी या अभंगात सांगतात. 
९७
काळे ना सांवळे गोरे ना पिवळे । वर्ण व्यक्ती वेगळे विटेवरी ॥१॥ आनंद स्वानंद नित्य परमानंद । आनंदाचा कंद विटेवरी ॥२॥ निर्गुण सगुण चहू वाचांवेगळा । आदि अंत पाहता डोळा न दिसे काही ॥३॥ एका जनार्दनी देखिला तो डोळा । त्रिगुणा वेगळा विटेवरी ॥४॥
भावार्थ
विटेवर उभा असलेला आनंदाचा कंद, भक्तांना निरंतर लाभणारा परमानंद निराकार निर्गुण परब्रह्म सगुण रुपाने विटेवर उभे आहे. तो अनादी, अनंत परमात्मा सत्व, रज, तम या तिन्ही गुणांच्या अतीत असून वैखरी, मध्यमा, परा, पश्यंती या चारी वाणींच्या पलिकडे वेगळा आहे. जो अनादी अनंत असून डोळ्यांना अगोचर आहे. एका जनार्दनी म्हणतात, विटेवर दिसणारा हा परमात्मा गोरा, सावळा, काळा, पिवळा यापैकी कोणत्याही वर्णाचा नसून सत्व, रज, तम या गुणाहून वेगळा आहे. 
९८
जे जे देखिले ते ते भंगले । रूप एक उरले विटेवरी ॥१॥ डोळियांची धणी पाहता पुरली । परी वासना राहिली चरणांजवळी ॥२॥ एका जनार्दनी विश्वास तो मनी । संतांचे चरणी सदा बैसो ॥३॥
भावार्थ
डोळ्यांना दिसणारे हे सारे विश्व नश्वर आहे असा अनुभव आल्यानंतर विटेवर उभे असलेले हे परब्रह्म रूपच शाश्वत (अविनाशी) आहे याची खात्री होते. हे रूप डोळे भरून पाहतांना मनाला अतीव समाधान लाभते, पण या दर्शनाची वासना चरणांशी खिळून राहते. एका जनार्दनी या विठ्ठलचरणी प्रार्थना करतात की, ब्संताच्या चरणी मनाचा विश्वास सदासर्वदा अभंग राहो. 
९९
भीष्मे जया ध्याईले । ते विटेवरी देखिले ॥१॥ धर्मराये पूजियेले । ते विटेवरी देखिले ॥२॥ शिशूपाळा अंतक जाहले । ते विटेवरी देखिले ॥३॥ एका जनार्दनी पुजिले । ते विटेवरी देखिले ॥४॥
भावार्थ
महाभारत युध्दप्रसंगी भीष्माचार्य शरपंजरी पडून उत्तरायणाची वाट पहात असतांना ज्या श्रीकृष्णाचे ध्यान करीत होते, राजसूय यज्ञानंतर इंद्रप्रस्थनगरी धर्मराजाने ज्या श्रीधराला प्रथम पूजेचा मान दिला, शंभर अपराध सहन करून ज्या चक्रपाणीने शिशुपालाला मृत्युदंड दिला त्याच जगदीश्वराला विटेवर उभा असलेला पाहून त्याचे पूजन केले असे एका जनार्दनी म्हणतात. 
१००
गोकुळी जे शोभले । ते विटेवरी देखिले ॥१॥ काळ्या पृष्टी शोभले । ते विटेवरी देखिले ॥२॥ पूतनेहृदयी शोभले । ते विटेवरी देखिले ॥३॥ काळयवने पाहिले । ते विटेवरी देखिले ॥४॥ एका जनार्दनी भले । ते विटेवरी देखिले ॥५॥
भावार्थ
गोकुळात गोप गोपिकांबरोबर क्रीडा करीत असताना जे श्रीहरी रूप शोभून दिसत होते, यमुनेच्या काळ्या डोहात कालियानागाच्या फण्यावर श्रीधराने जे रूप धारण केले होते, पूतनेचा वध करतांना बाळकृष्णाचे जे स्वरुप प्रत्ययास आले, काळयवनाच्या अंतसमयी योगेश्वराचे जे भयानक रौद्र रूप दिसले तेच रुप विटेवर दिसत आहे असे एका जनार्दनी या अभंगात कथन करतात. 
१०१
जें द्रौपदीने स्मरिलें । तें विटेवरी शोभलें ॥१॥ जे अर्जुनें स्मरिलें । तें विटेवरी शोभलें ॥२॥ जेणें गजेंद्रा उध्दरिले । तें विटेवरी शोभलें ॥३॥ जे हनुमंतें स्मरिलें । तें विटेवरी शोभलें ॥४॥ जें पुंडलिके ध्याइलें । ते एका जनार्दनीं देखिलें ॥५॥
भावार्थ
हस्तिनापूरच्या राजसभेंत द्रौपदी वस्त्र हरणाच्या प्रसंगीं द्रौपदीने ज्याचा धावा केला. महाभारताच्या अंतिम युध्दांत अर्जुनाने सतत ज्याचे स्मरण केले, मगरीच्या मगरमिठींत सापडलेल्या गजेंद्राला ज्याने मुक्त केले, भक्तराज पुंडलिकाने ज्या चरणांना अठ्ठावीस युगे विटेवर उभे केले त्याच चरणांचे एका जनार्दनीं एकाग्र चित्ताने दर्शन घेतात. 
१०२
मुख सुंदर मंडित साजिरा । विंझणे वारिती राहीरखुमाई सुंदरा ॥१॥ नवल वो हरी देखिला डोळां । पाहतां पाहतां मन विरालें अबळा ॥२॥ नेणें तहान भूक लज्जा अपमान । वेधिलें देवकीनंदनें गे माय ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां मुख । मुख पाहतां अवघें विसरलो दु:ख ॥४॥
भावार्थ
साजिरे सुंदर मुखकमल धारी श्रीहरीला रखुमाई पंख्याने वारा घालित आहे. हे अनुपम सौंदर्य डोळ्यांत साठवित असतांना त्या रुपाने मन असे वेधले गेले की, तहान भूक हे देहभाव तसेच लज्जा, अपमान हे मनोभाव त्यां रूपांत विरघळून गेले. एका जनार्दनीं म्हणतात, अपूर्व सुंदर मुख दर्शनाने सारे दु:ख विसरले. 
१०३
जयाचे पाहतां श्रीमुख । हरे कोटी जन्म दु:ख ॥१॥ तो हा उभा विटेवरी । भक्तकाज म्हणवी कैवारी ॥२॥ वेदासी जो दुर्गम । आम्हां कळलें तयाचे वर्म ॥३॥ ऐसा भक्तवत्सल तो एक दीनानाथ । एका जनार्दनीं तया ध्यात ॥४॥
भावार्थ
भक्तांच्या उध्दारासाठी विटेवर उभा असलेला पांडुरंग भक्तांचा कैवारी असून वेदांना ह्या अवतार लीला अगम्य वाटतात. भागवत धर्माचे आचरण हाच ह्या रुपाला समजून घेण्याचा मार्ग आहे. भक्तवत्सल पांडुरंग दीनांचा नाथ आहे. या पांडुरंगाचे दर्शंन कोटी जन्माचे दु:ख संपवते. एका जनार्दनीं सतत या विठ्ठलमूर्तीचे ध्यान करतात. 
१०४
ठेवणें अनंत जन्माचे । सांपडलें आजी साचें ॥१॥ पुंडलिके ते पोखलें । जगा उपकार केलें ॥२॥ महा पातकी चांडाळ । मुक्त होय दरूशनें खळ ॥३॥ एका जनार्दनीं निश्चय । वेदादिका हा आश्रय ॥४॥
भावार्थ
अनंत जन्म घेऊन जे परमात्म तत्व शोधण्याचा प्रयास केला ते सहज सापडले. भक्त पुंडलिकाने ते निधान विटेवर उभे करून भाविकांवर मोठे उपकार केले. महापातकी दुष्ट चांडाळ सुध्दां या चरणांच्या दर्शनाने मुक्त होतो असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, वेदश्रुतींना याच चरणांचे अधिष्ठान आहे. 
१०५
साजिरें सुंदर श्रीमुख पाहतां । नाठवें ती चिंता संसाराची ॥१॥ तो हा पांडुरंग विटेवरी उभा ।त्रैलोक्याचा गाभा शोभतसे ॥२॥ एका जनार्दनीं कर ठेवूनी कटीं ।उभा वाळुवंटी चंद्रभागे ॥३॥
भावार्थ
चंद्रभागेच्या वाळवंटी दोन्ही कर कटीवर ठेवून उभा असलेला त्रैलोकीचा गाभा पांडुरंगाच्या सगुण रुपांत शोभून दिसतो. हे साजिरे सुंदर श्रीमुख पाहतांच भक्त संसाराच्या सगळ्या भय-चिंता विसरून जातो. 
१०६
कृपाळु उदार । उभा कटीं ठेवुनी कर ॥१॥ सर्व देवांचा हा देव । निवारी भेव काळाचें ॥२॥ निघतां शरण काया वाचा । चालवी त्याचा योग क्षेम ॥३॥ दृढ वाचे वदतां नाम । होय निष्काम संसारी ॥४॥ एका जनार्दनीं ठेवणें खरें तें जाणें पंढरी ॥५॥
भावार्थ
भाविकांवर उदारपणे सतत कृपेचा वर्षाव करणारा देवाधिदेव कटीवर कर ठेवून उभा आहे. जे भक्त काया, वाचा, मनाने या देवाला शरण जातात त्यांच्या उदरनिर्वाह तो चालवतो. श्रध्दापुर्वक या विठ्ठलाच्या नामाचा घोष करणार्या भक्तांच्या संसारातील मायेंत गुंतलेल्या वासना नाहिशा करून त्यांना निष्काम भक्तीप्रेमाचा मार्ग दाखवतो. एका जनार्दनीं म्हणतात, या देवाचे सत्य स्वरुप पंढरीचे भोळेभाबडे भक्त जाणतात. 
१०७
काया वाचा मन एकविध करी । पाहे तो श्रीहरी पंढरीये ॥१॥ ब्रह्मादिक जया ध्याती शिवादि वंदिती ।ती विटेवरी मूर्ति पांडुरंग ॥२॥ वेद पैं भागले शास्त्रें वेवादती । पुराणांसी भ्रांती अद्यापवरी ॥३॥ नेति नेति शब्दें श्रुती त्या राहिल्या । न कळे तयाला पार त्याचा ॥४॥ एका जनार्दनीं भक्तालागीं सोपा । भीमातटीं पाहें यां विठ्ठलासी ॥५॥
भावार्थ
ब्रह्मादि देव ज्या रूपाचे ध्यान करतात, शिवशंकर ज्या पदांना वंदन करतात, या परमात्म स्वरूपाचे वर्णन करतांना वेदश्रुती थकून स्तब्ध होतात. साही शास्त्रे निरंतर चर्चा करूनही या परमेश्वरी स्वरूपाचा निश्चित निर्णय करू शकत नाही. अठरा पुराणे या देवाधिदेवाच्या अवतार लीलांचे रहस्य जाणून घेऊ शकत नाही. त्या पंढरीच्या श्री हरी दर्शनाने भक्त काया वाचा मने एकाग्र होतात. भीमातटीं उभा असलेला हा पांडुरंग भक्तीप्रेमाने सहज आपलासा करता येतो असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात. 
१०८
परब्रह्म मूर्ति विठ्ठल विटेवरी । चंद्रभागेतीरीं उभा असे ॥१॥ तयाचे चरण आठवी वेळोवळां । सर्व सुख सोहळा पावशील ॥२॥ अविनाश सुख देईल निश्चयें । करीं या लवलाहें लाहो त्याचा ॥३॥ श्रीविठ्ठलचरणीं शरण तूं जाई । एका जनार्दनीं पाहीं अनन्यभावें ॥४॥
भावार्थ
परब्रह्म परमात्मा विठ्ठलमूर्ति स्वरूपांत चंद्रभागेच्या तीरावर विटेवर उभा आहे त्याच्या चरणांचे नित्य स्मरण करावे. अविनाशी सुखाचा सोहळा प्राप्त होईल. या विठ्ठल चरणांना अनन्यभावें शरण जावे असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात. 
१०९
अनंता जन्मींचे पुण्य बहुत । तें देखे पंढरीनाथ ॥१॥ वांयां शिणतात बापुडीं । काय गोडी धरुनी ॥२॥ पाहतां विठ्ठलाचे मुख ।हरे सर्व पाप निवारें दु:ख ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठल उभा । त्रैलोक्याचा गाभा विटेवरी ॥४॥
भावार्थ
अनंत जन्म घेऊन मोठा पुण्यसाठा गाठीं असेल तरच पंढरीनाथाचे दर्शन घडते या अलभ्य दर्शनाने सर्व पापांचे हरण होऊन सर्व दु:खांचे निवारण होते. त्रैलोक्याचा गाभा विठ्ठलरूपाने विटेवर उभा आहे, या दर्शनाची गोडी सोडून अन्य तीर्थयात्रा करून निष्कारण देह शिणवतात असे एका जनार्दनीं या अभंगात सुचवतात. 
११०
उदार उदार । सखा पांडुरंग उदार ॥१॥ ठेवा मन त्याचे पायीं । तुम्हां उणें मग कायीं ॥२॥ दुजीयांसी कींव । कां रे भाकितसां जीव ॥३॥ तीं काय देतील बापुडीं । एका जनार्दनीं धरा गोडी ॥४॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनीं विठ्ठल भक्तीची मनाला गोडी लावा असे सांगत आहेत. भक्तांचा सखा पांडुरंग अतिशय उदार असून भक्तांच्या सर्व कामना पुर्ण करण्यास समर्थ आहे. दुसर्या कुणापुढे भिक मागण्याची गरज नाही. जे स्वता:च दीन आहेत ते इतरांना मदत करू शकत नाहीत. विठ्ठलाच्या चरणांवर दृढ विश्वास ठेवावा. 
१११
आणिकांसी जातां शरण । हें तों तुम्हां उणीवपण ॥१॥ दास विठोबाचे व्हावें । तिहीं सर्व सुख भोगावें ॥२॥ एका जनार्दनीं म्हणा दास । तुमची आस पुरवील ॥३॥
भावार्थ
विठोबाचे चरण सोडून आणखी कोणाला शरण जाणे हे कमीपणाचे आहे. विठोबाचे दास होऊनि सर्व सुखाचे भागीदार व्हावे. एका जनार्दनीं म्हणतात, विठोबा दासांच्या सर्व कामना पूर्ण करतो. 
११२
पुरवावया मनोरथ । उभा अनाथनाथ विठ्ठल ॥१॥ भोळेभाळे येती शरण । चुकवी त्यांचे जन्ममरण ॥२॥ एका जनार्दनीं भाव ।अर्पूनिया भाका कींव ॥३॥
भावार्थ
अनाथांचा नाथ विठ्ठल शरण आलेल्या भोळ्याभाबड्या भाविकांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी उभा आहे. एका जनार्दनीं म्हणतात, भक्तीभाव अर्पून करुणा भाकणार्या भक्तांचे तो जन्ममरण चुकवतो. 
११३
आणिकांचे मत नका पडूं तेथ । भजा पंढरीनाथ एकभावें ॥१॥ काय होणार तें होईल देहाचें । नाशिवंत साचें काय हातीं ॥२॥ मृत्तिकेचा गोळा गोळाचि मृत्तिका । वाउगाचि देखा शीण वाहे ॥३॥ घट मठ जेवीं आकाश निराळें । एका जनार्दनीं खेळे अकळची ॥४॥
भावार्थ
मानवी देह पृथ्वी, आकाश, वायु, अग्नीं, पाणी यांपासून बनलेला असून नाशवंत आहे. हा देह मातीचा असून शेवटी मातितच मिळतो. या देहाची चिंता करणे निरर्थक आहे. एका जनार्दनीं म्हणतात, याविषयीं अनेक मत मतांतरे आहेत त्यांत लक्ष न घालतां भक्तीभावाने पंढरीनाथाचे भजन करणे श्रेयस्कर आहे. 
११४
भलते भावे शरण येतां । निवारी जन्ममरण चिंता । उदार लक्ष्मीचा दाता । साक्ष पुंडलिक करूनी सांगे ॥१॥ येथें या रे लहान थोर । भावें नारी अथवा नर । मोक्षाचा विचार । न करणे कवणाही ॥२॥ एका दरूशने मुक्ती । पुन्हां नाहीं जन्मावृत्ती । एका जनार्दनीं चित्तीं । सदोदित तें सुख ॥३॥
भावार्थ
लक्ष्मीपती श्रीहरी अत्यंत उदार असून भक्तीभावानें शरण जाणार्या भाविकांची जन्ममरण चिंता निवारण करतो. कोणत्याही वयाचे लहान थोर नर नारी पंढरींत आल्यास त्यांना मोक्षाची चिंता करावी लागत नाही. केवळ एका दर्शनाने जन्ममरणाचे फेरे चुकवून मुक्ति मिळतें, शाश्वत सुख प्राप्त होते असे एका जनार्दनीं या अभंगात म्हणतात. 
११४
भलते भावे शरण येतां । निवारी जन्ममरण चिंता । उदार लक्ष्मीचा दाता । साक्ष पुंडलिक करूनी सांगे ॥१॥ येथें या रे लहान थोर । भावें नारी अथवा नर । मोक्षाचा विचार । न करणे कवणाही ॥२॥ एका दरूशने मुक्ती । पुन्हां नाहीं जन्मावृत्ती । एका जनार्दनीं चित्तीं । सदोदित तें सुख ॥३॥
भावार्थ
लक्ष्मीपती श्रीहरी अत्यंत उदार असून भक्तीभावानें शरण शरण जाणार्या भाविकांची जन्ममरण चिंता निवारण करतो. कोणत्याही वयाचे लहान थोर नर नारी पंढरींत आल्यास त्यांना मोक्षाची चिंता करावी लागत नाही. केवळ एका दर्शनाने जन्ममरणाचे फेरे चुकवून मुक्ति मिळतें, शाश्वत सुख प्राप्त होते असे एका जनार्दनीं या अभंगात म्हणतात. 
११५
ॐकार स्वरूप सद्गुरू असंग । अक्षय अभंग पांडुरंग॥१॥ नसे ज्याचे ठायीं द्वैताद्वैत भाव । ब्रह्म स्वयमेव पांडुरंग ॥२॥ मस्तक हें माझें तयाचे चरणीं । असे जनीं वनीं पांडुरंग ॥३॥ सद्सद्भाव हे नसती ज्याचे ठायीं । नित्य तो मी गाई पांडुरंग ॥४॥ गुरूराज माझा दीनांचा दयाळ । तोडी मायाजाळ पांडुरंग ॥५॥ श्रीमान हा माझा सद्गुरू समर्थ । देई मोक्ष स्वार्थ पांडुरंग ॥६॥ डुरकणी देई मोह पंचानन । करी त्या हनन पांडुरंग ॥७॥ रंगे चित्त माझे तयाच्या स्वरुपीं ।असे आप आपी पांडुरंग ॥८॥ गर्व अभिमान झाडावा समूळ । भेटे तो दयाळ पांडुरंग ॥९॥ महा माया एके क्षणांत निरसी । सुखाची पैं राशी पांडुरंग ॥१०॥ भूतळीं या नसे दुजा कोणी ऐसा ।भक्तांचा कोंवसा पांडुरंग ॥११॥ नेई भक्तांसी जो आपुल्या समीप ।तो हा मायबाप पांडुरंग ॥१२॥ तीकडी सांखळी त्रिगुणाची तोडी । भवातूनि काढी पांडुरंग ॥१३॥ उपमा तयासी काय देऊं आतां । सकळ अर्थदाता पांडुरंग ॥१४॥ भक्तालागी अवतार केला । आनंदाचा झेला पांडुरंग ॥१५॥ नाम हे जयाचे जन्ममरण वारी । मक्ता सहाकारी पांडुरंग ॥१६॥ मन हें जडलें तयाचियां पदी ।उतरी भवनदी पांडुरंग ॥१७॥ काया वाचा मनें स्वरुपी रहावें । नाम आठवावें पांडुरंग ॥१८॥ यम नियम साधी साधन अष्टांग । होईल सर्वांग पांडुरंग ॥१९॥ एका जनार्दनीं देह हारपला । होऊनि राहिला पांडुरंग ॥२०॥
भावार्थ
ॐ कार स्वरुप असलेला पांडुरंग चिरंतन, इंद्रिय विषयांचा संग नसलेला (असंग) आणि अभंग आहे. तो साक्षात ब्रह्मरूप असून त्याच्या ठिकाणी द्वैत आणि अद्वैत असे दोन्ही भाव नाहीत. सर्व सजीव प्राणी व वनस्पती या मध्ये भरून राहिलेला पांडुरंग सद् आणि असद् या दोन्ही भावांपासून वेगळा आहे. दीनदयाळ पांडुरंग, भक्तांचा मायेची बंधन तात्काळ तोडून टाकतो. या तेजमूर्ति पांडुरंगाच्या तेजानेच सूर्य, चंद्र या ज्योती प्रकाशित होतात. ह्या वेदमूर्ति पांडुरंगाची वेद नित्य स्तुती करतात. हा पांडुरंग ज्ञानाची खाण असून पंचमहाभुतांवर याची अबाधित सत्ता चालते. मोहरूपी वनराजाचे हनन करून हा पांडुरंग जिवांचे रक्षण करतो. गर्व, अभिमान समूळ नाहिसा करून ज्याचे चित्त शुध्द झाले आहे अशा भाविकांना तो पांडुरंग भेटतो. त्याच्या स्वरूपी या भक्तांचे चित्त रंगून जाते. सुखाची राशी असलेला हा पांडुरंग महामायेचे एका क्षणांत निरसन करतो. सद्गुरू चरणांची साधकाची ईच्छा तो पूर्ण करतो. त्रैलोक्याचा गुरूराज स्वामी पांडुरंग प्रत्येकाच्या अंत:करणांत वास करून जाया, पुत्र, धन देऊन त्यांच्या कामना पूर्ण करतो, त्या भक्ताचे सर्वप्रकारे रक्षण करतो. पांडुरंग रूपी गुरूमुर्ति भेटतांच मृत्युचे भय नाहीसे होते. हा पाडुरंग चिद् रुपाची खाणी असून त्याच्याच रूपाने हे सर्व विश्व नटलें आहे. त्या विश्वेश्वरा सारखा या भुतलावर कोणिही नाही. हा पांडुरंग विश्वाचा मायबाप होऊन प्रतिपाळ करतो. त्या विश्वंभराची सेवा करणे हीच मानवी जीवनाची सार्थकता आहे. सत्व, रज, तम या त्रिगुणात्मक गुणांची सांखळी तोडून हा देवाधिदेव भवसागरातून सुटका करतो. हा सर्वदाता पांडुरंग अनुपमेय आहे साधकांवर उपकार करण्यासाठीं त्याने अवतार धारण केला असून तो सद्-चिद्-आनंद स्वरूप आहे. या पांडुरंगाचे नामस्मरण करून कायावाचामने त्याची भक्ती करावी. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ध्यान, धारणा, समाधी ही अष्टांग योगाची आठ अंगे आहेत. या आष्टांगयोगाची साधना केल्यास सर्वागानें पांडुरंग स्वरूप होता येईल असे एका जनार्दनीं म्हणतात. 

N/A

References : N/A
Last Updated : August 31, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP