२४२
जनार्दने मज केला उपकार । पाडिला विसर प्रपंचाचा प्रपंच पारखा झाला दुराचारी । केलीसे बोहरी काम-क्रोधा आशातृष्णा ह्यांचे तोडियेले जाळे ।कामनेचें काळें केलें तोंड एका जनार्दनी तोडिलें लिगाड । परमार्थ गोड दाखविला
भावार्थ
जनार्दन स्वामींनी आपल्यावर फार मोठा उपकार केला आहे. त्यांच्या कृपेनें नश्वर प्रपंचाची बंधने तुटून पडली आणि प्रपंचाचा विसर पडला. ज्या प्रपंच्याच्या मोहाने अनेक दुराचार घडतात त्या प्रपंचा पासून सुटका झाली, काम व क्रोध चित्तातून हद्दपार झालें. आशातृष्णा जाळ्यांत अडकलेलें मन जाळे तोडून मुक्त झाले. कामनेचे पूर्ण उच्चाटन झाले, अत्यंत गोड फळे देणार्या परमार्थाची ओळख पटली. असे एका जनार्दनी म्हणतात.
२४३
सर्व भावें दास झालों मी उदास । तोडिला मायापाश जनार्दने माझें मज दाविलें माझें मज दाविलें । उघडें अनुभवले परब्रह्म रविबिंबा परी प्रकाश तो केला । अंधार पळविला काम क्रोध एका जनार्दनी उघडा बोध दिला ।तो चा टिकवला हृदया माजी
भावार्थ
जनार्दन स्वामींनी केलेल्या उपदेशाने ऐहिक गोष्टीं बाबत उदासीन वृत्ती निर्माण झाली. स्वामींचा एकनिष्ठ दास बनलो. स्वता:चे आत्मरुप बघावयास मिळाले, परब्रह्म स्पष्टपणें अनुभवास आले. आत्मबोधारुपी सूर्यप्रकाशाचा उदय झाला, काम क्रोधाचा अंधार नाहीसा झाला. सद्गुरू जनार्दन स्वामींचा उपदेश हृदयांत कायमचा ठसविला असे एका जनार्दनी सांगतात.
२४४
अभिनव गुरुने दाखविले । ओहं सोनं माझे गिळिलें प्रपंचाचे उगवोनि जाळे ।केलें षडवैरियांचे तोंड काळें उदो-अस्ताविण प्रकाश । स्वयें देही दाविला भास मीपण नाहीं उरले । एका जनार्दनी मन रमलें
भावार्थ
सद्गुरूघ्या कृपेने मी-तू पणाचे सर्व भेदाभेद नाहिसे झाले. प्रपंचाचे जाळें मोकळे झाले. काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार या षड्ररिपूंनी तोंड काळें केले. सूर्योदय व सूर्यास्त या शिवाय निरंतर आत्मबोधाचा प्रकाश सर्व देही भरून राहिला. एका जनार्दनी म्हणतात सद्गुरू वचनात मन कायमचे गुंतून राहिले.
२४५
अभिनव सांगतां विस्मयो दाटला । देही च भासला देव माझ्या नवल कृपेचे विंदान कसे । जनार्दनें सरसें केलें मज साधनाची आटी न करितां गोष्टी । हृदय-संपुटी दाविला देव एका जनार्दनी एकपणें शरण । न कळे महिमान कांहीं मज
भावार्थ
सद्गुरूंनी सांगितलेल्या अभिनव गोष्टींनी विस्मय वाटला. आपल्या देहातच देव सामावलेला आहे या सत्य वचनाची प्रचिती आली. कोणत्याही साधनेचा आटापिटा न करता अंत:करणांत वसत असलेला देव दाखवला. एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरूंचा महिमा अपार असून त्याचे वर्णन करणे शक्य नाही. सद्गुरूंना अनन्यपणे शरण जाणे च योग्य आहे.
२४६
पीक पिकलें प्रेमाचे । साठवितां गगन टांचें भूमि शोधोनि पेरिलें बीज । सद्गुरू -कृपें उगवले सहज कामक्रोधांच्या उपटोनी बेडी । कल्पनेच्या काथा काढी एका जनार्दनी निभाव । विश्वंभरित पिकला देव
भावार्थ
प्रेमाचे एव्हढे अमाप पीक पिकले कीं, ते साठवण्यासाठी गगन अपुरे पडले. सुयोग्य अशी भूमी शोधून तेथे बी पेरले आणि सद्गुरू कृपेने ते बीज सहज उगवले. काम क्रोधाचे तण काढून टाकले, कल्पनेचा समूळ नाश केला. एका जनार्दनी म्हणतात, भाव-भक्तिच्या योगानें विश्वंभर देव प्रसन्न झाला.
२४७
भक्ति आणि मुक्ति फुकाचें ठेवणे । गुरु जनार्दन तुच्छ केलें साधन आष्टांग यज्ञ तप दान ।तीर्थे तीर्थाटण शीण वाया एका जनार्दनी दाविला आरसा ।शुध्द त्यां सरिसा सहज झालों
भावार्थ
सद्गुरू जनार्दन स्वामींनी भुक्ति आणि मुक्ति या गोष्टी निरुपयोगी ठरवल्या आहेत. स्वामी या गोष्टी तुच्छ मानतात. यज्ञ, तप, दान, तीर्थयात्रा ह्या अष्टांग साधनांचा निरर्थक शीण होतो. एका जनार्दनी म्हणतात सद्गुरूंनी परम तत्वाचा आरसा दाखवून निजरुप प्रत्ययास आणले.
२४८
गुरु-कृपांजन पायो मेरे भाई । राम बिना कछु जानत नाहीं अंतर राम बिहार राम । जहूं देखो तहं राम ही राम जागत राम सोवत राम । सपनेमें देखो राजा राम एका जनार्दनी भाव ही नौका । जो देखो सो राम सरिखा
भावार्थ
गुरु-कृपा रुपी अंजन डोळ्यांत घातले की, सारे विश्व रामरुप दिसू लागते. देहाच्या अंतरांत आणि बाहेर सर्वत्र रामाचे दर्शन घडते. जिकडे पहावे तिकडे रामरुप भरून राहिले आहे याचा प्रत्यय येतो. जागेपणी आणि झोपेंत तसेच स्वप्नांत देखील केवळ राम च दिसतो. एका जनार्दनी म्हणतात, राम-चरणाशी असलेला भक्ति -भाव हा च प्रत्ययकारी असून या भक्तिभावाने भेटणारा प्रत्येक जण राम च आहे असे वाटते.
२४९
ओहं कोहं सोहं सर्व आटलें । दृश्य द्रष्टत्व सर्व फिटले ऐसी कृपेची साउली । माझी जनार्दन माउली द्वैत -अद्वैताचे जाळें । उगविलें कृपा-बळें शरण एका जनार्दनी । एकपणें भरला अवनी
भावार्थ
एका जनार्दनी म्हणतात मी-तूं पणाचे सर्व भेदाभेद नाहिसे झाले. दृष्टीस भासणारे सर्व विश्व निराभास झाले . द्रुष्य, द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी विलयास जाऊन द्वैत-अद्वैत यांचे मायाजाल विरुन भक्त आणि देव एकरुप झाले, हे सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपा-प्रसादाने घडून आले.
२५०
वेणुनादाचिया किळा । पान्हा फुटला निराळा आर्तभूत जीव तिन्हीं । चातक निघाले जीवनीं स्वानुभवाचे सरिता । जेंवि जीवना दाटे भरते एका एक गर्जे घनीं । पूर आला जनार्दनी
भावार्थ
श्री हरीच्या बासरीचा स्वर कानी पडला आणि भक्तिभावना उचंबळून आल्या. आर्त, जिज्ञासू, आणि साधक हे तिन्हीं चातकरुपी जीव स्वानुभवरुपी सरितेच्या जीवनाने तृप्त झाले. एका जनार्दनी म्हणतात, जनार्दन स्वामींच्या कृपा प्रसादानें जीवनाचे सार्थक झाले.