मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
श्रीदत्तनाममहिमा

श्रीदत्तनाममहिमा

प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली.


धरीं अवतार विश्व तारावया । अंत्रीची अनुसूया गरोदर ॥१॥ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी । शुक्लपक्ष दिनीं पूर्णतिथी ॥२॥ तिथी पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरू तो वासर उत्सवात ॥३॥ एका जनार्दनीं पूर्ण अवतार । निर्गुण निराकार आकारले ॥४॥
भावार्थ
मार्गशीर्ष महिना, हेमंत ऋतू, शुक्लपक्षांतिल पौर्णिमेची शुभ तिथी, रोहिणी नक्षत्र आणि गुरुवार या शुभ दिनी निर्गुण, निराकार परमेश्वराने विश्वकल्याणासाठी अवतार धारण करण्याचे ठरवून अत्री ऋषींची भार्या अनुसूयेचे पोटीं जन्म घेतला. एका जनार्दनीं म्हणतात, हा दत्तात्रयाचा पूर्ण अवतार आहे. 

अव्यक्त परब्रह्म न्हाणी पायांवरी । अभेद नरनारी मिळोनियां ॥१॥ पीतांबर पदरें पुशिला घननिळा । निजविला निर्मळ पालखांत ॥२॥ निंब कातबोळ त्रिगुण त्रिखुंडी । प्रेमाचे आवडी सेवा माय ॥३॥ एका जनार्दनीं दत्त पाळण्यांत घातिला । हालविती त्याला अनुसूया ॥४॥
भावार्थ
दत्तजन्माच्या उत्सव सोहळा साजरा करण्यासाठी अनेक स्त्री-पुरूष एकत्र जमले. अव्यक्त परब्रह्म दत्तात्रय या नामरूपाने अवतरले असतां सती अनुसूया त्याला पायांवर घेऊन न्हाऊ घालते, पीतांबराच्या पदरानें त्याचे अंग पुसते. या घननिळाला निर्मळ करून पाळण्यांत निजविते. कडुलिंबाची पाने, कात आणि सुंठ ही त्रीगुणी भुकटी सर्वांना प्रेमाने प्रसाद वाटते. एका जनार्दनीं म्हणतात, अनुसूया दत्ताचा पाळणा हलक्या हाताने झुलवते. 

दत्त वसे औदुंबरीं । त्रिशूळ डमरू जटाधारी ॥१॥ कामधेनु आणि श्वान । उभे शोभती समान ॥२॥ गोदातीरीं नित्य वस्ती । अंगीं चर्चिली विभुती ॥३॥ काखेमाजीं शोभे झोळी । अर्धचंद्र वसे भाळीं ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । रात्रंदिनीं आठवित ॥५॥
भावार्थ
औदुंबर वृक्षाच्या छायेत दत्तगुरूंचा निवास असतो. या जटाधारी देवाने हतांत त्रिशूळ आणि डमरू धारण केले आहेत. अंगाला विभुतीचे लेपन केले असून कपाळावर अर्धचंद्राची कोर शोभून दिसत आहे. गाय आणि कुत्रा पायाशी उभे आहेत. खांद्यावर भिक्षेची झोळी आहे. गोदावरी नदीच्या तीरावर दत्तात्रयाची नित्य वस्ती असते. एका जनार्दनीं या दत्तगुरूंचे रात्रंदिवस स्मरण करतात. 

दत्त माझा दीनानाथ । भक्तालागीं उभा सतत ॥१॥ त्रिशूळ घेऊनियां करीं । उभा असे भक्ताद्वारीं ॥२॥ भाळीं चर्चिली विभुती । रूद्राक्षाची माळ कंठीं ॥३॥ जवळी असे कामधेनु । तिचा महिमा काय वानुं ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । रूप राहिलें हृदयांत ॥५॥
भावार्थ
दत्तगुरू हे दीनांचे नाथ असून भक्तांच्या रक्षणासाठी हातांत त्रिशूळ घेऊन भक्तांच्या दारांत उभे आहेत. त्यांच्या पायाशी कामधेनु उभी असून तिचा महिमा अवर्णनीय आहे. कंठांत रूद्राक्षाची माळ असून कपाळी विभुती लावली आहे. एका जनार्दनीं म्हणतात, हे रूप अंत:करणांत भरून राहिले आहे. 

हातीं कमंडलु दंड । दत्तमूर्ति ती अखंड ॥१॥ ध्यान लागो माझे मना । विनवितो गुरुराणा ॥२॥ हृदयीं वसे क्षमा शांती ॥३॥ तोचि चित्तांत आठव । गुरूराज दत्त देव ॥४॥ एका जनार्दनीं दत्त । तद्रूप हें झालें चित्त ॥५॥
भावार्थ
हातांत कमंडलु आणि अखंड दंड घेतलेल्या गुरूमुर्तिचे मनाला अखंड ध्यान लागावे, हृदयांत सतत क्षमा शांती नांदावी, गुरूराज दत्त देवाचे सतत स्मरण राहावे अशी प्रार्थना एका जनार्दनीं या अभंगात करतात. 

आयुष्य जाय माझें व्यर्थ । दत्त समर्थ महाराज ॥१॥ धांव धांव लवकरी । करूणा करी गुरूराया ॥२॥ मी तव अनाथ अपराधी । हीनबुध्दि स्वामीया ॥३॥ काळ घाला पडिलावरी । धांव श्रीहरी लवलाह्या ॥४॥ दत्ता पतित पावना । शरण एका जनार्दना ॥५॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनीं समर्थ दत्त महाराजाची विनवणी करीत आहेत. आपण अनाथ अपराधी असून गुरूकृपे शिवाय आयुष्य व्यर्थ जात आहे. काळाचा घाला पडल्यावर दत्तगुरूंनी त्वरित धावून यावे, करूणा करावी. पतिताला पावन करावे. 

धांवे पावे दत्तराजा । महाराजा गुरुराया ॥१॥ अनाथासी सांभाळावें । ब्रीद पावन आपुलें ॥२॥ तूजविण सोडवितां । नाहीं त्राता दुसरा ॥३॥ महादोषी पतितालागीं । करा वेगीं उध्दार ॥४॥ एका जनार्दनीं दत्ता । अवधूता माय बापा ॥५॥
भावार्थ
अनाथांचा नाथ हे दत्तराजाचे पावन ब्रीद असून भक्तजनांना तारणारा दुसरा त्राता नाही. महादोषी, पतित जनांचा उध्दार करण्यासाठी, अनाथांना सांभाळण्यास साठी दत्त महाराजांनी धांव घ्यावी अशी प्रार्थना एका जनार्दनीं या अभंगात करतात. 

वेधोनि गलें माझें मन । हारपलें दुजेपण ॥१॥ ऐसी ब्रह्ममूर्ति दत्त । बोतलीसे आनंदभरित ॥२॥ तयाविण ठाव । रिता कोठें आहे वाव ॥३॥ एका जनार्दनीं भरला । सबाह्य अभ्यंतर व्यापिला ॥४॥
भावार्थ
दत्ताची ब्रह्ममूर्ति पाहून मन वेधले गेले. मनांतले सारे द्वैतभाव मावळलें. सर्व विश्वांत आतबाहेर हे ब्रह्मरूप व्यापून राहिलें आहे असा साक्षात्कार झाला. मन आनंदित झाले असा दत्तभेटीचा अनुभव एका जनार्दनीं वर्णन करतात. 

ऐसी जगाची माऊली । दत्तनामे व्यापुनी ठेली ॥१॥ जावें जिकडे तिकडे दत्त । ऐशी जया मति होत ॥२॥ तया सांकडेंचि नाहीं । दत्त उभा सर्वां ठायीं ॥३॥ घात आघात निवारी । भक्तां बाहे धरी करीं ॥४॥ ऐशी कृपाळु माउली । एका जनार्दनीं देखिली ॥५॥
भावार्थ
जिकडे जावे तिकडे दत्त असा अस्तिक्य भाव ज्या साधकाच्या मनांत निर्माण होतो त्याला कोणतेही कोडे (संकट) पडत नाही. अंगावर पडणार्या घात आघातांचे निवारण करण्यासाठीं प्रत्यक्ष दत्त माऊली सर्व ठिकाणीं उभी असते. भक्तांना हात धरून सावरते. अशी जगन्माता दत्त या नामाने विश्वविख्यात आहे. असे सांगून एका जनार्दनीं आपण त्या माऊलीचे दर्शन घेतले आहे असे सांगतात. 
१०
लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा । देखिलासे डोळां दत्तराव ॥१॥ चरणीं घातली मिठी । प्रेम दुणावे पोटीं । पाहतां हारपली दृष्टि दुजेपणा ॥२॥ मन माझें वेधलें परिपूर्ण भरलें । एका जनार्दनीं सांठविलें हृदयीं दत्त ॥३॥
भावार्थ
अत्यंत मनोहर लावण्यपूर्ण प्रेमाचा पुतळा डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितला असा अनुभव एका जनार्दनीं या अभंगात कथन करतात. या दत्त दर्शनाने मनातील द्वैतभाव विलयास गेला. चरणांना मिठी घालतांच अंत:करणातिल प्रेमभावाला भरती आली. मन भक्तीप्रेमाने परिपूर्ण भरले. एका जनार्दनीं म्हणतात, हे सद्गुरू रूप हृदयांत पूर्णाशांने साठवले. 
११
आमुचे कुळीचें दैवत । श्रीगुरुदत्तराज समर्थ ॥१॥ तोचि आमुचा मायबाप । नाशी सकळ संताप ॥२॥ हेंचि आमुचे व्रत तप । मुखीं दत्तनाम जप ॥३॥ तयाविण हे सुटिका नाहीं नाहीं आम्हां देखा ॥४॥ एका शरण जनार्दनीं । दत्त वसे तनमनीं ॥५॥
भावार्थ
सद्गुरु जनार्दन स्वामींना शरणागत झालेले एका जनार्दनीं सांगतात, श्रीगुरुदत्त हे त्यांच्ये कुळदैवत आहे. सर्व प्रकारचे संसार ताप नाहिसे करणारे मायबाप आहेत. दत्तगुरुंची सेवा हे त्यांच्या घराण्याचे व्रत असून सर्व द्वंद्वात्मक दु:खे दूर करण्यासाठी दत्तनामाचा जप ही च साधना आहे. दत्त गुरु त्यांच्या तन मनीं ध्यानीं वास करतात. दत्तगुरुंशिवाय त्यांना दुसरा तरणोपाय नाही. 
१२
आत्मज्ञान बिंबलें हृदयीं । दत्त वोळखिला ठायीं ॥१॥ पारिखेपणा दूर केला । अवघा दत्तचि गमला ॥२॥ नामें पावन चराचरें । तें दत्तनाम दोन अक्षरें ॥३॥ एका जनार्दनीं छंद । दत्तनामें लागला वेधु ॥४॥
भावार्थ
सद्गुरू कृपेने चित्तांत आत्मज्ञानाचा उदय झाला. दत्तगुरुंची ओळख पटली. दुरावा नाहिसा झाला. सर्वाठायीं दत्तरूप भरून राहिले आहे याचा प्रत्यय आला. दत्तनामानें चराचर पावन झाले. दत्त या दोन अक्षरी नामाचा मनाला छंद जडला. मनाला दत्त दर्शनाचा वेध लागला असे एका जनार्दनीं म्हणतात. 
१३
श्रीगुरूकृपे दत्त वोळखिला । हृदय डोल्हार्यावरी बैसविला । अभेद पूर्ण चांदवा तेथें दिला । शुध्द भक्तीनें दत्त पूजियेला ॥१॥ दत्त चरणीं मज लागलीसे गोडी । भवभयाची तुटोनी गेली बेडी ॥ध्रृ०॥ सोहं गुढी तेथें उभारली । मंत्र उपदेशें देहबुध्दि गेली । पूर्ण निवृत्ती प्रवृत्तीही धाली । सहज पूर्णानंद पूर्णता आली ॥२॥ जिकडे पाहे तिकडे चक्रपाणी । बोलावयाची राहिली शिराणीं । जनीं वनीं एकात्मता खाणीं । एका जनार्दनीं रंगलीसे वाणी ॥३॥
भावार्थ
सद्गुरु कृपेने दत्तस्वरुपाची ओळख पटली. हृदयाच्या हिंदोळ्यावर दत्तगुरुंची स्थापना करून अभेद भावभक्तीने दत्ताचे पूजन केले. दत्तचरणाची गोडी निर्माण होऊन संसार भयाची शृंखला गळून पडली. दत्त नाममंत्राने देहबुध्दी विलयास जाऊन स्वानंदाची गुढी उभारली. प्रवृतीची पूर्ण निवृत्ती झाल्याची अनुभूती आली. अंत:करणांत सहज पूर्णानंदाची भरती आली. जनीं वनीं सर्वत्र, जिकडे पहावे तिकडे चक्रपाणी एकात्मरूपाने व्यापून आहे याची जाणीव झाली. एका जनार्दनीं म्हणतात, या असामान्य अनुभूतीचे वर्णन करताना वाणी रंगून गेली. 
१४
स्वानंदे आवडी दत्त पाहूं गेलों डोळां । तंव चराचर अवघे श्रीदत्तची लीला ॥१॥ विस्मयो दाटला आतां पाहूं मी कैसें । देखता देखणें अवघें दत्तचि दिसे ॥२॥ असे आणि नसे हा तंव विकल्प जनांत । जनीं जनार्दन निजरूपें दत्त ॥३॥ एका जनार्दनीं तेथें अद्वय नित्य । सबाह्य अभ्यंतरी दत्त नांदत ॥४॥
भावार्थ
अत्यंत आनंदाने दत्त दर्शनाची आवड पूर्ण करण्यासाठी गेलो असतां सर्व चराचर सृष्टी ही दत्ताचिच लीला आहे असा अनुभव आला. दत्त, दर्शन आणि देखावा ही त्रिपुटी विलयास जावून सगळीकडे दत्तरूपच भरले आहे असा अनुभव येवून मनाला विस्मय वाटला. असणे, नसणे हा विकल्प जावून अद्वैताची नित्य भावना चित्तांत दाटून आली. विश्वांत आणि अंतरांत एकच दत्त नांदत आहे याची खात्री पटली. सद्गुरु जनार्दन हे निजरुपाने दत्तस्वरूप आहेत असे एका जनार्दनीं म्हणतात. 
१५
मनासी स्थिरता नामें दत्त वेध । दुजा नाहीं छंद आणीक कांहीं ॥१॥ म्हणोनि संकल्प दृढ झाला पायीं । दत्तावांचुनी ठायीं नोहे कांहीं ॥२॥ पाहतां पाहाणे परतलें मन । पाहण्याचें विंदान विसरले ॥३॥ एका जनार्दनीं परब्रह्म पुतळा । दत्त देखिला डोळां आत्मदृष्टी ॥४॥
भावार्थ
अत्यंत एकाग्रतेने दत्त नामाचा जप करण्याशिवाय वेगळा छंद नसल्याने मनाचा निश्चय दृढ झाला. दत्त भजनाशिवाय दुसरा विचार मनाला सुचेनासा झाला. दत्त दर्शनाची ओढ संपली. एका जनार्दनीं म्हणतात, दत्तगुरू हा परब्रह्म पुतळा आत्मदृष्टीने पाहिला. 
१६
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती वेगळा । पाहे तो सांवळा दत्तरावो ॥१॥ मन माझे वेधलें दत्ताचे चरणीं । नाहीं आन मनीं दुजा छंद ॥२॥ परात्पर पहावा हृदयी तैसा ध्यावा । एका जनार्दनीं सांठवावा दत्त मनीं ॥३॥
भावार्थ
ब्रह्मा रजोगुणी, विष्णु सत्वगुणी, महेश तमोगुणी असे मानतात परंतु सांवळा दत्तगुरू या त्रिगुणात्मक त्रिमूर्ती पेक्षा वेगळा, गुणातित आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, मन दत्तचरणीं गुंतले, मनाला दुसरा छंद उरला नाही. दत्तराज नयनांनी पहावा, हृदयांत ध्यान करावे आणि मनांत सांठवावा. 
१७
दत्तात्रय नाम । नित्य जपे जो निष्काम ॥१॥ तया नाहीं द्वैतभाव । दृष्टि दिसे गुरूराव ॥२॥ दत्ताविण नसे स्थान । दत्तरूप जनवन ॥३॥ ध्यानीं मनीं दत्तराज । दत्ताविण नांही काज ॥४॥ एका जनार्दनीं जपा । दत्तनाम मंत्र सोपा ॥५॥
भावार्थ
दत्तनामाचा जप निष्कामपणे कोणतिही वासना मनांत न ठेवतां करतो त्याला दत्तगुरू स्वता: दर्शन देतात, त्या भक्ताचा द्वैतभाव नाहिसा होतो. जनीं, वनीं, स्वप्नीं दत्तरूप प्रत्ययास येते. ध्यानी मनीं दत्ताशिवाय अन्य कांहीं जाणवत नाही. एका जनार्दनीं म्हणतात, दत्तनामाचा सोपा मंत्र जपावा. 
१८
खुंटलासे शब्द बोलता आनंद । सर्व ब्रह्मानंद कोंदाटला ॥१॥ तें हें दत्तनाम आवडी आदरें । उच्चारी सोपारें सर्वकाळ ॥२॥ कलिमाजीं सोपें दत्तनाम घेतां । संसाराची वार्ता उरो नेदी ॥३॥ एका जनार्दनीं लागलासे छंद । दत्तनामें आनंद सर्वकाळ ॥४॥
भावार्थ
दत्तनामाचा जप करतांना जो आनंद मिळतो त्याचे वर्णन करतांना शब्द सापडत नाही, तो आनंद शब्दातीत असतो. कलियुगांत सोपे दत्तनाम घेतांना संसाराचा विसर पडतो. ह्या दत्तनामाचा जप अत्यंत आदराने मनापासून करावा. एका जनार्दनीं म्हणतात. दत्तनामाचा छंद म्हणजे सर्वकाळ टिकणारा आनंद!
१९
दत्त नामाचा उच्चार । मुखीं वसे निरंतर ॥१॥ तयापाशीं शांति क्षमा । प्राप्त होय निजधामा ॥२॥ सर्व सुखें तयापाशीं । ऋध्दिसिध्दि त्याच्या दासी ॥३॥ भुक्ति मुक्ति लोटांगणीं । लागताती त्या चरणीं ॥४॥ म्हणे एका जनार्दन मना लागलेंसे ध्यान ॥५॥
भावार्थ
मुखाने सदासर्वदा दत्तनामाचा उच्चार करणार्या साधकाच्या मनांत सतत क्षमा, शांती नांदत असते. ऋध्दि सिध्दि दासी बनून सेवा करतात. भुक्ति, मुक्ति आदराने चरणवंदन करतात. सर्व सुखे प्राप्त होतात. एका जनार्दनीं दत्तगुरूंचे निरंतर ध्यान लागावे अशी प्रार्थना करतात. 
२०
सर्व पर्वकाळ दत्त वदतां वाचे । आणिक सायासाचे मूळ खुंटे ॥१॥ म्हणा दत्त दत्त म्हणा दत्त दत्त । म्हणा दत्त दत्त वेळोवेळां ॥२॥ काळ वेळ कांही न लगे तत्वतां । नाम उच्चारितां दरुशन ॥३॥ भोळ्या भावीकांसी जप मंत्रावळी । दत्तनाम माउली सोपा जप ॥४॥ एका जनार्दनीं नामाचा प्रताप । निवारे भवताप दरूशनें ॥५॥
भावार्थ
दत्तनामाचा जप करण्यास काळ वेळाचा विचार करण्याचे कारण नाही. हा पवित्र मंत्र वाचेने वदतांना सदा पर्वकाळ असतो. भोळ्या भाविकांना ही मंत्रावळी सहज सोपी आहे. नाम उच्चारतांच दत्त माउलीचे दर्शन होते. असा विश्वास व्यक्त करून एका जनार्दनीं म्हणतात, दत्त नामाचा महिमा असा आहे की, दत्तदर्शनाने सर्व भवतापांचे निवारण होते. 
२१
दत्त दत्त म्हणे वाचे । काळ पाय वंदी त्याचे ॥१॥ दत्तचरणीं ठेवीं वृत्ती । होय वृत्तीची निवृत्ती ॥२॥ दत्तरूप पाहे डोळा । वंद्य होय कळिकाळा ॥३॥ एका जनार्दनीं दत्त । हृदयीं वसे सदोदित ॥४॥
भावार्थ
वाचेने दत्तनामाचे स्मरण करणार्‍या भाविकाचे चरणवंदन प्रत्यक्ष काळ करतो. मनाच्या सगळ्या वृत्ती दत्तचरणी समर्पित केल्याने वृत्तींची निवृत्ती होते. दत्तरूपाचे दर्शन लाभलेला भक्त कळिकाळास वंद्य होतो असे सांगून एका जनार्दनीं हृदयांत दत्तगुरूंनी निरंतर वास करावा अशी प्रार्थना करतात. 
२२
म्हणता दत्त दत्त । दत्त करी गुणातीत ॥१॥ दत्तनामाचा निजछंद । नामें प्रगटे परमानंद ॥२॥ निज भाव समर्थ । जेथें नाम तेथें दत्त ॥३॥ एका जनार्दनीं दत्त । दत्त करी देहातीत ॥४॥
भावार्थ
दत्तनामाचा जप साधकाला सत्व, रज, तम या गुणविकारां पासून मुक्त करतो. दत्तनामाचा छंद मनाला उच्च प्रतीचा आनंद देतो. जेथे नाम तेथे दत्त येऊन उभा राहतो. एका जनार्दनीं म्हणतात, दत्तनामाचे स्मरण भक्ताची देहबुध्दी नाहिसी करून आत्मबुध्दी प्रदान करते. 

N/A

References : N/A
Last Updated : August 31, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP