श्रीदत्तमानसपूजा
प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली.
१
केलें आवाहन । जेथें नाहीं विसर्जन ॥१॥ भरला ओतप्रोत । स्वामी माझा देव दत्त ॥२॥ गातां येत नाहीं । पूर्ण सुलीनता पाही ॥३॥ एका जनार्दनीं खूण । विश्वीं भरला परिपूर्ण ॥४॥
भावार्थ
आपला स्वामी गुरू देव दत्त सर्व विश्वांत परिपूर्णपणे ओतप्रोत भरला आहे हीच मनाला पटलेली एकमेव खूण आहे असे अती विनम्रपणे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, पूजेसाठी दत्तगुरुंना आवाहन करावे तेथें विसर्जन करावे लागत नाही.
२
अनन्य आवरी उदक निर्मळ । वासना सोज्वळ नम्रपणें ॥१॥ प्रक्षाळिले पाय वाही एक माथा । हृदयीं प्रीति धरितां प्रेमलाभ ॥२॥ घेऊनियां तीर्थ इंद्रियें तों धालीं । सकळ निवालीं जनार्दनीं ॥३॥
भावार्थ
सोज्वळ वासनेच्या निर्मळ पाण्यानें कमंडलू भरून नम्रपणे दत्तगुरूंचे चरण प्रक्षालन केले. मस्तकावर अभिषेक केला. हृदयातील भक्तीभावाने प्रेमलाभ झाला. चरणतीर्थ घेऊन सर्व इंद्रिये तृप्त झाली आणि जनार्दन स्वरूपी एकरूप झाली.
३
चोहों देहांची क्रिया । अर्घ्य दिले दत्तात्रया ॥१॥ जे जे कर्म धर्म । शुध्द सबळ अनुक्रम ॥२॥ इंद्रिय क्रियाजात । कांहीं उचित अनुचित ॥३॥ आत्मा माझा देवदत्त । एका जनार्दनीं स्वस्थ ॥४॥
भावार्थ
स्थूल सुक्ष्म कारण महाकारण या चारी देहांच्या कर्म, धर्म, शुध्द, सबळ या चारी क्रिया दत्तात्रयाला अर्पण केल्या. इंद्रियांच्या कडुन घडणार्या उचित अथवा अनुचित क्रिया दत्तचरणी पदार्पण केल्या. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, आत्मतत्त्व देवदत्त असल्याने चित्त स्थिर झाले.
४
संचित क्रियमाण । केलें सर्वांचे आचमन ॥१॥ प्रारब्ध शेष उरलें यथा । तेथें ध्याऊं सद्गुरुदत्ता ॥२॥ झालें सकळ मंगळ । एका जनार्दनीं फळ ॥३॥
भावार्थ
चांगल्या, वाईट कर्मांचे जे साचलेले फळ होते ते आचमन करून गिळून टाकले. जे प्रारब्धाचे (पापपुण्याचे) फळ भोगायचे राहिले असेल त्या साठी सद्गुरूदत्ताचे ध्यान करावे असे सांगून एका जनार्दनीं समाधानाने म्हणतात, सर्व मंगलमय क्रियांचे फळ मिळालें.
५
वर्णावर्ण नाहीं । हेचि प्रावर्ण त्याचे ठायीं ॥१॥ पराभक्तीची पालवीं । जिवो अज्ञाना मालवी ॥२॥ करा करा जन्मोध्दार । हरिभक्तीचा बडिवार॥३॥ एका जनार्दनीं बोध । दत्तापायीं तो स्वानंद ॥४॥
भावार्थ
दत्तगुरू स्वरूपी वर्णावर्णांचा भेदाभेद नाही हेच त्या स्वरूपाचे वैशिष्ट्य आहे. पराभक्ती ही जिवाचे अज्ञान नाहिसे करते. जीवाचा जन्मोध्दार करते. एका जनार्दनीं म्हणतात दत्तगुरूंचा हा बोध मनाला स्वानंद देतो.
६
गंध ग्रहण घ्राणता । त्रिपुटीं मांडिली सर्वथा ॥१॥ सुबुध्दि सुगंध चंदन । केलें दत्तात्रया अर्पण ॥२॥ शांति क्षमा अक्षता । तिलक रेखिला तत्वतां ॥३॥ एका जनार्दन । करूनि साष्टांगें नमन ॥४॥
भावार्थ
सुबुध्दीरूपी सुगंधी चंदन दत्तात्रयाला अर्पण केले. सुगंध, सुगंध घेण्याची क्रिया सुबुध्दीरूपी चंदन ही त्रिपुटी लयास जाऊन दत्तगुरूंच्या ठायीं सुबुध्दी तद्रुप झाली. शांती, क्षमा रूपी तिलक रेखून त्यावर अक्षता लावल्या. एका जनार्दनीं म्हणतात, अशी मानसोपचाराने पूजा करून साष्टांग नमन केले.
७
आत्मज्ञान वैश्वानरीं । धूप जाळिला सरोभरी ॥१॥ तेणें मातला परिमळ । पिंडब्रह्मांडीं सकळ ॥२॥ वासाचा निजवास । एका जनार्दनीं सुवास ॥३॥
भावार्थ
आत्मज्ञान रूपी धूप अग्नींत (वैश्वानर) टाकला असतां विश्वातिल सर्व चराचर सृष्टींत या आत्मज्ञानाचा परिमळ(सुवास)दरवळला. एका जनार्दनीं या मानसपूजेचे असे वर्णन या अभंगात करतात.
८
ज्ञानदिपिका उजळी । नाहीं चिंतेची काजळी ॥१॥ ओवाळिला देवदत्त । प्रमें आनंद भरित ॥२॥ उष्ण चांदणें अतीत । तेज कोंदलें अद्भुत ॥३॥ भेदाभेद मावळले । सर्व विकार गळालें ॥४॥ एका मिळवी जनार्दन ।तेजीं मिळाला आपण ॥५॥
भावार्थ
ज्ञानरूपी दिपिका (निरांजन) पेटविले, चिंतेची काजळी नसलेला स्निग्ध, अपूर्व प्रकाश सभोवती कोंदून राहिला. मनातिल द्वैतभाव, भेदाभेद क्षणांत मावळले, सारे मनोविकार गळून पडले. एका जनार्दनीं म्हणतात, चित्त सद्गुरू जनार्दन स्वामींशी एकरूप झाले. तेजांत मिळून मिसळून गेले.
९
अहंममता घारीपुरी । समूळ साधली दुरी ॥१॥ चतुर्विध केलीं ताटें । मानीं शरण गोमटें ॥२॥ मन पवन समर्पिलें । भोग्य कृत्य हारपलें ॥३॥ एका जनार्दनीं भोजन । तृप्त झालें त्रिभुवन ॥४॥
भावार्थ
अहंकार आणि ममता यांना मुळांसह उपटून टाकून गुरूचरणी संपूर्ण शरणागती पत्करली. चंचल मन दत्तगुरूंना समर्पित केले. सर्व भोग भोगण्याच्या ईच्छेसह हरपून गेले. एका जनार्दनीं म्हणतात, हे चतुर्विध (चार प्रकारचे) भोजन करून स्वर्ग, पाताळासह पृथ्वी हे त्रिभुवन तृप्त झाले.
१०
नाम मंगळा मंगळ । झालें जन्माचें सफळ ॥१॥ दत्त जीवींचे जीवन । दत्त कारणा कारण ॥२॥ अनुसुयात्मजा पाही । देहभाव उरला नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं दर्शन । चित्त झाले समाधान ॥३॥
भावार्थ
दत्तगुरूंचे नाम सर्व मांगल्याचे मांगल्य आहेत. विश्वांत ज्या मंगल घटना घडतात त्या घडवण्याचे मूळ कारण म्हणजे दत्तगुरू होत. अनुसुया पुत्र दत्त गुरूंचे दर्शन झाले आणि देहभाव लयास गेला. चित्त समाधानरूप झाले. जन्म सफळ झाला. मनातिल कृतार्थ भावाचे वर्णन एका जनार्दनीं या अभंगात करतात.
N/A
References : N/A
Last Updated : August 31, 2025

TOP