३२
वेदांमाजी ओंकार सार । शास्त्र सार वेदांत । मंत्रांमाजी गायत्री सार । तीर्थ-सार गुरु-चरण । दानांमाजी अन्न-दान सार । कीर्तन सार कलियुगी । जिव्हा-उपस्थ जय सार । भोग-सार शांति-सुख । एका जनार्दनी एका सार । सर्व-सार आत्म-ज्ञान ।
भावार्थ:
ओंकार हे वेदांचे सार तर शास्त्र हे वेदांताचे सार आहे. सर्व मंत्रामध्ये गायत्रीमंत्र प्रमुख, तर गुरुचरणांचे तीर्थ सर्व तीर्थात पवित्र मानले जाते. दानामध्ये दान अन्नदान, नवविधा भक्तीत कीर्तन-भक्ती कलियुगात श्रेष्ठ मानली जाते. वाणी, रुची (जिव्हा) व कामवासना यांचा संयम हा सर्वश्रेष्ठ संयम असून शांति-सुख हे भोगाचे सार आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, आत्म-ज्ञान (मी देह नसून आत्मा आहे, अमृताचा पुत्र आहे) हे ज्ञान सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे.
३३
पिंपळावरुनी मार्ग आहे । ऐकोनि वृक्षा वेधो जाय । ऐसे अभागी पामर । न कळे तयांसी विचार । म्हणोनी शरण जनार्दनी । एका जनार्दनी एकपणी ।
भावार्थ:
गीतेच्या पंधराव्या अध्यायांत भगवंताने अश्वस्थ (पिंपळ) वृक्षाला संसारवृक्षाची उपमा दिली आहे, हे लक्षात घेऊन एखादा भाविक संसार बंधनातून सुटण्यासाठी पिंपळाला फेरे घालत असेल तर तो अभागी पामर आहे असे समजावे कारण त्याला भगवंताचे विचार समजले नाहीत. पारमार्थिक विचार समजण्यासाठी सद्गुरूला शरण जाऊन ज्ञान ग्रहण करणे जरुरीचे आहे असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, आपण जनार्दनस्वामींना एकनिष्ठपणे शरणागत आहोत.
३४
वेद-वाणी देवे केली । येर काय चोरापासूनि झाली । सकळ वाचा वदवी देव । का वाढवा अहंभाव । ज्या ज्या वाणी स्तुति केली । ती ती देवासी पावली । एका जनार्दनी मातु । वाचा वाचक जगन्नाथु ।
भावार्थ:
संस्कृत भाषेचे अभिमानी लोक गर्विष्ठपणे सांगतात की, संस्कृत (वेदांची भाषा) वाणी देवांनी निर्माण केली आहे. संत एकनाथ मराठी प्राकृत भाषेचे अभिमानी असल्याने ते विचारतात, संस्कृतशिवाय बाकी भाषा चोरापासून आल्या आहेत असे नसून सर्व वाचा वदवणारा देवच आहे. कोणत्याही वाणीतून भगवंताची स्तुति केली तरी ती देवाला पावते. एका जनार्दनी म्हणतात, वाणी निर्माण करणारा आणि वदवणारा केवळ जगन्नाथच आहे.
३५
शतावर्ती श्रवण अधिक पै झाले । तेणे अंगा आले जाणपणव । श्रवण तो लौकिक मनी नाही विवेक । बुध्दीसि परिपाक कैसेनि होय । एका जनार्दनी साच न रिघे मन । तंववरी समाधान केवी होय ।
भावार्थ:
शंभरापेक्षा अधिक ग्रंथांचे श्रवण (वाचन) केल्याने अनेक गोष्टींचे ज्ञान झाले. परंतु मनात विवेक निर्माण झाला नाही, तर बुध्दी परिपक्व होऊ शकणार नाही आणि मनामध्ये खर्या ज्ञानाचा उदय झाल्याशिवाय निर्भेळ समाधान लाभणार नाही असे एका जनार्दन म्हणतात.
३६
करिता हरिकथा श्रवण । स्वेद रोमांच न ये दारुण । रुका वेचिता प्राण । जाऊ पाहे । द्रव्य-दारा-लोभ अंतरी । हरि-कथा वरी वरी । बीज अग्नी माझारी । विरूढे कैसे । एका जनार्दनी । काम-क्रोध-लोभ तीन्ही । द्रव्य दारा त्यजुनी । नित्य तो मुक्त ।
भावार्थ:
हरिकथा ऐकतांना सामान्य माणसाचे अष्टसात्विक भाव दाटून येत नाहीत. देहावर रोमांच उभे रहात नाहीत किंवा स्वेद (घाम) येत नाही. परंतु पैसा खर्च करतांना मात्र प्राणांतिक वेदना होतात कारण धन, पत्नी, संतती यांचा मनाला लोभ वाटतो. या लोभरुपी अग्नीत भक्तीभावाचे बीज रुजत नाही, जसे अग्नीमध्ये कोणत्याही वनस्पतीचे बीज रुजत नाही. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, काम, क्रोध, लोभ, पत्नी आणि धन यांचा जो त्याग करु शकतो तो नित्य मुक्त समजावा. तोच हरिकथा श्रवणात भक्तभावाने रममाण होऊ शकेल.
३७
आरशा अंगी लागता मळ । मुख न दिसेचि निर्मळ । मळ तो झाडूनि पाहता । मुख दिसे निर्मळता । पाहता शुध्द भाव रिती । परमार्थ हाचि चित्ती । एका जनार्दनी हा विचार । आरशासारखा प्रकार ।
भावार्थ:
चित्तामध्ये काम, क्रोध, मोह, लोभ या विकारांची पुटं चढलेली असतील तर या मलिन चित्तात परमार्थाचे निर्मळ रूप दिसणार नाही. जसे आरशावर धुळीची पुटं चढली की, निर्मळ मुख-दर्शन होणार नाही हा विचार एका जनार्दनी स्पष्ट करून सांगतात.