२१२
भजन भावाते निपजवी । भाव देवाते उपजवी । ऐसा भजने देव केला । भक्त वडील देव धाकुला । भक्ताकारणे संकल्प । भक्त देवाचाहि बाप । देव भक्ताचे पोटी । झाला म्हणोन आवड मोठी । एका जनार्दनी नवलावो । कैसा भक्तचि झाला देवो ।
भावार्थ
भक्त जेव्हा देवाच्या भजनात तल्लीन होतो तेव्हा भक्तिभाव निर्माण होतो आणि या भक्तिभावातून देव जागृत होतो. अशाप्रकारे साधकाच्या भजनातून देव जन्म घेतो. भक्ताच्या संकल्पातून देवाची निर्मिती होते. भक्त देवाचा बाप आहे, म्हणून भक्ताच्या मनात देवाविषयी स्वाभाविक प्रेम (आवड)आहे. एका जनार्दनी म्हणतात, ही मोठी नवलाची गोष्ट आहे की भक्त देवत्वाला पोचला आहे.
२१३
आधी देव पाठी भक्त । ऐसे मागे आले चालत । हे हि बोलणेचि वाव । मक्ता आधी कैचा देव । भक्त शिरोमणी भावाचा । देव लंपट झाला साचा । भक्तासाठी अवतार । ऐसा आहे निर्धार । वडील भक्त धाकुला देव । एका जनार्दनी नाही संदेह ।
भावार्थ
आधी देवाचा अवतार आणि नंतर भक्त असे मानण्याची पूर्वी पध्दत होती. परंतु हे बोलणे सत्य नाही. भक्त हा भावाचा शिरोमणी असून देव या भक्तीभावामुळे वेडा झाला असून तो भक्तांसाठी अवतार धारण करण्याचा निर्धार करतो. एका जनार्दनी म्हणतात, भक्त वडील असून देव धाकटा आहे, याविषयी मनामध्ये कोणताही संशय नाही.
२१४
भक्तपणा सान नव्हे रे भाई । भक्ताचे पाय देवाचे हृदयी । भक्त तोचि देव भक्त तोचि देव । जाणती हा भाव अनुभवी । दान-सर्वस्वे उदार बळी । त्याचे द्वार राखे सदा वनमाळी । एका जनार्दनी मिती नाही भावा । देवचि करितो भक्तांची सेवा ।
भावार्थ
भक्तांची भावभक्ती ही छोटी गोष्ट नाही, या भक्तिभावाने देव भक्ताचे पाय आपल्या हृदयात धारण करतो. भक्त हाच देव असून ते एकरुप आहेत, हे केवळ अनुभवी सद्गुरूच जाणतात. सर्वस्वाचे दान देणारा दैत्यराजा बळी याचा वनमाळी द्वारपाल झाला. एका जनार्दनी म्हणतात, भक्तिभावाची महती अमर्याद आहे, भक्तांसाठी देव तिष्ठत राहून त्यांची सेवा करतो.
२१५
भक्तालागी अणुमात्र व्यथा । ते न साहवे भगवंता । करूनि सर्वांगाचा ओढा । निवारीतसे भक्त-पीडा । होऊनी भक्तांचा अंकित । सारथीपण तो करीत । ऐसा अंकित चक्रपाणि । एका शरण जनार्दनी ।
भावार्थ
भक्ताला होत असलेले थोडेसेही दु:ख भगवंताला सहन होत नाही. आपले सर्वस्व पणाला लावून देव या भक्ताचे संकट निवारण करतो. भक्ताचा अंकित होऊन तो त्याचा सारथी होतो. एका जनार्दनी म्हणतात, देव हा भक्तिभावाचा भुकेला आहे.
२१६
साचपणे देवा शरण पै जाती । तया वैकुंठपति विसरेना । जैसी कन्या दूर देशी एकटी । रात्रंदिवस संकटी घोकी मायबाप । पतिव्रतेचे सर्व मन पति-पायी । तैसा देव ठायी तिष्ठतसे । एका जनार्दनी मज हा अनुभव । जनार्दनी देव दाखविला ।
भावार्थ
एकनिष्ठपणे देवाला जे शरण जातात त्यांना वैकुंठपती विप्णु कधीच विसरत नाही. जशी परक्या देशात सासरी गेलेली मुलगी आई-वडिलांची, माहेरची सारखी आठवण काढत असते, जसे पतिव्रतेचे मन सतत पतीभोवताली घोटाळत असते, तसा देव भक्ताच्या ठिकाणी गुंतून पडतो. एका जनार्दनी स्वानुभवाने सांगतात की जनार्दनस्वामींच्या कृपेने आपल्याला देव-भक्ताचे नाते समजले.
२१७
मिठी घालुनीया भक्ता । म्हणे शिणलेती आता । धावे चुरावया चरण । ऐसा लाघवी आपण । योगियासी भेटी नाही । तो आवडीने कवळी बाही । एका जनार्दनी भोळा । भक्ता आलिंगी सावळा ।
भावार्थ
एका जनार्दनी या भजनात परमेश्वराच्या भक्ताविषयी वाटणार्या आत्मभावाचे वर्णन करीत आहे. थकला-भागलेला भक्त दिसताच देव त्याचा श्रमपरिहार करण्यासाठी धावतो. प्रेमाने आलिंगन देतो. योगीजनांची भेट घेण्यासाठी देव अत्यंत आतूर असतो. भोळ्या भाविकांना सावळा श्रीहरी प्रेमाने मिठी घालतो.
२१८
देव धावे मागे न करी आळस । सांडिता भवपाश माया-जाळ । सर्व भावे जे का शरण रिघती । तयांचे ओझे श्रीपती अंगे वाहे । नको भक्ति मुक्ति सदा नामी हेत । देव तो अंकित होय त्यांचा । एका जनार्दनी ऐसा ज्यांचा भाव । तया घरी देव पाणी वाहे ।
भावार्थ
संसाराची सर्व बंधने, सर्व मायापाश तोडून, पूर्ण शरणागत होऊन, भक्तिभावाने जे भक्त श्रीपतीला शरण जातात त्यांच्या संसाराचे ओझे श्रीपती स्वत: वाहतो. अनन्य भक्त भुक्ति-मुक्तिची अपेक्षा करीत नाही. सतत देवाचा नामजप करीत असतो, देव त्याचा अंकित असतो. एका जनार्दनी म्हणतात, अशा अनन्य भक्ताच्या घरी देव पाणी भरतो.
२१९
एका घरी द्वारपाळ । एका घरी होय बाळ । एका घरी करी चोरी । एका घरी होय भिकारी । एका घरी युध्द करी । एका घरी पुजा बरी । एका घरी खाय फळे । एका घरी लोणी बरे । एका एकपणे एकला । एका जनार्दनी प्रकाशला ।
भावार्थ
या भजनात एका जनार्दनी भगवंताच्या विविध लिलांचे वर्णन करतात. बळीराज्याच्या घरी भगवंत दारावरचा पहारेकरी होतो तर नंदाच्या घरी बालक बनतो आणि लोण्याची चोरी करतो, सुभद्रा आणि द्रौपदीघ्या घरी चिंधी मागणारा भिकारी होतो. दुर्योधनाच्या घरी युध्दाची भाषा करतो तर विदुराच्या घरी पूजा करुन घेतो. शबरीच्या घरी उष्टी बोरे खातो तर यशोदेच्या घरी लोणी चाखतो. या कृष्णलीलांचा आनंदात एका जनार्दनी रममाण होतो.
२२०
खुर्पु लागे सावत्यासी । न पाहे यातीसी कारण । घडी मडके कुंभाराचे । चोख्यामेळ्याची ढोरे ओढी । सजन कसायाचे विकी मांस । दामाजीचा दास स्वये होय । एका जनार्दनी जनीसंगे । दळू कांडू लागे आपण ।
भावार्थ
पंढरीचा पांडुरंग संताच्या भक्तिप्रेमाचा भुकेला असून तो त्यांच्यासाठी अनेक कामे करतो. सावता माळ्याबरोबर भगवंत मळ्याची खुरपणी करतो तर गोरा कुंभाराची मडकी घडवतो. चोखामेळ्यासाठी गुरे ओढतो. सजन कसायाचे घरी मांस विकायचे काम करतो. दामाजीचा दास बनून त्याची संकटातून सुटका करण्यासाठी निजरुप प्रकट करतो. जनाबाईबरोबर दळण, कांडण करुन तिला मदत करतो असे एका जनार्दनी सांगतात.
२२१
तुम्ही कृपाळु जी देवा । केली सेवा आवडी । करुनि सडा संमार्जन । पाळिले वचन प्रमाण । उगाळूनी गंध पुरविले । सोहळे केले दासाचे । ऐसा अपराधी पतित । एका जनार्दनी म्हणत ।
भावार्थ
एका जनार्दनी म्हणतात, आपण देवाचा अपराध केला आहे. देवाकडून सडासंमार्जन, पुजेसाठी चंदन उगाळून घेतले असून आपण अत्यंत पतित आहोत. परंतु देवाने भक्ताचे सर्व सोहळे पूर्ण केले आहेत, अत्यंत आवडीने सेवा केली आहे कारण देव कृपाळु आहे आणि दिलेले वचन पूर्ण करणारा आहे.
२२२
देव विसरे देवपण । अर्पी वासना भक्तांसी । भक्त देही सदा वसे । धर्म अर्थ अर्पीतसे । जे जे भक्तांची वासना । पुरवी त्याचि क्षणा । एका जनार्दनी अंकित । उभा तेथेचि तिष्ठत ।
भावार्थ
एका जनार्दनी म्हणतात, देव आपला देवपणा विसरून भक्ताच्या देही निरंतर वास करतो. धर्म आणि अर्थ अर्पण करतो. भक्तांच्या मनोकामना, वासना तत्परतेने पूर्ण करतो. तो भक्ताचा अंकित होतो, त्याच्या दाराशी तिष्ठत उभा राहतो.
२२३
अभेद भजनाचा हरिख । देव भक्त झाले एक । कोठे न दिसे भेद-वाणी । अवघी कहाणी बुडाली । हरपले देव-भक्तपण । जनी झाला जनार्दन । एका जनार्दनी देव । पुढे उभा स्वयमेव ।
भावार्थ
भजनाचा निर्भेळ आनंद लुटताना देव-भक्त एकरुप होतात. कोठेही भेदाभेदाचा लवलेश ऐकू येत नाही. सारा भूतकाळ या आनंदात बुडून जातो. देवाचे मोठेपण आणि भक्ताचे सानपण हरपून नाहिसे होते. जनार्दन भक्तीरंगात रंगून जातो. एका जनार्दनी म्हणतात, देव प्रत्यक्ष पुढे उभा राहतो.
२२४
देव म्हणे भक्तांसी आवडी । मी झालो तुमचा गडी । सांगाल ते करीन काम । मजवरी ठेवा तुमचे प्रेम । भाव मज द्यावा । आणिक मज नाही हेवा । आवडीने देव बोले । भक्तांमाजी स्वये खेळे । खेळता गोपाळी । एका जनार्दनी गोकुळी ।
भावार्थ
देव भक्तांना लडिवाळपणे म्हणतो, तो त्यांचा सेवक झाला आहे. भक्तांच्या प्रेमासाठी तो त्यांचे कोणतेही काम करण्यास तयार असून तो केवळ निरपेक्ष भावाचा भुकेला आहे. आणखी कोणतीही गोष्ट त्याला हवीशी वाटत नाही. मनापासून देव बोलतो आणि भक्तांबरोबर गोकुळात गोपाळांसह खेळ खेळतो असे एका जनार्दनी म्हणतात.
२२५
बहु बोलाचे नाही कारण । मी देह भक्त आत्मा जाण । माझा देह शरीर जाण । भक्त आत पंचप्राण । नांदे सहज भक्त आत । मी देह भक्त देहातीत । एका जनार्दनी भक्त । देवपणा मी भक्तांकित ।
भावार्थ
देव हा केवळ पंचभूतात्मक शरीर असून भक्त त्याचे पंचप्राण आहेत. देवाच्या शरिरात भक्त आत्मरुपाने नांदतो. देव देह असून भक्त त्या देहापलिकडील अविनाशी आत्मतत्व आहे. एका जनार्दनी म्हणतात, देवाचे देवपण भक्तांच्या अंकित आहे, देवावर भक्तांचे स्वामित्व आहे.
२२६
तुमचे अप्रमाण होता बोल । मग फोल जीवित्व माझे । कासया वागवू सुदर्शन । नाही कारण गदेचे । तुमचा बोल व्हावा निका । हेचि देवा मज प्रिय । मज याचे उणेपण । तुमचे थोरपण प्रकाशू द्या । एका जनार्दनी देव । स्वयमेव बोलती ।
भावार्थ
भक्तांचे देवाविषयीचे वचनांचा प्रत्यय येत नसेल तर देवाचे अस्तित्व सिद्ध होणार नाही, देवाचे जीवित्व व्यर्थ होईल आणि हातातील गदा, सुदर्शनचक्राला काही कारण उरणार नाही. भक्तांच्या श्रध्देला उणेपणा येऊ नये अशी देवाची इच्छा आहे. भक्तांचा थोरपणा प्रकाशित व्हावा असे देवाचे मनोगत आहे असे एका जनार्दन म्हणतात.
२२७
मज जे अनुसरले काया वाचा मने । त्यांचे चालवणे सर्व मज । ऋणविई त्यांचा अनंत जन्मांचा । जे गाती वाचा कीर्ति माझी । तयांचिया द्वारी लक्ष्मीसहित । उभा मी तिष्ठत याचकपणे । सर्व जड भारी जाणे योगक्षेम । एका जनार्दनी नेम जाण माझा ।
भावार्थ
जे भक्त देवाची काया, वाचा, मने करून भक्ति करतात, सतत भगवंताचे चिंतन करतात, परमेश्वराचे किर्तन करतात त्या भक्तांचा देव अनंत जन्माचा ऋणी असतो. त्यांच्या दारात श्रीहरी लक्ष्मीसह याचक रुपाने उभा असतो. या एकनिष्ठ भक्तांचा योगक्षेम चालवून त्यांचे ओझे हलके करतो. एका जनार्दनी म्हणतात, भक्तांची पाठराखण करणे हा देवाचा नेम आहे.
२२८
मजसी जेणे विकिले शरीर । जाणे मी निर्धार अंकित त्याचा । त्याचे सर्व काम करीन मी अंगे । पडो नेदी व्यंगे सहसा कोठे । एका जनार्दनी त्याचा मी अंकित । राहे पै तिष्ठत त्याचे दारी ।
भावार्थ
जे भक्त देवाच्या सेवेत देह झिजवतात, वाणीने देवाचे किर्तन करतात, मनाने देवाचे चिंतन करतात त्या भक्तांचा देव अंकित असतो. त्यांची सर्व कामे देव स्वत: करतो, त्यांचा कमीपणा कोठे दिसू देत नाही. या भक्तांची ताबेदारी स्विकारून देव त्यांच्या दारात तिष्ठत उभा राहतो असे एका जनार्दनी म्हणतात.
२२९
माझा शरणागत न दिसे केविलवाणा । ही तो लाज जाणा माझी मज एकविध भावे आलिया शरण । कर्म धर्म जाण पूर्ण त्याचे समर्थाचे मुला काय खावयाची चिंता । तैसे मी तत्वता न विसंबे एका जनार्दनी हा माझा नेम । आणिक नाही वर्म भावेविण
भावार्थ
भगवंताला शरण गेलेला भक्त केविलवाणा दिसत असेल तर ती गोष्ट देवाला कमीपणा आणणारी आहे. समर्थाचा मुलगा अन्नावाचून उपाशी राहत असेल तर समर्थ या नावाला विरोध करणारी आहे. एका जनार्दनी म्हणतात, भगवंताला भाव-भक्तिने पूर्णपणे शरणागत झाल्याने भक्ताचे कर्म-धर्म विनासायास घडतात. भावपूर्ण भक्ति याशिवाय देवाला कसलिही अपेक्षा नाही.
२३०
सर्व कर्म मदर्पण । करिता मन होय शुध्द न्यून ते चढते जाण । करी संपूर्ण मी एक मन ठेवुनी माझ्या पायीन् । असो कोठे भलते ठायी एका जनार्दनी मन । करा मजचि अर्पण
भावार्थ
आपल्याकडून घडणारी सर्व कर्मे भगवंताला अर्पण केल्यास मन शुध्द होते. ही कर्मे करीत असतांना काही उणिवा राहिल्यास भगवान ते पूर्णत्वास नेतात. भक्त देहाने कोठेही असला तरी मनाने तो देवाच्या सन्निध असावा. एका जनार्दनी म्हणतात, भक्ताने आपले मन देवाला अर्पण करावे, त्याने देव प्रसन्न होईल.
२३१
ऐके उध्दवा प्रेमळा । सांगतो जीवींचा जिव्हाळा तू भक्त-राज निर्मळा । सुचित ऐके मी बैसोनी आसनी । पूजा करितो निशिदिनी ते पूज्य मूर्ति तुजलागुनी । नाही ठाउकी उध्दव
भावार्थ
उध्दव हा श्रीहरीचा प्रेमळ भक्त आहे. त्याला श्रीहरी आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. देव उध्दवाला भक्तराज असे संबोधून आपल्या मनातील विचार ऐकावे अशी सूचना करतात. भगवंत स्थिरचित्ताने आसनावर बसून ज्या मूर्तीची रात्रंदिवस पूजा करतात ती मूर्ती कोणाची आहे हे त्यांच्या प्रिय भक्ताला (उध्दवाला) देखिल माहिती नाही. भगवंताचे हे कोडे उलगडण्याचा प्रयत्न उध्दवाने करावा अशी देवाची इच्छा आहे असे एका जनार्दनी सूचित करीत आहेत.
२३२
माझे आराध्य दैवत । ते कोण म्हणती सत्य । भक्त माझे जीवींचे हेत । जाणती ते । माझे विश्रांतीचे स्थान । माझे भक्त सूख-निधान । काया वाचा मन । मी विकिलो तयाची । ते हे भक्त परियेसी । उध्दवा सांगे हृषीकेशी । एका जनार्दनी सर्वांची । तेचि वदतसे ।
भावार्थ
भगवंत ज्याची आराधना करतात ते दैवत कोणते हे भगवंताचे भक्त जाणतात, कारण भगवंताच्या जीवनाचे हेत केवळ भक्तच जाणू शकतात. भक्त हे भगवंताच्या विश्रांतीचे स्थान, सुख मिळण्याचे ठिकाण असून या प्रेमळ भक्तांनी भगवंताला काया, वाचा, मनाने विकत घेतले आहे. या भक्तांची नावे हृषीकेशी (श्रीकृष्ण) उध्दवाला सांगतात. एका जनार्दनी सर्वांना त्याच भक्तांची नावे सांगतात.