१
ऐसे नित्यकाळ जाताती वना । गोपाळ. रामकृष्ण खेळती खेळ नाना ॥१॥ यमुनेचे तटीं कळंबा तळवटीं । मांळियला काला गोपाळांची. दाटी ॥२॥ आणिती. शिदोय्रा आपआपल्या । जया जैसा हेत तैशा. त्या चांगल्या. ॥३॥ शिळ्या विटक्या. भाकरी दही. भात. लोणी । मिळवोनी मेळा करी चक्रपाणी ॥४॥ एका जनार्दनीं अवघ्या करीतो कवळ । ठकविलें तेणे ब्रह्मादिक सकळ ॥५॥
भावार्थ
गोपाळ नित्यनेमाने वनांत जाऊन बलराम, कृष्णा बरोबर नाना प्रकारे खेळ खेळतात. यमुनातीरावर कदंब वृक्षाखाली श्रीहरीने काला मांडला. प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे शिदोय्रा आणून गोपाळांनी एकच दाटी केली दही भात लोणी आणि शिळ्या भाकरी एकत्र करून काला केला. या काल्याचे कवळ श्रीहरी प्रत्येकाच्या मुखी भरवतो, हे लाघव पाहून ब्रह्मादिक देव अचंबित होतात, असे एका जनार्दनी म्हणतात.
२
बैसोनि कळंबातळीं । गडी मिळाले सकळीं । मिळोनि गोपिळीं करती काला ॥१॥ नानापरीचीं पक्वान्नें । वाढिताती उत्तम गुणें । सर्वा परिपूर्ण । मध्यें शोभे सांवळा ॥२॥ वडजा वांकुडा पेंदा । आणि. सवंगडी बहुधा । काल्याच्या. त्या मुदा । घेती आपुलें करीं ॥३॥ लोणचें तें नानापरी । वाढिताती कुसरीं । सर्व वाढिले निर्धारी । परिपूर्ण अवघीयां ॥४॥ एका जनार्दनी म्हणे । कृष्णा कवळ. तूं घेणें । गडियांसी देव म्हणे । तुम्हीं. घ्यावा आधीं ॥५॥
भावार्थ
कळंबातळीं बसून सकळ गोपाळांनी मिळून काला केला. नानापरींची उत्तम पक्वान्नें सर्वांना योग्यप्रकारे वाढली. मध्यभागीं सावळा. हरी शोभून दिसतो. बोबडे बोलणारा पेंदा आणि सवंगड्यांनी काल्याच्या मुदी आपल्या हातात घेतल्या आणि सर्वांना समान मिळतील अशा कौशल्याने वाढण्यांत आले. असे वर्णन करून. एका जनार्दनी म्हणतात, कृष्णाने पहिला कवळ मुखी घ्यावा अशी गोपाळांची ईच्छा पण कृष्णदेव सवंगड्यांनी प्रथम भोजनास सुरवात करावी असे सुचवतात.
३
गडी म्हणती सकळ । कृष्णा तूं घेई कवळ । हरी म्हणे उतावीळ । घ्यावा तुम्ही ॥१॥ गडी नायकती सर्वथा । हरी म्हणे मी नेघें आतां । म्हणोनी रूसोनी तत्वतां ।चालिला कृष्ण ॥२॥ कृष्णा नको जाऊं जाण । तुझैं एकूं वचन । म्हणोनि संबोधून । आणिला कृष्ण ॥३॥ एका जनार्दनीं । लाघव दावी चक्रपाणी । भक्ता वाढवुनी । महिमा वदवी ॥४॥
भावार्थ
सगळे सवंगडी कृष्णाने कवळ घ्यावा म्हणुन आग्रह करतात. कृष्ण ते मान्य करत नाही, सवंगडी आपला. हट्ट. सोडत नाहीत. कृष्ण नाराज होऊन वृदांवन सोडून चालू लागतो, सवंगडी कृष्णाची आज्ञा. पाळण्याचे. वचन देऊन श्रीहरीला माघारी आणतात. एका जनार्दनीं म्हणतात, चक्रपाणी आपले लाघव दाखवून भक्तांची मने जिंकून भक्तिमहिमा वाढवतात.
४
काळ्या कांबळ्याची घडी । घालिताती सवंगडी । बैसवुनी हरी । कवळ. घेती ॥१ ॥ कृष्ण आपुलेनी हातें । कवळ घाली गडीयातें । त्यांची उच्छिष्ट शितें । घालितसे मुखीं ॥२॥ मुखामाजी कवळ । सवंगडे घालिती सकळ । वैकुंठीचा. पाळ ब्रह्मानंदें डुल्लत ॥३॥ तृप्त झाला जनार्दन । एका वंदितसे चरण । काया वाचा मन । खूण भक्त जाणती ॥४॥
भावार्थ
काळ्या. कांबळ्यवर सवंगडी हरीला बसवून मुखीं कवळ घालतात. कृष्ण आपल्या हाताने सवंगड्यांना घास भरवून त्यांची उष्टी शिते आनंदाने मुखीं घालतो , ब्रह्मानंदांत मग्न होतो . एका जनार्दनीं म्हणतात, काया. वाचा मनाने भक्त देवाशी एकरूप होतात हीच एकाग्र भक्तिची खूण आहे.
५
मिळोनि गोपाळ सकाळीं । यमुनेतटीं खेळे चेंडूफळी । गाई बैसविल्या. कदंबातळीं । जाहली दुपारीं खेळतां ॥१॥ काला मांडिला वो काला मांडिला । नवलक्ष. मिळोनी काला मांडिला वो ॥ध्रु ०॥ नानापरींचें. शोभतीं दहीभात । पंक्ती बैसविल्या पेंदा बोबडा वाढीत । जो. जया संकल्प तें तया मिळत । अनधिकारिया तेथें कोणी न पुसत ॥२॥ पूर्वसंचित खाली पत्रावळी । वाढती भक्तिभावाची पुरणपोळी । नामस्मरणाची क्षुधा. पोटीं आगळीं । तेणें तृप्ती होय. सहजी सकाळीं ॥३॥ ऐसे. तृप्त जाहले परमानंदें । कवळ कवळाचे निजछंदें । एका जनार्दनी. अभेदें. । शुध्द समाधिबोधें मुख संवादें ॥४॥
भावार्थ
गाईंना कदंबातळी बसवून सर्व गोपाळ मिळून यमुनातटीं चेंडूफळीचा खेळ खेळू लागली. खेळतां. खेळतां दुपार झाली. नवलक्ष गोपाळांनी मिळून काला मांडिला. पंगती बसल्या. बोबडा पेंदा पंगतीला नानापरींचे भात, भक्तिभावाची पुरणपोळी वाढूं लागला. जयाला जे आवडते तें त्याला मिळू लागलें. नामस्मरणाची भूक लागली असल्यानें सहजपणे सर्वांची तृप्ती झाली, परमानंदाचा प्रसाद मिळाला. एका जनार्दनीं म्हणतात, कोणताही भेदभाव नसलेल्या शुध्द मनाला समाधी सुखाचा बोध झाला.
६
नित्य तो सोहळा करिताती काला । तो पहावयाला देव येती ॥१॥ अंतरीं सुरवर विचार करिती । काला श्रीपती करीत स्वयें ॥२॥ उच्छिष्ट प्रसाद सेवूं धणीवरी । मत्स्यरूप निर्धारी घेती. सर्व ॥३॥ एका जनार्दनी जाणितसे खूण । म्हणोनी विंदान आरंभीं ॥४॥
भावार्थ
वृंदावनांत नित्य चालू असलेला कालासोहळा पाहण्यासाठीं देव आतुर झाले. श्रीपती स्वता: काला करीत आहे तर देव उच्छिष्ट प्रसाद सेवन करण्यासाठी मत्स्यरुप धारण करतात. एका जनार्दनी परब्रह्म स्वरुपाची खूण जाणून विस्मयकारी अवतार लीला समजून घेतात.
७
गडियासी सांगे वैकुंठीचा राव । आजीं. आला भेंवों यमुनेंत ॥१॥ जीवनालागीं तेथें कोण्ही पै न जावें । डाऊन आला आहे तया ठायीं ॥२॥ तयाचे बोलणें लागे सर्वा गोड । म्हणोनि धरिती. चाड सवंगडे ॥३॥ एका जनार्दनी. ऐकोनि वचन । पुढती. वचन पेंदा बोले ॥४॥
भावार्थ
वैकुंठीचा राणा श्रीकृष्ण सवंगड्यांना सांगतो कीं, यमुनेवर पाण्यासाठी. कुणी जाऊं नये कारण तेथें बागुलबुवा आला आहे. कृष्णाचे मधुर बोल. सर्वांना आवडतात, सगळे त्याला संमती दर्शवतात असे सांगून. एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरिचे वचन ऐकून पुढे पेंदा बोलतो.
८
आजी कांहो कृष्णा वर्जिली यमुना । बाऊ तो जाणा कोठोनि आला ॥१॥ कैसा आहे बाऊ पाहिन तयातें । म्हणोनि त्वरित उठिलासे. ॥२॥ वारितां वारितां पेंदा. पैं गेला । पहातसे. उगला यमुनेंत ॥३॥ बाऊ तो न दिसे कोठें वाजत । पैंदा तया. म्हणत क्रोधयुक्त ॥४॥ म्हणतसे पेंदा यमुनेसी जाण । स्त्री. तूं. होऊन. हुंबरी. घेसी ॥५॥ मी कृष्णदास घेसी तूं हुंबरी. । तुज निर्धारी बळ बहु ॥६॥ मी. काय निर्बळ घेसी तूं हुंबरी । आतांचि निर्धारी पाहे माझें ॥७॥ म्हणोनियां पेंदा तेथेंचि बैसला । हुंबरी तो तयाला. घालीतसे ॥८॥ पेंदा कां नये काय. जाहलें त्याला । कृष्णे पाठविला दुजा एक ॥९॥ तोही मीनला तयांसी तत्काळ । गडी तों सकळे आलें तेथें ॥१०॥ उरलेले दोघे कृष्ण आणि राम । गुंतले सकाम गडी तेथें ॥११ ॥ काय जाहलें म्हणोनि आले उभयतां ।पाहुनी तत्वतां हासताती॥१२॥ सावध करितां न होती सावध । लागलासे छंद घुमरीचा ॥१३॥ एका जनार्दनीं कौतुकें कान्हया । आली असे दया भक्ताची ते ॥१४ ॥
भावार्थ
श्रीकृष्णाने यमुनेवर जाऊ नका असे कां सांगितले आणि तो बाऊ कोठून आला असे विचारून पेंदा तो बाऊ कसा आहे ते पाहतो असे बोलून त्वरित उठला आणि यमुना जळांत शिरला. यमुनेचे पाणी खळखळ आवाज करून वाहत होते पण बाऊ मात्र कोठे दिसेना तेंव्हां पेंदा रागाने आपण कृष्णाचे दास असून बलशाली आहे स्त्री असून कृष्णदासासी हुंबरी. घेणे योग्य नाही असे यमुनेला बोलून मनाचा निर्धार करून पेंदा तेथें बसला. पेंदाला शोधण्यासाठी क्रृष्णाने एका सवंगड्याला. पाठवले एकामागून एक असे सगळे यमुनेकांठी. गोळा झाले . रामकृष्ण दोघेही काय झाले हे समजून घेण्यसाठी यमुनेवर आले आणि घुमरीच्या छंदाने देहभान विसरून गेलेल्या गोपाळांना सावध केले. एका जनार्दनी म्हणतात, भोळ्या भक्तांची दया येऊन कान्हा त्यांच्या प्रेमानें. धावून येतो.
९
पाहूनियां हरी गोपिळाचें चोज । म्हणे तेणें तो निर्वाणीचें निज मांडियेलें ॥१॥ मेठा खुंटी येउनी हुंबरी घालिती । खर तोंडाप्रती येती जाहली ॥२॥ कळवळला देव जाहलासे घाबरा । मुरली अधरा. लावियेली ॥३॥ मुरलीस्वरें चराचरी. नाद तो भरला । तेणें स्थिर झाला पवनवेगीं ॥४॥ यमुनाही शांत झाली तेच क्षणीं । म्हणे चक्रपाणी सावध. व्हा. रे ॥५॥ पेंदीयाचे तो शब्द ऐकिला कानीं । एका. जनार्दनीं स्थिर. झाला. ॥६॥
भावार्थ
गोपाळांचे निर्वाणीचे प्रयत्न पाहून देव कळवळला, काळजीने घाबरला. गोपाळांना सावध करण्यासाठी कृष्णानें मुरलीचे सूर छेडलें, चराचर या नादानें भरून गेले. वायूचा वेग मंदावून स्थिर झाला. यमुनेचा खल्लाळ थांबला, ती शांत झाली. हा प्रसंग वर्णन करुन एका जनार्दनी म्हणतात, सावध व्हा रे हे श्रीहरीचे शब्द ऐकून पेंदा निश्चिंत झाला.
१०
ऐकतां तो नाद मोहिलेंसे मन । न कळे विंदान तिहीं लोकां ॥१॥ सावध. होउनी. गडी ते पहाती ॥२॥ स्थिर पैं होती यमुना ते ॥३॥ एका जनार्दनीं. ऐसा दासाचा. कळवळा । म्हणोनी भक्त लळा पाळितसे ॥४॥ यैवोनि गोपाळ कृष्णासी. बोलती । यमुनेचा बाऊ पळाला वो श्रीपती ॥५॥ धन्य बळिया आम्हीं की वो त्रिभुवनी । धन्य धन्य कृष्णा म्हणोनि नाचती। अवनी आनंदे गोपाळ तयाशीं खेळे ॥६॥
भावार्थ
कृष्णाच्या मुरलीनादाने सर्व सृष्टी मोहून गेली. स्वर्ग, पृथ्वी, आणि पाताळ तिन्हीं लोक विस्मयचकीत झालें. सावध झालेले गोपाळ स्थिर झालेले यमुनाजळ पाहून कृष्णाला सांगतात यमुनेतला बाऊ त्यांचे धाडस पाहून पळाला. ते त्रिजगती धन्य झाले. कारण त्यांच्यावर श्रीपतीने कृपा केली. सर्वजण आनंदाने नाचू लागले, श्रीहरी त्यां आनंदात सहभागी झाले.
११
खेळतां खेळतां गडियासी म्हणे । खेळ तो पुरे गाई जमा करणें ॥१॥ आपुलाल्या आपण वळाव्या गाई । नवल तो तेणें खेळ मांडावया भाई ॥२॥ धांवती सवंगडी पाठोपाठ लवलाह्या । गुंतल्या त्या गाई. न येती वळाया ॥३॥ येवोनि दीन मुख करिती हरीपुढें । एका जनार्दनीं तया. पाहतां प्रेम चढे ॥४॥
भावार्थ
खेळत असतांना सावळा कृष्ण गोपगड्यांना खेळ थांबवून आपआपल्या गाई वळवावयास सांगतो'. सगळे जण एका पाठोपाठ वेगानें धावतात, गाई चारा खाण्यांत गुंतल्या असल्याने घराकडे वळत नाहीत. नाराज होऊन दीनवाणीने गोपाळ हरीपुढे उभे राहतात. एका जनार्दनौ म्हणतात, गोपगड्यांच्या दीन मुद्रा पाहून हरीच्या मनांत त्यांच्या विषयीं प्रेम दाटून येते.
१२
काकुलती गोपाळ म्हणती रे. कान्हया । गाई न येती माघारी कोण. बळी कासया ॥१॥ आमुची. खुंटली गति आवरीं तूं हरी । तुजवाचूनी कोण सखा आमुचा कैवारी ॥२॥ नको येरझारा. पुरे आतां हरी । एका जनार्दनी ऐशी करूणा करी ॥३॥
भावार्थ
काकुळतीला येऊन गोपगडी हरीला विनंती करतात, गाई माघारी फिरत नाहीत, प्रयत्न. करून थकून मार्ग खुंटला आहे, असे बोलून ते कृष्णाला सांगतात, कृष्ण सख्यावाचून त्यांना मदत करणारा कैवारी कोणी नाही. एका जनार्दनी म्हणतात, संसाराच्या येरझर्यातून भक्तांची सुटका करणारे श्रीहरिशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही.
१३
गडियांचे उत्तर ऐकोनि सावळा । वेधियेलें मन तटस्थ सकळां ॥१॥ घेऊनी मोहरी गाई पाचारी सकळां । नवल तें जाहलैं गोपाळा सकळां ॥२॥ येउंनी गाई अवघ्या जमा होती । पाहूनियां कृष्णा त्या हुंबरती ॥३॥ एका जनार्दनीं विश्वाचा निवासी । गाई आणि गोपाळां वेधिलैं सर्वांसी ॥४॥
भावार्थ
गोपगड्यांचे हे उत्तर ऐकून श्रीकृष्णाने नवलाई केली. त्याने गोपाळांसह सर्व गाईंचे मन स्वस्वरुपाशी वेधून घेतले. सकळ गोपाळ आश्र्चर्यचकित झाले, सगळ्या गाई कृष्णा सभोवताली येऊन कृष्णाला पाहून हंबरु लागल्या. एका जनार्दनी म्हणतात, विश्वनायक गाई आणि गोपाळांचे मन वेधून घेतो.
१४
काळे गोरे एकापुढे एक । धांवताती बिदो बिदी देख । अलक्ष लक्ष्या नये सम्यक । तो नंदनंदन त्रिभुवननायक गे माय ॥१॥ गाईवत्स नेताती वनां । गोपाळ म्हणती अरे कान्हा । जो नये वेदां अनुमाना । ज्यासी चतुरानन ध्यानीं ध्यातसे ॥२॥ योगीजनांचे ध्येय ध्यान । ज्याकारणें अष्टांग योगसाधन । तयांसि नोहे कधीं दृश्यमान । तो गोळ्यांचे उच्छिष्ट खाय जाण गे माय ॥३॥ एका जनार्दनीं व्यापक । सर्वां ठायीं समसमान देख । अरिमित्रां देणें. ज्याचें एक । तो हा नायक वैकुंठींचा ४॥
भावार्थ
काळे सावळे गोपगडी एका पुढे एक वेगानें धावतात, सारे लक्ष त्यां नंदनंदन त्रिभुवननायक, जो अलक्ष्य लक्ष्य असल्याने सम्यक दर्शन घडत नाही. ज्याचे वेद सुध्दां सम्यक वर्णन करु शकत नाहीत. ध्यान लावूनही सृष्टीकर्ता ब्रह्मा देखील ज्याला जाणून घेऊ शकत नाही, ज्याच्या साठी योगीजन ध्यानधारणा, अष्टांग योगसाधना करतात त्यांना तो परमात्मा दृष्टीपथांत येत नाही तो गोकुळात गौळ्यांच्या सह गोपाळ काला करून त्यांचे उच्छिष्ट आवडीने खातो. एका जनार्दनी म्हणतात, हा जनार्दन सर्व सृष्टीत व्यापकरुपे भरून राहिला आहे. हा वैकुंठीचा नायक शत्रु आणि मित्र यांना समान दृष्टीने बघणारा असून चराचरावर प्रेम करणारा आहे.
१५
जाहला अस्तमान आलें गोकुळां । वोवाळिती आरत्या गोपिका बाळा ॥१॥ जाती सवंगडी आपुलाले घरां । रामकृष्ण. दोघे आले. मंदिरां ॥२॥ नानापरींची पक्वान्ने वाढिती भोजना । यशोदा. रोहिणी राम आणि कृष्णा ॥३॥ एका जनार्दनीं पहुडले देव । गोकुळामाजीं दावी ऐसे लाघव ॥४॥
भावार्थ
सूर्य मावळला, सर्व गोपाळ आपल्या घरां परतलें, गोपिकांनी गोपबाळांना आरतीने ओवाळलें. रामकृष्ण दोघे राजमंदिरांत परतलें परतलें यशोदा रोहिणीने नाना प्रकारची पक्वान्ने रामकृष्णाला भोजनीं वाढलें. गोकुळांत आपली अवतार लीला दाखवणारे देव सुख शय्येवर पहुडलें असे एका जनार्दनी म्हणतात.
१६
कृष्ण देखतांची गेलें ज्ञान । शेखीं बुडविलें महिमान॥१॥ भली नव्हे हे कृष्णगती । सखे पळविले सांगाती ॥२॥ मायेचा करविला बंदु । शमदमादि पळविले बंधु ॥३॥ द्रष्टा दृश्य दर्शन । तिन्ही सांडिले पुसून ॥४॥ ब्रह्माहमस्मि शुध्द जाण । तेथील शून्य केला अभिमान ॥५॥ एका जनार्दनाची प्राप्ती । ज्ञान अज्ञान हारपती ॥६॥
भावार्थ
सखे सांगाती यांचे पाश तोडून टाकणारी, मायेच्या बंधनातून सोडवणारी, व्यक्तिमहात्म्य बुडविणारी शमदमादि साधनांचा खटाटोप संपवणारी ही कृष्णगती भली नव्हे असे स्पष्ट करून एका जनार्दनीं म्हणतात, कृष्ण स्वरुपाचे दर्शन होतांच दृश्य (देखावा) द्रष्टा, ( पहाणारा ) आणि दर्शन क्रिया ही त्रिपुटी लयास जावून अज्ञाना सहित ज्ञानाचा निरास होतो. मी ब्रह्म आहे ही शुध्द जाणीव होऊन अभिमान शून्य होतो . हे सर्व गुरुकृपेने समजते.
१७
करुनिया काला सर्व आले गोकुळीं । गोपाळांसहित गाईवत्स सकळीं ॥१॥ वोवाळिती श्रीमुख कुर्वंडी करिती । रामकृष्णातें सर्व वोवाळिती ॥२॥ जाहला. जयजयकार आनंद सकळां । एका जनार्दनीं धणी पाहतां डोळां ॥३॥
भावार्थ
काल्याचा सोहळा संपवून गाईवासरे, गोपाळ सर्वजण गोकुळांत परतलें. गोपिकांनी सर्व गोपगड्यांना ओवाळले. रामकृष्णाला ओवाळून आनंदाने जयजयकार केला. एका जनार्दनी म्हणतात, हा आनंद सोहळा पाहून मन समाधानाने भरून गेले.
१८
अस्तमान जालिया ग्रामांत परतले । गोपाळ ते गेले घरोघरीं ॥१॥ आपुलिया गृही रामकृष्ण आले । यशोदेनें केले निंबलोण ॥२॥ षड्ररस पक्वान्नीं विस्तारिलें ताट. । जेविती वैकुंठ नंदासवें ॥३॥ नंदासवें जेवी वैकुंठीचा हरी । ब्रह्मादिक सरी न पावती ज्याची ॥४॥ एका जनार्दनीं ऐसी लीला. खेळे । परब्रह्म सांवळें कृष्णरुप ॥५॥
भावार्थ
सुर्यास्त होतांच गोकुळांत. परतलेलें गोपाळ घरोघरी गेले. रामकृष्ण घरीं. येतांच. यशोदेनें लिंबलोण केले. सहा रसांनी युक्त अशा पक्वानांनी ताट सजविली वैकुंठाचा हरी नंदासवे भोजनास बसलें. ज्याची गोडी ब्रह्मदेवांना देखील. चाखण्यास मिळाली नसेल. असे वर्णन एका जनार्दनी करतात. श्रीकृष्णाचे मथुरेस प्रयाण गौळणींचा आकांत
१९
गौळणी म्हणती यशोदेला । कोठें गे सांवळा । कां रथ शृंगारिला । सांगे वो मजला । अक्रूर उभा असे बाई गे साजणी ॥१॥ या नंदाच्या अंगणी । मिळाल्या गौळणी ॥ध्रु०॥ बोले नंदाची पट्टराणी । सद्गदीत होउनी । मथुरेसी चक्रपाणी । जातो गे साजणी ॥१॥ विव्हळ झाले मन वचन ऐकोनी ॥२॥ अक्रूरा चांडाळा । तुज कोणी धाडिला । कां घात करुं आलासी । बधिशी सकळां । अक्रूरा तुझें नाम तैशीच करणी ॥३॥ रथीं चढले वनमाळी । आकांत गोकुळीं । भूमि पडल्या व्रजबाळी । कोण त्या सांभाळी । नयनींच्या उदकानें भिजली धरणी ॥४॥ देव बोले अक्रूरासी । वेगें हांकी रथासी । या गोपींच्या शोकासी । न पहावें मजसी । एका जनार्दनीं रथ गेला निघोनी ॥५॥
भावार्थ
नंदाच्या अंगणात जमा झालेल्या गौळणी यशोदेला विचारतात की सावळा कोठे आहे ? हा रथ कशासाठी सजविला आहे ? तेव्हां भरल्या कंठाने यशोदा मैत्रिणींना सांगते की चक्रपाणी मथुरेला जात आहेत. शोकाकूल होऊन गौळणी अक्रूराला दूषण देऊन त्याची निंदा करतात की तो नावाप्रमाणेच क्रूर असून घात करण्यासाठीं गोकुळांत आलेला चांडाळ आहे. वनमाळी रथारूढ होतांच गोकुळांत एकच आकांत माजतो. व्रजकन्या भूमीवर कोसळून आकांत करु लागतात. त्यांच्या अश्रुंनी धरणी भिजून जाते. गोपींच्या शोकाने घायाळ झालेल्या श्रीहरीच्या विनंतीनुसार अक्रूर वेगाने रथ हाकतो. कृष्णासह रथ निघून गेला असे एका जनार्दनी खिन्नपणे वर्णन करतात. गोपळांच्या शांतवनाची उध्दवास आज्ञा
२०
उध्दवासी एकांतीं बोले गुज सांवळा । गोकुळासी जाऊनी बोधी सुंदरी गोपीबाळा । रथीं बैसोनी निघाला वेगीं पावला गोकुळां । तो उध्दव देखोनी दृष्टी गोपींनी वेढिला ॥१॥ उध्दवा जाय मथुरेला । आणी. लौकरी हरीला ॥ध्रू०॥ मुख सुंदर शोभे कपाळीं टिळक रेखिला । नवरत्नजडित मुद्रिका हार कंठीं घातिला. ॥२॥ झळकती कुंडलें कानीं शिरीं मुगूट शोभला । मुरली मोहिला भाळला तिच्या रुपासी । डोळे पिचके खुरडत जे चाले काय. । वानूं मुखासी शुध्द भाव. देखोनी तिचा अनुसरला तियेसी ॥३॥ रासमंडळी नाचे मुरारी कधीं भेटेल तो न कळे । वेणू वाजवी सुस्वर सोज्वळ पदकमळें । धणी न पुरे तया पाहतां. मन आमुचे वेधिलें ॥४॥ हा अक्रूर कोठोन आला हरी गेला घेऊनी । तो वियोग जाळी न जाय जीव आमुचा अझुनी । घरदार सोडोनी जावें गोकुळ हे सोडोनी । उध्दवा कधीं भेटविसी हरीला आणुनी ॥५॥ घडी घडी घरां येतो चोरितो श्रीहरी । तो. झडकरी दाखवीं लौकरी । धन्य. प्रेम तयाचें सद्गदित अंतरीं । एका जनार्दनीं हरिरुपीं । वेधल्या नारी ॥६॥
भावार्थ
गोकुळांत जाऊन गोपींना उपदेश करून त्यांचे वियोगी मन शांत करावे असे श्रीकृष्ण उध्दवास सांगतो. वेगाने निघून उध्दव गोकुळांत येतांच गोपी त्याला मथुरेस जाऊन कृष्णाला घेऊन येण्यास विनवितात. श्रीहरीच्या रुपाचे सुंदर वर्ण़न करतात. कपाळीं कस्तुरी टिळक, गळ्यांत हार, बोटांत रत्नजडित अंगठी, कानांत कुंडलें, मस्तकी मुगुट , अधरावर मुरली धारण करणारा श्री हरी गोकुळ सोडून मथुरेला जाऊन राहिला. खुरडत चालणार्या, पिचक्या डोळ्यांच्या कुब्जेच्या भोळ्या भावाला भुलून गोपिकांना विसरला. रासमंडळी नाचणारा, सुस्वर मुरली वाजवणारा, मनाला वेध लावणारा अशा श्रीहरीचा वियोग जीव जाळून टाकीत आहे. हे घरदार, गोकुळ यांचा त्याग करून हरिदर्शनाची आस पुरवावी असे व्याकूळ गोपी उध्दवाला सांगतात. असे कथन करून एका जनार्दनीं गोपी -कृष्णाचे हे अलौकिक, निर्व्याज प्रेम धन्य होय. असे म्हणतात.