मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
एकनाथांचे चरित्र

एकनाथांचे चरित्र

प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली .


नाथांचा जन्म इ. स. १५२८ मध्ये पुण्यपावन अशा घराण्यात झाला. ज्यांनी विजयनगरहून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात परत आणली त्या संत भानुदासाचे एकनाथ हे पणतू होत. भगवद्भक्ती त्यांच्या घराण्यात पूर्वीपासून चालत आलेली. पैठण हे तत्कालीन महाराष्ट्राचे काशीक्षेत्र आणि संस्कृत धर्मग्रंथाच्या अभ्यासाचे व्यासपीठ समजले जाई. या पैठणक्षेत्री एकनाथांचा जन्म झाला. नाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण तर आईचे नाव रुक्मिणी असे होते. पण आईवडिलांचा सहवास नाथांना फार काळ लाभला नाही. नाथांचे पालनपोषण त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनीच केले. एकनाथांनी लहानपणी गीता, उपनिषदे, शास्त्रे, पुराणे याबरोबरच लेखन, वाचन, गणित यांचाही अभ्यास केला. बालवयात भक्तिमार्गाचे संस्कार नाथांवर झाले. त्यांचे मन परमार्थाकडे वळले व गुरूभेटीची ओढ निर्माण झाली. आजोबा चक्रपाणी यांची अनुज्ञा घेऊन एकनाथ देवगिरी येथील विद्वान संत जनार्दनस्वामी यांच्याकडे गेले. अत्यंत तेजस्वी व विनम्र अशा नाथांची योग्यता स्वामींनी ओळखली व एकनाथांना गुरूदिक्षा दिली. गुरू-शिष्य तीर्थयात्रेला निघाले असतांना स्वामींनी नाथांना चतु:श्लोकी भागवतावर टीका लिहिण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे नाथांनी पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर येथील मुक्कामात भागवतावर विद्वत्तापूर्ण व रसाळ भाषेत टीका पूर्ण केली. अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग व उत्तर भारतातील तीर्थे करून नाथ पैठणला आले. 
गुरूआज्ञेप्रमाणे नाथांनी सन १५५७ मध्ये पैठण येथे गिरिजाबाईंशी विवाह केला. पतिव्रता गिरिजाबाई नाथांच्या जीवनांत पूर्ण समरस झाल्या. श्रीखंड्या व उध्दव हे दोन सेवक नाथांना लाभले. गोदा, लीला आणि हरिपंडित ही तीन अपत्ये, मुक्तेश्वर कवी, गोदावरीचा मुलगा हे नाथांचे कुटुंब. एकनाथांचा मुलगा हरिपंडित हा संस्कृत भाषेचा अभिमानी, कर्मठ, सनातनी वृत्तीचा होता. नाथ उदार व सहिष्णू होते. भागवतावर नाथांनी मराठीत टीका केली म्हणून हरिपंडित रागावला व घर सोडून काशीला निघून गेला. नाथांच्या भागवतग्रंथाच्या मराठी टीकेचा काशीच्या पंडितांनी सन्मानाने गौरव केला, तेव्हा हरिपंडिताला आपली चूक समजली व पितापुत्रामधील वाद कायमचा मिटला. 
प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली. नाथांनी आपले विचार व्यक्त करण्यासाठी विविध पद्धतींची योजना केली. पंडित आणि विद्वानांसाठी चतु:श्लोकी भागवत व एकनाथी भागवताचे लेखन केले. मध्यमवर्गासाठी रुक्मिणीस्वयंवर व भावार्थरामायणाची योजना केली. जो तळाचा वर्ग होता त्यासाठी भारूडांची निर्मिती केली. लोकभाषेत लोकरंजन करताना लोकशिक्षण देणारे एकनाथ हे पहिले कवी होत. ग्रंथ, भारूडे, पदे, गौळणी आणि अभंग मिळून नाथांची काव्यसंपदा पाऊण लाख भरते. दत्तउपासक आणि वारकरी, प्रपंच आणि परमार्थ, काव्य आणि तत्वज्ञान, संस्कृत आणि प्राकृत, पंडितश्रेष्ठ आणि सामान्यजन असा समन्वय नाथांनी आपल्या जीवनात व धर्मग्रंथात घातला. 
भागवतातील नवव्या अध्यायाच्या ३२ ते ३५ या चार श्लोकावर एकनाथांनी १०३६ ओव्यांचे भाष्य लिहिले. सृष्टीनिर्मितीपूर्वीं ब्रह्मदेवाने केलेल्या तपश्चर्येने श्रीआदिनारायण प्रसन्न झाले व त्यांनी जे ज्ञान सांगितले ते या चार श्लोकात आले आहे. हा आपला पहिलाच ग्रंथ असल्याने ‘वाकुडे तिकुडे आर्ष‘ आहेत असे नाथ संकोचाने व विनयाने सांगतात. ग्रंथाच्या शेवटी जे बोलविले जनार्दने । तेचि ग्रंथकथने कथिलें म्यां या शब्दांत ग्रंथलेखनाचे सारे श्रेय नाथ आपले गुरू जनार्दनस्वामींना अर्पण करतात. 
नाथांची भारूडरचना विविध स्वरुपाची असून त्यातून लोकजीवनातील उदाहरणे देऊन लोकभाषेतून अध्यात्म शिकवले आहे. मनोरंजनातून परमार्थाची भाषा शिकवली आहे. त्यामुळे नाथांचे वर्णन लोकसाहित्यकार असे केले जाते. नाथकालीन समाजजीवनाचे म्हणजे चालिरिती, सणवा, कुटुंबव्यवस्था, ग्रामजीवन, समाजव्यवस्था यांचे अत्यंत स्पष्ट दर्शन ही भारूडे घडवतात. अशी सुमारे ३०० भारूडे नाथांनी लिहिली आहेत. याशिवाय ‘हस्तामलक', ‘स्वात्मसुख’, ‘शुकाष्टक’, ‘आनंदलहरी’, ‘गीतासार’, ‘चिरंजीवपद’, ‘गीतामहिमा’ अशी स्फुटप्रकरणे नाथांनी लिहिली आहेत. त्यातील ओव्यांची एकूण संख्या सुमारे ४००० आहे. 
विविध देवदेवतांवर एकनाथांनी अभंगरचना करून भक्तीच्या नाना छटांचे मनोरम दर्शन घडवले आहे. अभंगातून कृष्णजन्म, बालक्रिडा, कृष्णमहिमा, पंढरीमहिमा विठ्ठलमहिमा, राममहिमा, नाममहिमा, नामपाठ, किर्तनमहिमा, संतमहिमा, सद्गुरूमहिमा, अद्वैतज्ञान, आत्मभूमी अश्या विविध विषयांवर प्रासादिक, सुबोध अभंगरचना करून नाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे. सुलभता, गेयता, प्रासादिकता हे नाथांच्या अभंगांचे प्रमुख गुणविशेष आहेत. 

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP