२५९
जन देव जन विजन । देवीं जडले तन मन देव घरीं देव दारीं । देव दिसे व्यवहारी । देव मागे देव पुढें । दृष्टि चैतन्य उघडें एका जनार्दनी देव । सहज चैतन्य स्वयमेव
भावार्थ
तन मन परमेश्वरी चरणांशी गुंतून राहिले कीं, जनांत आणि वनांत सगळीकडे देवाचे अस्तित्व जाणवते. चार भिंतिंच्या आंत घरांत आणि बाहेर व्यवहारात देव दिसू लागतो. मागे पुढे सभोताली दृष्टिपुढे चैतन्याचा अनुभव येतो. एका जनार्दनी म्हणतात, चैतन्य सहजपणे एकमेव पुढे उभे ठाकले आहे असे वाटते.
२६०
पाहो गेलो देवालागीं । देवरुप झालो अंगी । आतां मी-तूंपणा ठाव । उरला नाहीं अवघा देव सुवर्णाची झालीं लेणीं । देव झाला जगपणीं घटीं मृत्तिका वर्तत । जगीं देव तैसा व्याप्त एकानेक जनार्दन । एका जडला एकपणें
भावार्थ
देव-दर्शनासाठी दवालयांत गेलो आणि देवाशी एकरुपता पावून देवरुप झालो. देव व भक्त वेगळे उरलेच नाही, सारे द्वैत संपून गेले. सुवंर्णाचे अलंकार घडवले, रुप आणि आकार बदलला तसाच परमेश्वर सर्व सृष्टीत भरून राहिला आहे. मातीच्या घटांत आंतबाहेर जशी माती च असते तसा देव सर्व जग व्यापून उरणारा आहे. एका जनार्दनी म्हणतात , तसेच ह्या गुरुतत्वाशी आपण एकरुप झालो आहे.
२६१
देव झाला पाठीं पोटीं । तया नाहीं आटाआटी जेथें जाय तेथें देव । नाहीं भेद सर्वथा संसारासी मारुनि लाथा । केला तत्वतां देशोधडी विषयाचे ठेचिलें तोंड । मोडिलें बंड पाचांचे एका जनार्दनी एकपणा साठीं ।देव पाठी पोटी भक्ता मागें
भावार्थ
ज्या भक्ताला पुढे मागे देवाचे अस्तित्व जाणवू लागते त्याला साधनेचा आटापिटा करावा लागत नाहीं. स्थल-कालाचा भेद नाहिसा होऊन त्याला सर्वत्र देव दिसतो. पअसा एकनिष्ठ भक्त संसाराला लाथ मारून जगापासून अलिप्त होतो. इंद्रिय विषयांचा संग टाळून मुक्त होतो. पंचमहाभुतानी बनलेल्या देहाचे बंड मोडून टाकतो. एका जनार्दनी म्हणतात, या एकनिष्ठ भक्तांच्या भक्ति साठी देव त्यांच्या मागे पुढे वावरत असतो.
२६२
अष्ट हि दिशा पूर्ण भरला देव । मा पूर्व-पश्चिम भाव तेथें कैचा पाहे तिकडे देव व्यापूनि भरला । रिता ठाव उरला कोठे नाही समाधि समाधान मनाचे उन्मन । मा देवा भिन्नपण नाही नाही एका जनार्दनी एकपणा साठीं । देव पाठीं पोटीं भक्ता मागे
भावार्थ
परमेश्वर आठही दिशा व्यापून भरून राहिला आहे. सर्वत्र देवाचे अस्तित्व जाणवत असल्याने पूर्व , पश्चिम असा भेद नाहिसा झाला. सर्व विश्वांत देव व्यापून राहिल्याने रिक्त जागा दिसेनासी झाली. बघता बघता मन समाधी अवस्थेत गेले. उच्च पातळीवर जाऊन स्थिर झाले आणि अपूर्व समाधान झाले. असा आत्म साक्षात्काराचा अनुभव वर्णन करुन एका जनार्दनी म्हणतात, भक्ताच्या प्रेमसुखाचा आनंद घेण्यासाठी देव भक्ताच्या सभोवती सतत नांदतो.
२६३
साकर दिसे परी गोडी न दिसे । ती काय त्या वेगळी असें तैसा जनीं आहे जनार्दन । तयातें पहावया सांडीं अभिमान कापुरा अंगीं परिमळू गाढा । पाहतां पाहतां केवीं दिसे पाठ पोट जैसें नाही चि सुवर्णा । एका जनार्दनी यापरी जाणा
भावार्थ
साखर आणि साखरेची गोडी जशी एकजीव असूनही साखर डोळ्यांना दिसते पण गोडी वेगळी दिसत नाही. कापुराचा नाकाला जाणवणारा सुवास उघड्या डोळ्यांनी बघता येत नाही. सोन्याचे नाणे जसे अंतर्बाह्य सोन्याने भरलेलें असते तसे सृष्टीच्या अणुरेणूत भरलेले आत्मतत्व जाणावे, जनांत अंशरुपानें भरलेला जनार्दन प्रत्यक्षात दिसत नाही , या दैवी शक्ती चा अनुभव घेण्यसाठी अहंकार दूर करावा. असे एका जनार्दनी म्हणतात .
२६४
मागें पुढे विठ्ठल भरला । रिता ठांव नाहीं उरला जिकडे पाहावे तिकडे आहे । दिशा-द्रुम भरला आहे एका जनार्दनी सर्व देशी । विठ्ठल व्यापक निश्चयेंसीं
भावार्थ
या भजनांत संत एकनाथ विठ्ठल तत्व किती व्यापक आहे हे सांगत आहेत . जिकडे पाहावे तिकडे , मागे, पुढे दाही दिशांत हे इश्वरी रुप भरुन राहिलें आहे. हा विठ्ठल एकदेशीय नसून सर्व चराचरात त्याचे अस्तित्व जाणवते हे नि:संशय सत्य आहे असे एका जनार्दनी म्हणतात.
२६५
पहा कैसा देवाचा नवलाव । पाहे तिकडे अवघा देव पाहणें पातलें देवे नवल केलें । सर्व हि व्यापिलें काय पाहीं पहाणेयाचा ठाव समूळ फिटला ।अवघा देहीं दाटला देव माझ्या एका जनार्दनी कैसे नवल झाले । दिशाद्रुम दाटले देहें सहजी
भावार्थ
परमेश्वरी शक्तीचा चमत्कार असा कीं, जिकडे पाहावे तिकडे देव च दिसतो. देव रुप च सर्व आसमंतात व्यापून राहिले आहे तर त्या इश्वरी रुपा शिवाय अन्य काही नजरेस पडत नाही आणि पहाणाराही त्या रुपाशी एकरुप होतो. हे दैवी-रुप देहाच्या अणुरेणूत व्यापून राहते. एका जनार्दनी म्हणतात, सारे विश्व या देहांत सामावले आहे ही अनुभूती विस्मयकारक आहे.
२६६
देवासी कांहीं नेसणें नसे । जेथे तेथें देव उघडा चि दिसे देव निलाजरा देव निलाजरा । देव निलाजरा पहा तुम्ही लाजेसीं जेथें नाही ठाव ।पांढरा डुकर झाला देव एका जनार्दनी एकल्या काज । भक्ति तेणें चि नेली लाज
भावार्थ
देव भक्तिभावाचा एव्हढा भुकेला आहे कीं, त्याचा लज्जा भाव लोपून गेला आहे अशी एक वेगळी कल्पना या भजनांत वाचायला मिळते. देव भक्तांसाठी आपले अंतर्बाह्य स्वरुप उघड करुन दाखवतो , देव निलाजरा आहे असा संदैश एका जनार्दनी देतात.
२६७
एक धरलिया भाव । आपण चि होय देव नको आणिक सायास । जाय तिकडें देव भास ध्यानीं मनीं शयनीं । देव पाहे जनीं वनीं अवलोकीं जिकडे । एका जनार्दनी देव तिकडे
भावार्थ
मनामध्ये भक्तिभाव दृढ असला म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठी आणखी काही वेगळे सायास करण्याची गरज नाही. असा एकनिष्ठ भक्त ध्यान करीत असताना, चिंतन करताना , एकांतवासांत अथवा जनसमुहांत कोठेही असला तरी तो देवाच्या अस्तित्वाचा अनुभव घेत असतो, असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, असा भक्त आपणच देव होतो.
२६८
मज करुं दिली नाहीं सेवा । दाविलें देवा देहीं च जग व्यापक जनार्दन । सदा असे परिपूर्ण भिन्न भिन्न नाहीं मनीं । भरलासे जनीं वनीं अवलोकी जिकडे । एका जनार्दनी देव तिकडे
भावार्थ
सद्गुरु कृपेने आपणास या देही च परमेश्वरी शक्तिची प्रचिती आली कोणत्याही प्रकारची सेवा न घडतां हे फळ मिळाले असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, सर्व विश्व व्यापून असलेला हा जनार्दन सर्वज्ञानी, परिपूर्ण असून भेदातीत आहे.
२६९
पाहलें रे मना पाहलें रे । बुध्दी -बोधें इंद्रिया सम जालें रे नयनी पाहतां न दिसे बिंब । अवघा प्रकाश स्वयंभ एका जनार्दनी पहाट । जनीं वनीं अवनी लखलखाट
भावार्थ
बुध्दिला झालेल्या पारमार्थिक बोधाने इंद्रियांना समत्व प्राप्त झाले, डोळ्यांना सूर्य-बिंब दिसनासे झाले. ज्ञान-सूर्याचा उदय झाल्यानें अवघे विश्व स्वयंभू प्रकाशाने उजळून निघाले. एका जनार्दनी म्हणतात, नगर, वन, सारी पृथ्वी या स्वयंभू प्रकाशाने न्हावून निघाली, सगळीकडे लखलखाट झाला.
२७०
जळ स्पर्शो जातां स्नानीं । तंव चिन्मय भासे जीवनी कैसी वाहताहे गंगा । स्नानें हरपलें अंग अंगत्व मुकलें अंगा । स्नानीं सोवळीं झाली गंगा एका जनार्दनी मज्जन । सकळ तीर्थे झाली पावन
भावार्थ
एका जनार्दनी म्हणतात, सद्गुरू गंगेच्या प्रवाहांत स्नानासाठी उतरले आणि त्या पवित्र जलाने देहाचे देहपण च हरपले, चिरंतन इश्वरी तत्वाचा जीवनाला स्पर्श झाला आहे असा भास झाला. गंगा-जलाची मलिनता लोप पावली. सकळ तीर्थे पावन झाली.
२७१
स्वयं प्रकाशामाजीं केले असे स्नान । द्वैतार्थ त्यागून निर्मळ झालो सुविद्येचे वस्त्र गुंडोनि बैसलो । भूतदया ल्यालों विभूति अंगीं
चोविसा परतें एक ओळखिलें । तें चि उच्चारिलें मूळारंभीं । एका भावें नमन भूतां एकपणीं । एका जनार्दनी संध्या झाली
भावार्थ
या भजनांत संत एकनाथ पारमार्थिक संध्येचे वर्णन करीत आहेत. ज्ञान -सूर्याच्या स्वयं प्रकाशांत स्नान केल्याने चित्तातिल द्वैत-भावाची मलिनता लोप पावून चित्त निर्मळ झाले. सुविद्येचे वस्त्र नेसून भूतदयेची विभूति अंगाला लावली. चोविस तत्वाच्या पलिकडे असजलेल्या ॐ काराचा उच्चार मूळारंभी करून सर्व प्राणिमात्रांना नमन केले. अशा प्रकारे संध्या-पाठ संपूर्ण झाला.
२७२
झाली संध्या संदेह माझा गेला ।आत्माराम ह्रदयीं प्रगटला गुरु-कृपा निर्मळ भागीरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती ऐसीं पदे एकत्र जेथें होती । स्वानुभव स्नान हे मुक्त-स्थिति सद्बुद्धीचे घालुनि सुखासन । वरी गुरुची दया परिपूर्ण शम-दम विभूति चर्चुनि जाण । वाचे उच्चारी केशव नारायण सहज कर्मे झालीं तीं ब्रह्मार्पण । जन नोहे अवघा हा जनार्दन आइकता निववी साधुजन । एका जनार्दनी बाणली निजखूण
भावार्थ
एका जनार्दनी या भजनांत सांगतात, संध्या झाली आणि मनातिल संदेह समूळ नाहिसा झाला. ह्रदयांत आत्माराम प्रगट झाला . गुरु-कृपेची भागीरथी, शांतिरुपी यमुना आणि क्षमा रुपी सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमांत स्वानुभवाचे स्नान करून मुक्त-स्थिती प्राप्त झाली. सद्बुद्धीचे सुखासन घालून शम-दमाची विभूति अंगाला लावली. वाचेने केशव नारायण या नामाचा जप सुरू केला. या पुण्याईने सारी कर्मे सहजपणे इश्वर-चरणी अर्पण केली. गुरु-कृपेने जनीं वनीं अंत:करणी एकच जनार्दन भरुन राहिला आहे असा साक्षात्कार झाला. ही श्रध्दा चित्तांत कायम स्वरुपी दृढ झाली.
२७३
बोधभानु तया नाहीं मध्याह्नु । सायंप्रातर् नाही तेथें कैचा अस्तमानु कर्म चि खुंटले करणें चि हारपलें । अस्तमान गेलें अस्तमाना जिकडे पाहे तिकडे उदयो चि दिसे । पूर्व पश्चिम तेणें कैची भासे एका जनार्दनी नित्य प्रकाश । कर्माकर्म झालें दिवसा चंद्र जैसा
भावार्थ
निरंतर प्रकाशणाय्रा ज्ञान -सूर्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ या काळाचे बंधन नसते, उदय आणि अस्त या स्थितिच्या मर्यादा नसतात. तसेच पारमार्थिक बोध झालेल्या साधकाचे कर्म , अकर्माचे बंधन गळून पडते. या साधकाच्या दृष्टीने जिकडे पाहावे तिकडे प्रकाशच असतो , मावळणे ही क्रियाच अस्तित्वांत नसते. पूर्व, पश्चिम (उगवती आणि मावळती) या दिशांचे भान ही हरपून जाते. एका जनार्दनी म्हणतात, या आत्मज्ञानी साधकाचे कर्माकर्म दिवसा दिसणार्या चंद्रा सारखे निस्तेज असते.
२७४
कृष्ण चंदन आणिलें । सकळ वेधिलें परिमळें तेथें फुटती अंकुर । अंगी भावाचे तरुवर खैर घामोडे चंदन । कृष्ण-वेधे वेधिलें मन एकाएक हरिख मनीं । वसंत दाटे जनार्दनी
भावार्थ
या भजनांत संत एकनाथांनी कृष्ण भक्तीवर सुंदर रुपक योजले आहे. श्री कृष्णरुपी चंदनाच्या सुगंधाने सर्वांचे मन वेधून घेतले. सर्वांच्या देहावर भावभक्तीचे अंकुर फुटले. एका जनार्दनी म्हणतात, मनाच्या प्रांगणात वसंताचे आगमन झाले. आनंदाने मन भरून गेले.
२७५
आतां कैसेनि पुजूं देवा । माझी मज घडें सेवा तोडू गेलो तुळसी-पान । तेथें पाहतां मधूसूदन पत्र गंध धूप दीप । तें हि माझें चि स्वरुप एका जनार्दनी पुजा । पूज्य पूजक नाही दुजा
भावार्थ
या । भजनांत संत एकनाथ देवपुजेच्या संदर्भांत एक नविनच कल्पना मांडतात. देवपुजेसाठी तुळशीचे पान तोडायला गेलो असतांना मधुसूदनाचे दर्शंन घडलें. पाने, फुले, गंध, धूप, दीप हे सर्व पूजा साहित्य स्वता:चीच रुपे आहेत असे वाटले. एका जनार्दनी म्हणतात, पूजा करणारा आणि पूजेचे आराध्य दैवत वेगळे नसून एकरुप च आहेत आतां देवाची पूजा कशी करता येईल.
२७६
मी चि देवो मी चि भक्त । पूजा उपचार मी समस्त ही चि उपासना भक्ति । धर्म अर्थ सर्व पुरती मी चि गंध मी चि अक्षता । मी चि आहे मी चि पुरता मी चि धूप मी चा दीप । मी माझें देव स्वरूप मी चि माझी करीं पूजा । एका जनार्दनी बोले वाचा
भावार्थ
या भजनांत संत एकनाथ देवपूजे विषयी एक वेगळाच दृष्टिकोन व्यक्त करतात. पूजा करणारा भक्त हाच पूजेचा उपचारही आहे, पूजे पासून मिळणारे फळ (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) हे सुध्दा तो भक्त च आहे, पूजेला लागणारे सर्व साहित्य (गंध, धूप, दीप, अक्षता इ. ) हे सुध्दा त्यां भक्ताचे च रुप आहे. ईतकेच नव्हे तर ज्याची पूजा केली जाते तो देव देखील भक्त च आहे. एका जनार्दनी म्हणतात, सतत केलेल्या उपासनेने देव भक्तातील द्वैत संपून भक्त आणि देव एकरुप होतात.