मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
भाव-दशा

भाव-दशा

प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली .


२३३
एका देहा माजीं दोघे पै बसची । एकासी बंधन एका मुक्तगति पहा हो समर्थ करी तैसे होय । कोण त्यासी पाहे वक्र -दृष्टि पाप पुण्य दोन्ही भोगावी एका हातीं ।ऐसी आहे गति अतर्क्य ते एका जनार्दनी जनीं जनार्दन । तयासी नमन सर्वभावें
भावार्थ
एकाच देहामध्यें जिवात्मा आणि शिवात्मा दोन्हीं वसत असतात. जिवातम्याला जन्म, मृत्युचे बंधन असते तर शिवात्मा मुक्त आहे. त्याच्या कडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. शिवात्मा सामर्थशाली असून तो करील तसेच घडते. पाप आणि पुण्य दोन्ही जिवाला भोगावी लागतात. कर्मगती माणसाच्या तर्क शक्तीच्या पलिकडे आहे. एका जनार्दनी म्हणतात, शिवशक्ती अतर्क्य आहे या शक्तीला सर्वभावे वंदन करावें. 
२३४
सात्विका भरणे रोमांसी दाटणें । स्वेदाचे जीवन येऊन लागे कांदे तो थरारी स्वरूप देखे नेत्रीं । अश्रु त्या भीतरीं वाहताती आनंद होय पोटी स्तब्ध झाला कंठी ।मौन वाक्-पुटीधरुनीराहे टाकी श्वासोच्छ्वास अश्रुभाव देवा । जिरवून एका स्वरुप होय एका जनार्दनी ऐसे अष्टभाव । उत्पन्न होतां देव कृपा करी
भावार्थ
अंगावर शहारे येणे, स्वाद (घाम फुटणे), शरिराला कंप सुटणे, डोळे अश्रुंनी डबडबणे, कंठ गद्गदणें, शब्द कुंठित होणे, श्वासोच्छ्वासाची गती वाढणे, स्वरुप दर्शनाने अंत:करण आनंदाने भरून जाणे हे अष्ट-सात्विक भाव आहेत असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, स्वरुपाशी एकरुप झाल्यावर या सात्विक भावांचा अनुभव येतो, तेव्हां देवाची कृपा होते. 
२३५
सहज सहज ऐशा करिताती गोष्टी परि सहजाची भेटी विरळा जाणे सहजाची आवडी विद्या अविद्या तोडी जाणीव-नेणीवेची राहूं नेदी बेडी जाणीवा जाणपण नेणीवा नेणपण दोहींच्या विंदानें सहजाचे दर्शन एका जनार्दनी जाणीव ना नेणीव सहज चैतन्यासी देउनि ठेला खेंव
भावार्थ
अध्यात्मिक अनुभवांत परमेश्वर भेटीच्या अनेक कथा सांगितल्या जातात परंतू ईश्वर भेटीचे रहस्य एखादाच जाणतो. परमेश्वर कृपेची ओढ निर्माण झालेल्या साधकाचे ज्ञान, अज्ञान, जाणीव, नेणीव यांच्या बेड्या आपोआपच तुटून पडतात. असा साधक जाणीव आणि नेणिवेच्या कक्षा ओलांडून पलीकडे जातो आणि प्रत्यक्ष चैतन्याला मिठी घालतो. हा अनुभव विरळा च असतो. 
२३६
मीतू ऐसी परी । जैसे तरंग सागरीं दोहीं माजी एक जाणा । कृष्ण द्वारकेचा राणा तंतु वस्त्र दोन्ही एक । तैसें जयासी व्यापक देव भक्त ऐसी बोली ।भ्रांती निरसेनासी झाली एका जनार्दनी कृपा । भ्रांति कैसी जगीं पहा पां
भावार्थ
समुद्रावर लाटांचे तरंग उठतात तसेच चित्तात मी-तूं पणाचे तरंग उमटतात. सागरावरचे तरंग जसे पाण्याचे असतात तसेच मनावर उमटणारे तरंग एकाच श्रीकृष्ण रुपी परम तत्वा पासून निर्माण झाले आहेत. तंतू पासून विणलेलें वस्त्र आणि तंतु जसे एकरुप असतात तसेच विश्व आणि विश्वाला प्रकाशित करणारा परमात्मा एकच आहेत हे जाणून घ्यावे म्हणजे देव आणि भक्त भिन्न आहेत या भ्रांतिचे निरसन होईल. एका जनार्दनी म्हणतात, परमेश्वरी कृपेने च या भ्रांतिचे निरसन होते. 

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP