१
सांवळा श्रीकृष्ण राखितो गाई वधियेलें मन आमुचे तें पायीं ॥१॥ नवल लाघव न कळे ब्रह्मादिका । वेदश्रुती शिणल्या ठक पडलें सकळिकां ॥२॥ साही दरूशनें गौळण जयासाठीं । खांदी घेउनी कांबळा गोधन राखी जगजेठी॥३॥ एका जनार्दनीं ब्रह्म गोकुळीं उघडें ।पाहतां. पाहतां चित्त तेथे वेधलें ॥४॥
भावार्थ
ज्याच्या पायीं मन गुंतून गेले आहे तो सांवळा हरी गोकुळांत गाई राखित आहे. भक्तीप्रेमाचे हे विस्मयकारी रुप ब्रह्मादिदेवांना सुध्दां अनाकलनीय आहे. हे जाणून घेण्यांच्या प्रयत्नांत वेदश्रुती थकल्या. साही दर्शने अचंबित झाली. खांद्यावर कांबळे घेऊन गाई राखणाय्रा जगजेठीला पाहून सगळे कोड्यांत पडलें. एका जनार्दनीं म्हणतात, गोकुळांत नांदणारे हे उघडे परब्रह्म पाहतांना मन तेथें गुंतून पडलें.
२
ब्रह्मादिकां न कळे तें रुप सुंदर । गोकुळीं परिकर नंदाघरीं ॥१॥ रांगणा रांगतु बाळलीले खेळतु । दुडदुडां धांवतु गायीपाठीं ॥२॥ गौळणींचे घरीं चोरूनि लोणी खाये । पिलंगता जाये हातीं न लगे ॥३ ॥ एका जनार्दनीं त्रैलोक्या व्यापक । गाई राखे कौतुक गोळियांसी ॥४॥
भावार्थ
नंदाच्या अंगणात रांगणारे, बाळलीला करणारे, गाईंच्या मागें दुडदुडा धावणारे, गौळणींच्या घरीं चोरून. लोणी खाणारे, पळून जातांना कधी हातीं न लागणारे, हे परब्रह्म रुप ब्रह्मादीदेवांना सुध्दां कोड्यांत टाकते . एका जनार्दनीं म्हणतात, स्वरुपाने जे त्रैलोक्य व्यापून टाकते ते परब्रह्म गवळ्यांच्या गाई राखते हे कौतुक केले.
३
ओंकारा परतें निर्गुणा आरुतें । भक्तांसी निरूंतें वसे ॥१॥ सांवळें सगुण चैतन्य परिपूर्ण । सवंगडियांसी क्रीडा करी॥२॥ आदि मध्य अंत न कळे ज्या रुपाचा । तोचि बाळ नंदाचा म्हणताती ॥३॥ एका जनार्दनीं वेगळाचि पाही । हृदयीं धरूनी राही सांवळियासी ॥४॥
भावार्थ
ओंकारा पेक्षां श्रेष्ठतम, निर्गुणा पेक्षां वेगळे, भक्तांना निकट असे परब्रह्म हे स्वरुप सांवळे, सगुण, चैतन्यपूर्ण असून सवंगड्यांसह. क्रीडा करीत आहे. या रुपाचा आरंभ, मध्य, अंत बुध्दीला आकलन होत नाहीं . सामान्य जन या परब्रह्माला नंदबाळ म्हणतात. असे कथन करून एका जनार्दनीं म्हणतात, या आगळ्या वेगळ्या सावळ्या रुपाला अंत:करणांत धारण करावें.
४
सांवळा श्रीकृष्ण. राखितो गाई । वेधियेलें मन आमुचे तें पायीं ॥१॥ नवल लाघव न कळे ब्रह्मादिका ॥१॥ वेदश्रुती शिणल्या ठक पडलें सकळिका ॥२॥ साही दरूशनें वेडावलीं जयासाठीं । खांदी घेऊनी कांबळा गोधन राखी जगजेठी ॥३॥ एका जनार्दनीं चित्त वेधलें ॥४॥
भावार्थ
खांद्यावर कांबळे घेऊन जगजेठी गोकुळांत गाई राखतो, या विस्मयकारक करणीचे मर्म ब्रह्मादिदेवांना देखील उलगडत नाही. वेद आणि श्रुती याची मिमांसा करतांना थकून गेल्या, साही दर्शने हतबुद्ध झाली. सगळेजण कोड्यांत पडलें. एका जनार्दनीं म्हणतात, या सांवळ्या श्रीकृष्णाने सर्वांचे चित्त वेधून घेतले.
५
जाणते नेणते होतु ब्रह्मज्ञानी । तयांचे तो ध्यानी नातुडेची॥१॥ सुलभ सोपारा गोकुळामाझारीं । घरोघरींचोरी खाय लोणी ॥२॥ न कळे ब्रह्मादिका करितां लाघव । योगियांची धांव खुंटे जेथें ॥३॥ एका जनार्दनीं चेंडूवाचे मिसें । उडी घालितसे डोहामाजीं ॥४॥
भावार्थ
ब्रह्मज्ञान जाणणारे योगीजन ज्याच्या रुपाची आस धरून निरंतर ध्यान लावून बसतात त्यांना देखील जो सापडत नाही. ब्रह्मादिदेव आणि जाणते योगीजन यांना जो अनाकलनीय आहे तो श्रीहरी गोपाळांना सहज प्राप्त होतो, घरोघरीं जाऊन चोरून लोणी खातो. एका जनार्दनींम्हणतात, चेंडू आणण्याच्या निमित्ताने श्रीहरी यमुनेच्या डोहांत उडी घालतो .
६
पाहुनी कृष्णासी आनंद मानसीं । प्रेमभरित अहर्निशीं कृष्णनामे॥१॥ आजीं. कां वो कृष्ण आलां. नाहीं घरां । करती येरझारा नंदगृहीं ॥२॥ भलतीया मिसें जातीं त्या घरासी । पाहतां कृष्णासी समाधान ॥३॥ एका जनार्दनीं वेधल्या गौळणी । तटस्थ त्या ध्यानीं कृष्णाचिया॥४॥
भावार्थ
प्रेमभराने कृष्णाच्या नामाचा जप करणार्या गौळणी कृष्ण दर्शनाने आनंदित होतात. कृष्ण भेटला नाहीतर त्या कांहीतरी. कारण. काढून नंदाघरीं येरझरा घालतात. कृष्ण भेटताच समाधान. पावतात. एका जनार्दनीं म्हणतात, गोपींचे चित्त श्रीहरीने हरण केले आहे.
७
वैधिल्या त्या गोपी नाठवे आपपर । कृष्णमय शरीर वृत्ति जाहली ॥१॥ नाठवे भावना देह गेह कांहीं । आपपर त्याही विसरल्या ॥२॥ एका जनार्दनीं व्यापला हृदयीं । बाहेर मिरवी दृष्टिभरित ॥३॥
भावार्थ
गोकुळीच्या गोपींच्या देहवृति आणि मनोवृत्ति कृष्णमय झाल्या. देह आणि घरा विषयींच्या ममत्वाच्या भावनांचा. पूर्ण निरास झाला. आपपर भाव लोपला. बाह्य सृष्टीत नजरेला दिसणाय्रा कृष्णरूपाने हृदय व्यापून टाकले. या शब्दांत गोपींच्या प्रेमभक्तीचे वर्णन एका जनार्दनीं करतात.
८
जगाचे जीवन ब्रह्म परिपूर्ण । जनीं जनार्दन व्यापक तो॥१॥ तो हरी गोकुळीं रांगणा नंदाघरीं । गौळणी त्या सुंदरी खेळविती ॥२॥ वेद गीतीं गाणी शास्त्रें विवादती । खुंटलीसे मति शेषादिकांची ॥३॥ एका जनार्दनीं चहूं वाचांपरता । उच्छिष्ट सर्वथा भक्षी सुखें ॥४॥
भावार्थ
परिपूर्ण ब्रह्म, विश्वाचे चैतन्य असा हा जनार्द़न अणुरेणुमध्यें भरून राहिला आहे. ज्याचा महिमा वेद, पुराणे गीतांमधून गातात, साही शास्त्रे वाद विवाद करतात. त्याचे यथार्थ वर्णन सहस्त्र मुखीं शेष सुध्दा करु शकत नाही. तो हरी नंदाघरी रांगतो, गौळणी त्याला खेळवतात. एका जनार्दनी म्हणतात, वैखरी, मध्यमा, पश्यंती, परा या चारी वाचा या रुपाचे वर्णन करण्यासाठी असमर्थ ठरतात.
९
चहूं वाचांपरता चहूं वेदां निरूता । न कळे तत्वतां चतुर्वक्त्रा ॥१॥ चौबारा खेळतु सौंगडी सांगातु । लोणी चोरुं जातु घरोघरीं ॥२॥ चौसष्टा वेगळा चौदांसी निराळा । अगम्य ज्याची लीळा सनकादिका ॥३॥ एका जनार्दनीं चहूं देहावेगळा । संपुष्टीं आगळा भरला देव ॥४ ॥
भावार्थ
वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या चारी वाचा ज्याचे यथार्थ वर्णन करु शकत नाही, चारी वेद ज्या परमात्म रुपाचे वर्णन करतांना नेती नेती म्हणून मूक होतात, चार मुखी ब्रह्मदेव ज्याला तत्वतां जाणू शकत नाही, जो चोसष्ट विद्या आणि चौदा कला यांच्याहून निराळा आहे. सनकादिक ऋषीं देखील या परमात्म्याच्या अगम्य लिळांचे वर्णन करु शकत. नाही. असे कथन. करून एका जनार्दनीं म्हणतात, स्थूल, सुक्ष्म, कारण आणि महाकारण या चारी देहावेगळा हा परमात्मा अंतरंग व्यापून टाकतो.
१०
अबोलणें बोल कुंठीत पै जाहलें । तें निधान देखिलें नंदाघरीं ॥१॥ अधिष्ठान मूळ व्यापक सकळ । जगाचें तें कुळ कल्पद्रुम ॥२॥ एका जनार्दनीं. बिंबी बिंबाकार । सर्वत्र श्रीधर. परिपूर्ण. ॥३॥
भावार्थ
नंदाघरीं नांदत असलेलें विश्वाचे निधान पाहून शब्द कुंठीत होऊन वाचा अबोल झाली. सकळ विश्वाचे व्यापक अधिष्ठान, जगाला ईच्छिले फळ देणारा कल्पतरु श्रीधर सर्वत्र ओतप्रोत भरून राहिला आहे. असे वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात, परमात्म्याच्या प्रतिबिंब रूपी सृष्टितिल बिंब असुन सर्वसाक्षी आहे.
११
राखितो गोधनें मनचेनि मनें । न पुरे अवसरू धांवण्या धांवणें । कुंठित जाहली गति पवनाची तेणें । तो हा नंदाचा नंदन यशोदेचें तान्हैं ॥१॥ देखिला देखिला मंडित चतुर्भुज । वैकुंठीचा भूपती तेज:पुंज । पहातांचि तया नावडे कांहीं दुजें । ऐसें लाघव याचें सहज ॥२॥ चित्त चैतन्य पडिली मिठी । कामिनी मनमोहना जगजेठी । तुझ्या वेधें ध्यानस्थ धूर्जटी । ऐसा गोवळु योगीयांसी नोहे भैटी॥३॥ एका जनार्दनीं शब्दांवेगळा । आगमांनिगमां कांहीं न कळे लीळा । सोहं कोहं शब्दांवेगळा । पहा पहा परब्रह्म पुतळा॥४॥
भावार्थ
नंद यशोदेचा नंदन मनोवेगाने धांवून गाई राखतो, त्या वेगापुढे वायुची गती कुंठित होते. शंख, चक्र, गदा, पद्म यांनी मंडित असलेला चतुर्भुज तेज:पुंज असा वैकुंठीचा राजा पाहतांच दुजें कांही पाहण्याची ईच्छाच उरत नाही. मनमोहन जगजेठी दृष्टीस पडतांच चित्ताला चैतन्याची मिठी पडतें. प्रत्यक्ष शिवशंकर ध्यानस्थ बसून या भेटीची अपेक्षा करतात. एका जनार्दनीं म्हणतात, वेदश्रुतींना या परब्रह्म्याच्या अवतार लीळांचे रहस्य कळत नाही. हा परब्रह्म पुतळा शब्दांनी वर्णन करण्या पलिकडील आहे.
१२
चतुर्भुज शामसुंदर । गळां गुंजांचे हार । निडळीं चंदन शोभे परिकर । मिरवे नंदरायाचा किशोर ॥१॥ हातीं काठी खांदां कांबळीं । गाई राखे यमुनेचे पाबळी । नाचती गोपाळ धुमाळी । पृष्टी जाळी दहीभात ॥२॥ जें निगमांचे ठेवणें । सनकसनंदाचे घोसुलें येणें । शंभूचे आराध्यदैवत केणें । तें चारित. गोधने नंदाचीं ॥३॥ ऐसा अकळ नाकळें हरी । वेणू वाजवी छंदे नानापरी । एका जनार्दनीं वाटी शिदोरी गोपाळा ॥४॥
भावार्थ
चारभुजाधारी शामसुंदर नंदरायाच्या किशोराचे रूप घेऊन यमुनेच्या तीरावर गाई राखतो निडळावर चंदनाचा रेखीव टिळा, गळ्यांत गुंजांचे हार, खांद्यावर कांबळी, हातामध्ये काठी घेऊन वेणू वाजवितो. सभोवती गोपाळ आनंदाने नाचतात. शिवशंकराचे आराध्यदैवत, सनकादिक ऋषींचे ध्याननिधान, वेदांचे उगमस्थान असा हा वैकुंठीचा हरी कळूनही पूर्ण समजल्या सारखा. वाटत नाही. असे कथन करून एका जनार्दनीं म्हणतात, हा गोपवेषातील श्रीहरी गोपाळांना शिदोरी वाटतो.
१३
राखीत गोधनें भक्तांचिया काजा । उणीव सहजा येवो नेदी॥१॥ आपुलें थोरपण सारूनी परतें । भक्तांचे आरुतें काम करी ॥२॥ उच्छिष्ट काढणें सारथ्य करणें । उच्छिष्ट तें खाणें तयांसवें ॥३॥ चुकतां वळतीआपण वोळणें । एका जनार्दनीं पुण्य धन्य त्यांचे॥४॥
भावार्थ
वैकुंठीचा राणा गोकुळांत भक्तांसाठी गोधने राखतो. यांत कोणतिही उणीव जाणवूं देत नाही. आपला थोरपणा बाजूला सारून भक्तांचे काम पूर्ण करतो. रथाचे सारथ्य करतो, उष्ट्या पत्रावळी उचलतो, उच्छिष्ट खातो. चुका सुधारून घेतो. असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, या गोकुळवासी जनांचे पुण्य थोर असल्याने त्यांना हे भाग्य प्राप्त झाले.
१४
न देखतां कृष्णवदन । उन्मळती तयांचे नयन । न घेती अन्नजीवन । कृष्णमुख न पाहताना ॥१॥ कोठें गुंतला आमुचा कृष्ण । ऐशी जया आठवण । गायी हुंबरती अधोवदन । कृष्णमुख न पाहताना ॥२॥ सवंगडे ठायीं ठायीं उभे । कृष्णीं द्रष्टी ठेवुनी लोभें । आजी कृष्ण कांहो नये । आम्हांशीं खेळावया ॥३॥ ऐशी जयांची आवडीं । तयां पडो नेदी सांकडी । एका. जनार्दनीं उडी । अंगें घाली आपण ॥४॥
भावार्थ
गोपगड्यांना कृष्णाचे दर्श़न न झाल्यास त्यांचे डोळे आसवांनी भरून वाहू लागतात. ते अन्नपाणी सोडून देतात. कृष्ण कोठे गुंतला असेल या विचाराने अस्वस्थ होतात, त्याच्या आठवणीने व्याकुळ होतात. गाई खाली माना घालून हंबरतात. सवंगडी ठिकठिकाणी उभे राहून कृष्ण केव्हां खेळायला येईल याची वाट पहातात गोपगड्यांच्या या प्रेमभक्तीने ते कृष्णसख्याला एक क्षणही विसंबत नाहीत असे एका जनार्दनीं म्हणतात.
१५
ज्याचें उदारपण काय वानुं । उपमेसी नये कल्पतरु कामधेनु । वेधी वेधियेलें आमुचे मनु । तो हा देखिला सांवळा श्रीकृष्ण ॥१ ॥ मंजुळ मंजुळ. वाजवी वेणू । श्रुतीशाखां न कळे अनुमानु । जो हा परापश्यंती वेगळा वामनु । तया. गोवळ म्हणती कान्हू ॥२॥ रुप अरुपाशीं नाही ठाव. । आगमांनिगमां न कळे वैभव । वेदशास्त्रांची निमाली हाव । एका जनार्दनीं देखिला स्वयमेव ॥३॥
भावार्थ
ज्याच्या औदार्याला कल्पतरू आणि कामधेनुची उपमा अपुरी पडेल त्या सांवळ्या श्रीकृष्णाने चित्त वेधून घेतले आहे. हा वामन अवतार परा, पश्यंती वाणींच्या पलिकडे रेअसून त्याचे अनुमान वेदश्रुतींना सुध्दां अनाकलनीय वाटते, अशा परब्रह्माला गोकुळचे गोप कान्हा म्हणतात. प्रेमभक्तीचे असे वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात, ज्याच्या रुपाचे. आणि वैभवाचे आकलन आगमानिगमाला होत नाही असा श्रीपती स्वयमेव याच देहीं याच डोळां पहावयास मिळाला .
१६
मागे पुढे उभा हाती घेउनी काठी वळत्या धावे पाठीं गाईमागें ॥१॥ गोपाळ बैसती आपण धांवे राणा । तयाच्या वासना पूर्ण करी ।२॥ वासना ते देवें जया दिली जैशी । पुरवावी तैसी ब्रीद साच ॥३ । । ब्रीद तें साच करावें आपुलें । म्हणोनियां खेळे गोपाळांत ॥४ ॥ एका जनार्दनीं खेळतो कान्हया । ब्रह्मादिका माया न कळेची ॥५॥
भावार्थ
वैकुंठीचा राणा हातांत काठी घेऊन गाईंच्या मागे पुढे उभा राहतो आणि वळत्या गाईंच्या पाठीमागे धावतो. गोपाळांच्या वासना पूर्ण करण्यासाठी त्यांना विश्रांती देवून आपण गाईंच्या मागे धावतो. मनांत वासना निर्माण करणारा देव त्यां वासना पुरवतो हे ब्रीद खरे करतो. देव भक्तांचे कोड पुरविण्यासाठी गोपाळां समवेत खेळ खेळतो. एका जनार्दनीं म्हणतात कान्हाची ही माया ब्रह्मादिदेवांना आकळत नाही.
१७
तिन्हीं त्रिभुवनी सत्ता जयाची । तो गोपाळांचे उच्छिष्ट खाय ॥१॥ खाउनी उच्छिष्ट तृप्तमय. होय । यज्ञाकडे न. पाहे वांकुडें तोंडें. ॥३॥ ऐसा तो लाघव गोपाळांसी दावी । एका जनार्दनीं कांहीं कळों नैदी ॥३॥
भावार्थ
स्वर्ग पृथ्वी पाताळ या तिन्ही भुवनांत ज्याची सत्ता चालते तो गोपाळांचे उच्छिष्ट खाऊन तृप्त होतो. यज्ञयागाकडे दुर्लक्ष करतो. एका जनार्दनीं म्हणतात, गोपाळांविषयी श्रीहरीला जो आपलेपणा. वाटतो ते अनाकलनीय आहे.
१८
न कळे लाघव तया मागें. धावें । तयाचे ऐकावें वचन देवें ॥१॥ देव तो अंकित भक्तजनांचा । सदोदित साचा मागें धांवे ॥२॥ गोपाळ आवडीं म्हणती कान्हया । बैसे याची छाया सुखरूप ॥३॥ सुखरूप बैसे वैकुंठीचा राव ।भक्ताचा. मनोभाव जाणोनियां ॥४॥ जाणोनियां भाव पुरवी वासना । एका जनार्दना शरण जाऊं ॥५॥
भावार्थ
वैकुंठीचा राजा गोपाळांच्या मागे धावतो, त्यांचे वचन ऐकून त्यांचा अंकित होतो. गोपाळ देवाला प्रेमाने कान्हा म्हणतात आणि भक्तांच्या मनांतिल भाव जाणून कान्हा त्यांच्या सर्व ईच्छा पूर्ण करतो. एका जनार्दनीं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या चरणीं शरणागत होतात.
१९
भक्तांचा पुरवी लळा । तो सांवळा श्रीकृष्ण ॥१॥ उचलिला पर्वतगिरी । नाथिला. काळ्या यमुनेतीरीं ॥२॥ अगबग. केशिया असुर । मारिला तो कंसासुर ॥३॥ उग्रसेन मथुरापाळ । द्वारका बसविलीं सकळ ॥४॥ द्वारकेमाजीं आनंदघन । शरण एका जनार्दन ॥५॥
भावार्थ
सांवळा श्रीकृष्ण भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी करांगुलीवर गोवर्धन पर्वत उचलतो. यमुनेचे पाणी विषारी बनवणार्या कालिया सर्पाचे मर्दन करतो. कशिया असुराचा वध करतो. कंसासुराला मारून उग्रसेनेला मथुरेच्या सिंहासनावर बसवतो. द्वारका नगरी वसवून प्रजेला आनंद देतो या आनंदघन श्रीकृष्णाला एका जनार्दनीं सर्वभावें शरण जातात.
२०
कमळगर्भीचा पुतळा । पाहतां दिसे पूर्ण कळा । शशी लोपलासे. निराळा रुपासही ॥१॥ वेधक वेधक नंदनंदनु । लाविला अंगीं चंदनु । पुराणपुरुष पंचाननु । सांवळां कृष्ण ॥२॥ उभे पुढें अक्रुर उद्धव । मिळाले सर्व भक्तराव । पहाती मुखकमळभाव । नाठवे द्वैत ॥३॥ रूप साजिरें गोजिरें । दृष्टी पाहतां मन न पुरे । एका जनार्दनीं झुरे । चित्त तेथें सर्वदा ॥४॥
भावार्थ
भक्त प्रल्हादा साठी नृसिंह रूपानें अवतार धारण करणारा श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या नाभिकमळांतून जन्मला असे या पुराणपुरूषाचे वर्णन विष्णुपुराणांत आढळते. चंद्राचे तेज ज्याच्या तेजापुढे फिके पडते असे याचे रूप सोळा कलांनी परिपूर्ण भासते. सर्वांचे लक्ष वेधून घेणार्या या नंदनंदनाने चंदनाची उटी अंगाला लावली आहे. या सांवळ्या श्रीकृष्णापुढे अक्रूर, उध्दवा समवेत सर्व भक्त उभे राहून त्याचे साजिरे, गोजिरे रूप डोळ्यांत साठवित आहेत. श्रीकृष्णरूपाचे असे यथार्थ वर्णन करून एका जनार्दनीं म्हणतात, या रूपाच्या दर्शनाने मनाची आस कधीच पुरी होत नाही चित्त सतत झुरत राहते.
२१
जगाचें जीवन भक्तांचे मोहन । सगुण निर्गुण ठाण शोभतसें ॥१॥ तें रुप गोकुळीं नंदाचिये घरीं । यशोदे मांडीवरी खेळतसे ॥२॥ ईंद्रादी शंकर ध्यान धरती ज्याचे । तो. लोणी. चोरी गौळ्याचे घरोघरीं ॥३॥ सर्वांवरी चाले जयाची तें सत्ता । त्यासी. बागुल आला म्हणतां उगा राहे ॥४॥ एकाचि पदें बळी. पाताळीं घातला । तो उखळीं बांधिला यशोदेनें ॥५॥ जयाचेनी तृप्त त्रिभुवन. सगळें तो लोणियाचे गोळे मागून खाय॥६॥ एका जनार्दनीं भरुनी उरला । तो असे संचला विटेवरी ॥७॥
भावार्थ
निर्गुणरुपे जो विश्वाचे अधिष्ठान असून सगुणरुपाने भक्तांचे मनमोहन रूप गोकुळांत नंदाघरीं यशोदेच्या मांडीवर खेळत आहे. शिवशंकरासह इंद्रादि देव ज्याच्यासाठी ध्यानधारणा करतात तो गवळ्यांचे घरी लोणी चोरुन खातो. सर्वांवर ज्याची सत्ता चालते तो बागुलबुवा आला म्हणतांच उगा राहतो. ज्याने एका-पदाने दैत्यराजा बळीला पाताळांत ढकललें त्याला यशोदेने उखळाला बांधले. जो त्रिभुवनाची भूक भागवून तृप्त करतो तो गोकुळांत लोण्याचे गोळे मागून खावून संतोष पावतो. एका जनार्दनीं म्हणतात, जो अखिल विश्व केवळ दशांगुळे व्यापून उरला तो प्रेमभक्तीसाठी पंढरींत एका विटेवर उभा ठाकला आहे.
२२
अर्जुनाचे रथीं श्रमला जगजेठी । म्हणोनी कर ठैउनी कटी उभा येथें ॥१॥ धरुनी गोवर्धन उभा सप्तदीन । म्हणौनि कर जघन ठेऊनी उभा ॥२॥ कंसादी मल्ल मारी जरासंघ । ते चरणविंद उभे विटे॥३॥ धर्माघरीं उच्छिष्टपात्र काढी करे । म्हणौनि श्रमें निर्धारिं ठेविलें कटीं कर ॥४॥ पुंडलिक भक्त देखौनि तल्लीन जाला एका जनार्दनीं ठेविला कटीं कर ॥५॥
भावार्थ
अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करुन थकल्यामुळे जगजेठी श्रीकृष्ण कर कटीवर ठेवून उभा आहे. गोकुळजनांवर गोवर्धन पर्वताचे छायाछत्र धरुन सात दिवस उभा राहून थकल्याने हात कंबरेवर ठेवून उभा आहे. कंसाच्या मल्लांचा पराभव करून आणि जरासंघाचा वध करुन जगजेठीचे हे वंदनीय चरण विटेवर उभे ठाकले आहेत. धर्मराजाच्या राजसूय यज्ञात उष्टी पात्रे उचलून श्रमपरिहारा साठी भकतवत्सल श्रीहरी करकटीं ठेवून उभा राहतो. एका जनार्दनीं म्हणतात, भक्त पुंडलिकाला पाहून तल्लीन झालेला श्रीकृष्ण पंढरींत कटीकर ठेवून उभे आहे.