मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
श्रीविठ्ठलनाममहिमा

श्रीविठ्ठलनाममहिमा

प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली.


अविनाश नाम स्वयंभ संचलें । तें उभें चांगलें विटेवर ॥१॥ वर्णितां वेदांसी न कळेचि पार । तें उभें साचार विटेवरी ॥२॥ मौन्यरुप श्रुती राहिल्या तटस्थ । तो आहे मूर्तिमंत विटेवरी ॥३॥ एका जनार्दनीं नाम अविनाश । गातां जातीं दोष जन्मांतरींचे ॥४॥
भावार्थ
अविनाशी परमात्मा साचार विटेवर उभा आहे, त्याचा अपार महिमा चारी वेदही यथार्थपणे वर्णन करु शकत नाहीत. स्वयंभू रुपाने विटेवर उभेअसलेले हे मुर्तिमंत रूप पाहून श्रुती तटस्थपणे मौन धारण करून राहिल्या आहेत. एका जनार्दनीं म्हणतात, अनेक जन्मांचे दोष हे अविनाशी नाम घेतल्याने निघून जातात. 

जयालागीं करिती योगी सायास ।तो हरी पंढरीस उभा असे ॥१॥ न लगे साधन मांडणे तत्वतां ।नाम गातीं गातां सोपा सर्वां ॥२॥ नर अथवा नारी न म्हणे दुराचारी । दर्शने उध्दरीं जडजीवा ॥३॥ पुंडलिका भाक देऊनि सावकाश । पुरवितो सौरस अद्यापवरी ॥४॥ एका जनार्दनीं चैतन्याचा गाभा । विटेवरी उभा भक्तांसाठीं ॥५॥
भावार्थ
ज्याच्यासाठी योगी खडतर तपश्चर्या करतात तो विश्व चैतन्याचा गाभा कोणत्याही साधनेशिवाय केवळ नामजपाच्या सोप्या मार्गाने सहजसाध्य होतो. नर, नारी, सदाचारी, दुराचारी असा भेदभाव न करता केवळ दर्शनाने तो विश्वात्मा जडजीवांचा उध्दार करतो. भक्त पुंडलिकाला दिलेले वचन पाळण्यासाठीं तो अजुनही भक्तांसाठी विटेवर उभा आहे असे एका जनार्दनीं सांगतात. 

अंकितपणे राहिला उभा । विठ्ठल चैतन्याचा गाभा । उजळली दिव्य प्रभा । अंगकांती साजिरी ॥१॥ पीतांबर माळ कंठी । केशर कस्तुरीची उटी । मुगुटा तळवटीं । मयुरपिच्छें शोभत ॥२॥ सनकादिकांचे जे ध्यान । उभें विटे समचरण । भक्तांचे ठेवणे ॥३॥ वाचे वदतां न लगे मोल । एका जनार्दनीं बोल । फुकाचें तें वेचितां ॥४॥
भावार्थ
भक्त पुंडलिकाच्या भक्तीचा अंकित होऊन विठ्ठल रूपाने चैतन्याचा गाभा विटेवरीं समचरणी उभा आहे. या विश्वात्मक विश्वेश्वराच्या अंगकांतीची दिव्य प्रभा विश्वांत प्रतिबिंबित झाली आहे. कटी पितांबर, कंठी वैजयंती माळ, कस्तुरी मिश्रीत केशराची उटी आणि मुगुटीं मोराची पिसे शोभून दिसत आहेत. सनकादिक मुनीं ज्या स्वरूपाचे निरंतर ध्यान करतात, तो भक्तांच्या हृदयीचा ठेवा असून केवळ वाचेने आळवितांच कृपेचा वर्षाव करतो. त्या साठी कांहीं मोल द्यावे लागत नाही असे एका जनार्दनीं या अभंगातून आश्वासन देतात. 

श्रीविठ्ठलाचें नाम मंगल । अमंगल उध्दरिले ॥१॥ ऐसा याचा थोर महिमा । शिव उमा जाणती ॥२॥ एका जनार्दनीं नाम ब्रह्म । सोपे वर्म जपतां ॥३॥
भावार्थ
श्रीविठ्ठलाचे मंगल नाम सर्व अमंगलाचा उध्दार करते असा या नामाचा महिमा आहे हें शिव पार्वती जाणतात. सरहे नादब्रह्म असून जप करण्यास अती सुलभ आहे असे एका जनार्दनीं म्हणतात. 

नामामृत गोडी वैष्णव जाणती । येर चरफडती काग जैसें ॥१॥ प्राकृत हे जन भुलले विषया । नामाविण वांया जाती देखा ॥२॥ नामें साधे मुक्ति नामे साधे मुक्ति । नामेंचि विरक्ति होत आहे ॥३॥ नाम तेंचि जालें वर्णरुपातीत । अनाम सतत उभें असें ॥४॥ एका जनार्दनीं पूर्ण नामबोध । विठ्ठलनामीं छंद सदा असो ॥५॥
भावार्थ
नामरुपी अमृताची गोडी वैष्णव जाणतात. बाकीचे कावळ्यासारखी व्यर्थ कावकाव करतात. ईंद्रिय विषयसुखाला भुलून सामान्य जन मानवी जन्म वाया घालवतात. विठ्ठल नामाच्या उच्चाराने भक्ती, मुक्ती आणि विरक्ती साध्य होते. ज्यांना नामबोध झाला तें वर्ण व रुप यांच्या अतित होतात. विठ्ठल नामाचा छंद सतत मनाला जडो अशी प्रार्थना एका जनार्दनीं या अभंगात करतात. 

सर्वकाळ ज्यांचा नेम । वाचें श्रीविठ्ठलाचें नाम । दुजा नाहीं कांहीं श्रम । विठ्ठल विठ्ठल वदती ॥१॥ धन्य पुण्य तया साचें । नामस्मरण नित्य वाचे । त्रीअक्षरीं नाम वाचें । धन्य त्यांचें पुण्य तें ॥२॥ ऐसा साधे जया नेम । तया सोय राखे आत्माराम । एका जनार्दनीं परम । प्रिय तो देवाचा ॥३॥
भावार्थ
विठ्ठल ह्या तीन अक्षरी नामाचा सर्वकाळ वाचेने जप करणे हा ज्या साधकांचा नित्यनेम असतो ते धन्य होत, ते देवाला प्रिय असतात. या नामजपाच्या साधनेनें पुण्य संचय वाढतो. आत्माराम या साधकांवर प्रसन्न असतो असे एका जनार्दनीं या अभंगात स्पष्ट करतात. 

दीनाचिया काजा । धांवे वैकुंठीचा राजा ॥१॥ तो हा हरी विटेवरी । समकर धरूनी कटीं ॥२॥ भक्त पुंडलिका पाहे । उभारूनी दृढ बाहे ॥३॥ एका जनार्दनीं शरण । विठ्ठलनाम पतीत पावन ॥४॥
भावार्थ
दीनदुबळ्या भक्तांसाठी धावत येणारा वैकुंठीचा राजा समचरण विटेवर ठेवून भक्त पुंडलिकासाठीं दृढपणे उभा आहे. विठ्ठल नामाने पतीत पावन होतात असे सांगून एका जनार्दनीं विठ्ठल चरणीं शरणागत होतात. 

गोमटीं गोजिरीं पाऊलें साजिरीं । कटीं मिरविलीं करें दोन्हीं ॥१॥ वामभागीं शोभें भीमकतनया । राही सत्यभामा या जीवलगा ॥२॥ गरूड हनुमंत जोडलें तें करी । उभे महाद्वारीं भक्त जन ॥३॥ एका जनार्दनीं आनंद भक्तांचा । जयजयकार साचा विठ्ठलनामें ॥४॥
भावार्थ
दोन्ही हात कमरेवर, सुंदर गोजिरी पाऊले विटेवर ठेवून उभा असलेल्या विठ्ठलाच्या डाव्या बाजूला भीमक राजाची कन्या रुक्मिणी व सत्यभामा शोभून दिसत आहेत. समोर गरूड, हनुमंत हात जोडून उभे आहेत. महद्वारी भक्तजनांचा मेळावा विठ्ठल नामाच्या गजरांत आनंदाने नाचत आहेत. असे सुंदर शब्दचित्र या अभंगात एका जनार्दनीं रेखाटतात. 

श्रीगुरुसारखा वंद्य नाहीं त्रिभुवनीं । तो कैवल्याचा धनी विटेवरी ॥१॥ विटेवरी उभा आनंदे राहिला । वैष्णवांचा मेळा शोभे तेथें ॥२॥ आनंद भीमातीरीं पुंडलिकापाशीं । नाम आनंदेसी गाऊं गीती ॥३॥ एका जनार्दनीं कैवल्याचा धनी । तो नंदाच्या अंगणीं खेळे लीला ॥४॥
भावार्थ
गोकुळांत नंदाच्या अंगणांत लीला करणारा श्रीहरी हाच परब्रह परमात्मा कैवल्याचा धनी भक्त पुंडलिका साठी भीमातीरी पांडुरंग रूपांत आनंदाने विटेवर उभा आहे. वैष्णवांचा मेळा आनंदानें क्विठ्ठल नामाचा जयघोष करीत आहेत असे वर्णन करुन एका जनार्दनीं म्हणतात, हा कैवल्यमूर्ति पांडुरंग जगद्गुरू असून त्याच्या ईतका वंदनीय त्रीभुवनांत कोणी सापडणार नाही. 
१०
जन्मांतर सुखें घेऊं । श्रीविठ्ठलनाम आठवूं ॥१॥ नाहीं त्याचे आम्हा कोडें । विठ्ठल उभा मागें पुढें ॥२॥ कळिकाळाचें भय तें किती । पाय यमधर्म वंदिती ॥३॥ एका जनार्दनीं सिद्धी ।नामें तुटती उपाधी ॥४॥
भावार्थ
विठ्ठल नामाचा निजध्यास घेतलेल्या भक्तांना विठ्ठल त्यांचा सखा सांगाती वाटतो. सतत मागे पुढे राहून तो त्यांची सोबत करतो. अनेक जन्मांचे सोहळे विठ्ठल नाम गांत गांत साजरे करण्याची जिद्द हे भक्त बाळगतात. कळीकाळाचा नियंता विठ्ठल कृपेने या भक्तांच्या पायीं वंदन करतो. विठ्ठल नामानें सर्व सिध्दी प्राप्त होतात, सर्व उपाधी मिटतात असे एका जनार्दनीं सांगतात. 
११
व्यापक विठ्ठल नाम तेव्हांचि होईल । जेव्हां तें जाईल मीतूंपण ॥१॥ आपलें ते नाम जेव्हां वोळखील । व्यापक साधेल विठ्ठल तेणें ॥२॥ आपले वोळखी आपणचि सांपडे । सर्वत्रासी जोडू विठ्ठलनाम ॥३॥ नामिविण जन पशूच्या समान । एका जनार्दनीं जाण नाम जप ॥४॥
भावार्थ
सर्व विश्वांत चैतन्यरुपाने व्यापून असलेल्या विठ्ठलाचे आपण एक अंश आहोत याची जाणीव होईल तेव्हांच आपल्याला आपली खरी ओळख पटेल. मनातला आपपर भाव संपून जीव त्या विश्वंभरासारखा विश्वव्यापी बनेल असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, नामजपाचा महिमा अपार असून नामाविण मानव हा पशुसमान आहे. 
१२
सर्वामाजीं सार नाम विठोबाचें । सर्व साधनांचें घर जे कां ॥१॥ सहा चार अठरा वर्णितात कीर्ती । नामें मोक्षप्राप्ती अर्धक्षणीं ॥२॥ शुकादिकीं नाम साधिलेसें दृढ । प्रपंच काबाड निरसिले ॥३॥ एका जनार्दनीं जनीं ब्रह्मनाम । तेणें नेम धर्म सर्व होय ॥४॥
भावार्थ
यज्ञ, याग, क्रिया, कर्म, तप ईश्वर प्राप्तीची ही सर्व साधनें शेवटी एका नामाशी येऊन थांबतात. नाम साधन सर्व साधनांचे सार आहे. साही शास्त्रे, चारी वेद, अठरा पुराणे ज्याच्या किर्तीचा महिमा गातात त्या विश्वात्मक पुराणपुरुषाचे केवळ नाम घेतल्यानें क्षणांत मोक्षप्राप्ती जयाचिया भेटी जातांहोते. संसारतापाचे निरसन होण्यासाठीं शुका सारख्या अनेक विरक्त मुनींनी दृढपणे नामसाधना केली असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, नामजप हे नादब्रह्म असून त्याने सर्व नेम, धर्म साकार होतात. 
१३
सदा सर्वकाळ मनीं वसे देव । तेथें नाहीं भेव कळीकाळाचा ॥१॥ काळ तो पुढारी जोडितसे हात । मुखीं नाम गात तयापुढें ॥२॥ म्हणोनि आदरें वाचे नाम घ्यावें । रात्रंदिवस ध्यावें विठ्ठलासी ॥३॥ एकाजनार्दनीं जपतां नाम होटीं । पूर्वजा वैकुंठीं पायवाट ॥४॥
भावार्थ
सदा सर्वकाळ ज्या भक्ताच्या अंतरात देव वसत असतो त्या भक्तापुढे काळनियंता मुखाने नाम गात हात जोडुन उभा असतो. आदराने विठ्ठलाचे नाम घेऊन रात्रंदिवस त्याचे ध्यान करावे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, वाचेने निरंतर नामजप करण्याने पूर्वजांना वैकुंठ पदाची प्राप्ती होते. 
१४
जयाचिया भेटी जातां । मोक्ष सायुज्यता पाठीं लागे ॥१॥ ऐसा उदार पंढरीराणा । पुरवी खुणा मनींच्या ॥२॥ एक वेळ दरूशनें । तुटतीं बंधनें निश्चयें ॥३॥ एका जनार्दनीं एक्याभावें ।काया वाचा मनें गावें ॥४॥
भावार्थ
पंढरीचा राणा अत्यंत उदार असून भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करतो. या पंढरीनाथाचे एकवार दर्शन घेतांच भक्त सायुज्यता मुक्तीचा भागीदार होतो. जन्म मृत्युच्या बंधनातून मूक्त होतो. एका जनार्दनीं म्हणतात, काया, वाचा मनाने या पंढरीनाथाशी एकरूप व्हावे. 
१५
न धरी लौकिकाची लाज । तेणें सहज नाम गावें ॥१॥ अनायासें देव हातां । साधन सर्वथा दुजें नाही ॥२॥ साधन तें खटपट । नाम वरिष्ठ नित्य गावे ॥३॥ एका जनार्दनीं सोपा । विठ्ठलनाम मंत्र जपा ॥४॥
भावार्थ
सदासर्वकाळीं वाचेने विठ्ठलनामाचा जप करणे हे परमेश्वर प्राप्तीचे सुलभ साधन आहे. घरदार, धनसंपत्ती, सामाजिक प्रतिष्ठा या लौकिक गोष्टींचा हव्यास सोडून देवाचे नामसंकीर्तन करावे. ईतर खडतर साधनांपेक्षा नामसाधना वरिष्ठ आहे त्याने अनायासे देवाची कृपा होते असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठलनाम हा सोपा मंत्र आहे तो आधी जपावा. 
१६
बोल बोलतां वाचें । नाम आठवी विठ्ठलाचें ॥१॥ व्यर्थ बोलणे चावटी । नामावाचुनी नको होटीं ॥२॥ नाम हें परमामृत । नामें पावन तिन्ही लोक ॥३॥ नाम सोपे भूमंडळीं । महापापा होय होळी ॥४॥ एका जनार्दनीं शरण । नाम पतितपावन ॥५॥
भावार्थ
व्यर्थ वायफळ गप्पा मारण्यापेक्षां सहज बोलतां विठ्ठल नाम आठवावें असा मोलाचा सल्ला देऊन एका जनार्दनीं सांगतात, तिन्ही लोक पावन करण्याचे सामर्थ्य विठ्ठलनामांत आहे. ते परम अमृत असून महापापांची होळी करुन पतितांना पावन करते. 
१७
विठ्ठलासी गाय विठ्ठलासी ध्येय । विठ्ठलासी पाहे वेळोंवेळां ॥१॥ विठ्ठल विसावा सोडवण जीवां । म्हणोनि त्याच्या गांवां जावें आधीं ॥२॥ विठ्ठलावाचुनि सोयरा जिवलग । विठ्ठलची मार्ग जपा आधीं ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठलावांचोनी । दुजा नेणे स्वप्नीं संग कांहीं ॥४॥
भावार्थ
विठ्ठल हा जीवाच्या मनाचे विश्रांतीस्थान असून त्याच्या दर्शनासाठी पंढरीस जावे. विठ्ठल हा सोय जाणणारा जिवलग सोयरा आहे. विठ्ठलाचे गुणकीर्तन करावे, विठ्ठलमूर्तीचे सतत ध्यान करावें, विठ्ठलनामाचा निरंतर जप करावा. एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठलाशिवाय कशाचाही संग स्वप्नीं देखील नसावा. 
१८
करावे पूजन मुखीं नामस्मरण । अनुदिनीं ध्यान संतसेवा ॥१॥ आणिक न लगे यातायाती कांही ।वाचे विठाबाई वदे कां रे ॥२॥ एका जनार्दनीं संतांचे सांगात ।त्याचे वचनें मात कळों येत ॥३॥
भावार्थ
दोन्हीं करांनी विठ्ठलाचे पूजन, मुखाने नामस्मरण, चित्तांत विठ्ठलाचे ध्यान आणि संतसेवा ह्या शिवाय कोणत्याही खडतर साधनेची अपेक्षा विठाई करीत नाही असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, संत हे साधकांचे सांगाती असून त्यांच्या वचनातून विठ्ठलनामाचा महिमा समजतो. 
१९
बरें वा वाईट नाम कोणी घोका । तो हाय सखा विठोबाचा ॥१॥ कोणत्या सहवासें जाय पंढरीसी । मुक्ति दारापाशीं तिष्ठे सदा॥२॥ विनोदें सहज ऐके कीर्तन । तया नाहीं पतन जन्मोजन्मीं ॥३॥ एका जनार्दनीं ऐशीं माझी भाष । धरावा विश्वास विठ्ठलनामीं ॥४॥
भावार्थ
चांगल्या किंवा वाईट कोणत्याही पध्दतीने विठ्ठलनामाचा जप केल्यास भक्त विठोबाचा सखा बनतो. कोणाच्याही सोबतीने पंढरीची वारी केली तरी संसारापासून मुक्ती मिळते. विनासायास सहज विठ्ठलाचे गुणकीर्तन ऐकले तरी अनेक जन्म पतनाचे भय संपून जाते. एका जनार्दनीं म्हणतात, हे संतवचन असून या सत्य वचनावर विश्वास धरावा. 
२०
विठ्ठल विठ्ठल वदतां वाचे । स्वरुप त्याचे ठसावें १॥ हा तो अनुभवा अनुभव । निरसे भेव काळाचें २॥ रूप देखतां आनंद । जन्म कंद तुटे तेणें ३॥ एका जनार्दनीं मन । जडोन ठेलें चरणीं ॥४॥
भावार्थ
विठ्ठल नामाचा जप करतांना तो विश्वात्मा अंतरांत प्रकाशमान होतो याची प्रचिती घ्यावी. हे रुप पिहतांना मन आनंदाने भरून जाते. जीवाचे जन्म बंधन तुटून, काळाचे भय नाहीसे होते. एका जनार्दनीं म्हणतात, मन त्या ईश्वर चरणीं चिरंतन जोडले जाते. 
२१
ऐका ऐका वचन माझें । तुम्ही वदा विठ्ठल वाचे ॥१॥ नामापरतें साधन नाही । वेदशास्त्रे देती ग्वाही ॥२॥ चार वेद सहा शास्त्र ।अवघा नामाचा पसर ॥३॥ अठरा पुराणांचे पोटीं । नामेंविण नाहीं गोष्टी ४॥ नामें तारीले पातकी । मुक्त झाले इहलोकीं ॥५॥ अजमेळ तारिला । वाल्हा कोळी ऋषी केला ॥६॥ गणिका नेली निजपदा । रामनाम वदे एकदां ॥७॥ ऐसी नामाची ती थोरी । पुतना तारिली निर्धारित ॥८॥ आवडीने नाम गाय । एका जनार्दनीं वंदी पाय ॥९॥
भावार्थ
वाचेने विठ्ठलाला आळवणे या सारखे परमेश्वर प्राप्तीचे दुसरे साधन नाही असे चारी वेद एकमुखानें सांगतात. चारी वेद आणि सहा शास्त्रे हरीनामाचा महिमा विस्ताराने वर्णन करतात. अठरा पुराणे अनेक भक्तांच्या कथा सांगून नामाचा महिमा अखंडपणे सांगतात. पुत्रप्रेमाच्या मिषाने वारंवार देवाच्या नामाचा जप करणारा अजमेळ, वाटमारी करून कुटुंब निर्वाह करणारा वाल्याकोळी, पिंजर्यातल्या पोपटाला राम राम म्हणायल्या शिकवणारी गणिका नामजपाने मोक्षपदाला पोचले. श्रीहरीला दुधातून विषबाधा करण्यसाठी पाठवलेली पुतना सुध्दा उध्दरून नेली. अशी अनेक उदाहरणे देवून एका जनार्दनीं म्हणतात, आवडीने परमेश्वराचे नाम गायन करणारे सर्व भाविक वंदनीय आहेत. 
२२
आठवी गोविंद वेळोवेळां वाचे । तेणें या देहाचें सार्थक होय ॥१॥ विठ्ठल विठ्ठल मनीं निरंतर साचा ।काया मनें वाचा छंद त्याचा ॥२॥ त्याविण आणिक दैवत पैं नाहीं । आणिके प्रवाहीं गुंतूं नको ॥३॥ सर्व सुखाचा विठ्ठल सांगाती । एका जनार्दनीं भ्रांती काढी काढी ॥४॥
भावार्थ
या मनुष्यदेहाचे सार्थक करायचे असेल तर हरघडीला गोविंदाचे स्मरण करावें. काया, वाचा, मनाला या गोविंदाचा छंद लागावा. गोविंदा खेरीज अन्य दैवत नाही असा ध्यास लागावा. सर्व सुख देणारा सखा आहे. गोविंदा शिवाय अन्य दैवत शोधण्याचा प्रयास करून चित्त विचलीत करू नका असे एका जनार्दनीं या अभंगात कथन करतात. 
२३
काढी काढी भ्रांती देहाची सर्वथा । प्रपंचाची चिंता नको तुज ॥१॥ सर्वभावे शरण विठ्ठलासी जाई ।ठायींचाचि ठायीं निवारील ॥२॥ देह गेह माझें म्हणणे हें दुजें ।सर्व विठ्ठलराजे समर्पी तूं ॥३॥ एका जनार्दनीं करी आठवण । चिंतीं तूं पावन परब्रह्म ॥४॥
भावार्थ
या नश्वर देहाचे ममत्व आणि प्रपंचाची चिंता सोडून एका विठ्ठलाला सर्वभावें शरण जावे. हा देह व गेह(घर) यांची अभिलाषा सोडून ते विठ्ठलचरणीं समर्पित करावे. हा विठ्ठल परब्रह्म स्वरूप असून त्याचे निरंतर पावन चिंतन करावे असे एका जनार्दनीं या अभंगात सांगतात. 
२४
दृढभाव हृदयीं धरा । वाचे स्मरा विठ्ठल ॥१॥ मग तुम्हां काय उणें । होय पेणें वैकुंठ ॥२॥ धरा सत्यसमागम आवडीं । कीर्तनपरवडीं नाचावें ॥३॥ एका जनार्दनीं श्रोते । एकात्मते पावाल ॥४॥
भावार्थ
विठ्ठलचरणीं दृढ विश्वास धरुन वाचेने सदैव विठ्ठलाचे स्मरण केल्यास साधकाला कशाचिही उणीव भासणार नाही आणि वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. आवडीने सत्यस्वरुप परमेशाचे कीर्तन करीत आनंदानें नाचावे भगवद् भक्तीचा हा सोपा मार्ग आहे. या मार्गाने परमात्म तत्वाशी एकरूप होता येईल असे एका जनार्दनीं या अभंगांत सुचवतात. 
२५
बहुतांची मतांतरे ती टाकुनी । विठ्ठलचरणीं बुडी दे कां ॥१॥ नव्हे तुज बाधा काळाची आपदा । ध्याई तूं गोविंदा प्रेमभरीत ॥२॥ जनार्दनाचा एका लागून चरणीं । बोलतसे वाणी करुणाभरीत ॥३॥
भावार्थ
अत्यंत नम्रपणे करुणामय वाणीने एका जनार्दनीं म्हणतात, अनेकांच्या परस्पर विरोधी मतांचा विचार न करता गोविंद चरणी शरणागत होऊन अनन्य भक्तीने त्याचे स्मरण केल्यास काळाची बाधा संपून जाईल. अनेक संकटे दूर होतील. असे एका जनार्दनीं श्रध्दापूर्वक विश्वासाने सांगतात. 
२६
जाणत्यां नेणत्यां हाचि उपदेश । विठ्ठल वाचे जप सुखें करा ॥१॥ न करा साधन वाउगाची शीण । विठ्ठलरूपी मन निमग्न राहो ॥२॥ भलतिया परी विठ्ठलासी गाये । सुखा उणें काय तुजला आहे ॥३॥ जन्ममरण तुटे आधिव्याधी । विठ्ठलनामें सिध्दि पायां लागे ॥४॥ एका जनार्दनीं जपतां विठ्ठल । न लगे तया मोल धन कांहीं ॥५॥
भावार्थ
विठ्ठलाची कृपा संपादन करण्यासाठी क्रिया, कर्म, नेम, धर्म, यज्ञयाग या साधनेची गरज नाही. ते व्यर्थ श्रम आहेत. विठ्ठल स्वरूपीं मन रममाण होण्यासाठी कोणत्याही प्रकारानें विठ्ठल नामाचे भजन करावें, यांतच सर्व सुख आहे. मनोदेहाच्या आधिव्याधी संपून सुखी जीवनाच्या सर्व सिध्दी प्राप्त होतील. जन्ममरणाची बंधने गळून पडतील. यासाठी नामसाधनेचा निरंतर जप करा असा उपदेश करून एका जनार्दनीं म्हणतात, या नामसाधनेसाठी कांहीं मोल द्यावे लागत नाही. 
२७
स्थिर करूनियां मन । वाचें गावा जनार्दन ॥१॥ तुटती बंधने । यमयातनेची ॥२॥ ऐशी विठ्ठल माऊली ।वाचे स्मरा वेळावेळीं कळिकाळाची चाली । होऊं नेदी सर्वदा ॥३॥ कापलिया काळ । येथें न चले त्याचे बळ । वाउगा पाल्हाळ । सांडा सांडा परता ॥४॥ धरा विश्वास दृढ मनीं । लक्ष लावावें चरणीं । शरण एका जनार्दनीं । नुपेक्षी तो सर्वथा ॥५॥
भावार्थ
मन एकाग्र करून जगदीश्वराच्या भजनांत तल्लीन व्हावे त्यामुळे यमयातनेची बंधने तुटून पडतील. कळीकाळाची गती मंद होईल. विठ्ठलमाऊलीच्या सामर्थ्यापुढे काळाचे बळ कमी होईल. मनामध्ये दृढ निश्चय करून विठ्ठल चरणीं लीन व्हावे. एका जनार्दनीं म्हणतात, ही विठ्ठल माऊली भक्तांची उपेक्षा करणार नाही. 
२८
एकविध भावें हरी । वाचे उच्चारी सर्वदा ॥१॥ सर्व साधनांचे सार । विठ्ठलमंत्राचा उच्चार ॥२॥ असो सदा हेंचि ध्यान । विठ्ठल नामाचें चिंतन ॥३॥ एका जनार्दनीं जपा । विठ्ठल मंत्र सोपा ॥४॥
भावार्थbr>
भक्तीभावाने विठ्ठल नामाचा सदासर्वदा उच्चार करावा. नामसाधना हे हे सर्व साधनेचे सार आहे. विठ्ठलमूर्तीचे ध्यान आणि चिंतन हा सर्वांत सोपा मंत्र असून त्याचा सदोदित जप करा असे एका जनार्दनीं परत परत सांगतात. 
२९
एक वेळ गाय विठ्ठलाचे नाम । मोक्ष मुक्ति सकाम पुढें उभे ॥१॥ आवडीनें घाली तया लोटांगण । संताचे चरण वंदी माथां ॥२॥ पंढरीची वारी संतांचा सांगात । पुरवी सर्व हेत निश्चयेसी ॥३॥ एका जनार्दनीं धरूनि विश्वास । संतांचा दास होय आधीं ॥४॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनीं संतपदाचा महिमा वर्णन करतात. पंढरीची वारी आणि संतांची संगती हे मनातील सर्व हेतू पूर्ण करतात. या वचनावर विश्वास ठेवून संत चरणांचे दास्यत्व करावे. 
३०
विठ्ठल म्हणतां विठ्ठचि होसी । संदेह येविशीं धरुं नको १॥ सागरीं उठती नाना पैं तरंग । सिंधु तो अभंग विठ्ठल एक ॥२॥ तैसें मन करीं द्वैत न धरी । सर्व चराचरीं विठ्ठल एक ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठलावांचुनी । दुजा नेणो कोणी स्वप्नीं आम्ही ॥४॥
भावार्थbr>
विठ्ठल नामांतच विठ्ठलाशी एकरुप होण्याचे सामर्थ्य आहे यांविषयीं संदेह धरुं नये. जसे सागरांत अनंत तरंग उमटतात तरी तो सागर अभंग असतो. विठ्ठल तत्व या सागरासारखे समजावें. सर्व चराचरांत व्यापलेले चैतन्यतत्व विठ्ठलाचेच रूप आहे हे अद्वैत भावाने जाणावे. स्वप्नांत देखील याविषयीं संदेह नसावा असे प्रतिपादन करून एका जनार्दनीं म्हणतात, विठ्ठलाचे नाम घेतांघेतांच विठ्ठ होशील. 
३१
उघडा हा मंत्र विठ्ठल वदा वाचे । अनंता जन्मांचे दोष जाती ॥१॥ न करी आळस आलिया संसारीं । वदा निरंतरी विठ्ठलनाम ॥२॥ साधेल साधन तुटतीं बंधने । विठ्ठलनाम जाण जप करीं ॥३॥ एका जनार्दनीं आसनीं शयनीं । विठ्ठल निशिदिनीं जप करीं ॥४॥
भावार्थ
अनंत जन्माचे दोष निवारण करण्यासाठी विठ्ठल नामाचा जप करावा. संसाराची सारी बंधने तोडून टाकण्याचे हे सोपे साधन आहे. जागेपणीं, स्वप्नांत किंवा गाढ झोपेतही विठ्ठलनामाचा रात्रंदिवस जप करावा त्यांत आळस करू नये असे आवाहन एका जनार्दनीं या अभंगांत करतात. 
३२
अखंडित वाचे । विठ्ठल वदा साचें ॥१॥ तेणें चुकतीं बंधन । कर्माकर्मी नाही पतन ॥२॥ सदा विठ्ठल ध्यानीं मनीं । तोचि पुण्यपावन जनीं ॥३॥ जननी पवित्र तयाची हाव । एका जनार्दनीं धन्य सुख ॥४॥
भावार्थ
अखंडपणे वाचेने विठ्ठलनाम घेतल्याने कर्म, अकर्म, विकर्म यांची बंधने चुकतात आणि कर्मभेदाने भोगाव्या लागणार्या पतनापासून मुक्ती मिळते. सदासर्वदा विठ्लनाम घेऊन भजन, चिंतन करणारा पुण्यपावन म्हणुन मान्यता पावतो. याची जन्मदात्री धन्य होय असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, ह्या पुण्यपुरुषाचे सुख अलौकिक आहे. 
३३
ज्ञान होय आधीं संतां शरण जातां । मग ओळखितां कळे रूप ॥१॥ नामांचें जें मुळ रूपाचें रूपस । पंढरीनिवास हृदयीं धरी ॥२॥ प्रपंची परमार्थी तारक हें नाम ।ब्रह्मानंद प्रेम सर्व वसे ॥३॥ सच्चिदानंद खूण एका जनार्दनीं । स्वयं ब्रह्म जाण नाम असे ॥४॥
भावार्थ
संताना शरण गेल्यानंतर ज्ञान मार्ग सांपडतो. या मार्गाने प्रवास सुरू झाला की, परमेश्वरी रुपाचा साक्षात्कार घडतो. नामाचे जे मुळरुप तोच पंढरीनाथ असून त्याला अंत:करणांत सदैव धारण करावें. हे विठ्ठल नाम प्रपंचांत आणि परमार्थांत तारक आहे. हे नाम परब्रह्म असून सच्चिदानंद हे त्याचे स्वरूप आहे. त्यामुळे जीवनांत ब्रह्मानंद व भक्तिप्रेम निर्माण होते. परमेश्वराचे नाम हे स्वयं ब्रह्म आहे हे जाणून घ्यावे असे एका जनार्दनीं या अभंगात म्हणतात. 
१६
शिव शिव अक्षरें दोन । जो जपे रात्रंदीन ॥१॥ धन्य तयाचा संसार । परमार्थाचें तेंच घर ॥२॥ सदोदित वाचे । जपे शिव शिव साचें ॥३॥ एका जनार्दनीं शिव । सोपा मंत्र तो राणीव ॥४॥
भावार्थ
शिव शिव ह्या दोन अक्षरी नामाचा जो रात्रंदिवस जप करतो तो संसारांत धन्यता पावतो. त्याचे घर परमार्थाचे निवासस्थान बनते. एका जनार्दनीं म्हणतात, शिवनामाचा मंत्र अत्यंत सोपा असून सर्व मंत्रांत श्रेष्ठ आहे. सदासर्वकाळ या मंत्राचा वाचेने जप करावा. 

================================================================================================================================================================== =============================================================================================================== =============================================================================================================== =============================================================================================================== =============================================================================================================== ===============================================================================================================
श्रीरामनाममहिमा

शिवाचे हृदयीं नांदसी श्रीरामा । काय वर्णू महिमा न कळे आगमानिगमा ॥१॥ वेदशास्त्रे मौनावलीं पुराणें भांबावलीं । श्रुति म्हणती नेति नेति शब्दें खुंटली ॥२॥ वाच्य वाचक जगन्नाथ स्वये शिवाचा आत्माराम । एका जनार्दनीं सुख तयांसी गातां निष्काम ॥३॥
भावार्थ
वाणीने ज्याचे सतत स्मरण करावे तो जगन्नाथ शिवशंकराचे ह्रदयांत नांदणारा श्रीराम असून तोच शिवाचा आत्माराम आहे. या आत्मारामाचा महिमा अगाध असून वेदशास्त्रे मौन होतात. पुराणे कोड्यांत पडतात. श्रुती या विश्वंभराचे वर्णन करतांना नि:शब्द होतात. एका जनार्दनीं म्हणतात, या जनार्दनाचे नाम गात असतांना अपार सुख मिळते आणि चित्त निष्काम होते. 

मानवा रामनामीं भजें । तेणें तुझें कार्य होतें सहजें ॥१॥ अनुभव घेई अनुभव घेई । अनुभव घेई रामनामीं ॥२॥ शंकरादि तरले वाल्मिकादि उध्दरले । तें तूं वहिलें घेई रामनाम ॥३॥ एका जनार्दनीं नामाचा परिपाठीं । दोष पातकें पळती कोटी ४॥
भावार्थ
रामनामाच्या भजनाने वाल्याचा वाल्मिकी झाला , त्याचा उध्दार झाला. शिवशंकर रामाचे सतत चिंतन केल्याने तरुन गेले. कोणतेही कार्य सहज सफल होण्यासाठी मानवाने रामनाम भजावे या वचनाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, नामाचा परिपाठ ठेवल्याने माणसाचे अनेक दोष आणि कोटी पातकें पळून जातात. 

कासयासी हटयोग धूम्रपान । घालुनी आसन चिंती वेगीं ॥१॥ सोपा रे मंत्र राम अक्षरे दोनीं । जपतां चुके आयणी चौर्यांशीची ॥२॥ मागें बहुतांचा उपदेश हाची । तरलें रामनामेंची पातकी जन ॥३॥ एका जनार्दनीं रामनाम ख्याती । जाहली पैं विश्रांति शंकरासी ॥४॥
भावार्थ
दोन अक्षरी रामनामाचा सोपा मंत्र असून त्याचा जप केल्याने चौर्यांशी लक्ष जन्म मरणाचे फेरे चुकतात. रामनामाने पातकी जन तरून जातात असा उपदेश पूर्वी अनेक ब्रह्मज्ञानी ऋषी, मुनीनी केला आहे असे सांगून एका जनार्दनीं म्हणतात, समुद्र मंथनातून निघालेल्या विषाचा दाह संपवण्यासाठी शिवशंकरांनी रामनामाची मात्रा घेतली आणि विश्रांति मिळाली. हटयोग, धूम्रपान या सारख्या खडतर तपश्चर्या करण्यापेक्षा आसनावर बसून रामनाम जपणे हा सहजसोपा मार्ग आहे. 

सुख रामनामें अपार । शंकर जाणें तो विचार ॥१॥ गणिका जाणें रामनाम । गजेंद्र उध्दरिला राम ॥२॥ शिळा मुक्त केली । रामनामें पदा गेलीं ॥३॥ तारिले वानर । रामनामें ते साचार ॥४॥ रामनामे ऐसी ख्याती । एका जनार्दनीं प्रीती ॥५॥
भावार्थ
रामनामांत अपार सुख आहे हे शिवशंकर जाणतात. याच रामनामाने गणिका संसार सागर तरुन गेली आणि गजेंद्राची संकटातून सुटका झाली आणि उध्दार झाला. अहिल्या शापातून मुक्त होऊन रामनामाने रामपदां गेली. रामनामाने अनेक वानर तरून गेले. रामनामाचा महिमा सांगतांना एका जनार्दनीं अशी अनेक उदाहरणे देतात. 

श्रीराम जयराम वदतां वाचे । पातकें जाती कोटी जन्माची ॥१॥ जयजय राम जयजय राम । तुमचे नाम गाये शंकर उमा ॥२॥ नाम थोर तिहीं लोकीं साजे । उफराटे वदतां पातक नासले वाल्हयाचे ॥३॥ एका जनार्दनीं नाम साराचें सार । नामस्मरणें तुटे भवबंध येरझार ॥४॥
भावार्थ
श्रीरामाच्या नामाचा जयजयकार करून शंकर पार्वती रामनाम गातात. रामनामाचा उफराटा (मरा) उच्चार करूनही वाल्याचे महापातक नाहीसे होऊन तो वाल्मिकी या महान पदाला पोचला. रामनामाची थोरवी तिन्ही लोकी गाजते. एका जनार्दनीं म्हणतात, रामनाम सर्व साधनेचे सार असून कोटी जन्मांचे पाप नाहिसे करण्याचे सामर्थ्य नामांत आहे. भवबंधन तोडून जन्म मरणाच्या फेरा नामस्मरणाने चुकवतां येतो. 

आणिकांचे नामें कोण हो तरला । ऐसें सांगा मला निवडोनी ॥१॥ या रामनामें पातकी पतीत । जीव असंख्यात उध्दरिले ॥२॥ जुनाट हा पंथ शिवाचे हे ध्येय । रामनाम गाणे स्मशानीं तो ॥३॥ गिरजेसी आवडी रामनामें गोडी । एका जनार्दनीं जोडी हेंचि आम्हां ॥४॥
भावार्थ
रामनामाने असंख्य पतित पातकी जीवांचा उध्दार होतो. रामनामाची ही ख्याती पूर्वीपार चालत असून शिवशंकर स्मशानात रामनामाचा जप करीत असे. शिवशंकराप्रमाणे गिरजेला सुध्दां रामनामाची अवीट गोडी वाटे. याच रामनामाचा छंद आपल्यालाही जडावा अशी प्रार्थना एका जनार्दनीं करतात. 

रामना उच्चार होटीं । संसाराची होय तुटी ॥१॥ संसार तो समूळ जाय । राम उच्चारूनी पाहे ॥२॥ मागें अनुभवा आलें । गजेंद्रादि ऊध्दरिले ॥३॥ शिव ध्यातो मानसी । रामनाम अहर्निशीं ४॥ एका जनार्दनीं राम । पूर्ण परब्रह्म निष्काम ॥५॥
भावार्थ
मुखाने रामनामाचा जप म्हणजेच संसारसुखाविषयीं विन्मुखता. रामनामाच्या अखंडित जपाने गजेंद्राची प्राणसंकटातून सुटका झाली असा अनुभव आहे. राम हा परब्रह्म स्वरूप असून पूर्ण निष्काम आहे असे एका जनार्दनीं म्हणतात. 

नाम उत्तम चांगले । त्रिभुवनीं तें मिरविलें । जे शंभूने धरिलें । निजमानसीं आदरें ॥१॥ धन्य मंत्र रामनाम । उच्चारितां होय सकाम । जन्म कर्म आणि धर्म । होय सुलभ प्राणिया ॥२॥ एका जनार्दनीं वाचे । ध्यान सदा श्रीरामाचे । कोटी तें यज्ञांचे । फळ तात्काळ जिव्हेसी ॥३॥
भावार्थ
रामनाम त्रिभुवनांत सर्वोत्तम मंत्र असून शिवशंकरांनी आदराने या मंत्राचा स्विकार केला आहे. रामनाम उच्चारताच सर्व कामना पूर्ण होऊन जीवनाचे सार्थक होते कारण रामनामाने जन्म, कर्म आणि धर्म यांचे आचरण करणे सुलभ होते. एका जनार्दनीं म्हणतात, वाचेने रामनाम, श्रीराममूर्तीचे सर्वकाळ ध्यान केल्याने कोटी यज्ञाचे फळ साधकाला तात्काळ प्राप्त होते. 

शिव सांगे गिरजेप्रती । रामनामें उत्तम गती ॥१॥ असो अधम चांडाळ । नामें पावन होय कुळ ॥२॥ नाम सारांचे पैं सार । भवसिंधू उतरीं पार ३॥ नाम श्रेष्ठांचे पैं श्रेष्ठ । एका जनार्दनीं वरिष्ठ ॥४॥
भावार्थ
शिवशंकर गिरजेला सांगतात की रामनामानें जीवाला उत्तम गती मिळते. अत्यंत पापी चांडाळाचे कुळ पावन करण्याचे सामर्थ्य रामनामांत आहे. श्रेष्ठ साधकांचा हा अत्यंत श्रेष्ठ मंत्र असून भवसिंधू तरून नेणारी नौका आहे असे एका जनार्दनीं म्हणतात. 
१०
अहर्निशीं ध्यान शंकर धरीं ज्याचें । तो श्रीराम वाचें कां रे नाठविसी ॥१॥ रामनाम म्हणतां तुटेल बंधन ॥होईल खंडन कर्माकर्मीं ॥२॥ रामनामें गणिका नेली मोक्षपदां । तुटली आपदा गर्भवास ॥३॥ रामनाम जप नित्य ती समाधीं । एका जनार्दनीं उपाधि तुटोनि गेली ॥४॥
भावार्थ
रात्रंदिवस शिवशंकर ज्याचे ध्यान करतात तो श्रीराम वाचेने निरंतर आठवावा. रामनामजपानें कर्म, अकर्माची बंधने तुटतिल. रामनामाने गणिका मोक्षपदाला पात्र झाली. अनेक भक्तांच्या संकटांचे निवारण झाले. एका जनार्दनीं म्हणतात, रामनामाचा जप म्हणजे नित्य समाधी अवस्था, ज्या अवस्थेत सर्व उपाधी संपून जातात. 

N/A

References : N/A
Last Updated : August 31, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP