मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
संतांची लक्षणें

संतांची लक्षणें

प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली .


अभंग १३७
जे जे बोले तैसा चाले । तोचि वहिले निवांत । अंगी असोनि जाणपण । सदा सर्वदा तो लीन । निंदा अथवा वंदा । नाही विषम ती बाधा । शांतीचा मांदूस । भरला असे सदोदित । एका जनार्दनी धन्य । त्याचे दर्शन जग-मान्य ।
भावार्थ:
जो जे बोलतो तसेच वागतो, ज्याच्या मनात कोणतीही चलबिचल नसते त्याचे मन निवांत असते. तो अत्यंत जाणता असूनही विनम्र असतो. कोणाच्या निंदेने अगर स्तुतीने तो विचलित होत नाही. तो शांतीचा मांदूस (पेटी)असतो, ही लक्षणे असलेला संत धन्य असून त्याचे दर्शन सर्वांना प्रिय असते असे एका जनार्दनी म्हणतात. 
अभंग १३८
असोनी संसारी आपदा । वाचे वदे विठ्ठल सदा । नाहीं मानसी तळमळ । सदा शांत गंगाजळ । असोनिया अकिंचन । ज्याची वृत्ती समाधान । एका जनार्दनी ऐसे थोडे । लक्षामधे एक निवडे ।
भावार्थ:
प्रपंचात अनेक प्रकारची कमतरता असूनही सतत देवाच्या नामस्मरणात रममाण असलेला संत गंगाजळाप्रमाणे शांत असतो. त्याच्या अंतरंगात कोणत्याही गोष्टीची तळमळ नसते. निर्धन (गरीब) असूनही तो समाधानी असतो. एका जनार्दनी म्हणतात, असे भक्त क्वचितच पहावयास मिळतात, लाखामधे एखादाच !
१३९
मज कोणी न देखावे । मज कोणी नोळखावे । मान देखोनिया दृष्टी । पळे देह-उपेक्षा पोटी । मी एक लौकिकी आहे । ऐसे कवणा ठावे नोहे । ऐसा निरपेक्ष सज्ञानी । एका शरण जनार्दनी ।
भावार्थ:
आपणास कोणी ओळखु नये यासाठी लोकांच्या नजरा चुकवून अलिप्तपणे साधना करणारे काही भक्त असतात. त्यांना मान-सन्मान, आत्म-स्तुती यांची अपेक्षा नसते. आपण सर्व सामान्यांपैकी एक आहोत असे ते मानतात. एका जनार्दनी म्हणतात असे भक्त सज्ञानी असून अत्यंत निरपेक्ष असतात. 
अभंग १४०
छळिता न येती रागावरी ।तदाकारी वृत्ति मुराली । आप-पर नाही येथे । भेद तेथे नसेचि । याती असो भलते परी । एक सरी जगासी । एका जनार्दनी भाव अवघिया ठाव एकचि ।
भावार्थ:
काही साधक असे असतात की, त्यांच्या अखंड साधनेमुळे ते परमात्मशक्तीसी एकरुप झालेले असतात. त्यांच्या मनातील सर्व संशय मिटतात आणि भेदाभेद संपून जातात. कोणताही आपपर भाव नसतो. जाती-पातिचा भेद न मानता सर्वांसी समभाव ठेवून वागतात असे एका जनार्दनी म्हणतात. 
अभंग १४१
आपुलीच दारा जरी टेके व्यभिचारा । क्रोधाचा थारा अंतरी न ये । आपुलेच धन तस्करे नेता जाण । जयाचे मन उद्विग्न नव्हे । आपुलाचि पुत्र वधोनी जाय शत्रु । परी मोहाचा पाझर नेत्री न ये आपुले शरीर गांजितां पर-नरे । परी शांतीचे घर चळो नेदी । एका जनार्दनी जया पूर्ण बोधु । तोचि एक साधु जगामाजी ।
भावार्थ:
आपली पत्नी व्यभिचारी आहे हे जाणूनही ज्याच्या अंतरात क्रोध निर्माण होत नाही, आपले धन चोराने चोरुन नेले आहे हे लक्षात येऊनही ज्याचे मन विचलित होत नाही, शत्रुने आपल्या मुलाचा वध केला आहे हे समजूनही जो मोहाने शोकाकुल होऊन रडत नाही, परक्या माणसाने आपल्या शरीराला वेदना दिल्या तरी ज्याची मन:शांती ढळत नाही, अशा साधुपुरुषाला पूर्ण बोध झाला असून असा साधु जगामधे एखादाच सापडतो असे एका जनार्दनी म्हणतात. 
अभंग १४२
मुखी नाही निंदा-स्तुती । साधु वर्ते जो आत्म-स्थिती । राग-द्वेष समूळ गेले । द्वैताद्वैत हारपले । घेणे देणे हा पसारा । नाही जयासी दुसरा । एका जनार्दनी संत । ज्याचे हृदयी भगवंत ।
भावार्थ:
मुखाने जो कुणाचीही निंदा किंवा स्तुती करत नाही जो स्वत:च्या आत्मस्वरुपात रममाण असतो, ज्याच्या मनातील सर्व राग-द्वेष विलयास गेले आहेत, देण्याघेण्याच्या व्यवहारातून जो अलिप्त झाला आहे. अशा साधुसारखा दुसरा कोणी नाही. एका जनार्दनी म्हणतात, अशा संताच्या हृदयात भगवंताचा निवास असतो. 
अभंग १४३
देही असोनि विदेही । चाले बोले सदा पाही । असे अखंड समाधी । नसे काही आधि-व्याधी । उपाधीचे तोडोनि लाग । देही देहपणे भरले जग । एका जनार्दनी संग । सदा समाधान सर्वांग ।
भावार्थ:
जो साधक देहाने या जगात वावरत असला तरी मनाने तो देहातीत असतो आपण देह नसून आत्मतत्व आहोत असा आत्मबोध झालेला असतो. ध्यानयोगाच्या अखंड साधनेमुळे तो सतत समाधी अवस्थेत असतो. त्याला कोणतीही मानसिक अथवा शारिरीक आधि-व्याधी नसते. तो जगातील सामान्य व्यवहारापासून मुक्त असतो तो मनाने संपूर्ण समाधानी असतो असे एका जनार्दनी या अभंगात म्हणतात. 
अभंग १४४
जो वस्तु झाला केवळ । त्याचे अंतर कोमळ । भूतमात्री दयाळ । सर्वांपरी भजन । जेथे रज तम वसती । तेथे द्वेष लोभ नांदती । त्याचे संगे ज्ञान-ज्योती । विझोनि जाय । एका जनार्दनी शरण । जेथे शुध्द तत्वाचे प्राधान्य । तो वस्तुसी जाय मिळोन । सहजी सहज ।
भावार्थ:
जो भक्त परमेश्वर चिंतनाने ब्रह्मरुप झाला आहे. त्याच्या मनात संपूर्ण प्राणिमात्रांविषयी दयाभाव निर्माण झालेला असतो. त्याचे अंतकरण कोमल भावनेने भरलेले असते. रज, तम गुणांचे उच्चाटन होऊन केवळ सत्वगुणांची वस्ती असते, तेथे द्वेष लोभ यांना थारा नसतो. तेथे केवळ ज्ञानज्योती प्रकाशत असते. या शुध्द ब्रह्मज्ञानामुळे तो ब्रह्मरुपाशी सहज एकरुप होतो असे एका जनार्दनी म्हणतात. 
अभंग १४५
ब्रह्म सर्वगत सदा सम । जेथे आन नाही विषम । ऐसे जाणती ते अति दुर्गम । तयाची भेटी झालिया भाग्य परम । एसे कैसियाने भेटती ते साधु । ज्याचा अतर्क्य तर्कवेना बोधू । ज्यांसी निजानंदी आनंदु । ज्यांचा परमानंदी उद्बोधु । पवना पालवेल पालाण । पायी चढवेल गगन । भूतभविष्य कळो येईल वर्तमान । परी त्या साधुचे न कळे महिमान । चंद्रामृत सुखे सेववेल । रवि अस्ता जाता धरवेल । बाह्या हेळा सागर तरवेल । परी त्या साधूंची भेटी नव्हेल । जप, तप करवेल अनुष्ठान । ध्येय ध्याता धरवेल ध्यान । ज्ञेय ज्ञाता-विवर्जित ज्ञान । ज्ञाना-ध्यानाचे मूळ हे साधूजन । निजवृत्तीचा करवेल निरोधु । जीव-शिवाचा भोगवेल आनंदु । एका जनार्दनी निज-साधु । त्यांच्या दर्शने तुटे भव-बंधु ।
भावार्थ:
ब्रह्म हे सर्वत्र सलगपणे समप्रमाणात व्यापून राहिलेले आहे. जेथे कोठेहि विषमता नाही हे समजण्यास अत्यंत कठीण असलेले शुध्द तत्व जे जाणतात अशा ब्रह्मज्ञानी साधुंची भेट होणे हे अतिशय भाग्याचे लक्षण आहे. ज्यांचा उपदेश तर्काने जाणतां येत नाही. असे साधू आत्मानंदात निमग्न असतात त्यांचा उपदेश परम आनंद देणारा असतो. या साधुंचा महिमा समजून घेणेसुध्दा सामान्य माणसाच्या कुवती बाहेरचे आहे. कदाचित वार्‍याला पदरात बांधणे शक्य होईल, पायाने आकाश चढून जाणे शक्य होईल, वर्तमान काळात राहून भूत आणि भविष्याचा वेध घेता येईल, पण या साधुंचा महिमा वर्णन करतात येणार नाही. एखादे वेळी मावळत्या सूर्याला रोकता येईल चंद्राचे शीतल चांदणे सुखाने सेवन करता येईल केवळ दोन्ही हातांनी सागर तरून जाता येईल परंतु या साधुंची भेट होणे संभवत नाही. ध्यानस्थ, ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी संपून ध्याता ध्येयाशी समरस होईल. ज्ञाता ज्ञेयाशी एकरूप होऊन ब्रह्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करीत असतांना समजून येईल की हे साधुजन ज्ञान आणि ध्यानाचे मूळस्थान आहेत. असे साधू स्वाभाविक वृतींचा नरोध करून जीवा-शिवाचे ऐक्य घडवून आनंद देणारे आहेत, त्यांच्या केवळ दर्शनाने संसाराची बंधने गळून पडतात असे एका जनार्दनी म्हणतात. 

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP