श्रीकृष्ण भगवानाचें चौर्यकर्म
प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली.
१
सांवळें सानुलें म्हणती तान्हुलें । खेळें तें वहिलें वृन्दावनी ॥१ ॥
नागर गोमटें शोभे गोपवेषें । नाचत सौरसें गोपाळासीं ॥२॥
एका जनार्दनी रुपासी वेगळें । अहं सोहमा न कळे रूपगुण ॥३॥
भावार्थ
सावळ्या रंगाचा बालकृष्ण वृंदावनात क्रिडा करतो गोपवेष घालून गोपाळांसवे नृत्य करणार्या बालकृष्णाचे नागर रूप अतिशय विलोभनीय दिसते. एका जनार्दनी म्हणतात, ह्या आगळ्या-वेगळ्या रुपाचे रहस्य वेदशास्त्रांनादेखिल उलगडत नाही.
२
वेदादिक श्रमले न कळे जया पार । शास्त्रसी निर्धार न कळेची ॥१॥
तो हा श्रीहरी नंदाचिया घरी । क्रीडे नानापरी गोपिकासी ॥२॥
चोरावया निघे गोपिकांचे लोणी । सौंगडे मिळोनी एकसरे ॥३॥
एका जनार्दनी खेळतसे खेळ । न कळे अकळ आगमानिगमा ॥४॥
भावार्थ
नंदाघरी नांदणार्या श्रीहरीच्या अवतार लीलेचे रहस्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात असताना वेद थकून गेले आणि शास्त्रांना त्याचा निर्णय करणे अशक्य झाले. सवंगडी मिळवून गोपिकांच्या घरातील लोणी चोरून नेणे, गोपिका जमवून त्यांच्यासवे रासक्रीडा करणे, नाना प्रकारचे खेळ खेळणे यांची कारणे समजून घेणे वेदशास्त्रांना कळेनासे झाले, असे एका जनार्दनी म्हणतात.
३
मेळवोनि मुले करावी हे चोरी । पूर्ण अवतारी रामकृष्ण ॥१॥
पाळती पाहती एका जाणविती । सर्वे जाऊनी खाती दहीदूधा ॥२॥
सांडिती फोडिती भाजन ताकाचे । कवळ नवनीताचे झेलिताती ॥३॥
एका जनार्दनी नाटकी तो खेळ । न कळे अकळ वेदशास्त्रा ॥४॥
भावार्थ
बलराम आणि श्रीकृष्ण अवतारी पुरुष असतांना मुले गोळा करून, पाळत ठेवून, एकमेकांना बोलावून, सर्व मिळून गोपिकांच्या घरचे दहीदूध खातात, ताकाचे मडके फोडतात, लोण्याचे गोळे झेलतात. एका जनार्दनी म्हणतात, या नाटकी खेळांचा अर्थ वेदशास्त्रांना आकलन होत नाही.
४
पाळतोनि जाती घरासी तात्काळ । खेळ तो अकळ सर्व त्याचा ॥१॥
गोपाळ सवंगडे मेळवोनि मेळा । मध्ये तो सावळा लोणी खाये ॥२॥
निजलियाच्या मुखा माखिती नवनीत । नवल विपरीत खेळताती ॥३॥
न कळे लाघव करी ऐशी चोरी । एका जनार्दनी हरी गोकुळात ॥४॥
भावार्थ
गोपाळ सवंगडी जमवून त्यांच्यामधे बसून सावळा श्रीहरी लोणी खातो, झोपेत असलेल्या गोप-गोपिकांच्या मुखास लोणी माखतो असे नवलाईचे विपरीत खेळ खेळतो. चोरी करताना अशा सहजपणे करतो की त्याचे लाघव कळतच नाही असे एका जनार्दनी या अभंगात म्हणतात.
५
मेळवोनि मेळा गोपाळांचा हरी । निघे करावया चोरी गोरसाची ॥१॥
धाकुले सवंगडी घेऊनि आपण । चालती रामकृष्ण चोरावया ॥२॥
ठेवियेलें लोणी काढिती बाहेरी ।खाती निरंतरीं सवंगडी ॥३॥
एका जनार्दनी तयाचें कौतुक । न पडे ठाऊके ब्रह्मादिका ॥४॥
भावार्थ
बाल सवंगड्यांना सवे घेऊन राम-कृष्ण गोरसाची चोरी करायला निघतात. गोपिकांनी ठेवलेले लोणी बाहेर काढून सवंगडी ते नेहमी च खाऊन फस्त करतात. एका जनार्दनी म्हणतात, श्रीहरीच्या या लीलांचे कौतुक ब्रह्मदेवांना सुध्दा कळत नाही.
N/A
References : N/A
Last Updated : August 31, 2025

TOP