१
उठोनि एके दिनीं म्हणे यशोदा कान्हया । गोधनें घेऊनियां जाई वनासी लवलाह्या ॥१॥ सवें मिळाले चिमणे सवंगडी । शिदोरी काठी कांबळी जाळी घेती आवडी ॥२॥ एका जनार्दनी गाई सोडिल्या सार्या । रामकृष्ण सवंगडीया देव येती पहावया ॥३॥
भावार्थ
एके दिवशी यशोदा कन्हयाला गाई घेऊन वनाला जाण्यास सांगते. सर्व बाळगोपाळ आनंदानें काठी, कांबळी, जाळी आणि शिदोरी घेऊन कृष्णा बरोबर निघतात. एका जनार्दनी म्हणतात, रामकृष्ण सवंगड्यां सोबत गाईंना घेऊन निघाले तेव्हां कौतुकाने त्यांना बघण्यासाठी देवांनी आकाशांत दाटी केली.
२
सैराट गोधनें चालती वनां । तयामागें चाले वैकुंठीचा राणा ॥१॥ सावळे चतुर्भुज मेघ:श्याम वर्ण ।गाईगोपाळां समवेत खेळे मनमोहन ॥२॥ यमुनेचे पाबळीं मिळोनियां सकळीं । खेळें चेंडूफळी गडियांसम ॥३॥ एका जनार्दनी मदनपुतळा । देखियेला डोळां नंदरायाचा ॥४॥
भावार्थ
गोकुळीची गोधनें वनाकडे सैराट चालली असतांना वैकुंठीचा राणा श्रीकृष्ण त्यांच्यामागे निघाला. मेघाप्रमाणे सांवळ्या रंगाचा चार भुजा असलेला मनमोहन श्रीहरी गोपांसमवेत यमुनेच्या काठीं चेंडूफळीचा खेळ खेळतो. एका जनार्दनी म्हणतात, नंदराजाचा श्रीहरी मदना सारखा शोभून दिसत असलेला या डोळ्यांनी पाहिला.
३
विष्णुमूर्ती चतुर्भुज शंख चक्र हातीं । गदा पद्म वनमाळा शोभती ॥१॥ गाई गोपाळ सवंगडे वनां । घेऊनियां जाय खेळे नंदाचा कान्हा ॥२॥ विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी । खेळ मांडियेला यमुनेचे तीरीं ॥३॥ एका जनार्दनी पाहतां तन्मय । वेधलें मन वृत्तिसहित माय ॥४॥
भावार्थ
गाई आणि गोपाळ सवंगड्यांना सोबत घेऊन नंदाचा कान्हा वनांत जातो. यमुनेच्या तीरावर विटी दांडू चेंडू लगोरी असे नाना प्रकारचे खेळ खेळतो. एका जनार्दनी म्हणतात, चित्त वृत्तीसह या रूपाकडे वेधले जाते, मन तन्मय होते. शंख, चक्र, गदा पद्म हातांत धारण केलेली चतुर्भुज विष्णुमूर्ती नयनांसमोर साकार होते. या मुर्तिच्या गळ्यांत वनमाळा शोभून दिसतात.
४
जयाच्या दरुशने शिवादिका तृप्ती । योगी हृदयी सदा जया ध्याती । सहा चार अठरा जया वर्णिती । सहस्रमुखा न कळे जयाची गती ॥१॥ तो हा नंदनंदनु यशोदेचा तान्हा । सवंगडे गोपाळ म्हणती कान्हा । परा पश्यंती मध्यमा वैखरी नातुडे जाणा । वेडावले जया ठायी रिघाले साधना ॥२॥ अष्टांग साधन साधिता अटी । नोहे नोहे मुनिजना ज्याची भेटी । एका जनार्दनी हाती घेऊनि काठी । गोधने चारी आवडी जगजेठी ॥३॥
भावार्थ
नंदाचा नंदन, यशोदेचा तान्हा ज्याला त्याचे सवंगडी गोपाळ प्रेमाने कान्हा असे म्हणतात, त्याच्या दर्शनाने शिवशंकरासह स्वर्गीच्या देवांची तृप्ती होत नाही. सहा शास्त्रे, चारी वेद, अठरा पुराणे ज्याच्या रूप-गुणांचे वर्णन करतात, योगीजन सदासर्वकाळ हृदयात ज्याचे ध्यान लावतात, असे असताना हजार मुखे असलेला शेषनाग श्रीहरीचा महिमा वर्णन करु शकत नाही. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी त्याला पूर्णपणे जाणू शकत नाहीत, त्या श्रीकृष्णाच्या दिव्यरुपाचे ठायी वेडावलेलें मुनिजन अष्टांग साधन करतात पण त्यांना श्रीहरीची भेट घडत नाही. असे वर्णन करून एका जनार्दनी म्हणतात, हातात काठी घेऊन तो जगजेठी आवडीने गोपाळांसह नंदाघरच्या गाई चारतो.
५
उठोनि प्रात:काळी म्हणे यशोदा मुरारी । गोपाळ वाट पाहती उभे तुझ्या द्वारी । शिदोरी घेऊन वेगी जाय रानी ॥१॥ यमुनेचे तीरी खेळ खेळतो कान्हा । नानापरी क्रीडा करी यादवांचा राणा ॥ध्रु०॥ मागे पुढे गोपाळ मध्ये चाले हरी । सांवळा सुकुमार वाजवी मुरली अधरी । पुच्छे वर करुनी गाई नाचती नाना ॥२॥ मुरलीचा नाद न समाय त्रिभुवनी । किती एक नादे भुलल्या गौळणी । देह गेह सांडोनि चालताती वनी ॥३॥ खग मृग गायी व्याघ्र नसे दुजा भाव । सकळी उच्चारण एक कृष्ण नाव । काया वाचा मने शरण एका जनार्दनी ॥४॥
भावार्थ
पहाट समयी उठून यशोदा माता कृष्णाला सांगते, गोपाळ दाराशी वाट पहात उभे आहेत, शिदोरी घेऊन रानांत जाण्याची वेळ झाली आहे. मागे, पुढे गोपाळ आणि मध्यें हरी असे सर्वजण वनांत जाण्यसाठी निघतात. यमुनेच्या तीरावर गोपाळांसह यादवांचा राणा नाना प्रकारच्या क्रिडा करतो. सावळ्या सुकुमार मुरारीच्या मुरलीचा नाद ऐकून आनंदित झालेल्या गाई नाचु लागतात, त्या नादाने वेड्या झालेल्या गौळणी देहभान विसरून घर सोडून वनाकडे निघतात. पक्षी, हरिणी, गाई, वाघ आपला वैरभाव विसरुन हरीनादांत दंग होतात असे वर्णन करुन एका जनार्दनी काया वाचा मनाने श्रीहरीच्या पायी शरणागत होतात. मुरली
६
नंदनंदन मुरलीवाला । याच्या मुरलीचा वेध लागला ॥१॥ प्रपंच धंदा नाठवे कांहीं । मुरलीचा नाद भरला हृदयीं ॥२॥ पती सुताचा विसर पडिला । याच्या मुरलीचा छंद लागला ॥३॥ स्थावर जंगम विसरूनि गेले । भेदभाव हारपले ॥४॥ समाधि उन्मनी तुच्छ वाटती । मुरली नाद ऐकतां मना विश्रांती ॥५॥ एका जनार्दनी मुरलीचा नाद ऐकतां होती त्या सद्गद ॥६॥
भावार्थ
या अभंगात एका जनार्दनी श्रीहरीच्या मुरली-नादाचा गोकुळच्या गोपींना कसा वेध लागतो याचे वर्णन करतात. मुरलीचा नाद गोपींचे ह्रदय भरून टाकतो. मुरलीचा त्यांना छंद लागतो, प्रपंच, कामधंदा, पती, मुल या सगळ्याचा विसर पडतो. सभोवतालची चराचर सृष्टी, मनातले सारे भेदभाव विलयास जाऊन मन मुरली नादासी एकरूप होते. ध्यानधारणेतील समाधी, उन्मनी या अवस्था कवडीमोलाच्या वाटू लागतात. मुरलीनदाने गोपी सद्गतींत होतात. मनाला प्रगाढ विश्रांतीचा लाभ होतो.
७
तुझ्या मुरलीचा ध्वनी । अकल्पित पडला कानीं । विव्हळ जालें अंत:करणी । मी घरधंदा विसरलें ॥१॥ अहा रे सांवळीया कैशी वाजविली मुरली ॥ध्रु०॥ मुरली नोहे केवळ बाण । तिनें हरीला माझा प्राण । संसार केला दाणादीन । येऊनि ह्रदयी संचरली ॥२॥ तुझ्या मुरलीचा सूर तान । मी विसरले देहभान । घर सोडून धरिलें रान ।मी वृंदावना गेले ॥३॥ एका जनार्दनी गोविंदा । पतितपावन परमानंदा । तुझ्या नामाचा मज धंदा । वृत्ति तंव पदीं निवर्तली ॥४॥
भावार्थ
मुरलीचा आवाज ऐकून वेडी झालेली गवळण आपली व्यथा व्यक्त करीत आहे. ही मुरली नसून केवळ बाण आहे, त्याने आपले प्राण हरण केले आहेत, आपल्या हृदयांत संचारली आहे. मुरलीच्या सूरांनी ती देहभान विसरून गेली आणि घरसंसार सोडून वनाचा रस्ता धरून ती वृंदावनात गेली. संसाराची दाणादाण झाली. गवळणीची ही अवस्था वर्णन करून एका जनार्दनी म्हणतात, गोविंद पतितपावन असून परम आनंद देणारा आहे. गोविंदाच्या नामाचा छंद लागला कीं, भक्तांच्या सर्व वृत्ती त्याच्या पायीं लीन होतात.
८
मुरली धरूनी अधरीं । वाजवी छंदे. नानापरी । भोवतें गोपाळ नाचती गुजरीं । यमुनातीरी आनंदें ॥१॥ तो हा नंदनंदन गे माये । त्याचा वेध लागला मज सये । कांही केलीया तो न राहणे । नाठवे गेह गे माय ॥२॥ स्थुल सूक्ष्म कारणांपरतां । चहु वाचा वेगळा तत्वतां । आगमां निगमांही वरतां । ज्याचा वेध शिवाचिया चित्ता गे माय॥३॥ अचोज वेदा चोजवेना । श्रुतीशास्त्रा नये अनुमाना । शरण एका जनार्दना । एकपणें जाणा सर्वा ठायीं ॥४॥
भावार्थ
एका जनार्दनी म्हणतात, यमुनेच्या तीरावर मधुर सुरांत मुरली वाजविणारा नंदाचा कान्हा स्थूल. सूक्ष्म, कारण या देहाच्या पलिकडील महाकारण देह साक्षात् परब्रम्ह असून तो वैखरी, मध्यमा, परा वाणीहून वेगळा आहे. या परब्रम्ह स्वरुपाचे. अनुमान चारी वेद आणि सहा शास्त्रे यांनाही आकलन होत नाही, शिवशंकरांच्या चित्ताला. ज्याचा वेध सतत लागलेला असतो तो हा परमात्मा. सर्व जीवांचे ठिकाणी एकपणे विलसत आहे. केवळ सदगुरू कृपेनेच हा परमात्मा जाणता येतो.
९
कशी जाऊं मी वृंदावना । मुरली वाजवी कान्हा ॥ध्रु०॥ पैलतीरीं हरी वाजवी मुरली । नदी भरली यमुना ॥१॥ कांसे पितांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥ काय करूं बाई कोणाला सांगू । नामाची सांगड आणा॥३॥ नंदाच्या हरीने कौतुक केलें । जाणे अंतरीच्या खूणा॥४॥ एका जनार्दनी मनीं म्हणा । देव. माहात्म्य कळेना कोणा ॥५॥
भावार्थ
दुथडी भरून वाहाणार्या यमुनेच्या पैलतीरावर नंदाचा कान्हा मुरली वाजवतो आहे, कान्हाच्या कानांत कुंडल, कपाळीं कस्तुरी टिळा, कमरेला पितांबर शोभून दिसतो. कान्हाच्या मुरलीने घायाळ झालेली गोपी वृंदावनात जाण्यासाठी आतुर झाली असून भरलेल्या यमुनेतून पैलथडी कसे जावे, काय करावे असा प्रश्न पडला आहे. पाण्याने भरलेली यमुना नदी संसाराचे प्रतिक असून हरीनाम हे नावे सारखे संसार बंधनातून मुक्त करणारे साधन आहे (सांगड) आहे. असे सुचवून एका जनार्दनी म्हणतात, परमात्मा भक्तांच्या अंतरीचे भाव जाणून अवतार लीला करतो पण देवाचे महात्म्य भोळ्या भक्तांच्या लक्षात येत नाही.
१०
यमुनेच्या तीरीं नवल परी वो । तेथें गोपाळ वत्सें स्वयें झाला हरी वो ॥१॥ नवल देखा ठक तिन्ही लोकां । भुली. ब्रह्मादिकां पार नाहीं सुखा ॥२॥ कृष्णवत्साची ध्वनी गाई. पान्हा. । तेथें वोळलें निराळे. विस्मयो गौळीजनां. ॥३॥ गोपाळांचे. वचनीं. सुखें सुखा. भेटी । तेथें. वोसंडला. आनंद माय कृष्णी भेटी. ॥४ ॥ ऐसा रचिला. आनंदु. देखोनि निवाडा । तेथें. सृष्टीकर्ता तोहि झाला वेडा ॥५ ॥ ऐसें अचोज. पैं. मना. नये अनुमाना । अचुंबीत. करणें एका जनार्दना ॥६ ॥
भावार्थ
नवलाची गोष्ट अशी कीं, यमुनेच्या तीरावर श्रीहरी स्वये गाईचे वासरू झाला आहे. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यां तिन्ही लोकांत तसेच सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाला देखील भूल पडली आहे. अपरंम्पार सुख दाटून आले आहे. कृष्णाच्या मुरलीचा स्वर ऐकून. गाईंना पान्हा फुटतो , गौवळ्यांना हे पाहून विस्मय वाटतो. गोमाय आणि कान्हाची भेटीने गोकुळांत. आनंद ओसंडून वाहत आहे. सृष्ट कर्ता आश्चर्य चकित झाला असे कथन करून एका जनार्दनी म्हणतात, अचंबित झालेले देवाधिदेव सुध्दां याचे. अनुमान करु शकत नाही.
रासक्रीडा
११
वनामाजीं नेती. गोपिका तयांसी । रासक्रिडा खेळावयासी एकांती ॥१॥ जैसा जया चित्ती हेत आहे मनीं । तैसा चक्रपाणी खेळतसे ॥२॥ जया जैसा भाव तैसा पुरविणें । म्हणोनि नारायणें अवतार ॥३॥ एका जनार्दनी घेऊनी अवतार भक्तांचें अंतर जैसें तैसें ॥४ ॥
भावार्थ
एकांतात रासक्रीडा खेळण्यासाठी गोपिका वनामध्ये जातात, ज्याच्या चित्तांत जसा भाव असेल तसा चक्रपाणी त्याच्याशी खेळतो. प्रत्येक व्यक्तिच्या मनातिल भाव पुरविण्यासाठीं नारायण अवतार धारण करतात असे एका जनार्दनी म्हणतात.
१२
कृष्णरुपी भाळल्या गोपिका नारी । नित्यनवा कृष्ण जीवा आवडतो भारी । पवन वेगीं चालिल्या कालिंदीतीरीं । चिदानंद. भावें भोगावा श्रीहरी ॥१॥ वाजती गाजती अनुहत टिपरी । बारा सोळा मिळोनी गौळ्याच्या नारी । प्रात:काळीं जाती यमुनातीरीं । कृष्ण प्राप्तिलागीं पूजिती गौरी ॥२॥ एकमेकीतें खुणविती दृष्टी । हरिरुपीं आवड जीवा लागली मोठी । समयी एकांत होईल काय भेटी । मनींचे आर्त सांगू गुज गोष्टी ॥३॥ कृष्णरुपीं वेधल्या विसरल्या अन्नपान । माया विलास नेघे अंजन चंदन । रात्र आणि दिवस कृष्णाचे ध्यान । एका जनार्दनी चरणीं वेधिलें मन ॥४॥
भावार्थ
कृष्णाच्या रुपावर गोपिका नारी भाळल्या , नेहमी नविन रुप धारण करणारा कृष्ण त्यांना विशेष आवडू लागला. सद्चीद् आनंदाचा नित्य अनुभव घेऊ लागल्या. बारा किंवा सोळा नारी मिळून सकाळीं. यमुनेच्या तीरावर जाऊन कृष्णासाठी गौरीपुजू लागल्या. श्रीहरीची एकांतात भेट घेऊन त्याच्याशी गुजगोष्टी कराव्या, मनीचे दु:ख सांगावे अशी आस लागली. कृष्णाचे वेध लागले, अन्नपाणी सुचेनासे झाले. माया, विलास विसरून हरीचरणाशी एकरुप झाल्या. असे वर्णन एका जनार्दनी. या अभंगात करतात.
१३
खांद्यावरी. कांबळी हातामधीं काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी ॥१॥ राधे राधे राधे. राधे. मुकुंद. मुरारी. । वाजवितो. धेणू. कान्हा श्रीहरी ॥२॥ एकएक गौळणी एक एक गोपाळा । हातीं धरूनि नाचती रासमंडळा ॥३॥ एका जनार्दनी रासमंडळ रचिलें । जिकडे पाहे तिकडे अवघें. ब्रह्म कोंदलें ॥४॥
भावार्थ
हातामध्ये काठी आणि खांद्यावरी घोंगडी घेऊन सांवळा श्रीहरी गोकुळांत गाई चारीत आहे आणि बासरी वाजवत आहे. गोकुळीच्या गौळणी आणि गोपाळ एकमेकांचे हात धरून नाचत आहेत. रासमंडळाचे. असे वर्णन करून एका जनार्दनी. म्हणतात, जिकडे पहावे तिकडे ब्रह्मानंद कोंदून राहिला आहे.
१४
रासक्रीडा खेळ खेळोनियां श्रीहरी । येती परोपरी गोकुळासी ॥१॥ न कळेची कवणा कैसें में विंदान । वेदांदिका मौन पडिलेंसें ॥२॥ तें काय कळें आणिकां जीवांसी । ऋषी मुनी तापसी धुंडिताती ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा खेळे खेळां परब्रह्म पुतळा नंदाघरीं ॥४॥
भावार्थ
गोकुळांत श्रीहरी नाना प्रकारे रासक्रीडा खेळत आहे. या विस्मयकारी अवतार लीला बघून वेदांना देखिल मौन पडलें आहे, ते सामान्य जीवांनाच काय ऋषी, मुनी, तापसी यांना सुध्दां हे कोडे सोडवतां येत नाही. एका जनार्दनी म्हणतात, परब्रह्म नंदाघरी असे खेळ खेळत आहेत.
१५
रासक्रीडा करूनी आलिया कामिनी । कृष्णीं लांचावल्या आन न रिघे मनीं ॥१॥ जें जें. दृष्टी दिसे तें तें कृष्ण भासे । गोपिका समरसे नित्य बोधु ॥२॥ आसनीं नयनीं भोजनीं गमनागमनीं । सर्व कर्मीं सदा. कृष्णमय कामिनीं ॥३॥ एका जनार्दनी. व्यभिचार. परवडी । गोपिका. तारिल्या. सप्रेम आवडीं ॥४॥
भावार्थ
गोकुळातील स्त्रिया रासक्रीडा खेळून परतल्या. कृष्ण भावनेने भारावून गेलेल्या त्यांच्या मनाला दुसरा विचार सुचत नव्हता. नजरेस पडणारी. प्रत्येक गोष्ट त्यांना कृष्णमय भासत होती. बसतां, उठतां, येतां जातां, खातां, पितां, झोपेत असताना सुध्दां त्या गोपी कृष्णरुपाशी समरस झाल्या .