मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें|
संतांचे अवतार-कार्य

संतांचे अवतार-कार्य

प्राकृतात ग्रंथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली .


अभंग १३०
मेघापरिस उदार संत । मनोरथ पुरवितो । आलिया शरण मनें वाचा । चालविती त्याचा भार सर्व । लिगाड उपाधि तोडिती । सरते करिती आपणामाजी । शरण एका जनार्दनी । तारिले जनी मूढ सर्व ।
भावार्थ:
संत हे मेघाप्रमाणे उदार असून मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात. काया-वाचा-मनाने शरण आलेल्या भक्ताचा सर्व प्रकारे भार हलका करतात. भक्तांच्या सर्व उपाधी, संकटे दूर करतात. भक्ताला आपल्यासारखे बनवतात. अज्ञानीजनांना मार्गदर्शन करून तारुन नेणार्‍या गुरूचरणांना एका जनार्दनी शरणागत होतात. 
अभंग १३१
जया जैसा हेत । तैसा संत पुरविती । उदारपणे सम देणे । नाही उणे कोणासी । भलतिया भावे संत-सेवा । करिता देवा माने ते । एका जनार्दनी त्याचा दास । पूर्ण वोरस कृपेचा ।
भावार्थ:
प्रत्येक साधकाच्या मनातील हेतु समजून संत तो हेतु पूर्ण करतात. उदारपणे सर्वांना समप्रमाणात, कोणताही दुजाभाव न ठेवता दान देतात. कोणत्याही भावनेने संत-सेवा केली तरी परमेश्वराला ती मान्य असते. एकनाथमहाराज जनार्दनस्वामींचे दास असून ते आपल्यावर पूर्ण कृपेचा वर्षाव करतात असे एका जनार्दनी म्हणतात. 
अभंग १३१
संतांचे ठायी नाही द्वैतभाव । रंक आणि राव सारिखाचि । संतांचे देणे अरि-मित्रा सम । कैवल्याचे धाम उघडे ते । संतांची थोरवी वैभव गौरव । न कळे अभिप्राव देवासी तो । एका जनार्दनी करी संत-सेवा । परब्रह्म ठेवा प्राप्त झाला ।
भावार्थ:
संतांच्या मनात कोणताही दुजाभाव नाही, त्यांना धनवान आणि निर्धन सारखेच असतात. त्यांना शत्रू आणि मित्र समानच वाटतात. संत म्हणजे मोक्षाचे उघडे द्वार ! संतांचा गौरव हेच त्यांचे वैभव असून तेच त्यांचा थोरपणा, त्याचा ठाव देवांना सुध्दा लागत नाही. एका जनार्दनी म्हणतात, संतसेवेमुळेच त्यांना परब्रह्मज्ञानाचे भांडार प्राप्त झाले. 
अभंग १३२
संत माय-बाप म्हणता । लाज वाटे बहु चित्ता । माय बाप जन्म देती । संत चुकविती जन्म-पंक्ति । माय बापा परिस थोर । वेद-शास्त्री हा निर्धार । शरण एका जनार्दनी । संत शोभती मुकुट-मणी ।
भावार्थ:
संतांना जेव्हा आपण माय-बाप म्हणतो, तेव्हा मनापासून लाज वाटते. कारण माय-बाप जन्म देतात तर संत जन्ममरणाच्या फेर्‍यातून सुटका करतात. वेद-शास्त्र जाणणारे संत मायबापापेक्षा खात्रीपूर्वक श्रेष्ठ आहेत. संत सर्वात मुकुटमण्याप्रमाणे शोभून दिसतात असे एका जनार्दनी म्हणतात. 
अभंग १३३
जयाचेनि चरणे तीर्था तीर्थपण । तो ह्रदयी केला साठवण । नवल महिमा हरिदासंतसाची । तीर्थे उपजती त्याचे कुशी । काशी-मरणे होय मुक्ति । येथे वचने न मरता मुक्ति । एका जनार्दनाचे भेटी । सकळ तीर्थे वोळंगती दिठी ।
भावार्थ:
ज्यांच्या चरणस्पर्शाने तीर्थाला पावित्रपणा येतो त्या संतांची ह्रदयात साठवण केली. संतांचा महिमा इतका मोठा आहे की त्यांच्या कुशीतून तीर्थे उगम पावतात. काशी या तीर्थक्षेत्री मरण आल्यास मुक्ति मिळते असे सांगितले जाते, पण संतांच्या गावी न मरताच मुक्तिचा लाभ होतो. एका जनार्दन जेव्हा गुरूंना भेटतात तेव्हा सर्व तीर्थे पायाशी लोळण घेतात असे एका जनार्दनी अभिमानाने सांगतात. 
अभंग १३४
सर्वांगी सुवास परि तो उगला न राहे । सभोवते तरु चंदन करीतचि जाये । वैरागर मणि पूर्ण तेजाचा होये । सभोवते हरळ हिरे करितचि जाये । एका जनार्दनी पूर्ण झालासे निज । आपणा सारिखे परी ते करितसे दुजे ।
भावार्थ:
चंदनाचे झाड़ सर्वांगात सुवासाने भरलेले असते. परंतु ते वेगळे न राहता आपल्या सभोवतालच्या वृक्षांना सुगंधित करते. पूर्ण तेजस्वी असा वैरागर मणि जवळपासच्या पाषाणांचे मौल्यवान हिरे बनवतो. एका जनार्दनी म्हणतात आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण असलेले संत आपल्या संगतीने सामान्यांना उन्नत करतात. 
अभंग १३५
निवृत्ति शोभे मुकुटाकार । ज्ञान सोपान वटेश्वर । विटु पंढरीचे राणे । ल्याले भक्तांची भूषणे । गळा शोभे वैजयंती । तिसी मुक्ताई म्हणती । अखंड शोभे माझ्या बापा । पदकी तो नामा शिंपा । कासे कसिला पीतांबर । तो हा जाणावा कबीर । चरणी वीट निर्मळ । तो हा झाला चोखामेळ । चरणा तळील ऊर्ध्वरेखा । झाला जनार्दन एका ।
भावार्थ
पंढरीचा विठुराणा आपल्या भक्तांची भूषणे लेऊन विटेवर उभे आहेत अशी सुंदर कल्पना एकनाथमहाराज या अभंगात करतात. विठुरायाच्या मस्तकावर निवृत्ती रूपी मुकट शोभून दिसते आहे आणि गळ्यात मुक्ताई नावाची वैजयंतीमाळ विराजमान झाली आहे. या वैजयंतीमाळेतील मोहक पदक म्हणजे संत नामदेव ! पंढरीरायाने कमरेला बांधलेला रेशमी पीतांबर हेच संत कबीर, विठोबा ज्या विटेवर उभा आहे ती वीट झाली आहे संत चोखामेळा तर चरण तळीची वर जाणारी रेषा म्हणजे संत एकनाथ असे एका जनार्दनी म्हणतात. 
अभंग १३६
धर्माची वाट मोडे । अधर्माची शीग चढे । तै आम्हा येणे घडे । संसार-स्थिती । आम्हा का संसारा येणे । हरिभक्ति नामस्मरणे । जड जीव उध्दरणे । नाम-स्मरणे करुनि । सर्व कर्म ब्रह्मस्थिति । प्रतिपादाच्या वेदोक्ति । हेचि एक निश्चिती । करणे आम्हा । नाना मते पाखंड । कर्मठता अति बंड । तयाचे ठेंचणे तोंड । हरि-भजने । विश्वरूप सृष्टी । अर्जुना दाविली दृष्टी । भिन्न भेदाची गोष्टी । बोलू नये । एका जनार्दनी । धरिता भेद मनी । दुर्हावले येथुनी । निंदक जाण ।
भावार्थ:
जेव्हा धर्माची अवनती होते आणि अधर्माचे प्राबल्य वाढते, तेव्हा संतांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. हरिभक्ति व नामस्मरण या साधनांनी जड जीवांचा उध्दार करणे व वेद वाणीचे प्रतिपादन करून कर्म योगाचे महत्त्व वाढवणे या दोन गोष्टी संताना कराव्या लागतात. नास्तिकता वाढवणारी पाखंडी मते व कर्मठता यांचा हरिभजनाने निरास करण्याचा प्रयत्न करावा लागतो. अर्जुनासारख्या भक्तांना विश्वरुप दाखवण्यासाठी नविन दृष्टी देवून भगवंतानी त्याच्या मनातील सर्व संशय, भेदाभेद नाहिसे केले. असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, मनातले सर्व भेद नाहिसे झाले तर चित्त परमेश्वरी शक्तीशी एकरूप होते आणि निंदक दुरावतात. 

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2025

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP